Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
इंटरमिटंट फास्टिंग केल्यामुळे जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठपणा असलेल्या लोकांना फायदा होत नाही, असं एका मोठ्या पुनरावलोकनातून किंवा अभ्यासातून समोरं आलं आहे.
इंटरमिटंट फास्टिंग ही एक खाण्याची पद्धत आहे. यात ठराविक वेळेत अन्न सेवन केलं जातं आणि उरलेल्या वेळेत उपवास (काहीही न खाणे) केला जातो. यात रिकामी पोटी राहण्याचा कालावधी जास्तीत जास्त ठेवण्याकडे कल असतो.
संशोधकांचं म्हणणं आहे की आठवड्यातील काही दिवस उपवास करायचा आणि उर्वरित दिवस सामान्य पद्धतीनं खायचं, या लोकप्रिय पद्धतीमुळे “वजन कमी करण्यास आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात फारसा फरक पडू शकत नाही”.
मात्र त्यांचं म्हणणं आहे की इंटरमिटंट फास्टिंग केल्यामुळे शरीराच्या काही क्रियांमध्ये उपयुक्त बदल झाल्यामुळे त्यातून एकूणच आरोग्यात सुधारणा होऊ शकते.
अर्थात यासाठी आणखी पुरावे आवश्यक आहेत.
इंटरमिटंट फास्टिंगमध्ये 5:2 आहार आणि दररोज दिवसभरातील एकूण खाण्याचा कालावधी कमी ठेवणं म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवणं आणि रात्रीचं जेवण या सर्व गोष्टींसाठीचा एकूण कालावधी कमी ठेवणं (अनेकदा जवळपास 8 तास) या गोष्टींचा समावेश आहे.
इंटरमिटंट फास्टिंगवरील अभ्यास आणि त्याचे प्रकार
संशोधकांच्या टीमनं आधी केलेल्या 22 अभ्यासांचे निष्कर्ष पाहिले. या आधीच्या अभ्यासांमध्ये जवळपास 2,000 प्रौढांचा समावेश होता.
नवीन अभ्यासातून हे शोधण्यात आलं की स्टँडर्ड किंवा मानक आहाराच्या सल्ल्यापेक्षा किंवा आहाराबाबतचा कोणताही सल्ला नसण्याच्या तुलनेत कमी काळ केलेलं इंटरमिटंट फास्टिंग (12 महिन्यांपर्यंतचा कालावधी) वजन कमी करण्यासाठी प्रौढांना अधिक फायद्याचं, परिणामकारक ठरतं का.
इंटरमिटंट फास्टिंग हा वजन कमी करण्यासाठीची एक नवीन पद्धत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही पद्धत लोकप्रिय झाली आहे.
याचे वेगवेगळे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
- दररोज फक्त एका निश्चित कालावधीतच खाणं
- आठवड्यातील काही उपवास करणं
- एक दिवस सामान्य पद्धतीनं खाणं आणि दुसऱ्या दिवशी कमी खाणं
फोटो स्रोत, Getty Images
कमी कॅलरी असलेला आणि अधिक निरोगी आहार घेणं, यासारख्या आहाराबद्दलच्या पारंपारिक सल्ल्याऐवजी, इंटरमिटंट फास्टिंग केल्यामुळे लोकांना वजन कमी करण्यास किंवा जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास फारसा पडला नाही.
ज्या लोकांना आहाराबद्दलचा कोणताही सल्ला देण्यात आला नाही किंवा जे वजन कमी करण्यासाठीच्या सल्ल्याची वाट पाहत होते, त्यांच्या तुलनेत इंटरमिटंट फास्टिंग केल्यानं फारसा फरक पडला नाही.
जरी त्याचा जीवनाच्या गुणवत्तेवर असणारा परिणाम स्पष्ट नव्हता.
इंटरमिटंट फास्टिंगबद्दलच्या प्रचाराला आधार नाही
लुईस गॅरेगनानी, युनिव्हर्सिडाड हॉस्पिटल इटालियानो डी ब्युनॉस आयर्समधील पुनरावलोकनाच्या अभ्यासाचे प्रमुख आहेत. ते म्हणतात, उपवासाबद्दल जो ऑनलाइन प्रचार होतो आहे किंवा त्यांचं कौतुक होतं आहे त्याबद्दल त्यांना चिंता वाटते.
ते म्हणाले, “इंटरमिटंट फास्टिंग हा काही लोकांसाठी एक योग्य पर्याय असू शकतो. मात्र त्यासंदर्भात सध्या जे पुरावे उपलब्ध आहेत, त्यातून सोशल मीडियावर त्याच्याबद्दल दिसणाऱ्या उत्साहाला आधार मिळत नाही.”
फोटो स्रोत, Getty Images
मात्र संशोधक हे देखील मान्य करतात की प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि काही लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो.
“वजन वाढलेल्या प्रौढ व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी सल्ला देताना डॉक्टरांना प्रत्येक रुग्णाकडे स्वतंत्रपणे दृष्टीकोनातून पाहावं लागेल,” असं वरिष्ठ संशोधक इव्हा माद्रिद म्हणाल्या.
जरी संशोधकांचं म्हणणं असलं की त्यांच्या निष्कर्षांबद्दल त्यांना ‘मध्यम स्वरुपाचा आत्मविश्वास’ आहे. तरीदेखील संशोधनातील इतर घटकांबद्दल त्यांना कमी आत्मविश्वास आहे.
इंटरमिटंट फास्टिंगच्या इतर पैलूंवर अभ्यास आवश्यक
त्यांनी पाहिलेल्या बहुतांश अभ्यासांमध्ये सर्वात स्थिर, विश्वासार्ह पद्धती वापरण्यात आलेल्या नाहीत. त्यात कमी लोकांवर अभ्यास करण्यात आला होता. त्यातून खऱ्या परिणामांना जाणून घेणं कठीण झालं.
कोक्रेन डेटाबेस ऑफ सिस्टेमॅटिक रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात म्हटलं आहे की लोकांच्या आरोग्याशी संबंधित इतर पैलूंवर इंटरमिटंट फास्टिंगचा काय परिणाम होतो, हे पाहण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
इतर पैलू म्हणजे त्यांच्या टाईप 2 मधुमेहाची स्थिती आणि इतर गंभीर, दीर्घकालीन आजार.
फोटो स्रोत, Getty Images
त्यात असंही म्हटलं आहे की इंटरमिटंट फास्टिंगचे अनेक प्रकार आहेत.
पुरुष आणि महिलांवर ते स्वतंत्रपणे कसा परिणाम करू शकतात याबद्दल अधिक तपशीलांची आवश्यकता आहे.
त्याशिवाय, वेगवेगळे बीएमआय असणाऱ्या आणि वेगवेगळ्या देशांमधील लोकांवरील होणाऱ्या परिणामांचेही तपशील आवश्यक आहेत.
या पुनरावलोकनासाठीचे अभ्यास युरोप, उत्तर अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेत झाले.
‘लोकांमधील धारणा’ आणि वास्तव
डॉ. बॅप्टिस्ट ल्युरेंट युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये वैद्यकीय सांख्यिकीचे सहायक प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, “एकत्रिपणे, हे वैयक्तिक अभ्यास “स्पष्टपणे दर्शवितात की इंटरमिटंट फास्टिंगमुळे फारसा फायदा होत नाही.”
“लोकांमध्ये असणारी धारणा आणि वैज्ञानिक पुरावे यामधील विसंगतीचं हे आणखी एक उदाहरण आहे,” असं ते पुढे म्हणाले.
प्राध्यापक कीथ फ्रेन, ऑक्सफर्ड विद्यापीठात मानवी चयापचय विभागाचे एमेरिटस प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की, वजन कमी करण्याचं साधन इंटरमिटंट फास्टिंगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता.
त्याचा ‘चयापचयावर विशेष परिणाम होतो’ या दाव्यांच्या आधारावर तो अनेकदा केला जात होता.
“या अभ्यासातून दिसून येतं की असे दावे त्याला फारसे अनुसरून नसतात किंवा त्यांचा संबंध नसतो,” असं ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणतेही ‘तात्काळ उपाय’ नाहीत. अशा लोकांना कॅलरी सेवन कमी करण्यावर लक्ष द्यावंच लागेल.
फोटो स्रोत, Getty Images
वजन वाढू नये यासाठी इंटरमिटंट फास्टिंग करणं हा अनेक लोकांना एक चांगला मार्ग वाटतो, हे बहुतांश लोकांना मान्य आहे.
अर्थात पुनरावलोकनात यावर संशोधन झालं नाही. कमी खाण्यास मदत करून इंटरमिटंट फास्टिंगचा संबंध कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर कमी करणं आणि आतड्यांचं आरोग्य सुधारण्याशी देखील जोडला गेला आहे.
युकेमध्ये जवळपास 16 लाख प्रौढ, वजन कमी करण्यासाठी वेगोवी आणि मौंजरो सारख्या इंजेक्शनचा वापर करत असल्याचं मानलं जातं.
यातील बहुतांश इंजेक्शन एनएचएसऐवजी खासगी प्रिस्क्रिप्शनद्वारे विकत घेतली जातात.
अलीकडेच झालेल्या एका अभ्यासात आढळलं आहे की जे लोक पांरपारिक आहार खाणं आणि व्यायाम करणं थांबवतात त्यांच्या तुलनेत जे लोक वजन कमी करण्यासाठीचं इंजेक्शन घेणं थांबवतात, त्यांच्या वजनात चार पट अधिक वेगानं पुन्हा वाढ होऊ शकते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC



