Home LATEST NEWS ताजी बातमी जुनी आमराई आणि नवं तंत्रज्ञान; बदलत्या हवामानात आंब्याचं उत्पादन कसं वाढवायचं?

जुनी आमराई आणि नवं तंत्रज्ञान; बदलत्या हवामानात आंब्याचं उत्पादन कसं वाढवायचं?

28
0

Source :- BBC INDIA NEWS

कैऱ्या

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC

उत्पन्न चांगले असले तरी आंबा पिकवणे सर्वात कठीण फळांपैकी एक मानले जाते. आंब्याचे पीक हे हवामान, झाडाची वाढ आणि शेती करण्याच्या पद्धती यांमधील अचूक मेळ यावर अवलंबून असते.

भारतासाठी हा मेळ साधणे खूप गरजेचे आहे कारण भारत जगात सर्वाधिक आंबा पिकवणारा देश आहे. भारतात दरवर्षी 2.3 कोटी टन आंब्याचे उत्पादन होते जे देशातील एकूण फळ उत्पादनाच्या साधारण एक पंचमांश (20%) आहे.

पण गेल्या काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांसाठी आंब्याची शेती करणे अधिक कठीण झाले आहे.

उत्तर प्रदेशातील मलिहाबादमध्ये 16 एकरांवर शेती करणारे उपेंद्र सिंह म्हणतात, “आता आंब्याची शेती करणे अनिश्चित झाले आहे.”

ते त्यांच्या कुटुंबातील आंब्याची शेती करणारी चौथी पिढी आहेत आणि त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून शेतात काम करायला सुरुवात केली.

आता 62 वर्षांचे सिंह म्हणतात, “हवामान बदलामुळे आता ऋतूंचा कोणताही नेम राहिलेला नाही. मोहोर येणे, फळे लागणे आणि काढणी होणे या सगळ्यांची वेळ दरवर्षी बदलत आहे.”

ते पुढे म्हणतात, “खते, कीटकनाशके, मजूर आणि सिंचनाचा खर्च वाढला आहे पण उत्पन्न कमी झाले आहे. शेतकरी आंब्याच्या बागेवर जास्त पैसे खर्च करत आहेत पण त्यातून मिळणारी कमाई मात्र कमी झाली आहे.

उपेंद्र सिंग

फोटो स्रोत, Upendra Singh

भारतात आंब्याच्या जवळपास 700 जातींची लागवड केली जाते आणि प्रत्येक भागात तिथली एक खास जात प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ, उत्तर भारतात ‘दशेरी’ हा सर्वात सामान्य आहे.

महाराष्ट्रात ‘हापूस’चे वर्चस्व आहे तर बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये ‘लंगडा’ आणि ‘मालदा’ या जाती प्रामुख्याने दिसतात.

सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर (ICAR) मधील शास्त्रज्ञ डॉ. हरी शंकर सिंह म्हणतात, “हवामानाचा लहरीपणा आता नेहमीचाच झाला असल्याने आंबा शेतीवर मोठा ताण येत आहे. आंब्याचे पीक पूर्णपणे तापमानावर अवलंबून असते.”

गेल्या वर्षी मोहोर लवकर आला. सोसाट्याच्या वाऱ्याचा फळांच्या वाढीवर परिणाम झाला. फळे वेळेआधीच पिकली आणि त्यामुळे पिकाचे खूप मोठे नुकसान झाले.”

“या वर्षी उत्तर भारतात दीर्घकाळ कमी तापमानामुळे मोहोर यायला मोठा उशीर झाला,” हरी शंकर सिंह सांगतात.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी संशोधक आंब्याच्या अशा नवीन जाती विकसित करत आहेत ज्या तापमानातील मोठा बदल सहन करू शकतील. तसेच कीड आणि रोगांना प्रतिकार करू शकतील. पण हे काम खूप हळू चालते.

नवीन प्रकारच्या आंब्याचे कलम केल्यावर त्याला मोहोर यायलाच 5 ते 10 वर्षे लागतात. त्यात आंब्याच्या झाडाचे एक वैशिष्ट्य त्रासदायक ठरते. एका झाडापासून तयार झालेलं दुसरं झाड त्याच्या मूळ झाडासारखं निघेल याची खात्री नसते.

डॉ. हरी शंकर सिंह म्हणतात, “आंब्याचं नवीन वाण तयार करणं हा काही दोन दिवसांचा खेळ नाही. त्यासाठी अनेक दशकांचे संशोधन लागते.”

आता जनुकीय शास्त्रामुळे हे काम वेगाने व्हायला मदत होत आहे. 2016 मध्ये ICAR च्या शास्त्रज्ञांनी आंब्याचा ‘जीनोम’ (म्हणजेच आंब्याची संपूर्ण अनुवांशिक माहिती) उलगडल्याचं जाहीर केलं होतं.

त्यांचं हे काम मुख्यत्वे ‘हापूस’ आंब्यावर होतं. डॉ. हरी शंकर सिंह सांगतात की, आंब्याचा जीनोम (अनुवांशिक माहिती) उलगडल्यामुळे आता शास्त्रज्ञांना फळाचा रंग, वास, गोडवा आणि मोहोर येण्याची पद्धत नेमकी कशामुळे ठरते, हे ओळखता येतं. इतकंच नाही तर हवामानातील बदल आणि रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता कोणत्या झाडात आहे हेही शास्त्रज्ञांना कळतं. यामुळे नवीन वाण तयार करायला जो 10 ते 20 वर्षांचा कालावधी लागायचा तो आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

आंबा

फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images

शेतकरी आता नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला तयार आहेत. उपेंद्र सिंह यांनी त्यांच्या शेतात जुन्या बागेपेक्षा अधिक दाट पद्धतीने आंब्याची एक नवीन ‘रंगीत’ जात लावली आहे. उपेंद्र सिंह सांगतात की, “या रंगीत आंब्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याला दरवर्षी फळं येतात. दशेरी किंवा लंगडा यांसारख्या जुन्या जातींना अनेकदा एका आड एक वर्ष फळं येतात.”

शेती करण्याच्या आधुनिक पद्धतींचाही मोठा फायदा होत आहे. डॉ. हरी सिंह सांगतात की, “झाडांची योग्य वेळी छाटणी करणं, त्यांचा विस्तार नीट सांभाळणं आणि काही विशिष्ट औषधांचा वापर करून झाडाची उंची आटोक्यात ठेवली जाते. यामुळे मोहोर लवकर येतो आणि सगळी फळं एकाच वेळी तयार होतात.”

गुणवत्ता कशी सुधारली जाते?

ICAR देखील शेतकऱ्यांना असे नवीन प्रयोग करायला सांगत आहे. यातलाच एक साधा पण परिणामकारक उपाय म्हणजे ‘बॅगिंग’. यात फळ लहान असतानाच त्यावर हवा खेळती राहील असं संरक्षक कव्हर (पिशवी) चढवलं जातं.

डॉ. दामोदरन यांच्या मते या प्रक्रियेमुळे फळाभोवती एक पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे कीड, रोग, बुरशी आणि कडक उन्हापासून फळाचा बचाव होतो.

त्यांची संस्था ‘गर्डलिंग’ नावाचं अजून एक तंत्र वापरण्याचा सल्ला देते. यात झाडाच्या निवडक फांदीवर एक गोल खाच पाडली जाते. यामुळे झाडाला थोडा ताण बसतो आणि झाड आपली सर्व शक्ती फांद्यांची वाढ करण्याऐवजी मोहोर येण्यासाठी आणि फळ मोठं करण्यासाठी वापरतं.

जुन्या आमरायांचेही पुनरुज्जीवन करता येते. त्यासाठी झाडांची उंची कमी करून ती साधारण 14 ते 18 फुटांपर्यंत ठेवली जाते. डॉ. हरी शंकर सिंह सांगतात की, “एकदा का झाडांचे पुनरुज्जीवन झाले की मग मोहोर खूप मोठ्या प्रमाणात येतो. फळांचा आकार वाढतो आणि जास्तीत जास्त फळे ही B किंवा C ग्रेडऐवजी उत्तम दर्जाची म्हणजेच A ग्रेड निघतात.”

आंब्यांना पिशव्या घालण्यामुळे त्यांची गुणवत्ता सुधारते.

फोटो स्रोत, Upendra Singh

नीती गोयल यांच्यासाठी आंबा शेती करणं हा फक्त एक छंद होता. 10 वर्षांपूर्वी त्यांनी कुतूहलापोटी काही झाडं लावली होती. आज अलिबागमध्ये त्यांच्याकडे 27 एकर जागेत 1100 हून अधिक झाडांची बाग आहे.

त्या सांगतात की, “आम्ही फक्त अनुभवावर किंवा अंदाजावर शेती करण्यापेक्षा आधुनिक विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आंब्याची लागवड करतो.”

आम्ही प्रत्येक हंगामाची सुरुवात माती आणि पानांच्या तपासणीने करतो. त्याशिवाय खतं देणं म्हणजे फक्त एक अंदाज लावण्यासारखं आहे. ती शेती नव्हे. बोरॉन आणि झिंक यांसारखी सूक्ष्म पोषक तत्त्वे फळांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की थेट उत्पादनावर परिणाम होतो.

तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही ग्रीनहाऊस उभारण्यावर भर दिला आहे. काळानुसार जर आपण असे आधुनिक बदल केले नाहीत तर आपलं मोठं नुकसान होईल.

झाडांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना आच्छादनाखाली ठेवणं गरजेचं आहे, असं सरवणन आचारी मानतात. आचारी हे ‘बेरीडेल फूड्स’चे संस्थापक आहेत जे 13 देशांमध्ये भारतीय आंब्यांची निर्यात करतात.

ग्रीनहाऊसचा वापर

किडीचा प्रादुर्भाव ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी चिंतेची गोष्ट आहे. आचारी सांगतात की, “परदेशातील मार्केटमध्ये किडीच्या बाबतीत अजिबात सवलत मिळत नाही. तपासणीत एका जरी फळात कीड आढळली तर संपूर्ण माल बाद केला जातो, ज्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान होतं.

बदलत्या हवामानामुळे किडीवर नियंत्रण ठेवणं आता कठीण झालंय. पाऊस पडला की फळमाशा येतात. पण आता पाऊस कधी पडेल याचा काही नेम उरलेला नाही. त्यामुळे वर्षाच्या कोणत्याही वेळी ही कीड दिसायला लागली आहे.”

आचारी म्हणतात की, “आजच्या काळात आंबा निर्यातीसाठी बदलतं हवामान हा सर्वात मोठा धोका बनला आहे. म्हणूनच आचारी त्यांच्या ‘बेरीडेल’ फार्मवर आता ग्रीनहाऊस वापरून नवनवीन प्रयोग करत आहेत.”

हवामानातील बदलांचा सामना करण्यासाठी जपान आणि इस्रायलमध्ये आता ग्रीनहाऊस आणि नियंत्रित वातावरणात शेती केली जाते.

जर आपल्याकडेही आंब्याचे उत्पादन आणि गुणवत्ता कायम राखायची असेल, तर निर्यात वाढवण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांनाही आता याच दिशेने पाऊल टाकावं लागेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC