Home LATEST NEWS ताजी बातमी ‘तुम्ही एकदा चंद्राचं लोणचं करून पाहा’; आशा भोसले गुलजार यांना असं का...

‘तुम्ही एकदा चंद्राचं लोणचं करून पाहा’; आशा भोसले गुलजार यांना असं का म्हणायच्या?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

आशा भोसले

फोटो स्रोत, Getty Images

2 तासांपूर्वी

वाचन वेळ: 6 मिनिटे

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं रविवारी (12 एप्रिल) वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं.

शनिवारी (11 एप्रिल) संध्याकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

आशा भोसले, फुफ्फुसांचा आजार आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांना तोंड देत होत्या. मल्टी-ऑर्गन फेल्युर म्हणजे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रतीप समदानी यांनी बीबीसीला दिली.

आशा भोसले यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण मनोरंजन विश्व शोकाकूल झालं आहे. त्याचबरोबर त्यांचे चाहतेदेखील खूप दु:खी झाले आहेत.

कलेक्टिव्ह न्यूजरूमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बीबीसीच्या तत्कालीन प्रतिनिधी रूपा झा यांनी 2010 मध्ये आशा भोसले यांची मुलाखत घेतली होती.

याच मुलाखतीतील काही खास गोष्टी आम्ही आमच्या वाचकांसाठी इथे देत आहोत.

जेव्हा नजरेनंच संवाद साधला जायचा

रूपा झा : सुरुवातीच्या काळात लाईव्ह रेकॉर्डिंग होत असे. त्याबद्दल थोडं सांगा.

आशा भोसले : लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचं, तेव्हा सर्व वादक (म्युझिशियन) समोर असायचे. आम्हाला सर्व ओळी लक्षात असायच्या. आम्ही सर्वजण एकमेकांना मदत करायचो. हा सूर इकडे जातो आहे, तिकडे जातो, असं आम्ही एकमेकांना सांगायचो. मी कानात सांगायची की हा सूर इकडे गेला पाहिजे किंवा इथे थांबायचं आहे, अशाप्रकारे मदत करायचो. किशोर आणि रफी यांच्यासोबत मी बऱ्याचदा असं करायची.

दीदीची एक सवय होती. ती फक्त नजरेनं सांगायची की, सुरू करा. मी तिला सांगायची की आता तुझी ओळ आहे. अशाप्रकारे आम्ही एकमेकांना सांगायचो.

आशा भोसले

फोटो स्रोत, Getty Images

रूपा झा : अशाप्रकारे नजरेनं खुणा करताना तुमचं सर्वात चांगलं ट्युनिंग कुणाबरोबर असायचं?

आशा भोसले : सर्वांबरोबरच चांगलं ट्युनिंग होतं. किशोरबरोबर खूप चांगलं ट्युनिंग होतं.

दीदीबरोबरदेखील होतं. मी दीदीसोबत जी गाणी गायली आहे. म्हणजे जर आलाप सुरू झाला, तर आलापसाठी वन-टू नाही देऊ शकत. आलाप अचानक सुरू होतो. मग मी दीदीकडे तिरप्या नजरेनं पाहायची. तिचा हात वर जायचा आणि मला कळायचं की आता तान सुरू होणार आहे.

मग अशाप्रकारे आमचा आलाप सुरू व्हायचा. शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांमध्ये त्याचा वापर खूप व्हायचा. तो आम्हाला एकमेकांकडे पाहूनच करावा लागायचा.

पंचम यांनी भेट दिला झाडू

रूपा झा : तुम्हाला स्वच्छता इतकी आवडते की पंचमदा यांनी तुम्हा चक्क झाडू भेट दिला होता?

आशा भोसले : झाडू आणि मासे…ते खवय्ये होते. मी उत्तम स्वयंपाक करायचे. मी स्वयंपाक करते म्हणून मला मासे दिले होते बनवण्यासाठी आणि ते झाडूनं झाकून दिले होते, झाडू साफसफाई करण्यासाठी. सोबत एक बांगडीदेखील होती. त्याच्याबरोबर देखील एक सोन्याचा झाडू दिला होता.

रूपा झा : पंचमजींचं गायन-संगीत यावरून पती-पत्नींमध्ये होतं तसं भांडण व्हायचं का?

आशा भोसले : नाही. मात्र कधीकधी मला एखादं गाणं आवडलं नाही, तर मी सांगायचे की मला हे गाणं आवडलं नाही. मग ते युक्तिवाद करायचे की हे चांगलं आहे, ते चांगलं आहे. मात्र मी म्हणायचे की मला आवडलं नाही, तर आवडलं नाही. ते माझ्या नजरेच्या इशाऱ्यानं समजून जायचे की मला ते आवडलं नाही.

आशा भोसले

फोटो स्रोत, Pancham Unmixed

उदाहरणार्थ, ‘तिसरी कसम’ चित्रपटामधील रफी साहेबांनी गायलेलं ‘तुमने मुझे देखा, होकर मेहरबां’ हे गीत. ते मला आवडलं नव्हतं. मी पंचमना म्हटलं की तीसरी कसमची सर्व गाणी वेगवान आहेत. मात्र हे गाणं थोडं धीमं वाटतं आहे. मला या गाण्यात पंचम, बर्मन दिसत नाही.

त्यावर ते म्हणाले की तो प्रसंगच तसा आहे. माझा मुलगादेखील मला म्हणतो की ते खूप छान गाणं आहे. मात्र माझं म्हणणं आहे की माझी स्वत:ची वेगळी आवड आहे.

पसंतीचा विचार करता, पंचम यांची सर्व गाणी छान आहेत.

‘चंद्राचं लोणचं’

रूपा झा : ‘इजाजत’ या चित्रपटातील गाण्यांच्या संगीतरचनेमध्ये तुमचं आणि गुलजारजींचं मोठं योगदान होतं का?

आशा भोसले : गुलजारजींची गाणी वेगळ्या प्रकारची असतात. ते चंद्राचा खूप वेळा वापर करतात. चंद्र असा, चंद्र तसा, चंद्राची खडीसाखर, चंद्र तोडून खा, काहीही म्हणतात. मग मी त्यांची चेष्टा करत म्हणते की तुम्ही एकदा चंद्राचं लोणचं करून पाहा.

आशा भोसले

फोटो स्रोत, Vijayananda Gupta/Hindustan Times via Getty Images

त्यांनी लिहिलेली गाणी खूपच छान होती. वेगळ्या प्रकारची होती. पंचम आणि त्यांचे सूर फार जुळायचे आणि वाददेखील व्हायचे. पंचम म्हणायचे की तुम्हाला मीटरची समज नाही. मात्र त्यांची गाणी खूप छान तयार व्हायची.

चाहत्यांच्या प्रेमावर काय म्हणाल्या होत्या?

आशा भोसले

फोटो स्रोत, PUNNET KUMAR

रूपा झा : गाणं गाण्यापूर्वी पडद्यावर ते ज्या अभिनेत्रीवर चित्रित होणार आहे, तिच्याबद्दल तुम्ही विचार करता का?

आशा भोसले : गाणं गाण्यापूर्वी मी म्हणते की ज्या अभिनेत्रीसाठी हे गाणं गायचं आहे, मला किमान तिचा फोटो तरी दाखवा. म्हणजे गाणं गाताना किमान तिचा चेहरा तरी समोर येईल. चेहरा जेव्हा डोळ्यासमोर येतो, तेव्हा गायनाची शैली थोडीशी बदलते.

रूपा झा : तुमचे असंख्य चाहते आहेत. अनेकजणांना तुम्ही आवडत असाल, त्यांना तुम्ही कशाप्रकारे मेसेज करायच्या?

आशा भोसले : खूप सांभाळून घ्यावं लागतं. मी त्या काळाबद्दल बोलते आहे, जेव्हा नावलौकिक होता, काम सुरू होतं, पैसेदेखील येत होते, मग खरं प्रेम करणारेदेखील होते. तशीही माणसं होती. पत्रंदेखील यायची.

दुर्लक्ष करणं, भाईसाहेब म्हणायचं, भैया म्हणायचं, कधी राखी बांधायची, अशाप्रकारे मी ते हाताळलं आणि त्यातून सुटले. एवढं मात्र खरं की मी कधी कोणाशीही भांडण केलं नाही. प्रेम करणारी इतकी माणसं होती की सर्वांनाच उत्तर देणं शक्य नव्हतं, त्यातच जीव गेला असता.

लतादीदींशी तुलनेवर आशा भोसले काय म्हणाल्या होत्या?

रूपा झा : ज्या कुटुंबात सर्वच संगीतकार, गायक आहेत, अशा कुटुंबात जन्माला येणं ही चांगली गोष्ट असते की त्यामुळे तोटा होतो?

आशा भोसले: मला वाटतं की नुकसानच होतं.

ज्या कुटुंबात एखादी खूप नावलौकिक असलेली व्यक्ती असते. तिथे जे त्या व्यक्तीपेक्षा कमी नावलौकिकाचे असतात, त्यांना पुढे जाताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. माझ्या बाबतीत असं घडलं की मी घरातून खूप लवकर बाहेर पडले आणि स्वत:चं नाव कमावण्यासाठी प्रचंड कष्ट केले. मी माझं काम स्वत:च केलं आणि तिथून बाहेर पडले.

मात्र, सर्वांनाच अशी संधी मिळत नाही. ते नावलौकिकाखाली दबले जातात.

आशा भोसले

फोटो स्रोत, STRDELAFP via Getty Images

मोठमोठ्या कलाकारांच्या मुलांचं काय होतं, हे तुम्ही पाहिलं असेल. आई जर खूप सुंदर असेल तर प्रत्येक वेळेस तुलना होते की मुलगी आईसारखी सुंदर नाही. एका बहिणीसारखी दुसरी बहीण नाही. अशी तुलना झाल्यामुळे त्यांच्या भवितव्यावर नकारात्मक परिणाम होतो.

नाहीतर मग त्यांनी विलायत हुसैन यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलांना घडवावं. तितकेच कष्ट घ्यावेत. तेव्हाच त्यांचं नाव होईल.

मला प्रचंड त्रास झाला. माझी नेहमीच तुलना होत राहिली ही मोठी की ती मोठी. हिचा नावलौकिक मोठा की तिचा, ही चांगलं गाणं गाते की ती चांगलं गाते. ही बहिणीसारखी नाही. अशी तुलना मला सतत ऐकावी लागायची.

जर मी पंजाब किंवा मद्रास किंवा गुजरातमधून आली असते तर लोक म्हणाले असते की नंबर वनवर आहे ही मुलगी. किमान बरोबरीची तरी म्हटले असते. मात्र बहीण असल्यामुळे मला नेहमीच खालचं स्थान दिलं जायचं.

गाण्यातला जिवंतपणा कसा टिकवून ठेवला?

रूपा झा : इतका प्रदीर्घ प्रवास कराल, असं कधी वाटलं होतं का?

आशा भोसले : नाही, कधीच असा विचार केला नव्हता. मी इतकं दूरवरचं विचार करणारी महिला नाही. जगात इतकी माणसं असताना, लोक मला ओळखतील, जगात माझं नाव होईल, जगातील गायकांमध्ये माझं नाव घेतलं जाईल, इतका विचार मी कधी केला नव्हता.

रूपा झा : तुमच्या गाण्यामध्ये जिवंतपणा आहे, तो तुम्ही कसा टिकवून ठेवता?

आशा भोसले : मी लहानपणापासूनच अशी आहे. मला बसून राहायला आवडत नाही. मी काहीना काही करतच असते. त्यामुळेच मी आजही उभी आहे. गाणंही गाते आणि बोलतेदेखील आहे. लोक म्हणतात की या वयात असं होतं, तसं होतं. मात्र मला वाटत नाही की काही होतं. खरोखरंच मला वाटतं की मी 30 वर्षांची आहे.

आशा भोसले

फोटो स्रोत, STRDEL/AFP via Getty Images)

रूपा झा : एखादी गोष्ट करायची राहून गेली, असं वाटतं का?

आशा भोसले : बऱ्याच गोष्टी आहेत. मला वाटतं की मला उत्तम इंग्रजी बोलता आलं असतं, तर ते किती छान झालं असतं. मी फ्रान्सला जाते, तेव्हा वाटतं की, मला फ्रेंच भाषा का येत नाही. मी मेक्सिकोत गेले की, मला तिथली भाषा बोलाविशी वाटते. मी गाणं गाते, मात्र मला बोलता का येत नाही.

इतरांचं मला माहीत नाही, मात्र मला प्रत्येक गोष्ट यायला हवी होती. मला शास्त्रीय संगीतातील खूप मोठी गायिका व्हायचं होतं. जर मी शास्त्रीय गायनात गेले असते, तर मी शास्त्रीय संगीतातील खूप मोठी गायिका झाले असते. कारण मला शास्त्रीय संगीत आवडतं. माझा आवाज ज्याप्रकारचा आहे, तो शास्त्रीय गायनासाठी योग्य आहे. तुम्ही माझी हिंदीतील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी ऐकली असतील. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की शास्त्रीय गायनासाठी माझा आवाज खूप चांगला आहे.

‘…तोपर्यंतच जिवंत राहिलं पाहिजे’

या मुलाखतीत आशा भोसलेंना निवृत्तीबद्दल विचारलं होतं, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर विचार करायला लावणारं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “कधीच नाही. मला वाटतं की मी गाता-गाताच मरणार आहे. जोपर्यंत तुम्ही काम करू शकता, तोपर्यंतच तुम्ही जिवंत राहिलं पाहिजे. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. मी अंथरुणाला खिळून असावं, असं मला कधीच वाटणार नाही. सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा की, मी जोपर्यंत राहीन, तोपर्यंत उभी राहावं.”

“जोपर्यंत जगण्याची मजा आहे, तोपर्यंतच मरण्याची मजा आहे,” असं त्या म्हणाल्या होत्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC