Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
जपानमधील एका लोकप्रिय प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यानं त्याच्या पत्नीचा मृतदेह प्राणीसंग्रहालयाच्याच कचरा जाळण्याच्या भट्टीत (इनसिनरेटर) टाकल्याचा गंभीर आरोप झाला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली.
त्यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनानं उन्हाळ्याच्या हंगामासाठी हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांना खुले करण्याचं पुढे ढकललं आहे. याबाबत स्थानिक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिलं आहे.
जपानच्या उत्तर भागातील असाहिकावा शहरातील ‘असाहियामा प्राणीसंग्रहालया’तील ही घटना आहे. 3 आठवडे प्राणीसंग्रहालय देखभालीसाठी बंद ठेवण्यात आल्यानंतर, जपानमधील गोल्डन वीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुट्टीच्या काळासाठी बुधवारी (29 एप्रिल) हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी खुलं केलं जाणार होतं.
मात्र, शहराच्या प्रशासनानं म्हटलं आहे की, तपास सुरू असल्यामुळे आता हे प्राणीसंग्रहालय शुक्रवारपर्यंत (1 मे) बंद राहणार आहे.
प्राण्यांचे मृतदेह जाळायच्या भट्टीत टाकला पत्नीचा मृतदेह
गेल्या आठवड्यात या प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यानं त्याच्या पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट कचरा जाळण्याच्या भट्टीत लावल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात शोध घेतला, असं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं.
प्राण्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ही भट्टी वापरली जात होती.
‘असाहियामा प्राणीसंग्रहालय’ हे जपानमधील सर्वात लोकप्रिय प्राणीसंग्रहालयांपैकी एक आहे. ते 1967 मध्ये सुरू झालं होतं.
हे प्राणीसंग्रहालय काचेचे बंदिस्त डोम किंवा घुमट, वरच्या बाजूला असलेले पिंजरे (ओव्हरहेड केज), त्या खालून पर्यटकांना जातं येणं, यासारख्या नेहमीपेक्षा वेगळ्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. यामुळे पर्यटकांना अगदी जवळून प्राण्यांना पाहता येतं.
दरवर्षी या प्राणीसंग्रहालयात 10 लाखांहून अधिक पर्यटक येतात. उन्हाळी हंगामासाठी तयारी करण्यासाठी म्हणून देखभालीच्या कामासाठी हे प्राणीसंग्रहालय 8 एप्रिलपासून बंद आहे.
मैत्रिणीनं तक्रार नोंदवल्यावर पोलिसांकडून तपास सुरू
स्थानिक वृत्तांनुसार, या महिलेच्या मैत्रिणीनं ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याच्या पत्नीचा शोध घेणं सुरू केलं.
प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी ते बंद ठेवल्यानं होणाऱ्या पर्यटकांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर त्यांनी असा इशाराही दिला आहे की, जर तपासात आवश्यकता भासली, तर प्राणीसंग्रहालय कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बंद केलं जाऊ शकतं.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
हिरोसुके इमाझू, असाहिकावा शहराचे महापौर आहेत. त्यांनी मंगळवारी (28 एप्रिल) एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, अधिकारी आता एका ‘अभूतपूर्व संकटा’ला तोंड देत आहेत.
“असं घडेल याचा अंदाज कोणीही वर्तवू शकलं नसतं. मला खूप चिंता वाटते आहे. मी एका अभूतपूर्व संकटाला तोंड देतो आहे,” असं हिरोसुके इमाझू म्हणाले.
“आम्ही तुमच्या स्वागताची तयारी करत आहोत. त्यामुळे पार्कमध्ये जास्तीत जास्त लोक येतील अशी आम्हाला आशा आहे,” असं पुढे ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC



