Home LATEST NEWS ताजी बातमी इराण युद्धातून बाहेर पडण्याच्या धडपडीत ट्रम्प यांचा पाय अधिकच खोलात अडकलाय का?

इराण युद्धातून बाहेर पडण्याच्या धडपडीत ट्रम्प यांचा पाय अधिकच खोलात अडकलाय का?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Reuters

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार गुरूवारी (2 एप्रिल) सकाळी 6.30 वाजता व्हाईट हाऊसमध्ये इराण युद्धासंदर्भात भाष्य केलं.

मात्र, ट्रम्प यांच्या या वक्तव्यात त्याच जुन्या गोष्टींचा पुनरूच्चार आढळून आला.

20 मिनिटांच्या या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं की, अमेरिका-इस्रायलची लष्करी मोहीम आपली ‘प्रमुख सामरिक उद्दिष्ट्ये’ साध्य करण्याच्या जवळ पोहोचली आहे. हे युद्ध आणखी 2 ते 3 आठवडे चालू शकतं, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.

यावेळी इराणविरुद्ध काही इशारेही वारंवार देण्यात आले. त्यामध्ये इराणला ‘पुन्हा पाषाणयुगात पाठवण्या’च्या भाषेचाही समावेश होता.

जर तुम्ही गेल्या आठवड्यात ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या ट्रम्प यांच्या पोस्ट पाहिल्या, तर त्या त्यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या या भाषणाशी खूपच मेळ खाणाऱ्या दिसतील.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला या युद्धाचे फायदे पटवून देण्याचाही प्रयत्न केला.

यामागे तसं कारणही आहे. अनेक सर्वेक्षणांनुसार बहुसंख्य अमेरिकन मतदार हे 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या लष्करी मोहिमेविषयी नापसंती व्यक्त करतात.

ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला या युद्धाकडे त्यांच्या भविष्यासाठीची एक ‘गुंतवणूक’ म्हणून पाहण्याचं आवाहन केलं.

ते म्हणाले की, गेल्या शतकाहून अधिक काळातील इतर संघर्षांच्या तुलनेत हा संघर्ष म्हणजे काहीच नाहीये, ज्या संघर्षांमध्ये अमेरिका खूप जास्त काळ गुंतलेली होती.

परंतु, हे युद्ध कोणत्या दिशेने जातंय किंवा अमेरिकेसाठी त्यातून बाहेर पडण्याचे संभाव्य मार्ग कोणते असू शकतात, हे ज्यांना जाणून घ्यायचं होतं, त्यांच्यासाठी त्या भाषणात फारसं काहीच नव्हतं.

त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले.

असे प्रश्न ज्यांची उत्तरे मिळाली नाहीत…

पहिली गोष्ट म्हणजे, इस्रायल अजूनही इराणवर हल्ले करत आहे. इस्रायलला इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचाही सामना करावा लागत आहे.

या हल्ल्यांमध्ये, बुधवारी (1 एप्रिल) तेल अवीवजवळ झालेल्या काही हल्ल्यांचाही समावेश आहे.

पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचं सरकार ट्रम्प यांनी सांगितलेली काही आठवड्यांची मुदत मान्य करतं की नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, ते इराण युद्धाचे आपले ध्येय साध्य करण्याच्या जवळ पोहोचले आहेत.

फोटो स्रोत, Alex Brandon-Pool/Getty Images

याबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही, किमान सध्याच्या परिस्थितीत तरी नाहीये.

दुसरं म्हणजे, काही दिवसांपूर्वीच व्हाईट हाऊसने इराणला स्वीकारायला सांगितलेल्या 15-कलमी शांतता योजनेचं काय झालं?

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात त्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.

समृद्ध युरेनियमचा साठा मागे घेण्याच्या मागणीसह इतर अनेक मागण्यांवरून अमेरिका आता माघार घेत आहे का? हे प्रश्नदेखील अनुत्तरित आहेत.

होर्मुझबाबत भूमिका स्पष्ट नाही

आता जगातील सर्वात व्यग्र तेल वाहतूक मार्गांपैकी एक होर्मुझची सामुद्रधुनी संघर्षाचे केंद्र बनली आहे.

इराणने या तेलमार्गाला बंद करून कोंडी तयार केली आहे.

मात्र, या मुद्द्याबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची कोणतीही ठोस भूमिका अथवा पवित्रा दिसून येत नाही.

कधी ते इराणने तेल जहाजांना वाट द्यावी, अशी मागणी करतात, तर दुसऱ्याच क्षणी आपल्या मित्र राष्ट्रांना स्वतः हे प्रकरण हाताळायला सांगतात.

“होर्मुझला जा आणि त्याचा ताबा घ्या. ते सुरक्षित करा आणि तुमच्या वापरासाठी खुलं करा. कठीण काम तर पार पडलेलं आहे, त्यामुळे हे सोपं जाईल,” असं ट्रम्प बुधवारी (1 एप्रिल) म्हणाले.

1 एप्रिल रोजी तेहरानमध्ये ज्या इमारतीवर हल्ला झाला होता, त्यातून धूर निघत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या आपल्या मित्रराष्ट्रांना तेल मिळवण्यासाठी स्वतःच होर्मुझला जाण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर त्यांनी अधिक तपशील न देता सांगितलं की, युद्ध संपल्यावर होर्मुझची सामुद्रधुनी ‘नेहमीप्रमाणे’ पुन्हा खुली होईल.

तेलाच्या किमतींबद्दल काळजीत असलेल्यांसाठी ही गोष्ट फारशी दिलासादायक नसेल.

बुधवारी (1 एप्रिल) सकाळी दिलेल्या एका मुलाखतीत नाटो लष्करी आघाडीतून बाहेर पडण्याची कल्पना मांडल्यानंतर ट्रम्प यांनी काही मित्र राष्ट्रांवर सडकून टीका केली.

परंतु, व्हाईट हाऊसमध्ये दिलेल्या त्यांच्या ताज्या भाषणात तो सूर पूर्णपणे गायब होता.

मात्र, तो त्यांच्या भाषणाचा एक महत्त्वाचा भाग असेल, असे संकेत ब्रीफिंग्समधून देण्यात आले होते.

आणखी एक मोठा अनुत्तरित प्रश्न हा लष्कराला थेट रणांगणात उतरवण्यासंदर्भातील आहे.

अमेरिकेत तेलाच्या सरासरी किमतीत 4 डॉलरची वाढ झाली.

फोटो स्रोत, Getty Images

त्या भागात सातत्याने येत असलेल्या हजारो मरीन आणि पॅराट्रूपर्सनी तिथं नेमकं काय करायचं आहे, हेच अस्पष्ट आहे.

या भाषणानंतर, ट्रम्प यांच्यासाठी या युद्धातील विजयाचा नेमका अन्वयार्थ काय आहे, ही बाब अधिक गुंतागुंतीची झालेली आहे.

त्यांची विधानं दररोज बदलत असल्यानं हा गोंधळ आणखीनच वाढला आहे.

या दरम्यान, अमेरिकेत गॅसची सरासरी किंमत जवळपास 4 वर्षांत प्रथमच प्रति गॅलन 4 डॉलरच्या वर गेली आहे.

तसेच, काँग्रेसवर नियंत्रण ठरवणाऱ्या महत्त्वपूर्ण मध्यावधी निवडणुका काही महिने शिल्लक असतानाच राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेत मोठी घसरण होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत आणि सध्या ते याच मार्गाच्या शोधात अंधातरी भटकत आहेत, असं वाटतंय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC