Home LATEST NEWS ताजी बातमी ‘शिवाजी कोण होता?’ असं नाव पुस्तकाला देण्यामागे गोविंद पानसरेंची भूमिका काय होती?

‘शिवाजी कोण होता?’ असं नाव पुस्तकाला देण्यामागे गोविंद पानसरेंची भूमिका काय होती?

24
0

Source :- BBC INDIA NEWS

शिवाजी कोण होता पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि गोविंद पानसरे

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

“आपलं ज्या व्यक्तीवर अत्यंत प्रेम असतं, अशा व्यक्तिबद्दल आपण अगदी सहजपणे आपल्या भावना व्यक्त करतो. आपण सर्वात जास्त प्रेम आईवर करतो आणि आपण आईला अहो-जाहो बोलायला लागलो तर ते जसं कृत्रिम वाटेल तसंच हे आहे.”

हे वाक्य आहे ‘शिवाजी कोण होता?’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे ‘राष्ट्र सेवा दलाचे’ अध्यक्ष असतानाच्या काळात त्यांच्याशी झालेल्या चर्चेत गोविंद पानसरेंनी हे मत व्यक्त केलं होतं. याबाबतची आठवण स्वतः सुभाष वारे सांगतात.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकात शिवाजी असा एकेरी उल्लेख का केला असा आक्षेप घेतला.

गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता या पुस्तकाची चर्चा होत आहे.

या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे लेखक असलेल्या गोविंद पानसरे यांची पुस्तकाला हे शीर्षक देण्यामागे काय भूमिका होती? नावावरील आक्षेपांवर त्यांनी काय म्हटलेलं? हे समजून घेऊयात.

‘शिवाजी कोण होता?’ या शीर्षकामागे पानसरे यांची भूमिका

पुस्तकाच्या शीर्षकासंदर्भात बोलताना गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे म्हणाल्या, “80 च्या दशकात मी विद्यार्थी चळवळीत काम करत होते. तेव्हा कॉ. पानसरे ही व्याख्यानं देत असत.

त्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील पुस्तके, त्यांची चरित्रे यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी भाषणाचेच एक पुस्तक लिहिले. तेव्हाची प्रक्रिया मी पाहिली आहे.”

“ते असं म्हणत की, मी ग्रामीण भागातून आलो आहे. आपली बहुतांशी जनता शेतकरी आहे, ग्रामीण भागात राहते. त्यांचं शिवाजीशी नातं खूप जवळचं आहे.

ते शिवाजी महाराजांना आपलं दुःख समजून घेणारा, आपण किती हलाखीचं आयुष्य जगत आहोत, त्याची जाणीव असणारा आणि आपल्यावर दुःख लादणाऱ्या जुलूमी सत्तेपासून स्वातंत्र्य देणारा, स्वराज्य स्थापन करणारा आपला सखा, आपला बाप मानतात.”

“ते म्हणायचे की, ग्रामीण भागात आई-बापाला आपण बिरूदं लावत नाहीत. त्यांच्यासारखाच शिवाजी आमच्या ह्रदयाच्या खूप जवळ आहे. त्यानं आम्हाला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं, मावळ्यांच्या सोबतीने ते उभं केलं अशा माणसाबद्दल आम्ही आमच्या बापासारखंच बोलू. तो आम्हाला आमच्या बापासारखा आहे.

त्यामुळे त्याचा उल्लेख करताना आम्ही कोणतीही बिरूदं लावत नाही. कारण आम्हाला त्याच्यात आणि आमच्यात अंतर नको आहे,” अशी आठवण मेघा पानसरे यांनी सांगितली.

डॉ. मेघा पानसरे, गोविंद पानसरे

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही आमच्या शिवाजीला शिवबा म्हणायचं की शिवा म्हणायचं की, आणखी काही हे आम्हाला इतरांनी का सांगावं. ज्यांना शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी उपयोग करायचा आहे त्यांनी आम्हाला काय म्हणायचं आहे हे सांगू नये. ते स्वातंत्र्य आम्हाला आहे.”

“आमचं शिवाजीबद्दलचं प्रेम ज्यातून व्यक्त होतं ते नाव आम्ही घेऊ, अशी त्यांची भूमिका होती. काहीही झालं तरी हे नाव मी मागं घेणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं,” असंही मेघा पानसरे नमूद करतात.

‘आई, विठोबा माऊलीचा एकेरी उल्लेख तसा शिवाजी उल्लेख’

सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी ‘आईचा, विठोबा माऊलीचा जसा एकेरी उल्लेख तसा शिवाजी उल्लेख’, अशी भूमिका व्यक्त केली.

ते म्हणाले, “गोविंद पानसरे यांच्या या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दलच्या मोठेपणाचेच वर्णन आहे. जसं आपण आईला किंवा विठोबा माऊलीला ‘अहो-जाहो’ म्हणण्याचा विषयच येत नाही. तेच या पुस्तकात दिसते.

आपल्या प्रेमाच्या लोकांना आपण एकेरीच हाक मारतो. जिथे कृत्रिमता असते तिथे अहो-जाहो बोललं जातं.”

कॉम्रेड गोविंद पानसरे

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

“त्या पुस्तकाचं केवळ शीर्षक न वाचता ते पुस्तक वाचण्याची मेहनत घ्यायला हवी. पुस्तक वाचणाऱ्यांना या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल आदर, आपलेपणा आणि अभिमान असल्याचं दिसेल.”

“गोविंद पानसरे असताना आणि हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हाही शिवाजी महाराजांचा केवळ चलनी नाणं म्हणून वापर करणाऱ्या काही लोकांनी असा वाद केला होता.

मात्र त्याला तितके महत्त्व दिले गेले नाही. मात्र आत्ता हे गृहस्थ आमदार असल्याने याची अधिक चर्चा होत आहे,” असं मत सुभाष वारे व्यक्त करतात.

‘शिवाजी’ असा उल्लेख करणारं हे एकमेव पुस्तक नाही

पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे ‘शिवाजी’ असा उल्लेख पानसरेंचे पुस्तक येण्याआधीही झाल्याचे संदर्भ देत म्हणाल्या, “पानसरे होते, तेव्हाही असे वाद झाले होते.

पण 1988 रोजी हे पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीही 1939 साली गणेश कुऱ्हाडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नावही ‘शिवाजी कोण होता?’ असंच आहे.

शिवाय, प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचं नावही ‘दगलबाज शिवाजी’ असंच आहे.”

प्रबोधनकार ठाकरे यांचे दगलबाज शिवाजी पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि गणेश कुऱ्हाडे यांच्या 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाचे मुखपृष्ठ

फोटो स्रोत, Madhushree Publication

“शिवाजी महाराजांची बहुतांश गाणी, घोषणा, आरत्याही झालेल्या आहेत. त्यात एकेरी उल्लेख आहेत, याचा अर्थ तो अनादर आहे, असा होतो का?” असा प्रश्नही स्मिता पानसरे विचारतात.

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकात नक्की काय आहे?

शिवाजी महाराजांनी तत्कालीन सरंजामशाहीतही नेमकं असं काय काम केलं की त्यांचं आधुनिक लोकशाहीतही कौतुक होतं या प्रश्नाचं उत्तर दिलं.

अनेक राजे होऊन गेले, तरी सर्व राजांची आठवण केली जात नाही हे सांगताना पानसरेंनी शिवाजी महाराज सर्वांच्या आठवणीत राहण्याची विस्तृत कारणं या पुस्तकात मांडली आहेत.

या मांडणीत त्यांनी शिवाजी महाराजांना राज्य वारसाहक्काने मिळालं नाही, तर त्यांनी ‘निर्माण’ केलं, हेही अधोरेखित केलं आहे.

शिवाजी कोण होता पुस्तकाचे मुखपृष्ठ

शिवाजी महाराजांचे कार्य आणि राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला-रयतेला आपले वाटत होते हे सांगताना पानसरेंनी त्याची अनेक उदाहरणे या पुस्तकात नोंदवली आहेत.

यात शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या मृत्यूला कवटाळणाऱ्या सर्वसमाजातील मावळ्यांचाही उल्लेख ते करतात. ही माणसं शिवाजी महाराजांसाठी प्राणाची आहुती द्यायला का तयार झाले यावरही पानसरे भाष्य करतात.

शिवाजी महाराजांनी रयतेची लूट थांबवण्यासाठी वतनदारांबाबत नियम तयार केले, मनमर्जी करवसुलीचा प्रकार बंद केला, शेतकरी आणि शेतीला बळ दिलं, स्त्रियांच्या सन्मानाबाबत ठोस भूमिका घेतली हेही पानसरे या पुस्तकात नमूद करतात.

तसेच आजही गोरगरीब रयतेच्या लेकी-सुनांवर खेडोपाडी आणि शहरातही बलात्कार होतात, पण शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे, उठल्याबसल्या जयघोष करणारे आज काय करतात? असा प्रश्नही पानसरे विचारतात.

शिवाजी महाराजांनी व्यापार-उद्योगाला कसं संरक्षण दिलं, गुलामांच्या व्यापारावर कशी बंदी घातली, त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन काय होता, त्यांच्या सैन्यात कोणत्या जाती-धर्माचे सैनिक होते, इतिहासाचा विपर्यास कोठे आणि कसा केला गेला यावरही पानसरेंनी या पुस्तकात मांडणी केली.

इतकंच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली काही पत्रेही वाचकांसमोर ठेवली आणि शिवाजी महाराज कसे ‘रयतेचा राजा’ होते, हे अधोरेखित केले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC