Home LATEST NEWS ताजी बातमी ‘डिजिटल ट्विन’ म्हणजे काय? ते तुम्हाला ‘सुपरवर्कर’ कसं बनवू शकतं?

‘डिजिटल ट्विन’ म्हणजे काय? ते तुम्हाला ‘सुपरवर्कर’ कसं बनवू शकतं?

13
0

Source :- BBC INDIA NEWS

रिचर्ड स्केलेट यांची स्वतःची एक डिजिटल आवृत्ती आहे

फोटो स्रोत, Andy Barnes

‘डिजिटल रिचर्ड’ हे रिचर्ड स्केलेट गेल्या तीन वर्षांपासून तयार करत असलेला त्यांचा ‘एआय ट्विन’ आहे. तो स्क्रीनमध्ये दिसतो, त्यामुळे तो द्विमितीय वाटतो. परंतु, तो सामान्य म्हणजे साधा चॅटबॉट नाही.

‘डिजिटल रिचर्ड’ला स्केलेटला जे काही माहिती आहे, ते सगळं माहीत आहे. त्याला लहान लँग्वेज मॉडेलसारखं तयार केलं असून, चॅटजीपीटीच्या मदतीने रिचर्डच्या मिटिंग्ज, कॉल्स, कागदपत्रं आणि प्रेझेंटेशन्समधील माहिती त्यात भरली गेली आहे. त्यानंतर त्याला स्केलेटसारखं विचार करायला आणि समस्या सोडवायला शिकवलं गेलं.

शेवटी तयार झालेली ही सिस्टिम किंवा प्रणाली म्हणजे एक टेक्स्टवर (मजकूर-आधारित) चालणारी विंडो आहे. स्केलेट त्याचा वापर सल्ला घेण्यासाठी करतात.

त्यामुळे त्यांना व्यवसायाचे निर्णय घ्यायला आणि क्लायंटसमोर प्रेझेंटेशन करायला मदत होते. ते टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सी ब्लूर रिसर्च येथे संशोधन आणि डिझाइनसाठी मुख्य विश्लेषक म्हणून काम करताना याचा उपयोग करतात.

डिजिटल रिचर्ड स्केलेट यांच्या वैयक्तिक आयुष्यातही मदत करतो. त्यात ‘फॅमिली’ आणि ‘ॲडमिन’ असे वेगळे टॅब आहेत, जे इतर सहकाऱ्यांसाठी बंद ठेवलेले आहेत. परंतु, कामाशी संबंधित प्रश्न विचारण्यासाठी डिजिटल रिचर्डचा वापर करू शकतात.

डिजिटल रिचर्डचा वापर आता एक नमुना (ब्लूप्रिंट) म्हणून केला जातो. त्यावरून ब्लूर रिसर्चच्या यूके, युरोप, अमेरिका आणि भारतातील सुमारे 50 जणांच्या टीमसाठी असेच डिजिटल ट्विन्स तयार करण्यात आले आहेत.

उदाहरणार्थ, निवृत्तीची तयारी करणाऱ्या एका विश्लेषकाला टप्प्याटप्प्याने निवृत्त होता आलं. कारण त्याच्या कामाचा काही भाग त्याच्या डिजिटल ट्विनने सांभाळायला सुरुवात केली होती.

कंपनीने मार्केटिंग टीममधील एका सदस्याच्या मॅटर्निटी लिव्हदरम्यान तिच्या डिजिटल ट्विनचा वापर केला. त्यामुळे तात्पुरता नवीन कर्मचारी ठेवण्याची गरजच कंपनीला भासली नाही.

‘पर्याय नाही, कामाचा भागच’

ब्लूर रिसर्चमध्ये ‘डिजिटल मी’ नावाची ही सुविधा आता नवीन येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला नियमितपणे दिली जाते.

आणखी सुमारे 20 कंपन्या आधीच या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहेत, आणि यावर्षाच्या शेवटी ते इतरांसाठीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

“आजच्या परिस्थितीत प्रभावीपणे काम करायचं असेल, तर ‘डिजिटल मी’ असणं पर्याय नाही-तो तुमच्या कामाचा एक भाग बनतं,” असं स्केलेट म्हणतात.

गार्टनर या तंत्रज्ञान विश्लेषक संस्थेलाही स्केलेट यांचं मत योग्य वाटतं. त्यांचं म्हणणं आहे की, यावर्षी ज्ञानावर आधारित काम करणाऱ्या लोकांचे डिजिटल अवतार (प्रतिकृती) मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागतील.

'डिजिटल ट्विन'चा सर्वाधिक फायदा कोणाला होईल- व्यक्तीला की कंपनीला?

फोटो स्रोत, Getty Images

जसं एआयला गायकांच्या आवाजाची आणि शैलीची नक्कल करायला शिकवलं जातं, तसाच हा ट्रेंड वाढताना दिसेल.

यात आणखी रस (रुची) वाढण्याची शक्यता आहे, कारण मेटा आपले प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांचा एआय अवतार (आवृत्ती) तयार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

‘डिजिटल ट्विन’चा फायदा कोणाला?

हे ऐकायला कंपन्यांसाठी स्वप्नवत वाटू शकतं. कारण डिजिटल ट्विनमुळे कर्मचाऱ्यांचं काम अधिक वाढून त्यातून त्यांना फायदा होऊ शकतो. पण सध्या याबाबत आणखी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची आहेत.

एआय ‘डिजिटल ट्विन’चा मालक कोण-कंपनी की कर्मचारी? तो वापरून जास्त काम होत असेल, तर जास्त पगार द्यावा का? त्यातील माहिती कोणाला पाहता येईल? आणि जर डिजिटल ट्विनकडून चूक झाली, तर याला जबाबदार कोण?

केलिन लोमास्टर या गार्टनरमध्ये संशोधन संचालक आहेत. एआयचा कामावर आणि कामगारांवर होणाऱ्या परिणामांवर त्या काम करतात.

त्या म्हणतात की, “याचे फायदे नक्की आहेत. पण त्यासाठी व्यवस्थित नियम ठरले पाहिजेत, मिळणारा मोकळा वेळ कसा वापरायचा ते स्पष्ट असलं पाहिजे, आणि या एआय सिस्टिम्सना किती स्वातंत्र्य द्यायचं तेही ठरवलं पाहिजे. जरी याचा फायदा कंपनीला होत असला तरी माझं नाव, माझा चेहरा आणि ओळख ही माझीच राहिली पाहिजे.”

“मला वाटतं, याचे चांगले फायदे पाहण्यापूर्वी आपल्याला त्याचे तोटे किंवा नकारात्मक बाबी आधी पाहायला मिळतील.”

जोश बर्सिन यांच्या मते, डिजिटल ट्विनमुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता (प्रॉडक्टिव्हिटी) वाढली आहे.

फोटो स्रोत, Josh Bersin Company

स्केलेट म्हणतात की, ब्लूर रिसर्चची मालकी आणि वेतनाबाबत भूमिका ‘खूप स्पष्ट’ आहे. एआय डिजिटल ट्विनचा मालक तो संबंधित व्यक्तीच असावा, म्हणजे त्यातून मिळणारा फायदा त्यालाच मिळेल. कंपनीला तो वापरायचा असेल, तर त्यासाठी पैसे द्यावेत.

ब्लूर रिसर्चमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांनी किती वेळ काम केलं यावर नाही, तर त्यांनी काय परिणाम (आऊटकम) दिले यावर पैसे मिळतात. त्यामुळे डिजिटल ट्विनमुळे ते जास्त काम करू शकतात आणि त्यानुसार ते जास्त कमावूही शकतात.

“म्हणूनच आता वेतन ठरवताना केवळ बेसिक सॅलरी किंवा बोनस नाही, तर कामातून मिळणारा परिणाम, त्याचा व्यवसायावर होणारा प्रभाव आणि तयार होणारी किंमत (व्हॅल्यू) यावर भर दिला जातो.”

“एआयमुळे कामाचा वेळ आणि वेग बदलला आहे. त्यामुळे तासांवर आधारित पगाराची पद्धत भविष्यात टिकणं कठीण आहे,” असं स्केलेट म्हणतात.

‘सुपरवर्कर’

जोश बर्सिन हे ‘द जोश बर्सिन कंपनी’चे संस्थापक आणि सीईओ आहेत. ही कंपनी एचआर क्षेत्रातील लीडर्सला सल्ला देते.

साधारण वर्षभरापूर्वी त्यांनी स्वतःसाठी आणि कंपनीतील सुमारे 50 जणांसाठी डिजिटल ट्विन तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोतील स्टार्टअप विवेनने विकसित केलेलं तंत्रज्ञान वापरलं.

आता एखाद्या प्रोजेक्टची किंवा क्लायंट अकाउंटची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर मीटिंग, कॉल किंवा ई-मेलची गरज भासत नाही. संबंधित व्यक्तीच्या डिजिटल ट्विनला एक साधा प्रश्न विचारला, की लगेच माहिती मिळते.

जोश बर्सिन यांनी यासाठी ‘सुपरवर्कर’ हा शब्द वापरला आहे. त्यांच्या मते, एआयमुळे एखाद्या व्यक्तीला कामात अधिक आणि चांगलं काम करता येतं, म्हणजेच त्याची क्षमता वाढते.

अंजली मलिक यांच्या मते, एआय ट्विनमुळे नोकरीच्या व्यवस्थेच्या अगदी मुख्य गोष्टींवरच प्रश्न उपस्थित होतात.

फोटो स्रोत, Bellevue Law

कॅलिफोर्नियातील ऑकलंड येथे राहणारे बर्सिन म्हणतात, “लोकांकडे आणखी एक मीटिंग किंवा कॉल करण्यासाठी नेहमी वेळ आणि ऊर्जा नसते. पण डिजिटल ट्विनला तुम्ही कधीही अगदी रात्री उशिरा सुद्धा-सुरू करून तासभर बोलू शकता, त्याला काही फरक पडत नाही. त्यामुळे ते खूप उपयोगी ठरतं.”

कंपनी दरवर्षी सुमारे 30 टक्क्यांनी वाढत असली, तरी डिजिटल ट्विनमुळे सगळ्यांची काम करण्याची क्षमता खूप वाढली आहे. त्यामुळे बर्सिन यांना वर्षाला फक्त 2 नवीन लोकांचीच भरती करावी लागते. यामुळे ते दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कमही वाढवू शकले आहेत.

“प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक मूल्य वाढते. जर तुम्ही कंपनीसाठी इतके महत्त्वाचे असाल, तर कंपनीने तुम्हाला जास्त पैसे का देऊ नयेत?”, असा सवाल बर्सिन करतात.

परंतु, मालकीच्या मुद्द्यावर त्यांचे आणि स्केलेट यांची मतं वेगळी आहेत.

बर्सिन म्हणतात, “बहुतांश देशांत नोकरीच्या करारानुसार तुम्ही तयार केलेली माहिती किंवा बौद्धिक संपदा (आयपी) ही कंपनीची मालमत्ता मानली जाते, ती तुमची वैयक्तिक नसते.”

‘न्यायालयं आणि विशेष कायदे’

“तार्किकदृष्ट्या म्हणजेच लॉजिकने विचार केला, तर एखाद्या व्यक्तीने कंपनी सोडली की तिच्या डिजिटल ट्विनची किंमतही किंवा मूल्य हळूहळू कमी होत जातं. कारण कंपनीमधील गोष्टी सतत बदलत राहतात, पण तो ट्विन तसा अपडेट होत नाही. त्यामुळे काही काळानंतर तो इतका उपयोगी राहील का, याबद्दल शंका आहे.”

Caption- अंजली मलिक यांच्या मते, एआय ट्विनमुळे नोकरीच्या व्यवस्थेच्या अगदी मुख्य गोष्टींवरच प्रश्न उपस्थित होतात.

डिजिटल ट्विनसाठी कामाचे नियम, रोजगाराचे कायदे कसे ठरवायचे, याबाबत अजून वकिलांमध्ये एकमत झालेलं नाही.

अंजली मलिक या बेल्लेव्ह्यू लॉमध्ये असोसिएट आहेत. रोजगार कायदा व व्यावसायिक वादांवरील त्या तज्ज्ञ आहेत.

त्या म्हणाल्या की,”एखाद्या व्यक्तीच्या ई-मेल्स, मिटिंग्स आणि कामाच्या माहितीवर एआय टूल ट्रेन केलं की, लगेचच काही महत्त्वाचे प्रश्न समोर येतात. संमती कोणाची, वैयक्तिक डेटावर नियंत्रण कोणाचं, कामाचं मूल्यमापन कसं करायचं, एखाद्याच्या जागी दुसरं काम करू शकतं का, आणि एखादी व्यक्ती नोकरी सोडली तर त्याचं पुढे काय?”

डिजिटल ट्विन

फोटो स्रोत, Getty Images

एव्हरशेड्स सदरलँड येथील रोजगार कायद्यातील तज्ज्ञ क्लो थेमिस्टोक्लियस यांच्या मते, ‘स्पष्ट आणि ठोस कायदेशीर मार्गदर्शन’ खूप गरजेचं आहे. अन्यथा डिजिटल ट्विन वापरताना कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही मोठा कायदेशीर धोका निर्माण होऊ शकतो.

त्या म्हणतात, “सध्या रोजगार कायद्यात बरेच बदल सुरू आहेत. त्यामुळे एआयसाठी विशेष नियम लवकर येतील, असं वाटत नाही. तोपर्यंत या विषयावरचे वाद न्यायालयांनाच सोडवावे लागतील.”

स्क्वेअर वन लॉ मधील भागीदार आणि रोजगार प्रमुख जीन-पियरे व्हॅन झील यांच्या मते, न्यायालयं या विषयात महत्त्वाची भूमिका बजावतील आणि पुढे कोणते नियम तयार होतील, त्यावर त्यांचा प्रभाव राहील.

ते म्हणतात, “भविष्यात एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या एआय ट्विनने केलेल्या चुकांमुळे शिक्षा दिली गेली किंवा नोकरीतून काढलं गेलं, तर त्यावरून कायदे तयार होतील. अशा वेळी न्यायालय ठरवेल की कंपनीने योग्य निर्णय घेतला की नाही.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC