Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
मला ना सध्या पुरूषाचा स्पर्श नको झालाय, मला ना आजकाल भसकन कधीही रडायला येतं, एकाएकी लो फील होतं, पुरूषांनी गच्च भरलेल्या लिफ्टमध्ये आत शिरणं मी टाळते, एरवी अतिसोशल असलेल्या मला गर्दी अचानक अंगावर येते, कशानंही ट्रिगर व्हायला होतं, गळा भरून येतो…
तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं? मस्त काहीतरी खा, मजा कर, लोकांशी बोल… फारच काय तर, थेरपिस्टकडे जा! होशील बरी. पण मला काहीतरी वेगळं सांगायचंय. माझ्या या मेंटल फेजला मी एकटी जबाबदार नाही. त्याला जबाबदार समाज नावाचा पुरूष आहे. समाजपुरूष!
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एपस्टीनचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर जेव्हा अशोक खरात प्रकरण समोर आलं, तेव्हा सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी ‘महाराष्ट्राचा एपस्टीन’ असं ‘क्रिएटीव्ह विशेषण’ दिलं. एवढंच नव्हे, तर त्या अशोक खरात प्रकरणाचे अंगावर येणारे चित्रविचित्र व्हिजुअल्स सगळ्यांच्या स्मार्टफोनवर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाले (की केले गेले?).
काही दिवसांनी मला उमजलं, एपस्टीन आणि खरात प्रकरण, सोबतच इराण-अमेरिका युद्ध अशा सगळ्यांचा माझ्या मना-मेंदूवर बऱ्यापैकी परिणाम झालाय. काही मित्र-मैत्रीणींशी बोलताना अनेकांची कमीजास्त अशीच अवस्था असल्याचंही कळालं.
मी पत्रकार आहे. लिहिती-वाचती बाई आहे. कितीही नकोसं झालं तरी जे घडतं ते समोर येत राहतं, अनेकदा ते येऊही द्यावं लागतं. त्यातून ही सगळी मना-मेंदूची अवस्था घडत गेली. अर्थात, थेरपिस्टकडे मी गेलेच, त्याच्यासमोर सगळी मळमळ ओकून कॅथर्सिस केलं, त्यानं ते सगळं शांतपणे, नॉन-जजमेंटली ऐकून घेत सल्लाही दिला. पण मानसशास्त्र सांगतं, तुमच्या मनाच्या आजारपणाला तुमचा भवताल, तुमचा भूगोलही जबाबदार असतो. सगळ्या गोष्टी ‘आत’च नसतात, ‘बाहेर’ही असतात आणि त्याचे तुमच्यावर उमटणारे प्रतिध्वनी तुमच्या मना-मेंदूला घडवतात-बिघडवतात, मरेपर्यंत! माझ्या या मेंटल स्टेटसाठी मी कितपत आणि समाज कितपत जबाबदार हा नक्कीच वादाचा विषय आहे.
मी थिंकिंग-ओवरथिंकिंग करत स्वत:ला विचारलं, का मला असं वल्नरेबल व्हायला होतं? तर एक उत्तर आलं, की माझ्या पायाखाली ठायीठायी ‘माइन्स’ पेरलेल्या आहेत. आत्ता आपण ज्यात आहोत, त्या समाजाला जर जगण्यासाठीची जमीन मानलं, तर सगळीकडे अदृश्य ‘मेंटल माइन्स’ पेरलेल्या आहेत.
ऑनलाइन आणि ऑफलाइनही. ब्लर्ड-अनब्लर्ड व्हीडिओज, मीम्स, आंबटशौकिन विनोद, विषारी उपरोधानं भरलेल्या, लैंगिक शिव्यांनी वाहणाऱ्या कमेंट्स… सध्या सगळीकडे ‘ट्रेंडिग’ असलेल्या ‘क्लिकबेटफुल’ खरात प्रकरणातल्या पीडित बायका कशा पद्धतीनं आता पुढचं आयुष्य, या माइन्सखाली स्वत:च्या चिंधड्या उडू न देता जगणार आहेत? समाज त्यांना नीट जगू देणार आहे का? यातल्या किती बायका मानसिक-शारीरिक उपचारांपर्यंत पोहोचू शकतील? या बायकांसाठी शरीरसंबंध आयुष्यभर कमीजास्त ट्रॉमॅटिक ठरतील का? प्रश्नच प्रश्न.

सध्या मी मुंबईत असते. पब्लिक प्लेसमध्ये किंवा बस लोकलमध्येही सहेतुक वा निर्हेतुक कुणाचा धक्का लागला तरी एरवी वाटते त्याहून अधिक नकोशी भावना दाटून येते आहे. हे जाणवून अजूनच भयानक वाटतं, की त्या पीडित बायका, ज्यांना तो स्पर्श झाला आणि शुद्ध फसवणूक, शोषण वाट्याला आलं, (ज्यात त्या स्त्रियांच्या घरचे पुरूष नवरा, बाप, भाऊही सामील होते अशी शंका घ्यायला पुरेपूर वाव आहे) त्यांची काय अवस्था झाली असेल?
मला आठवतं, खरात प्रकरण हवेत तरंगायला सुरू झाल्यावर “Patriarchy wins here. Cause ‘वांझ बायका’ are not allowed to live on this earth” अशी कमेंट मी मित्रांच्या व्हॉट्सप ग्रुपवर केली होती. आपण आजुबाजुला सतत मूल न होणाऱ्या, विविध प्रकारची ‘खोट’ असलेल्या स्रियांचे मांडलेले छळ, त्यांना आयव्हीएफसह बुवाबाबा-अंगाऱ्याधुपाऱ्याच्या जंजाळात ढकलणारा समाज पाहून तिकडं डोळेझाक करतच असतो हे कोण नाकारेल? पण इतकं खोलवर जाण्याचा दमसास आज राहिलाय कुणाकडं?
दुसरीकडे कालपरवाच खरात प्रकरणासंबंधी कायदा आणि कन्सेन्टमधल्या खाचाखोचा सुंदर-सोप्या भाषेत समजावून सांगणाऱ्या एका वकिलाच्या पोस्ट फेसबुकवर आली. त्याच्याखाली एका पत्रकार म्हणवणाऱ्या स्त्रीनं अत्यंत हिणकस भाषेत, पीडित महिलांचाच अवमान करणारी कमेंट केली. त्या कमेंटची भाषा इतकी पुरूषी आणि घाणेरडी होती, की परत एकदा मी दोनेक मिनिटं ट्रिगर झाले! डोळे भरून आले माझे. वैयक्तिक जखमी व्हायला झालं त्या भाषेनं. परत एका चांगल्या लेखिका-कार्यकर्ता बाईही याच आशयाचं सगळं मीडियामोर बोलून मोकळ्या झाल्या.
लेखक-पत्रकार लोकशिक्षण करतो, निदान त्यानं तसं करावं असं अपेक्षित असतं! आजच्या भाषेत सांगायचं तर ही जमात एका चांगल्या अर्थानं इन्फ्लुएन्सर असते. मात्र जेंडरनं महिला असलेले पत्रकार-लेखक लोकही ‘केवळ जे आणि जेवढं डोळ्यांना दिसतं तेच सत्य’ अशी ठाम धारणा बाळगणार असतील, त्यांचा इक्यू आणि आयक्यू इतका गंभीरपणे मर्यादित असेल, तर सामान्य म्हणवणाऱ्या मासेसना तरी काय आणि कसा दोष देणार? असं वाटून गेलं, की म्हणतात ना, ‘आपल्या योग्यतेनुसार राजकारणी मिळतात’, मग असंही आहे की काय, की ‘आपल्या योग्यतेनुसारच पत्रकार आणि लेखक मिळतात?’
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आतापर्यंत सगळ्यांनीच ही बातमीही वाचली असेल, की खरात प्रकरणातल्या पीडित महिला प्रचंड नैराश्याचा सामना करत आहेत, त्यातल्या काहींनी नाशिकमधल्या मानसोपचारतज्ज्ञांकडंही धाव घेतलीय.
मला एक बाई म्हणून कल्पनाच करवत नाही, की काय पद्धतीच्या पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD)ला या बायका सामोऱ्या जात असतील. केवळ शारीर नाही, तर न संपणारी मानसिक अवहेलना या बायका अनुभवत आहेत, अनुभवत राहतील.
राजस्थान हायकोर्टाचा 19 मार्चचा एक लक्षवेधी निकाल आहे, त्यात सोशल मीडियावर कुणाही व्यक्तीच्या त्याच्या/तिच्या संमतीविना उपलब्ध असणाऱ्या, व्हायरल केल्या जाणाऱ्या फोटो, व्हिडीओजचा ‘एन्ड्युरिंग डिजीटल स्कार्स’ (भरून न येणारे डीजिटल व्रण) असा उल्लेख केलाय. एका वडिलांनी आपल्या मुलाचे इंटरनेटवर कथितपणे फिरवले जाणारे अश्लील फोटो हटवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्या प्रकरणाचा त्या वडिलांच्या बाजूने निकाल देताना ‘मेटा’ आणि एकुणच सोशल मीडिया कंपन्यांना राजस्थान कोर्टानं खडे बोल सुनावलेत. शिवाय, इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडतांना हेसुद्धा म्हणलंय, की अशा प्रकरणांमध्ये कधीच न मिटणाऱ्या नकोशा डिजिटल फुटप्रिंट्समुळं ‘राइट टू प्रायव्हसी’सह ‘राइट टू बी फरगॉटन’चंही उल्लंघन होतं. शिवाय आपल्या ‘डेटा’चं काय होईल या धास्तीनं लोकं मोकळेपणानं व्यक्त होणं टाळतात, त्यातून फ्री आणि ओपन सोसायटीचं फ्रॅब्रिकही उसवलं जातं.
समाजमाध्यमांची स्पेस स्फोटक आहेच, पण आपली भारतीय माध्यमंही अशी प्रकरणं चवीनं चघळतात (वरून ‘लोकांना जे हवं तेच आम्ही देतो’ अशी साळसूद आणि शुद्ध खोटारडी भूमिका घेतात) हे आता पुरेसं ओपन सिक्रेट आहे. शिवाय असा सगळा अतिशय वल्नरेबल कंटेंट प्रसारित करताना मराठी माध्यमांनी कसली ‘ट्रिगर वॉर्निंग’ दिल्याचं मी कधीच वाचलं-पाहिलं नाही. ही सरळसरळ पत्रकारितेच्या वर्गात शिकवलेल्या ‘मीडिया इथिक्स’ची पायमल्ली आहे.
नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या अल्टिमेटमनंतर रात्रभर भारतीय मीडिया रात्रभर अक्षरश: काऊंटडाऊनचे टायमर लाऊन बसला होता. युद्धाचा युफोरिया! आणि खरात प्रकरणातही वाचक-प्रेक्षकांना सटल लेवलवर भडकवणारा कंटेंट कळत नकळत टार्गेट ऑडियन्सच्या ताटात वाढला जातोय.
भारतीय मीडियाचं चारित्र्य पुरूषी आणि युद्धखोर आहे, त्याचा आपल्यावर विषारी परिणाम होतोय, हे समाजमनाला नीटपणे कधी उमजणार?
मी याच समाजात जन्मलेली वाढलेली व्यक्ती आहे. माझा सबकॉन्शस भारतीय आहे आणि शुद्ध 24 कॅरेट जेंडर सेन्सिटिव्ह कुणी नसतं, जेंडर सेन्सिटिव्हिटीची परिक्षा आपण नेहमी देतच राहतो असं मानणारी मी व्यक्ती आहे.
खरात प्रकरण ट्रेंडिंगवर असताना डार्क ह्युमरची हुक्की येऊन मीपण एक ‘डॅन्क मीम’ बनवलं होतं, जे आडून-आडून पीडित बायकांनाच टार्गेट करत होतं. काही काळानं उपरती होऊन मीच ते डिलीट केलं.
खरात प्रकरणासह एपस्टीनचं प्रकरणही निसरडं, भयंकर ग्रे शेड्स असलेलं हे प्रकरण आहे. जी बाई तुमच्या डोळ्यांना पहिल्या नजरेत ‘गुन्हेगार’, ‘गुन्ह्यातली साथीदार’ दिसू शकते, ती खरंतर ‘पीडित’ आहे. पण मला वाटतं आजच्या डिजीटल काळात समाजाचा ‘अटेंशन स्पॅन’सारखाच ‘थिंकिंग स्पॅन’पण कमी झालेला आहे. आपण मेंदूला जास्त ताण न देता क्षणभरात ‘हे असं आणि म्हणून ते तसं’ असा न्यायच देऊन मोकळे होतो, डोक्यात भरलेला तोबरा थुंकत पोस्टची पिचकारी टाकायला.
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या लेटेस्ट व्हीडिओ प्रकरणात तरी काय वेगळं झालं? झिरवळ हे राजकीय-सामाजिक प्रभाव असलेली ताकदवान व्यक्ती आहेत. परत ते पुरूष आहेत.
‘इज्जत जाणाऱ्या’ प्रकरणांनंतर पुरूषांचं पुनर्वसन प्रचंड वेगात होतं. हे सिद्ध करायला आजवरची असंख्य उदाहरणंही देता येतील. पण झिरवळ यांच्यासोबतच्या पारलिंगी व्यक्तीचं काय? या दोघांमध्ये हा व्यवहार पैशाच्या बदल्यात झाला असेल, किंवा आर्थिक व्यवहाराविना परस्पर संमतीनेही झाला असेल.
‘व्याभिचार’ हा भारतीय कायद्यानं अजून तरी गुन्हा मानलेला नाही. आणि समजा कुठलातरी राजकीय स्कोअर सेटल करण्यासाठी हा व्हीडिओ समोर आलाही असेल, अशावेळी कसलीच सामाजिक, राजकीय पॉवर पोझिशन नसलेल्या त्या पारलिंगी व्यक्तीचं काय? तिच्या आणि इतरही पारलिंगी समूहाच्या जगण्यावर आता या सगळ्याचे जे दृश्य-अदृश्य परिणाम सतत होत राहतील त्याचं काय?
आणि हो, मला माहिताय, की या विशिष्ट प्रकरणात आणखी एका ब्लॅकमेलर व्यक्तीची धरपकड झालेली आहे, तेही तथ्य माध्यमांमध्ये आलेलं आहे. पण इथंही हेच सांगावं वाटतं, की स्किन करन्सी विकणाऱ्यांहून तो घेणारा दोषी असतो कारण बाजार, त्या बाजाराचे नियम, मूल्यव्यवस्था आणि सगळा व्यवहार यांचा डोलारा हा देणाऱ्याच्या नसून घेणाऱ्याच्या बळावर उभा असतो. मग तो हनी ट्रॅप असो, की वेश्याव्यवसाय की तत्सम काही.
या ‘मेन्स वर्ल्ड’मध्ये पुरूष स्किन करन्सीला बळी पडतो म्हणून ती करन्सी चलनात आली आणि येत राहील. इथं अशा सौदेबाजीत बाई किंवा पारलिंगी बलवान वाटत असली तरी, शेवटी ती विकली जाते आणि विकत घेणारा, सौदा-मूल्य ठरवणारा बहुतांश वेळा पुरूषच असतो. या व्यवहारातली बाई किंवा पारलिंगी व्यक्तीची वरवर दिसणारी सत्ता ही पुरेपुर फसवी आहे.
आपल्या देशात मॅरिटल रेपच अजून कायद्याच्या कक्षेत येत नाही. कन्सेंटचा ‘C’, त्यातले कायदेशीर खाचखळगे, शंभरातल्या नव्वद लोकांना माहीत नाही. उरलेल्या दहांपैकी पाच जणांचीही अनेकदा ‘कळतं पण मर्दपणा वळू देत नाही’ अशी स्थिती असते. अशावेळी बळी कोणाचा जाणार? तर अर्थातच लैंगिकतेच्या पॉवर गेममध्ये ज्या कायम खाली असतात, त्या स्त्रिया आणि पारलिंगी समूहाचा.
शिवाय, एखाद्या बाबा-बुवाला कायद्यानं शिक्षा होऊनही त्याचं तथाकथित धार्मिक-अध्यात्मिक साम्राज्य पुरेसं उद्ध्वस्त होत नाही. आणि दुसरीकडे या सगळ्यात शोषित असलेल्या बायकांना मात्र सर्व प्रकारची अवहेलना, कुचंबणा झेलत जगावं लागतं हेच आज भारतातलं चित्र आहे. आसारामसह इतरही अनेक उदाहरणं देता येतील. इंग्रजीत एक शब्द आहे. ऑडॅसिटी. मराठीत औद्धत्य किंवा दुस्साहस, बेफिकीर धाडस. पितृसत्ता मानणाऱ्या समाजात ही ऑडॅसिटीची एजन्सी पुरूषांना कशी मिळते, आणि त्यातून ते स्त्रियांना कसे वागवतात याची एक लिटमस टेस्ट या बाबा-बुवा प्रकरणांतून आपल्या धार्मिक देशात पुन्हा-पुन्हा होत राहते.
भारतात लैंगिकतेच्या बाबतीत कोंडमारा हा गंभीर प्रश्नच बनला आहे. डिजीटल काळात कळत-नकळत ज्या कुठल्या कन्सेन्शुअल किंवा नॉन कन्सेन्शुअल संबंधांचं चित्रण कॅमेऱ्याच्या विळख्यात सापडतं, ते जगाच्या अंतापर्यंत नष्ट होत नाही हे तर आता पुरेसं सिद्ध झालेलं आहे. आणि हेच पाहून, ‘समाजपुरूष’ स्वत:च्या विकृत भुकेचा निचरा करून घ्यायला बघतो आहे.
पॉर्न बघणं हा गुन्हा नाही. हरेकाच्या हातातल्या स्मार्टफोनच्या खासगी स्पेसमध्ये ते सर्वकाळ उपलब्धपण आहे. मात्र शोषक-शोषितामधलं लैंगिक कृत्य पाहून ऑर्गॅजम मिळवणं ही कसली वृत्ती म्हणायची? बऱ्याचदा थेरपीमध्ये ‘समाजात मिसळून, सोशल एन्ग्जायटी दूर करून मोकळं व्हा’ असं सांगितलं जातं. पण माझ्या आसपासचा समाज इतका मानसिक आजारी असेल तर मला त्याची कधीकधी भीती वाटते.
त्यात आपण जगतो त्या काळात सोशल मीडिया लिटरसी नावालाही नाही. समाज नावाच्या माकडाच्या हातातल्या स्मार्टफोनवर अनलिमीटेड 5G डेटाचं कोलीत आहे. त्यावर बेरोजगारी, युद्धखोरी, विषारी राष्ट्रवादाचं पेट्रोल टाकून सत्ताधाऱ्यांसह मेटासारख्या कंपन्यांनी काडी लावलीय. भडका उडालाय त्यात बळी आधी जातोय तो स्त्रियांचा, लहान मुलांचा, विविध अर्थानं शोषित-वंचित असलेल्यांचाच!
युद्ध भडकवण्यात, कुणाचं शोषण करण्यात मला तरी कधी ठळकपणे कुठली स्त्री, किंवा स्त्रियांची टोळी आघाडीवर दिसली नाही, देशात-जगातही. बाईच्या गर्भाशयात वाढून तिच्या योनीतून जन्मत पुरूषांनी पुरूषांची सत्ता पुरूषांकरवी ताब्यात ठेवण्यासाठी घडवलेली हिंसा हेच आज जगाचं नकोसं वास्तव आहे. स्त्री फारतर शोषणासाठी, सेक्स स्लेव म्हणून किंवा मग हनी ट्रॅप म्हणून प्यादं बनवली जाते.
समाज म्हणून आपण प्रतिगामी होत चाललोय वेगानं. 2024 मध्ये मी महिनाभर एका फेलोशिपवर अमेरिकेत गेले होते. निवडणुकीचाच दिवस होता आणि आम्ही लोक वॉशिंग्टनमध्येच होतो. तिथं माझा नव्यानं मित्र बनलेला एक एफ्रो-अमेरिकेन (ज्यानं निवडणुकीत ट्रंपला मतदान केलं नव्हतं) बोलून गेला, ‘The world is travelling in a regressive direction & we Americans are not the exception.’ (जग मागासलेल्या दिशेने प्रवास करतंय आणि आम्ही अमेरिकनही त्याला अपवाद नाही.) मला भारतात स्त्री म्हणून जगताना सतत त्याचं ते वाक्य आठवत राहतं.
ब्लर व्हीडिओ पाहून सोशल मीडियावर निर्लज्जपणे अनब्लर्ड व्हीडिओजच्या लिंक्स मागत फिरणं, पॉर्न साइट्सवर रेपचे व्हीडिओ शोधून पाहणं, विनोदाच्या नावाखाली शोषणाच्या गुन्ह्याला अप्रत्यक्षपणे नॉर्मलाइज करणारे मीम्स, कमेंट्स करणं… पीडित स्त्रियांनाच गुन्हेगार ठरवण्याची मागणी बोलून दाखवणं, त्यांच्याविषयीच्या विकृत हिणकस कमेंट्स आणि इतर असंख्य ऑनलाइन कृत्यं…
मला वाटतं, हा सगळा ‘डिजीटल रेप’ आहे. ‘डिजीटल रेपिस्ट’ हे लेबल लावून घ्यायचं की नाही हे आता हरेक स्त्री-पुरूषाला, खरात प्रकरणाच्या निमित्तानं ठरवता येईल.
(शर्मिष्ठा भोसले या मुक्त पत्रकार असून, या लेखातील मतं त्यांची वैयक्तिक आहेत.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
शॉर्ट व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
-

00:58
व्हीडिओ, आशा भोसले अखेरच्या दिवसांमध्येही तितक्याच आनंदाने गाणं गात होत्या…, वेळ 0,58
-

02:04
व्हीडिओ, 10 दिवसांचा ऐतिहासिक प्रवास संपला, कॅप्सूलमधून बाहेर पडले अंतराळवीर, वेळ 2,04
-

01:18
व्हीडिओ, आर्टेमिस मोहीम : अंतराळवीर पृथ्वीवर परतले तो क्षण, वेळ 1,18
-

02:34
व्हीडिओ, बड्या कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण? नाशिकमध्ये 8 महिलांची तक्रार, वेळ 2,34
-

02:11
व्हीडिओ, जमीन बळकावल्याचा आरोप, अशोक खरात प्रकरणात नवा गुन्हा, वेळ 2,11
-

01:13
व्हीडिओ, मेनका गुरुस्वामी – भारताच्या पहिल्या जाहीरपणे समलैंगिक खासदार शपथ घेतात तेव्हा…, वेळ 1,13
-

01:13
व्हीडिओ, ज्योती वाघमारेंनी सावित्रीबाईंच्या पेहरावात घेतली राज्यसभेची शपथ, वेळ 1,13
-

00:55
व्हीडिओ, क्रिकेटर जोस बटलर IPL आणि इराण युद्धाविषयी म्हणतो…, वेळ 0,55
-

01:32
व्हीडिओ, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला शिवीगाळ, धमकी देताना पाहा काय म्हणाले…, वेळ 1,32
-

00:31
व्हीडिओ, वाळवंटात गारपीट : राजस्थानात जमीन बर्फाखाली गेल्यानं शेतीचं मोठं नुकसान, वेळ 0,31
-

01:07
व्हीडिओ, अमेरिका इराण युद्धावर दररोज किती खर्च करत आहे?, वेळ 1,07
-

00:19
व्हीडिओ, आर्टेमिस-2 चं प्रक्षेपण विमानातून एका प्रवाशाने ‘असं’ टिपलं, वेळ 0,19
-

02:03
व्हीडिओ, इराण युद्धाच्या एक महिन्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…, वेळ 2,03
-

01:21
व्हीडिओ, जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 8 महिलांचा मृत्यू, वेळ 1,21
-

02:21
व्हीडिओ, दुर्मिळ पांढरी खारुताई, कोल्हापुरातील वन्यजीव अभ्यासक काय सांगतात?, वेळ 2,21
SOURCE : BBC


















