Home LATEST NEWS ताजी बातमी इम्रान खान यांच्यासाठी 14 माजी कर्णधार ‘मैदानात’, पाकिस्तान सरकारकडे पत्राद्वारे केल्या ‘या’...

इम्रान खान यांच्यासाठी 14 माजी कर्णधार ‘मैदानात’, पाकिस्तान सरकारकडे पत्राद्वारे केल्या ‘या’ 3 मागण्या

16
0

Source :- BBC INDIA NEWS

सुनील गावसकर, इम्रान खान आणि कपिल देव

फोटो स्रोत, Getty Images

3 तासांपूर्वी

वाचन वेळ: 4 मिनिटे

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान सध्या पाकिस्तानातील अडियाला तुरुंगात आहेत. इम्रान खान यांच्या तब्येतीबद्दल 5 देशांच्या 14 माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहिलं आहे.

पीटीआय आणि एएनआय या भारतीय वृत्तसंस्थेनुसार, या माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारकडे मागणी केली आहे की, इम्रान खान यांना चांगली वागणूक देण्यात यावी. तसंच, त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे उपचार करण्यात यावेत.

रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनंदेखील या बातला दुजोरा दिला आहे.

या 14 माजी कर्णधारांमध्ये भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार ॲलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, इयान चॅपल आणि किम ह्यूज, तसंच ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाच्या माजी कर्णधार बेलिंडा क्लार्क यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, इंग्लंडचे माईक आथर्टन, नासिर हुसैन, माईक ब्रेयरली आणि डेव्हिड गॉवर, वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड आणि न्यूझीलंडचे जॉन राईट यांनीदेखील या पत्रावर सही केली आहे.

पत्रात काय म्हटलं आहे?

पाकिस्तान सरकारला लिहिण्यात आलेल्या या पत्रात म्हटलं आहे की, “आम्ही आपापल्या देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांचे माजी कर्णधार आहोत. इम्रान खान यांना देण्यात आलेली कथित वागणूक आणि तुरुंगातील परिस्थितीबद्दल आम्ही गंभीर चिंता व्यक्त करतो. इम्रान खान पाकिस्तानचे माजी कर्णधार असण्याबरोबरच जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूदेखील आहेत.”

“इम्रान खान यांनी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाचं जगभरात कौतुक केलं जातं. कर्णधार म्हणून त्यांनी 1992 चा क्रिकेट विश्वचषक पाकिस्तानला जिंकून देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. हा विजय कौशल्य, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीवर आधारित होता. यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळाली.”

“आमच्यापैकी अनेकजण त्यांच्याविरोधात खेळले. त्यांच्याबरोबर मैदानात उतरले. त्यांची अष्टपैलू क्षमता, व्यक्तिमत्व आणि स्पर्धात्मक वृत्तीमुळे त्यांना आदर्श मानलं. आजदेखील त्यांना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधारांपैकी एक मानलं जातं. खेळाडू, चाहते आणि प्रशासक सर्वजण त्यांचा आदर करतात.”

कपिल देव यांच्यासह 14 माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला एक पत्र लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

“क्रिकेटव्यतिरिक्त इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणूनही काम केलं. त्यांनी कठीण काळात त्यांच्या देशाला नेतृत्व दिलं. राजकीय दृष्टीकोन काहीही असला तरी, त्यांना त्यांच्या देशाच्या सर्वोच्च पदावर लोकशाही पद्धतीनं निवडून येण्याचा मान मिळाला आहे.”

या पत्रात पुढे लिहिलं आहे की, अलीकडेच समोर आलेल्या वृत्तांमध्ये त्यांच्या तब्येतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषकरून तुरुंगात असताना त्यांची दृष्टी झपाट्यानं खराब होत गेल्याचं म्हटलं आहे. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांनी ज्या तुरुंगवासाला तोंड दिलं आहे, त्यामुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे.

सुनील गावस्कर यांनीदेखील या पत्रावर सही केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

या पत्रात लिहिलं आहे, “क्रिकेटपटू असल्यामुळे आम्हाला निपक्षपातीपणा, सन्मान आणि खिलाडूवृत्ती ही मूल्यं समजतात, जी मैदानाच्या सीमांच्या पलीकडे जातात. आम्हाला वाटतं की इम्रान खानसारख्या व्यक्तिमत्वाला सन्मानजनक आणि मूलभूत मानवीय संवेदना असलेली वागणूक दिली पाहिजे.”

माजी कर्णधारांनी केल्या 3 मागण्या

या पत्रात पुढे पाकिस्तान सरकारकडे 3 मागण्यात करण्यात आल्या आहेत.

पहिली मागणी इम्रान खान यांच्या इच्छेनुसार योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर लगेच आणि सातत्यपूर्ण उपचार करण्यात यावेत.

दुसरी मागणी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार त्यांना तुरुंगात मानवीय आणि सन्मानजनक वागणूक देण्यात यावी. यात कुटुंबातील सदस्यांना नियमितपणे भेटू देण्याचा समावेश असावा.

तिसरी मागणी, कोणत्याही विलंब किंवा अडथळ्याशिवाय निष्पक्ष आणि पारदर्शक कायदेशीर प्रक्रिया त्यांना उपलब्ध होईल याची खातरजमा करण्यात यावी.

या पत्रात इम्रान खान यांच्यावर योग्यप्रकारे उपचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पत्रात पुढे म्हटलं आहे, “क्रिकेट नेहमीच देशांमधील दुवा म्हणून काम करत आलं आहे. मैदानातील यष्ट्या काढताच स्पर्धा, चुरस संपुष्टात येते आणि सन्मान कायम राहतो. इम्रान खान त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत याच भावनेनं जगले.”

“अधिकाऱ्यांनी आजदेखील शिष्टाचार आणि न्यायाच्या त्याच तत्वांचं पालन करावं, असं आम्ही त्यांना आवाहन करतो.”

“हे आवाहन कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत अडथळा न आणता खिलाडूवृत्ती आणि मानवतेच्या आधारे केलं जात आहे.”

इम्रान खान यांची तब्येत कशी आहे?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा राजकीय पक्ष असलेल्या पीटीआयचा दावा आहे की त्यांच्या उजव्या डोळ्यात फक्त 15 टक्केच दृष्टी राहिली आहे.

बीबीसी न्यूज उर्दूनुसार, पाकिस्तान सरकारनं रविवारी (15 फेब्रुवारी) इम्रान खान यांना त्यांच्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी एका ‘स्पेशल मेडिकल इन्स्टिट्यूशन’ मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला होता.

केंद्रीय मंत्री अता तारड यांचं म्हणणं होतं की ‘इम्रान खान यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबरोबरच, त्यांच्या डोळ्यांची पुढील तपासणी आणि उपचार, एका ‘स्पेशल मेडिकल इन्स्टिट्यूशन’मध्ये नेत्रतज्ज्ञांकडून केले जातील. तसंच त्याचा एक सविस्तर अहवालदेखील सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल.’

सर्वोच्च न्यायालयानं पाकिस्तान सरकारला आदेश दिला होता की त्यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या डोळ्यांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत करवून घ्यावी. तसंच न्यायालयाच्या आदेशानंतर इम्रान खान यांचं त्यांच्या मुलांशी बोलणंदेखील करवून देण्यात आलं होतं.

इम्रान खान यांच्यावरील उपचारांसाठी पीटीआय आंदोलन करत असतानाच त्यांच्या सुटकेची मागणीदेखील करते आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC