Source :- ZEE NEWS
World News : उडत्या तबकड्या, परग्रहवासी अर्थात एलियन…. या सर्व गोष्टी कितीही कल्पत वाटत असल्या किंवा अनेकांचा त्यावर विश्वास नसला तरीही अवकाश आणि त्याच्याशी संबंधित या संकल्पनांच्या अस्तित्वावर संशोधनांच्या माध्यमातून विविध सिद्धांतांच्या मदतीनं शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. चित्रपटांच्या माध्यमातूनही या संकल्पना अधिक सोप्या करून दाखवण्या आल्या. एलियन, ही त्यापैकीच एक अतिशय कुतूहलाची गोष्ट. पृथ्वीपासून किबंहुना पृथ्वी आहे त्या आकाशगंगेपासून कैक मैल दूर असणाऱ्या कोणा एका दुसऱ्या विश्वात एलियनचं अस्तित्वं असल्याचं आजवर बऱ्याचदा सांगण्यात आलं. पुन्हा एकदा या विषयाला हवा मिळण्याचं कारण ठरत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जारी केलेले निर्देश.
एरिया 51, एलियन आणि उएफओ म्हणजेच उडत्या तबकड्यांबाबतची रहस्य सांगणारी माहिती आणि दस्तऐवज जारी करण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले. ज्यामुळं पुन्हा एकदा अमेरिका जगापासून नेमकं काय लपवू पाहत आहे, हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात आहे.
परग्रहांवरील अंतराळ यानांमध्ये कितपत तथ्य?
अवकाशात किंवा काही प्रसंगी आकाशत उडताना दिसणाऱ्या UFO सम गोष्टी कैक दशकांपासून अनेकांची उत्सुकता शिगेला नेताना दिसत आहेत. अमेरिकी सरकारनंही या विचित्र आकाराच्या यानांचं संशोधन करत काही अहवालांच्या आधारे निरीक्षणं केली. अनेकदा सांगण्यात आलं की, ही कोणत्या गोपनीय विमानाची चाचणी होती. मात्र, आता ट्रम्प यांच्या आदेशानंतर कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
एरिय़ा 51 नं वेधलं जगाचं लक्ष
बराक बामा यांनी एरिया 51 मध्ये एलियन नाही, असं वक्तव्य एका मुलाखतपर कार्यक्रमात केलं आणि यानंतर Google वर सर्वांनीच एरिया 51 बाबतची माहिती शोधण्यासाठी धाव घेतली. माहितीसाठी, अमेरिकेत नेवाडा नावाचा एक प्रांत आहे. येथील वाळवंटामध्ये अमेरिकेच्या वायुदलाचा एक गुप्त तळ आहे. उपलब्ध माहितीनुसार इथं काही गोपनीय मोहिमांवरील कामं, अतिशय अद्ययावत लढाऊ विमानांच्या चाचण्या होतात. गुगल मॅपमध्ये एरिया 51 सर्च केलं असता एक दृश्य दिसतं, ज्यामध्ये एका तलावापाशी असणारा पर्वतीय भाग नजरेस पडतो आणि काही बांधकाम दिसतं.

1955 पासून कार्यरत असणाऱ्या या सुविधेमध्ये यू 2 आणि एसआर 71 ब्लॅकबर्ड अशा विमानांची चाचणीसुद्धा करण्यात आली आहे. याच तळाबाबत एलियन तंत्रज्ञान आणि उडत्या तबकडीचे सिद्धांतसुद्धा मांडण्यात येतात.
अमेरिका हे ठिकाण जगापासून का लपवतंय?
ओबामांनी जाहीरपणे वक्तव्य करत इथं कोणतीही भूमिगत सुविधा नसल्याचं सांगितलं. काही काळापूर्वी एरिया 51 हा भाग एका वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आलेल्या माहितीरपटात दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये CIA च्या गोपनीय कागदपत्रांनुसार हा कोणताही तळ नसून, एक प्रयोगशाळा आहे. 1968 मध्ये इथं अनेक घातक विमानांची चाचणी घेण्यात आली होती. इथंच अमेरिकी वैमानिकांना रशियाशी संघर्ष झाल्यास डॉगफाईटमध्ये कसा लढा द्यावा याचं प्रशिक्षणही दिल्याचं सांगण्यात येतं. मात्र नेवाडामध्ये ननेमकं काय सुरुय याची माहिती कोणाला मिळू नये यासाठी काही अंतरावरील तळही बंद करण्यात आले.

अनावधानानं टीपलेल्या एका फोटोनं वाढवला गुंता
अमेरिकेनं जे रहस्य कैक वर्षांपासून लपवलं होतं ते जवळपास जगासमोर उघड होता होता राहिलं. मात्र, तिथं काहीतरी मोठी गोपनीय गोष्ट आहे याचा मात्र उलगडा झाला आणि तोसुद्धा अंतराळवीरांच्या एका चुकीमुळं. 1974 मध्ये स्कायलॅब्सच्या काही अंतराळवीरांनी अनावधानानं एरिया 51 चे फोटो टीपले आणि हे ठिकाण प्रकाशझोतात आलं. पुढं अमेरिकी वायुदलानं हा भाग ताब्य़ात घेतला.

2024 मध्ये पेंटागनच्या एका जाहीर अहवालात सांगितल्यानुसार, 1950 आणि 60 च्या दशकामध्ये इथं अनेक गोपनीय आणि आधुनिक तंत्रज्ञानाची विमानं पाहायला मिळाली. मात्र, याचा दुसऱ्या विश्वातील तबकड्यांशी कोणताही संबंध नाही. आजही या रहस्याबाबत अनेक सिद्धांत मांडले जात असल्यानं आता नव्या दस्तऐवजांतून नेमका कोणता उलगडा होतो, इथं खरंच एलियनचं अस्तित्वं आहे का, याचा खुलासा होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
SOURCE : ZEE NEWS
