Home LATEST NEWS ताजी बातमी वारकरी संप्रदायातील ‘घुसखोरी’च्या टीकेमुळे ठिणगी; जाणून घ्या, मूळ वारकरी संप्रदायाचा प्रवास

वारकरी संप्रदायातील ‘घुसखोरी’च्या टीकेमुळे ठिणगी; जाणून घ्या, मूळ वारकरी संप्रदायाचा प्रवास

11
0

Source :- BBC INDIA NEWS

वारकरी

फोटो स्रोत, Getty Images

अलीकडच्या काळात वारकरी संप्रदायाच्या संदर्भाने सतत वाद होताना दिसत आहेत. आता वारकरी संप्रदायातील घुसखोरी चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यामुळे मूळ वारकरी कोण? आणि वारकरी संप्रदाय नेमका काय आहे ? याविषयी लोक समजून घेत आहेत.

मुळात वारकरी संप्रदायातील संतपरंपरेची सुरुवात झाली ती तेराव्या शतकापासून. तेराव्या शतकाच्या अगोदरही विठ्ठल हे दैवत, पंढरपूर हे क्षेत्र आणि वारीची परंपरा होती.

या वारकरी परंपरेला तात्त्विक अधिष्ठान देण्याचं काम तेराव्या शतकात संतांनी केलं. त्यापूर्वी महाराष्ट्रातील समाजजीवनाची स्थिती अत्यंत विदारक होती.

हेमाद्री हा वैदिक पंडित चातुर्वर्ण्याचा आणि यज्ञयागादी वैदिक कर्मकांडाचा पुरस्कर्ता होता. त्याने ‘चतुर्वग चिंतामणी’ नावाचा ग्रंथ लिहून त्यातून हजारो कर्मकांडाचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे.

या हेमाद्रीचा तत्कालीन राजसत्तेवर मोठा प्रभाव होता. साहजिकच त्या काळात जातिविषमता, स्त्रियांना दुय्यमत्व, कर्मकांडाला उत्तेजन आणि गुरुबाजी वाढत चाललेली होती. या वैदिक वर्णाश्रम धर्माला विरोध करणारे काही पंथ महाराष्ट्रात होते.

त्यात विशेषत्वाने महानुभाव आणि लिंगायत यांचा उल्लेख करावा लागेल. बाराव्या शतकातील हे दोन पंथ वेदप्रामाण्य, चातुर्वर्ण्य आणि कर्मकांडाच्या विरोधात उभे होते. ते सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे होते.

वैदिक धर्मात ज्यांना नीच आणि हीन मानलं गेलं अशा स्त्रियांना आणि शूद्रातिशूद्रांना सन्मान देण्याची या पंथांची भूमिका होती. या दोन्ही पंथांना वैदिकांच्या प्रखर रोषाचा सामना करावा लागला.

महानुभाव पंथातील एका चर्मकाराला चुन्याच्या कळीत बसवून पखालीने पाणी ओतून भाजून मारण्याची शिक्षा दिली गेल्याची घटना ‘लीळाचरित्रा’त आली आहे.

त्याचबरोबर लिंगायत परंपरेतील आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याला हत्तीच्या पायाला बांधून फरफटून मारलं गेलं याचा उल्लेख पाल्कुरिके सोमनाथ यांनी लिहिलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या बसवपुराण चरित्रात त्याचप्रमाणे हरिहराच्या बसवराजदेवर रगळे या चरित्रातही आला आहे.

वारकरी

फोटो स्रोत, Getty Images

लिंगायत, महानुभाव आणि नाथ संप्रदायाचा महाराष्ट्रात प्रभाव

लिंगायत आणि महानुभाव या दोन्ही पंथाचा महाराष्ट्रात प्रभाव होता. त्याचबरोबर त्या काळात नाथ संप्रदायही कार्यरत होता. नाथ संप्रदायाची भूमिकाही सामाजिक समतेची होती.

नाथ संप्रदायाने दलित, भटके विमुक्त आणि स्त्रियांना जवळ केलं. त्यांच्यात आत्मसन्मानाची भावना निर्माण केली. जातिभेदाच्या विरोधात प्रखर मांडणी केली.

नाथ संप्रदायाच्या या योगदानाची मांडणी हजारीप्रसाद द्विवेदी आणि डाॅ. रा. चिं. ढेरे यांनी केलेली आहे.

‘नाथपंथातील सिद्धपुरुषांनी समाजातील दलित व बहिष्कृत वर्गांना आपुलकीने जवळ करुन त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला’ असं गं. बा. सरदार त्यांच्या संतवाड़मयाची सामाजिक फलश्रुती या पुस्तकात म्हणतात.

तर ‘हिंदु – मुस्लिम ऐक्याचा प्रथम प्रणेता, अधोगत भारतीय साधनेचा उद्धारकर्ता, स्त्री शूद्रांचा त्राता, लोकभाषांचा पुरस्कर्ता आणि वर्णाश्रम – शब्दप्रामाण्य – तीर्थयात्रा – व्रतोपवासादी कर्मकांड यांनी कुचंबलेल्या चैतन्यहीन सर्वसाधारण समाजाला आत्मप्रामाण्याची वाट दाखविणारा गुरु गोरक्षनाथ आणि त्याचा नाथ संप्रदाय भारतीय साधनेच्या इतिहासात चिरंजीव झाला आहे’ असं रा. चिं. ढेरे त्यांच्या ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या पुस्तकात म्हणतात.

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी

फोटो स्रोत, FACEBOOK/ SARVADNYA SHI CHAKRDHAR SWAMI

वैदिक वर्णाश्रम धर्माच्या विरोधात महाराष्ट्रात प्रामुख्याने लिंगायत, महानुभाव आणि नाथ संप्रदाय हे तीन प्रवाह कार्यरत होते. यातील नाथ संप्रदाय योगप्रधान असल्याने सर्वसामान्य संसारिक लोक त्यापासून अलिप्त होते.

लिंगायत परंपरा संसारिकांची असली तरी ती प्रामुख्याने कन्नड भाषिकांची असल्यानं कर्नाटक शेजारचा भाग वगळता इतर महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव कमी होता.

महानुभाव पंथ मराठी असला तरी उगम काळातच महाराष्ट्रात वैदिक राजवटीची पकड घट्ट असल्यानं या पंथाच्या प्रसाराला वैदिकांनी विरोध केला. त्याचबरोबर या पंथातील देहदंडनाच्या कठोर साधना आणि संसारत्याग हे त्या वेळच्या सर्वसामान्य लोकांना आचरणात आणण्यासाठी कठीण गोष्टी होत्या.

यासंदर्भात गं. बा. सरदार यांनी महत्त्वाचं विवेचन केलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य संसारिकांना सहजपणे आचरता येईल अशा एका जातिभेदविरोधी भक्तिपरंपरेची महाराष्ट्रात गरज होती. त्यातूनच वारकरी संतपरंपरेचा उगम झाला.

विठ्ठल दैवत, पंढरपूर क्षेत्र आणि नामस्मरण साधना

वारकरी संप्रदायाने विषम वेदाधिकार, बहुदेवतोपासना, यज्ञादी कर्मकांड, जातीविषमता, पुरुषी मानसिकता, गुरुबाजी आणि संन्यास नाकारत एका निर्मळ भक्तीमार्गाची प्रस्थापना केली.

विठ्ठल दैवत, पंढरपूर क्षेत्र आणि नामस्मरण साधना यावर वारकरी संप्रदाय उभा राहिला. तेराव्या शतकात नामदेवराय हे वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार होते.

विठ्ठल

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्या काळात माळी ( सावता), कुंभार (गोरोबा), महार (चोखोबाराय आणि त्यांचे कुटुंबीय), सोनार (नरहरी), गुरव (काशिबा), तेली (जोगा परमानंद), बहिष्कृत (ज्ञानदेवादी भावंडे), ब्राह्मण ( परिसा भागवत, अनंतभट अभ्यंग), सुतार (भोजलिंगकाका, जाल्हण) असे अनेक जातीतील संत होते. त्याचबरोबर विसोबा खेचर, चांगदेव असे नाथ संप्रदायिकही वारकरी संप्रदायात सामील झाले.

वारकरी संप्रदायाने स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीने परमार्थाचा अधिकार देण्याची भूमिका घेतली. जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, निर्मळा अशा संत स्त्रियाही वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करत होत्या.

वारकरी संप्रदायातील हे बहुतेक संत प्रापंचिक होते. त्यांनी त्यांच्या नाममुद्रेने अभंगांची रचना केली. त्यांचे अभंग लोकप्रिय झाले.

एकनाथ महाराज-तुकोबारायांचा वारसा

तेराव्या शतकात वारकरी संप्रदायाचा वेगाने प्रसार झाला. त्यानंतर पुढच्या काळात सेना न्हावी, दामाजीपंत, लतिफ, शेख महंमदबाबा, कान्होपात्रा, चांद बोधले, जनार्दन स्वामी असे संत झाले.

त्याचबरोबर नामदेवरायांच्या प्रभावाने उत्तर भारतात संतांची परंपरा उभी राहिली. त्यातील कबीर, रोहिदास, मीराबाई, धन्ना जाट, सूरदास, नरसी मेहता अशा हिंदी भाषिक संतांनाही वारकरी संप्रदायानेही स्वीकारलं.

त्यानंतर एकनाथ महाराज आणि तुकोबाराय हे वारकरी संप्रदायातील दोन महान संत झाले. एकनाथांनी थेट कृतिशीलपणे अस्पृश्यता, जातिभेद आणि कर्मकांडाला विरोध केला.

त्याचबरोबर तुकाराम महाराजांनीही त्यांच्या अभंगातून वैदिक पंडित आणि एकूणच समाजातील ढोंगबाजी यावर प्रखर प्रहार केले. एकनाथ महाराज आणि तुकोबाराय या दोन्ही संतांना वैदिक पंडितांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

श्रीधरमहाराज मोरे हे संत तुकारामांचे वंशज होते.

फोटो स्रोत, TUKARAM.COM

तुकाराम महाराजांच्या चरित्र आणि अभंगांचा प्रभाव महाराष्ट्रभर पसरला. त्यातून तुकोबारायांची मोठी प्रभावळ निर्माण झाली.

विविध जातीजमातील लोक त्यांच्या टाळकऱ्यात होते. त्यात नावजी माळी, सोनबा ठाकूर, संताजी तेली, शिवबा कासार, गवारशेठ वाणी, मालोजी गाडे कुणबी आणि सहा – सातजण ब्राह्मण होते.

त्यांच्या चाहत्यात अनगडशांसारखे फकीरही होते. बहिणाबाईंसारख्या प्रज्ञावंत दार्शनिक स्त्रीही त्यांना गुरू मानत होत्या. काही ब्राह्मण तुकोबारायांना गुरू मानत असत त्यामुळे वैदिक पंडित खवळले.

एका कुणबी संतांला ब्राह्मण लोक गुरु मानतात आणि नमस्कार करतात ही बाब त्यांच्या दृष्टीने भयंकर होती. त्यासाठीच तुकोबारायांवर खटले भरले गेले.

बहिणाबाई ब्राह्मण असून तुकोबांना गुरु मानतात म्हणून त्यांच्याविरुद्ध पुण्याच्या आप्पाजी गोसावी यांच्याकडे मंबाजीने तक्रार केल्याचा उल्लेख बहिणाबाईंच्या आत्मचरित्रात आला आहे.

आप्पाजी गोसावी पुण्यात राहत।

जो अति विख्यात राजयोगी॥१॥

तयाप्रती पत्र मंबाजी पाठवी।

तुकोबा गोसावी शूद्र वाणी॥२॥

कथा करितसे देऊळी सर्वदा।

द्विज त्याच्या पदा लागताती॥३॥

रामेश्वरभट अतियोगी थोर।

तेही नमस्कार त्यासी करिती॥४॥

आम्हासी अन्याय हाची थोर वाटे।

होत असे खोटे वेदवाक्य॥५॥

तुकोबारायांचे आणि बहिणाबाईंचे अभंग या समकालीन साधनांसह पुढच्या काळात तुकोबारायांचे पणतू गोपाळबुवा देहूकर आणि संतचरित्रकार महिपती यांनी लिहिलेल्या तुकोबारायांच्या चरित्रातही त्यांच्यावर धर्मपीठाकडे भरल्या गेलेल्या खटल्यांचे संदर्भ नोंदवले गेलेले आहेत.

तुकोबारायांनंतर वारकरी संप्रदायाची धुरा त्यांच्या प्रभावळीतील संतांनी सांभाळली. त्यांचे बंधू कान्होबा, कीर्तनकार जयरामस्वामी वडगांवकर, शिष्य बहिणाबाई, मुलगा नारायण महाराज, कचेश्वर भट ब्रह्मे आणि निळोबाराय हे वारकरी संप्रदायातील अखेरचे संत होते.

पुढच्या काळात वारकरी संप्रदायाचे जतन विविध स्वरुपात होत राहिले. याच काळात पेशवाईचा उगम झाला.

उत्तर पेशवाईत जातिभेदाने टोक गाठले. ब्राह्मणश्रेष्ठत्वाने उचल खाल्ली. त्याचा वारकरी संप्रदायावरही परिणाम झाला.

तुकोबारायांच्या अभंगांना शूद्रकवन म्हणून पेशव्यांनी अपमानित करण्याचा प्रयत्न केला. पेशव्यांच्या या जातीय मनोवृत्तीच्या विरोधात मोरोपंतांनी आर्या लिहिली.

तुकाराम महाराज

फोटो स्रोत, Aishwarya Tendulkar

सूज्ञ शिवाजी राजा न म्हणे तुकयास काय साधू निका।

तत्पंडितप्रधाना न कळे गुण समज फार आधुनिका॥

भक्तिरसिक शूद्रकवन म्हणवूनि कशास नाक वाहेल।

भगवत्पदप्रसादा बुध जेवि तयास नाक वाहेल॥

श्रीवर्धन या पेशव्यांच्या मूळ गावी ‘तुकाराम तुकाराम’ असं तुकोबारायांच्या नावाने कीर्तनात भजन करण्यालाही विरोध केल्याची घटना नोंदवली गेली आहे.

कीर्तनकार बापाजी गोसावी यांनी श्रीवर्धनच्या लक्ष्मीनारायण देवळात श्रोत्यांना ‘तुकाराम तुकाराम’ असं भजन करायला सांगितलं. त्यावेळी ब्राह्मण श्रोत्यांनी त्यावर आक्षेप घेत आम्ही उच्चवर्णीय असल्यामुळे तुकारामांच्या नावाचे भजन करणार नाही असं म्हणत वाद घातला.

त्याविरोधात जंजिरे सरकारात तक्रारही दाखल केली. त्या तक्रारीचा कागद वि. का. राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळासमोर वाचला आणि ‘देहूकर तुकारामांच्या योग्यतेबद्दल तंटा’ या शीर्षकाने तो छापला.

उत्तर पेशवाई, इंग्रजांच्या काळातला वारकरी समाज

उत्तर पेशवाईतला हा काळ वारकरी संप्रदायासाठी अत्यंत प्रतिकूल होता. या काळात वारकरी संप्रदायात फडकऱ्यांचा प्रवाह महत्त्वाचा आहे.

वासुदेव महाराज देहूकर, शंकरस्वामी शिऊरकर, मल्लाप्पाण्णा वासकर, गंगुकाका शिरवळकर, बाबासाहेब आजरेकर आणि गुरुजीबुवा राशिनकर असे अनेक फड वारकरी संप्रदायात कार्यरत झाले. उखळीकर, जळगांवकर, ठाकूरबुवा, नामदास, धोंडोपंत दादा अशा फडांनीही वारकरी संप्रदायाचे जतन – संवर्धन करण्यात योगदान दिले.

चातुर्मासात पंढरपुरात भजन करणाऱ्या काही भजनी परंपराही होत्या. त्यात चातुर्मासे, अंमळनेरकर, देगलूरकर, चोपडेकर आणि कुकुरमुंडेकर अशा काही परंपरा आहेत.

पेशवाई संपून नंतर इंग्रजांची राजवट आली. या काळात आपल्या समाजाचं आधुनिकीकरण झालं.

वारकरी

फोटो स्रोत, Getty Images

त्या आधुनिकीकरणाला प्रतिसाद देण्यात पारंपरिक वारकरी कमी पडले. याच काळात वारकरी संप्रदायात काही वेदांती मंडळी दाखल झाली. त्यांनी वारकरी संतवाड़मयाचा वेदांती चौकटीत अर्थ लावण्याचा प्रघात पाडला.

त्यामुळे वारकरी संप्रदायाशी विसंगत जातिभेद, कर्मकांड, गुरुबाजी, परधर्मद्वेष, अस्पृश्यता, ब्राह्मणश्रेष्ठता, महिलांना दुय्यमत्व अशा गोष्टी वारकरी संप्रदायात बळकट होत गेल्या.

त्याला विरोध करत मूळ वारकरी संतविचार उजागर करणाऱ्या काही परंपराही वारकरी संप्रदायात निर्माण झाल्या. दादा महाराज सातारकर, गणपती महाराज, गाडगेबाबा आणि कैकाडीबाबा यांनी वारकरी संप्रदायाच्या मूळ समतावादी विचारांचा आग्रह धरला.

दादा महाराज सातारकर यांच्या परंपरेतील गो. शं. राहिरकर, रं. वा. टण्णू गुरुजी, डाॅ. भा. पं. बहिरट आणि बाबाजी परांजपे अशा अभ्यासकांनी वैदिक धर्म आणि वारकरी भागवत धर्म यातील वैचारिक भेद स्पष्टतेसह ठामपणे मांडले.

वैदिक विचारधारा आणि वारकरी विचारधारा यातील भेद संतविचारांच्या अंगाने उलगडून दाखवण्यात या वारकरी अभ्यासकांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

संतविचारांचे अनुसरण करणारे दोन महत्त्वाचे सत्याग्रह

वारकरी संप्रदायाच्या इतिहासात संतविचाराला अनुसरुन दोन महत्त्वाचे सत्याग्रह अलीकडच्या काळात झाले. वारकरी संप्रदायात संतविचाराशी विसंगत अस्पृश्यता निर्माण झाली होती. पंढरपूर, आळंदी आणि देहू या क्षेत्रांच्या प्रमुख वारकरी मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी साने गुरुजींनी सत्याग्रह केला आणि मंदिर खुले झाले. त्यानंतर आळंदी – देहूची मंदिरेही दलितांसाठी खुली झाली.

1958 साली विनोबांच्या पुढाकाराने पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अहिंदूनांही खुले झाले. पुढे 1978 साली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात दलित दिंड्यांना जी अस्पृश्यतेची वागणूक मिळत होती त्या विरोधात चर्मकार समाजाच्या हराळे वैष्णव दिंडीने सत्याग्रह केला.

त्यानंतर 1978 सालापासून दलित जातीतील वारकऱ्यांच्या दिंड्यांना पालखी सोहळ्यात सामावून घेतले गेले.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी साने गुरुजींनी सत्याग्रह केला आणि  मंदिर खुले झाले.

फोटो स्रोत, Sane Guruji Smarak Samiti, Pandharpur

वारकरी संप्रदाय ही एक लोकपरंपरा आहे. या लोकपरंपरेने महाराष्ट्राच्या समाजमनाची मशागत केली. महाराष्ट्रात जे स्वराज्य उभं राहिलं त्यात वारकरी संतांचंही योगदान आहे.

संतांनी समाजात एकोपा, समता आणि बंधुभाव निर्माण केला होता. त्याचा फायदा स्वराज्यनिर्मितीसाठी झाला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या प्रवाहावरही संतविचारांचा प्रभाव होता. प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाजातले धुरीण संतविचारांच्या संस्कारातून घडलेले होते.

वारकरी संप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्रव्यापी आहे. साहजिकच त्याचे पडसाद आता राजकारणातही उमटत आहेत.

राजकीय पक्ष त्यांची विचारधारा वारकरी संप्रदायावर थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे क्रिया – प्रतिक्रिया असे वाद उद्भवत आहेत.

कीर्तनातून त्यांच्या सोयीच्या राजकीय पक्षाला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष समर्थन मिळेल अशी मांडणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यातच व्यावसायिक कीर्तनकारांचा भरणा झाल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

वारकरी संप्रदायातील वाढता राजकीय हस्तक्षेप ही चिंतेची बाब झालेली आहे. सप्ताहात करोडो रुपयांच्या अपहाराच्या घटना सतत घडत आहेत. महराष्ट्राचं समाजमन घडवणाऱ्या वारकरी संप्रदायाला यातून मार्ग काढावा लागणार आहे.

(लेखक वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आहेत. ‘होय होय वारकरी’ या पुस्तकाचे लेखक आहेत. लेखातील मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. )

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC