Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
आजचा स्मार्टफोन फक्त फोटो काढत नाही, तर तो आपल्या आठवणी ‘री-डिझाईन’ करतोय. साध्या उजेडापासून ते चेहऱ्याच्या रचनेपर्यंत, AI आता पडद्यामागे आपल्याला बदलत आहे. हे फोटो दिसायला सुंदर तर आहेत, पण यामुळे आपण जगाकडे पाहण्याची आपली खरी दृष्टी हरवून बसतोय का? हाच खरा प्रश्न आहे.
तुम्ही फोनने चंद्राचा फोटो काढता तेव्हा तो स्पष्ट येतो का? मग तुम्ही सॅमसंग गॅलेक्सीचं 100x Space Zoom फीचर नक्कीच पाहिलं असेल. अगदी छोट्या लेन्स असूनही हे फीचर चंद्राला इतक्या जवळून टिपतं की आयफोनचे फोटोही फिके वाटतील.
पण जरा थांबा…. यामध्ये एक ट्विस्ट आहे ते म्हणजे सॅमसंगचे हे ‘मून फोटोज’ पूर्णपणे खरे नसतात, ते AI ने बनवलेले असतात.
फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC
एका रेडिट युजरने हे सिद्धच करून दाखवलं. त्याने संगणकावर चंद्राचा एक मुद्दाम पुसट आणि अस्पष्ट फोटो लावला आणि समोर सॅमसंगचा फोन धरला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फोनने चक्क एका स्पष्ट चंद्राचा फोटो काढला. त्यात असे खड्डे आणि सावल्या दिसत होत्या त्या मूळ फोटोत नव्हत्याच. कंपनी याला ‘डिटेल एन्हान्सिंग फंक्शन’ म्हणते, पण खरं तर सॅमसंगने त्यांच्या AI ला ‘चंद्र ओळखायला’ शिकवलंय, जेणेकरून कॅमेरा जिथे कमी पडतो तिथे AI स्वतःहून डिटेल्स भरून काढतं.
तुमच्या खिशात कोणताही फोन असो, जेव्हा तुम्ही फोटो काढण्यासाठी बटण दाबता, तेव्हा पडद्यामागे अनेक AI टूल्स आणि अल्गोरिदम्स काम करू लागतात. फोटो गॅलरीत सेव्ह होण्यापूर्वीच तुमचा फोन काही सेकंदात लाखो-कोट्यवधी प्रक्रिया पूर्ण करतो.
साधारणपणे, हे सगळं तुमचा फोटो सुंदर आणि नैसर्गिक दिसावा म्हणूनच केलं जातं. पण कधीकधी हे AI इतकं पुढे जातं की, प्रत्यक्षात जे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय त्यापेक्षा फोटो पूर्णपणे वेगळाच येतो. म्हणून पुढच्या वेळी फोटो काढताना लक्षात ठेवा की तुमचा कॅमेरा जे दिसतंय तेच टिपतोय की आपल्याला हवं तसं जग ‘एडिट’ करून दाखवतोय?
ग्लास इमेजिंगचे मुख्य कार्यकारी झिव अतार )त्यांनी आयफोनच्या ‘पोर्ट्रेट मोड’वर काम केलंय) ते याला ‘कॉम्प्युटेशनल फोटोग्राफी’ म्हणतात. तुमचा फोन फक्त फोटो काढत नाही, तर तो एक अंदाज बांधतो आणि तुमच्यासाठी एक ‘परफेक्ट’ फोटो तयार करतो.
सॅमसंगच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे की, ‘आमचे AI फीचर्स फोटोची गुणवत्ता वाढवण्यासाठी आहेत, जेणेकरून फोटोची नैसर्गिकता टिकून राहील. तसेच, फोन वापरणाऱ्यांना ही फीचर्स बंद ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, तुम्ही ही मोठी AI फीचर्स बंद केले तरीही, तुम्ही काढलेल्या प्रत्येक फोटोवर बॅकग्राउंडमध्ये अनेक ‘अल्गोरिदम्स’ म्हणजेच तांत्रिक प्रक्रिया सतत काम करतच असतात.
जेव्हा तुम्ही फोनवर फोटो क्लिक करता तेव्हा तुम्हाला वाटतं तुम्ही एकच फोटो क्लिक केलाय.. पण प्रत्यक्षात तुमचा फोन एका सेकंदात 4 ते 10 वेगळे फोटो काढतो.
हे सर्व फोटो एकत्र करून फोन एक असा ‘परफेक्ट’ फोटो तयार करतो, जो एका साध्या फोटोपेक्षा कितीतरी पटीने सरस असतो. यातील काही फोटो अगदी सारखेच असतात, तर काही फोटोंमध्ये चित्राच्या वेगवेगळ्या भागांवर जास्त भर दिलेला असतो. असं झिव अतार सांगतात.
फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC
तुमचा फोन फोटोमधल्या अशा बारीक-सारीक चुका स्वतःहून सुधारतो, ज्या आपल्याला नको असतात. जसं की, फोटोतला ‘ग्रेन्स’ काढून तो स्मूथ करणं किंवा रंग अधिक नैसर्गिक दिसण्यासाठी त्यात सुधारणा करणं. यात HDR नावाचं एक खास फीचर असतं, ते उजेड आणि सावलीचा परफेक्ट समतोल राखतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फोनला ‘धूसर’ किंवा ‘ब्लर’ फोटो अजिबात आवडत नाहीत त्यामुळे फोटो एकदम स्पष्ट आणि शार्प येण्यासाठी तो पडद्यामागे खूप मेहनत घेतो.
उदाहरण घ्यायचं झालं तर, आयफोनमध्ये ‘डिप फ्यूजन’ नावाचं एक फिचर असतं. हे फिचर अशा AI वर आधारित आहे ज्याने चक्क करोडो फोटोंचा अभ्यास केलाय. हे तंत्रज्ञान तुमच्या फोटोतली प्रत्येक वस्तू ओळखतं आणि त्यानुसार बदल करतं. म्हणजे आकाशासाठी वेगळे फिल्टर्स आणि चेहऱ्यासाठी वेगळी सेटिंग्ज.
हे AI प्रत्येक पिक्सेलवर इतक्या बारकाईने काम करतं की, तुम्हाला एक परफेक्ट फोटो मिळतो. यालाच तज्ज्ञ ‘हाय-लेव्हल सेगमेंटेशन’ असं म्हणतात.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे, प्रकाश चांगला असेल तर फोटो एकदम चकाचक आणि स्पष्ट येतात. पण काही तज्ज्ञ आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्या लोकांचं म्हणणं असं आहे की, आताचे फोन जरा जास्तच अति करतात. यामुळे कधीकधी फोटोमध्ये एक विचित्र ‘प्लास्टिक’ सारखा फील येतो किंवा फोटो एखाद्या वॉटर कलर पेंटिंगसारखा सपाट दिसू लागतो.
फोटोमधील चुका काढण्याच्या नादात फोन कधीकधी इतकी मेहनत घेतो की, तुम्ही जर फोटो झूम करून पाहिला तर त्यात चक्क विचित्र आणि चुकीचे बदल दिसू लागतात ज्याला आपण ‘AI भ्रम’ (hallucinations) म्हणू शकतो.
नवीन फोनच्या या ‘ओव्हर-पॉलिश’ फोटोंना कंटाळून आता काही लोक पुन्हा जुने मॉडेल्स वापरू लागले आहेत, तर काही जण फक्त चांगले फोटो काढण्यासाठी सोबत दुसरा कॅमेरा किंवा जुना फोन बाळगत आहेत.
लोकांनी त्यांचे ‘खरे क्षण’ आहे तसे टिपले पाहिजेत आणि त्या आठवणी पुन्हा पुन्हा अनुभवल्या पाहिजेत, हेच आमचे ध्येय आहे.
AI ही प्रगतीची संधी असली तरी, फोटोग्राफीचा मूळ आत्मा जपला पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणूनच आमचा प्रयत्न असा असतो की, आमचे फोन आकर्षक पण वास्तववादी फोटो काढतील आणि वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीनुसार बदल करण्याची सोयही देतील.
फोटो स्रोत, Getty Images
“याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोनसुद्धा आहे. जर तुम्ही कुशल असता आणि तुमच्याकडे वेळ असता, तर हे सर्व बदल तुम्ही स्वतः हाताने करू शकला असता. पण आता त्यासाठी मेहनत घेण्याऐवजी ‘ऑटोमेशन’ आले आहे. न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर लेव्ह मॅनोविच म्हणतात की, ‘ज्या गोष्टी आधी फक्त प्रोफेशनल फोटोग्राफर्सनाच जमत होत्या, त्या आता सामान्य लोकही सहज करू शकतात.’
पण त्याच वेळी, तुमचा फोन तुमच्या आठवणी कशा दिसाव्यात याबद्दल स्वतःच ‘कलात्मक’ निर्णय घेत असतो. अनेकदा वापरकर्त्यांना याची कल्पनाही नसते की फोन पडद्यामागे काय करतोय आणि काही फोनमध्ये तर AI फक्त साधे बदल न करता, फोटो पूर्णपणे बदलून टाकत असते.”
केंब्रिज विद्यापीठातील ग्राफिक्स विषयाचे प्राध्यापक राफल मांतियुक यावर आपले मत मांडताना म्हणतात की “माझा असा विश्वास आहे की, स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांना लोकांना जे दिसतंय, तेच फोटोत उतरवायचं असतं. बनावट फोटो बनवण्याचा त्यांचा हेतू नसतो. पण एखादा फोटो शेवटी कसा दिसावा, याचे बरेचसे ‘क्रीएटीव्ह’ निर्णय फोन स्वतः घेत असतो. तुम्हाला माहीतच असेल की, प्रत्येक फोनची एक स्वतःची वेगळी स्टाईल असते. जसं की ‘पिक्सेल’ फोनची एक वेगळी स्टाईल आहे, तर ‘ॲपल’ फोनची वेगळी. हे अगदी वेगवेगळ्या फोटोग्राफर्ससारखं आहे, ज्यांची फोटो काढण्याची पद्धत निराळी असते.
खरं तर या वादामागे एक जुनी विचारसरणी आहे, ती म्हणजे ‘खरा’ फोटो म्हणजे जुन्या फिल्म कॅमेऱ्यासारखाच असायला हवा. पण ही तुलना करणं थोडं चुकीचं ठरेल. सुरुवातीपासूनच प्रत्येक कॅमेरा फोटो काढताना स्वतःहून काही ना काही बदल करतच आला आहे.
‘AI’ म्हटलं की आपल्याला वाटतं काहीतरी खोटं घडतंय. पण बऱ्याचदा हे तंत्रज्ञान फक्त फोनच्या छोट्या लेन्समुळे येणाऱ्या त्रुटी सुधारण्याचं काम करत असतं. पण हो, आता काही फीचर्स मात्र या सगळ्या मर्यादा ओलांडून खूप पुढे गेले आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
चायनीज ब्रँड्सच्या फोनमध्ये हे ‘ब्युटी फिल्टर्स’ आधीच सेट केलेले असतात. तुम्ही फोटो काढला की फिल्टर्स आपोआप तुमची त्वचा गुळगुळीत करतात, रंग बदलतात आणि चक्क चेहऱ्याची ठेवणही सुधारतात.
अत्तार म्हणतात की, ‘हे पूर्णपणे काल्पनिक आहे.
हे AI इतकं पुढे गेलंय की, कॅमेरा जर एखादी गोष्ट स्पष्टपणे टिपू शकला नाही म्हणजे जर फोटोमध्ये तुमची भुवई स्पष्ट दिसत नसेल, तर ते तिथे स्वतःहून केस ‘ड्रॉ’ करतं इतकंच नाही, तर बॅकग्राउंडमध्ये असलेल्या लोकांच्या डोळ्यांच्या बाहुल्या सुद्धा ते स्वतःच्या मनाने तयार करतं.
हे म्हणजे जे तिथे नाहीये, ते तिथे दाखवण्यासारखं आहे. तज्ज्ञांच्या मते, हे त्या त्या संस्कृतीच्या आवडीनुसार केलं जातं. मात्र, ॲपल किंवा गुगलसारख्या कंपन्या यापासून लांब राहतात. उलट, गुगलने मानसिक आरोग्याचं कारण देत आपल्या फोनमधील हे फीचर्स आधीच बंद केले आहेत.
सौंदर्य वाढवणं हे काही आजचं काम नाहीये, असं मॅनोविच सांगतात. 1850 पासून फोटोग्राफर्स फोटोमध्ये फेरफार करून चेहरा सुंदर बनवत आले आहेत. पण जो सीन तिथे नव्हताच, त्याचे डिटेल्स फोनने स्वतःहून भरणं ही मात्र अगदी नवीन गोष्ट आहे. हे तंत्रज्ञान आता केवळ फोटोग्राफी उरलेलं नाही, तर त्याही पुढे गेलं आहे.
हा फक्त विचारांचा किंवा तत्वज्ञानाचा विषय नाही. संशोधनातून असं समोर आलंय की, AI ने एडिट केलेले फोटो आणि व्हिडिओ आपल्या मनात खोट्या आठवणी निर्माण करू शकतात किंवा आपल्या स्वतःच्या शरीराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतात.
फोटो स्रोत, Getty Images
आता अमेरिकन कंपन्यांनीही AI फोटोग्राफीमध्ये मोठे बदल घडवणारे फीचर्स आणले आहेत. उदाहरणार्थ, गुगल पिक्सेल फोनमध्ये ‘Best Take’ नावाचं एक फीचर आहे. आपल्या सगळ्यांसोबत असं अनेकदा होतं की, ग्रुप फोटो काढताना कोणीतरी डोळे मिटतं किंवा हसायलाच विसरतं. गुगलच्या या फीचरमुळे तुम्ही एकाच वेळी अनेक फोटो काढू शकता आणि नंतर वेगवेगळ्या फोटोंमधून प्रत्येकाचा सर्वात छान चेहरा निवडून एक ‘परफेक्ट’ फायनल फोटो तयार करू शकता.”
फोटो तर छान येतो, पण तो असा एक क्षण असतो जो वास्तवात कधी अस्तित्वातच नव्हता. तरीही मांतियुक म्हणतात त्याप्रमाणे, ‘तुम्हाला कदाचित तो क्षण इतकाच सुंदर लक्षात ठेवायला आवडेल.’ शेवटी तो मित्रांसोबतचा किंवा फॅमिली फोटो आहे, काही कोर्टात सादर करायचा पुरावा नाही.
खरेपणा’ जपूनच आम्ही आमचा पिक्सेल कॅमेरा तयार करतो, असं गुगलने म्हटलंय. आम्ही स्वतः फोटोग्राफीचे चाहते आहोत. त्यामुळे मोबाईल कॅमेऱ्यातून लोकांना जे साध्य करायचं असतं, ते शक्य करून देणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे.”
जर तुम्हाला तुमच्या फोनमधील AI कडून सुधारलेला फोटो नको असेल, तर तुम्ही HDR, ब्युटी फिल्टर्स आणि सॅमसंगचे ‘Scene Optimizer’ सेटिंग बंद करू शकता. पण जर तुम्हाला कॅमेरा सेन्सरने टिपलेला अगदी मूळ आणि नैसर्गिक फोटो हवा असेल, ज्याला AI ने अजिबात स्पर्श केलेला नाही, तर त्यासाठी तुम्हाला काही वेगळ्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.”
सॅमसंगच्या नवीन फोन्समध्ये ‘Pro Mode’ वापरून तुम्ही अगदी नैसर्गिक फोटो काढू शकता. पण आयफोनचं ‘ProRAW’ फीचर पूर्णपणे Raw नसतं, त्यात थोडं AI प्रोसेसिंग असतंच. जर तुम्हाला आयफोनवर अस्सल Raw म्हणजे खरा फोटो हवा असेल, तर तुम्हाला ‘Adobe Lightroom’ किंवा ‘VSCO’ सारखी वेगळी ॲप्स वापरावी लागतील.
अस्सल ‘Raw’ फोटो म्हणजे काढलेला खरा फोटो दिसायला कदाचित ‘परफेक्ट’ नसतील, पण ते खरे असतात. त्यात स्पष्टता कमी असेल किंवा रंग थोडे फिके असतील, पण त्यांना एक वेगळाच ‘रेट्रो’ लूक असतो. ‘मॅनोविच यांच्या मते, अधूनमधून अशी रॉ फोटोग्राफी करणं फायद्याचं आहे. यामुळे आपल्याला हे समजतं की आपला फोन प्रत्यक्षात काय करतोय आणि आपण जे फोटो काढतोय त्यांचं खरं स्वरूप काय आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



