Home world news marathi Breaking News: भारत पाकिस्तान युद्ध थांबलं! शस्त्रसंधीसाठी दोन्ही देश तयार; नेमकं काय...

Breaking News: भारत पाकिस्तान युद्ध थांबलं! शस्त्रसंधीसाठी दोन्ही देश तयार; नेमकं काय झालं?

8
0

Source :- ZEE NEWS

Indian Pakistan War Update: भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध अखेर थांबलं आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. आज (शनिवारी) दुपारी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधीची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सर्वात आधी ही माहिती दिली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने अधिकृतपणे याला दुजोरा दिला. 

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त करत प्रत्युत्तर दिलं. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात असताना, भारताने मात्र ते परतून लावले आहेत. मात्र आता भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“अमेरिकेने मध्यस्थी केल्याने रात्रभर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि आपल्या हुशारीचा वापर केल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची पोस्ट

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनीही पोस्ट शेअर करत याला दुजोरा दिला आहे. “पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

भारताकडून दुजोरा

भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशांनी थेट चर्चा केली. पाकिस्तानच्या डीजीएमओने आज दुपारी फोन सुरू केला, त्यानंतर चर्चा झाली आणि समझोता झाला. इतर कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिसरी यांनी दिली आहे. 

पाकिस्तानच्या डीजीएमओने दुपारी 3.30 वाजता चर्चेसाठी पुढाकार घेतल्यानंतर भारताच्या डीजीएमओशी बोलणं झालं. या चर्चेत दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारचे हल्ले रोखण्यावर सहमती झाली. दरम्यान 12 मे रोजी 12 वाजता पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

“भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे, ती पुढेही कायम राहील,” असं भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं आहे. 

SOURCE : ZEE NEWS