Home LATEST NEWS ताजी बातमी दादासाहेब फाळकेंनी ‘मी चित्रपट व्यवसायासाठी मेलो आहे’, असं का म्हटलं होतं?

दादासाहेब फाळकेंनी ‘मी चित्रपट व्यवसायासाठी मेलो आहे’, असं का म्हटलं होतं?

9
0

Source :- BBC INDIA NEWS

दादासाहेब फाळके

फोटो स्रोत, Chandrashekhar Pusalkar

“ॲक्टर पाहिजेत. सुतार, धोबी, न्हावी, पेंटर पाहिजेत. व्यसनी, उडाणटप्पू, खप्पड अशा द्विपादांनी येण्याची तसदी घेऊ नये. सुस्वरूप, अव्यंग-मुके असले तरी चालतील- चांगले ॲक्टिंग जाणणारे कलाकार पाहिजेत.”

सोशल मीडिया, कास्टिंग डायरेक्टर्स, ऑडिशन्सच्या जमान्यात अभिनेत्यांसाठी अशी जाहिरात कोणी आणि का दिली असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थांबा…ही जाहिरात आताच्या कोणत्याही मालिका-सिनेमासाठीची नाहीये.

113 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पहिला भारतीय सिनेमा राजा हरिश्चंद्रसाठी दादासाहेब फाळकेंनी दिलेली ही जाहिरात.

सिनेमाच्या प्रवासाची सुरूवात दादासाहेब फाळकेंनी कुठून आणि कशी केली याची पुसटशी कल्पना या जाहिरातीतून येते. अर्थात, जाहिरात दिली, कलाकार मिळाले, सिनेमाला सुरूवात झाली आणि सिनेमा तयार झाला….इतकं सहज सोप्पं हे नक्कीच नव्हतं.

वेगवेगळे व्यवसाय करून वयाच्या चाळीशीत कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना दादासाहेबांनी भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली…त्यांचा सिनेमा निर्मितीचा हा प्रवास केवळ चढ-उतारांचाच नव्हता तर संघर्षाचाही होता.

त्यांच्या सिनेमा निर्मितीसोबतच भारतीय सिनेमाही घडत होता, आकाराला येत होता. त्यामुळेच आज (16 फेब्रुवारी) दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा, सिनेमा निर्मितीचा आणि त्यातून आकाराला आलेल्या भारतीय सिनेमाच्या जडणघडणीचा आढावा घेऊ.

दादासाहेब फाळके यांचा जन्म त्र्यंबकेश्वर इथं 30 एप्रिल 1870 साली झाला. त्यांचे पाळण्यातील नाव धुंडिराज होते. त्यांचे वडील गोविंद सदाशिव फाळके- दाजीशास्त्री हे वैदिक व्युत्पन्न ब्राह्मण होते. दाजीशास्त्रींनी देवालयातील पुराणिकाचा पेशा पत्कारल्यामुळे लहानपासून दादासाहेबांच्या कानांवर रामायण, महाभारत, भागवत इत्यादी पुराणांतल्या कथा पडल्या.

वडिलांच्या सततच्या सहवासामुळे दादासाहेबांनी या कथा पुराणांप्रमाणेच याज्ञिकी, वैदिकी, हव्यकव्यादिके मुखोद्गत केली होती.

पण दाजीशास्त्रींची एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृत शास्त्री म्हणून नेमणूक झाली. फाळके कुटुंब मुंबईला गेलं. दादासाहेबांचं नाव मुंबईच्या मराठा हायस्कूलमध्ये घालण्यात आलं.

दादासाहेबांनी मुंबईत मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. मॅट्रिकनंतर दादासाहेबांनी जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये ललितकलांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. मुंबईतला आर्ट स्कूलचा ड्रॉइंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते आपल्या थोरल्या भावाकडे बडोद्याला गेले.

बडोद्याच्या कलाभवनात पेंटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्यांनी आर्किटेक्चर आणि मोल्डिंग हे विषयही शिकले. तिथल्या एका स्थानिक कार्यक्रमात त्यांना कॅमेरा बक्षीस मिळाला. त्यातूनच छायाचित्रण आणि निगेटिव्ह्ज डेव्हलप करण्याचा छंद लागला. त्याचंच रुपांतर व्यवसायात करायचं त्यांनी ठरवलं.

पण त्याकाळी भारतात हा व्यवसाय बाल्यावस्थेत होता. त्यातून फारशी कमाई होत नसल्याने त्यांनी नाटक कंपन्यांचे पडदे रंगवण्याची कामं करायलाही सुरूवात केली. हा व्यवसाय करत असताना त्यांची ओळख शंकर मोरेश्वर रानडे यांच्याशी झाली. या ओळखीचा फायदा घेऊन त्यांनी रानडे यांच्याकडून नाट्यकलेचे मुलभूत शिक्षण घेतले. जे पुढे त्यांना चित्रपट व्यवसायासाठी उपयोगी पडले.

1892 ते 1894 या काळात दादासाहेबांनी वेगवेगळ्या कलांचा अभ्यास केला, पण त्यातून कमाईची सोय झाली नाही. शेवटी त्यांनी गोध्रा इथे एक फोटो स्टुडिओ सुरू केला. पण त्यावेळी कॅमेरा माणसातली शक्ती शोषून घेतो आणि अपमृत्यू होतो, असा समज पसरल्याने त्यांचा व्यवसाय बंद पडला.

त्याच दरम्यान, त्यांच्या पहिल्या पत्नीचाही मृत्यू झाला. त्यानंतर ते गोध्रावरून पुन्हा बडोद्याला आले.

प्रो. केल्फांच्या जादू

बडोद्यात त्यांची ओळख एका जर्मन जादूगाराशी झाली. त्याच्याकडून त्यांनी पत्त्यांचे प्रयोग तसंच इतरही वेगवेगळे खेळ शिकून घेतले. जादूची ही कला शिकल्यानंतर त्यांनी चक्क जादूचे जाहीर प्रयोग सुरू केले. त्यासाठी त्यांनी नाव घेतलं- प्रो. केल्फा….आपल्याच आडनावातील अक्षरं उलट्या क्रमाने घेऊन त्यांनी हे नवीन नाव तयार केलं होतं.

ही गोष्ट होती 1901 सालची.

नंतर त्यांनी प्रो. केल्फांच्या जादू हा लघुपट तयार करून त्यात कामही केलं होतं.

‘आपण हलत्या चित्रांचा धंदा करणार आहोत’

1902 साली दादासाहेबांचा विवाह बडोद्याच्या शंकर वासुदेव करंदीकरांची कन्या सरस्वती यांच्याशी झाला. सरस्वतीबाई याही त्यांच्या कामाशी एकरूप झाल्या.

1906 साली त्यांनी लोणावळ्याला फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटीग वर्क्सची स्थापना केली. नंतर त्यांनी ती दादरला हलवली. त्यांना पुरुषोत्तम मावजी नावाचे भागीदार भेटले.

छापखान्याचं नाव ‘लक्ष्मी आर्ट प्रिटिंग वर्क्स’ असं ठेवण्यात आलं. 1909 साली ते जर्मनीला जाऊन रंगीत छपाईचं तंत्रज्ञान शिकून आले. उत्तम काम. पण त्यांचं भागीदाराशी फार पटलं नाही. त्यांनी एक पैसाही न घेता भागीदारी सोडली.

हातात कोणतंही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे दादासाहेब उद्विग्न झाले होते. तशात ते रोज संध्याकाळी आपला मुलगा भालचंद्रला घेऊन फिरायला जायचे. एकदा फिरताना गिरगाव बॅक रोडला तंबूवजा थिएटर होतं. तिथे ते दोघं सिनेमा पाहायला गेले.

भालचंद्रने घरी आल्यावर सरस्वतीबाईंना सांगितलं की, आम्ही आज पडद्यावर हालती-चालती माणसं, प्राणी पाहिले. मजा आली.

सरस्वतीबाईंनी फाळकेंना विचारलं की, काय दाखवायला घेऊन गेला होता?

त्यावर दादासाहेबांनी तुला पाहायचंय का, तुलाही घेऊन जातो म्हटलं.

दुसऱ्या दिवशी ते सरस्वतीबाईंना घेऊन सिनेमा पाहायला गेले- ‘लाइफ ऑफ ख्राइस्ट’

दादासाहेब फाळके

फोटो स्रोत, Chandrashekhar Pusalkar

हा सिनेमा पाहताना त्यांच्या मनात आलं की, आपल्याकडे किती पौराणिक, ऐतिहासिक कथानकं आहेत. असे चित्रपट आपल्याकडे का बनू नयेत.

घरी जाताना सरस्वतीबाईंनी त्यांना विचारलं की, ही चित्रं कशी हालतात. त्यावर त्यांनी म्हटलं की, तुलाही कळेल. कारण आपण हालत्या चित्रांचा धंदा लवकरच सुरू करणार आहोत.

दिवस होता 15 एप्रिल 1911. वयाची चाळीशी उलटलेली, पैशाचं पाठबळ नाही अशा अवस्थेत हे कसं सुरू करणार हा प्रश्न सरस्वतीबाईंना पडला

पण दादासाहेबांना या उद्योगाचं वेडच लागलं होतं. त्यांनी एका इंग्लिश कंपनीतून एक टॉय सिनेमा आणि फिल्म्सच्या काही माळा विकत आणल्या.

रात्री मेणबत्तीच्या उजेडात हातानं चालवायच्या प्रोजेक्टरच्या लेन्सवर चालवून भिंतीवर सिनेमा पाहायचा कार्यक्रम सुरू झाला. अभ्यास म्हणून थिएटरमध्येही सिनेमा पाहणंही सुरूच होतं. या सगळ्यामुळे त्यांची झोप जेमतेम तीन-चार तासच व्हायची.

डोळ्यांवर ताण येऊन त्यांना एकाएकी दिसेनासं झालं. आता आपल्याला सिनेमा बनवता येणार नाही या विचाराने ते निराश झाले. पण डॉ. प्रभाकर या मुंबईतल्या नेत्ररोगतज्ज्ञाने त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांना दृष्टी परत मिळाली.

लंडनला ट्रेनिंग

सिनेमा बनवण्यासाठी लंडनला जाऊन ट्रेनिंग घ्यायला हवं असं त्यांना वाटू लागलं. मात्र, आर्थिक अडचण होतीच. दादासाहेबांचे स्नेही यशवंतराव नाडकर्णी यांनी त्यांना दहा हजार रुपये कर्जाऊ दिले.

फेब्रुवारी 1912 ला दादासाहेब लंडनला गेले. तिथे ‘बायोस्कोप’ या सिने वीकलीचे संपादक केपबर्न यांची भेट घेतली. त्यांना आपल्या येण्याचा हेतू सांगितला. ते आपल्या साप्ताहिकाचे वर्गणीदार आहेत, धूम्रपान करत नाहीत, शाकाहारी आहेत या गोष्टींमुळे केपबर्न यांचा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला. त्यांनी फाळके यांची भेट प्रसिद्ध निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्याशी घालून दिली.

केपबर्नच्या सल्ल्यानुसार दादासाहेबांनी भारतीय हवामानाचा विचार करून पन्नास पौंडांचा विल्यम्सनचा फिल्म कॅमेरा, एक परफोटेर (फिल्मला भोकं पाडणारे मशीन), एक प्रिटिंग मशीन आणि काही कच्ची फिल्म यांची ऑर्डर दिली. एक फेब्रुवारी 1912ला ते मुंबईत हजर झाले.

कसा तयार झाला राजा हरिश्चंद्र?

सिनेमा निर्मितीसाठी दादासाहेब फाळकेंनी हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनीची स्थापना केली. लंडनवरून सिनेमा निर्मितीचं सामान आल्यानंतर त्यांनी सरस्वतीबाईंनाही त्याचा कसा उपयोग करायचा हे शिकवून ठेवलं.

सरस्वतीबाईंनी त्याबद्दल लिहिलं आहे-

“दुपारी माझे घरातले काम आटोपल्यानंतर ह्यांनी मला डेव्हलपिंगची सर्व माहिती मराठीतून द्यावी. कारण इंग्लिशची एक ओळसुद्धा मला येत नव्हती. त्यातील रसायनांचे मोजमाप दोनतीनदा बघितल्यावर मला स्वतंत्रपणे फिल्म डेव्हलप करता येऊ लागली. कॅमेऱ्याच्या डायफ्रेम्स कसकशा बदलायच्या, कोणत्या लाइटला कोणती आणि कशी वापरायची वगैरे सर्व हळूहळू शिकवायला सुरूवात केली.”

एकीकडे तांत्रिक गोष्टी सुरू असतानाच कथानक कोणते हा प्रश्न होता. दादासाहेबांनी त्यासाठी हरिश्चंद्राची गोष्ट घेतली.

दादासाहेबांसमोर सर्वांत मोठं आव्हान होतं- कलाकार आणि तंत्रज्ञ निवडीचं. त्यासाठी त्यांनी इंदुप्रकाश आणि इतर दैनिकांत जाहिरात दिली. ही जाहिरातही नमुनेदार होती-

“ॲक्टर पाहिजेत. सुतार, धोबी, न्हावी, पेंटर पाहिजेत. व्यसनी, उडाणटप्पू, खप्पड अशा द्विपादांनी येण्याची तसदी घेऊ नये. सुस्वरूप, अव्यंग-मुके असले तरी चालतील- चांगले ॲक्टिंग जाणणारे कलाकार पाहिजेत.”

राजा हरिश्चंद्र

फोटो स्रोत, Getty Images

उर्दू नाटक कंपनीत काम करणारे गजानन वासुदेव साने आणि पांडुरंग गदाधर साने नावाचे स्त्रीपार्टी नट दरमहा चाळीस रुपये पगारावर आले. गजानन सानेंच्या ओळखीत दत्तात्रय दामोदर दाबके हे सुदढ प्रकृतीचे गृहस्थ होते. त्यांना हरिश्चंद्राच्या भूमिकेसाठी घेतलं.

प्रश्न होता तारामती आणि रोहिदासचा. त्याकाळी कोणतीही स्त्री कलाकार तारामतीच्या भूमिकेला मिळणं अशक्य होतं. दुसरं कथेत रोहिदासाच्या मृत्यूचं दृश्य होतं. त्यामुळे त्या कामासाठी कोणी आपला मुलगा द्यायला तयार नव्हता. शेवटी दादासाहेबांनी आपला मुलगा भालचंद्रला रोहिदासच्या भूमिकेत घेतलं.

पण तारामतीचा प्रश्न सुटला नाही…दादासाहेबांनी प्रयत्नांची शिकस्त केली. अगदी मुंबईच्या देहविक्रय करणाऱ्यांच्या वस्तीतही गेले. या कामासाठी किती पैसे मिळतील, असं तिथल्या स्त्रियांनी विचारलं. दादासाहेबांनी काही एक आकडा सांगितल्यावर “तुम्ही जेवढे पैसे देणार तेवढे आम्ही एका रात्रीत कमावतो,” असं त्यांनी दादासाहेबांना सांगितलं.

राजा हरिश्चंद्र

फोटो स्रोत, Getty Images

एकदा दादासाहेब ग्रँट रोडवरच्या गोखले उपहारगृहात चहा घ्यायला गेले होते. तिथे त्याला गिऱ्हाईकांना चहा-फराळ आणून देणारा नाकीडोळी नीटस गोरागोमटा मुलगा दिसला. त्यांनी या पोऱ्यालाच, कृष्णा साळुंखेलाच तारामतीच्या भूमिकेसाठी निवडलं.

अडचण एकच होती…त्याच्या मिशा. माझा बाप जिवंत आहे, मी मिशा काढणार नाही, यावर तो हटून बसला. मिशा असलेली तारामती कशी दिसेल असं दादासाहेब त्याला समजावत होते. शेवटी त्याच्या वडिलांची समजूत काढली आणि तो मिशा काढायला तयार झाला.

अशाच काही मुलांना दादासाहेबांनी स्त्री भूमिकेसाठी निवडलं. त्यांना लुगडी नेसून तांदूळ निवडणं, दळण दळणं ही कामं करायला सांगितली. जेणेकरून त्यांच्या सगळ्या हालचाली स्त्रीसुलभ दिसतील.

दादासाहेबांनी बारीक-सारीक गोष्टींचाही विचार केला होता. राजा रवीवर्मा, धुरंधर यांच्या चित्रावरून पोशाख तयार केले होते. त्याकाळी रेशमी, मोठ्या काठाची आणि पदराची लुगडी मिळत असत. त्यावर छायाचित्रणाच्या दृष्टीने योग्य अशी खडी छापून तारामतीसाठीचे शालू तयार केले गेले. पात्रांसाठी केसांचे टोप विकत घेतले.

हरिश्चंद्राच्या सैनिकांना जेव्हा पोलिसांनी पकडलं…

मुंबई जवळच्या वांगणी गावात सिनेमाचा काही भाग शूट होणार होता. हरिश्चंद्राचे सैनिक तयार होऊन भाले, तलवारी घेऊन शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले. पण गावकऱ्यांना या वेशातले लोक पाहून वाटलं की दरोडेखोर आलेत. त्यांनी फौजदाराला वर्दी दिली.

फौजदाराने या सगळ्यांना अटक करून पोलिस स्टेशनला नेलं. हे सगळे लोक आपण सिनेमाचं शूटिंग करत आहोत असं सांगत होते, पण सिनेमा ही गोष्टच तेव्हा लोकांना फार माहीत नव्हती.

मागून आलेल्या दादासाहेबांना जेव्हा हा सगळा प्रकार कळला, तेव्हा ते पोलिस स्टेशनवर पोहोचले आणि शूटिंग दाखवायला फौजदार, पाटलाला घेऊनच आले. राजा हरिश्चंद्र तारामतीचा शिरच्छेद करणार असतो, तेव्हा तिथे शंकर प्रकट होतात असा तो प्रसंग होता. या प्रसंगाचे चित्रीकरण पाहून फौजदार, पाटील, ग्रामस्थ अगदी भारावून गेले.

दादासाहेब समाधान होईपर्यंत शूट करत. त्यासाठी वेळ, पैसा कितीही गेला तरी विचार करत नसत. आउटडोअर शूटिंगच्या वेळीही फिल्म डेव्हलपिंगची व्यवस्था आधीच करून ठेवत. त्याच रात्री दिवसा झालेला भाग डेव्हलप करून पाहात, मनासारखा झाला नसेल तर पुन्हा दुसऱ्या दिवशी शूट करत.

दादासाहेब फाळके

फोटो स्रोत, Chandrashekhar Pusalkar

सहा महिने 27 दिवसांनी चार रिळांचा हा सिनेमा पूर्ण झाला. 3 मे 1913 साली राजा हरिश्चंद्र रिलीज झाला. मुंबईत हा सिनेमा गर्दीत सुरू झाला.

दादासाहेब इतर शहरांतही सिनेमा घेऊन जात. त्याकाळी आजच्यासारख्या सोयी नव्हत्या. दादासाहेबांना स्वतःचा प्रोजेक्टर, ऑपरेटर, मदतनीसस घेऊन जावं लागे. पण ते हेही काम करत होते.

हरिश्चंद्राच्या यशानंतर दादासाहेबांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. फाळके फिल्म कंपनीचा मुक्काम त्यांनी नाशिकला हलवला. नाशिकमध्येच त्यांनी ‘मोहिनी भस्मासूर’ आणि ‘सत्यवान सावित्री’ सिनेमांची निर्मितीही केली.

‘मोहिनी भस्मासुर’ आणि ‘सत्यवान सावित्री’ या दोन्ही सिनेमांनीही भरपूर यश मिळवलं. दादासाहेबांचं कर्ज फिटलं. या सिनेमाच्या यशानंतर त्यांनी सिनेमासाठी वीजेवर चालणारी यंत्रसामग्री घेण्याचा निर्णय घेतला.

‘महाराज, हे अंतःकरण नुसते जळते आहे’

वीजेवर चालणारी उपकरणं खरेदी करण्यासाठी 1914 साली दादासाहेब लंडनला गेले. ते लंडनला गेले आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरूवात झाली. पण त्यांनी शांतपणे आपली खरेदी सुरूच ठेवली.

‘बायोस्कोप’ साप्ताहिकाच्या केपबर्न यांच्यासोबत दादासाहेबांची मैत्री होतीच. लंडनमध्ये काही निर्मात्यांना दादासाहेबांचे चित्रपट दाखवण्यात आले. ते पाहून सगळेच चकित झाले.

बायोग्राफने म्हटलं की, तांत्रिकदृष्ट्या फाळक्यांचे चित्रपट थक्क करणारे आहेत.

‘कायनोटोग्राफ’ या फिल्म मॅगझिनने म्हटलं होतं की, फाळके इंग्लंडमध्येच का जन्माला आले नाहीत?

सेसिल हेपवर्थ यांनी तर दादासाहेबांना इंग्लंडमध्ये भारतीय सिनेमांची निर्मिती करण्याचीही ऑफर दिली होती. त्यासाठी कलाकारांचा प्रवास खर्च, पगार आणि नफ्यात हिस्सा देण्याचीही तयारी दाखवली. मात्र सिनेमा स्वदेशी करण्याच्या उद्देशाने झपाटलेल्या दादासाहेबांनी याला नकार दिला.

सिनेमा स्वदेशी करण्याच्या उद्देशाने परत आलेल्या दादासाहेबांसमोर अनेक आव्हानं होती. युद्धामुळे भांडवलदारांनी कर्ज देणं थांबवलं होतं. स्टुडिओला टाळं लागण्याची वेळ आली होती. कर्मचाऱ्यांची आजारपणं सुरू झाली. शेवटी दादासाहेबांनी स्टुडिओवर कर्ज घेऊन राजा श्रियाळ हा सिनेमा बनवायला घेतला. पण तोही पूर्ण झाला नाही.

सरस्वतीबाईंचे दागिनेही आधीच विकले गेले होते.

लोकमान्य टिळक नाशिकला आले असताना दादासाहेबांच्या स्टुडिओत आले होते. दादासाहेबांनी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. टिळकांनी पैसा फंडातून कर्जाची सोय करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही यश आलं नाही.

भांडवल उभं करण्यासाठी दादासाहेबांनी 1916 साली आणखी एक प्रयत्न केला. राजा हरिश्चंद्र, मोहिनी भस्मासुर, सत्यवान सावित्री हे चित्रपट घेऊन वेगवेगळ्या संस्थानिकांकडे गेले. पण केवळ औंधच्या संस्थानिकांनी एक हजार रुपये दिले. इंदौरच्या राजकन्येनं पाच हजार रुपये कर्ज आणि पाचशे रुपये बिदागी दिली.

पण त्यातून भांडवलं उभं राहात नव्हतंच. त्यामुळे शेवटी त्यांनी वर्तमानपत्रातून अनावृत्त पत्र लिहिलं आणि देशबांधवांना आवाहन केलं..

त्याचाही परिणाम झाला नाही.

लोकमान्य टिळक-दादासाहेब फाळके

मे 1917 ला नाशिकमध्ये मुंबई प्रांतिक काँग्रेस परिषदेचं अधिवेशन भरलं होतं. त्याला लोकमान्य टिळक उपस्थित होते. टिळकांच्या उपस्थितीत दादासाहेबांनी त्यांची सगळी परिस्थिती सांगितली. शेवटी लोकमान्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘महाराज, हे अंतःकरण नुसते जळते आहे.’

याचा परिणाम झाला, अनेकांनी तिथल्या तिथे पंधरा, वीस, पंचवीस, शंभरपर्यंत रोख रक्कम दिली. या आवाहनाचा परिणाम होतोय हे दिसल्यानंतर दादासाहेबांनी ‘लंकादहन’ या सिनेमाच्या निर्मितीला सुरूवात केली.

‘लंकादहन’चं बरचंस शूटिंग त्र्यंब्यकेश्वर इथंच पार पडलं. यात दादासाहेबांनी अनेक ट्रिक सीन्स वापरले होते. जे त्याकाळी कोणतंही तंत्रज्ञान नसताना कल्पकतेच्या जोरावर त्यांनी शूट केले होते.

यातलं एक दृश्य होतं मारुतीचं उड्डाण. बापू वाटवे यांनी लिहिलेल्या चरित्रात दादासाहेबांची कन्या मंदाकिनी आठवले यांनी या दृश्याची सांगितलेली आठवण नमूद केली आहे.

“स्टुडिओतल्या एका झाडाखाली आठ-दहा फूट लांबीचा लोखंडी गर्डर होता. त्यावर दादासाहेबांनी तीन मारुतींना पालथं पडायला सांगितलं. त्यांनी हातापायाची हालचाल सुरू केली की, शूटिंगला सुरूवात व्हायची. मारुती दूरदूर उड्डाण करत चालला आहे, असा भास व्हायचा. सर्वांत लहान मारुती मी होते. गर्डरच्या मागे काळा पडदा लावला होता. त्यामुळे पडद्यावर फक्त मारुतीच दिसायचा.”

या सिनेमातला मारुती गरागरा फिरताना- उलटासुलटा होताना दिसायचा आणि प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करायचे.

रावणाला त्याच्या पापांची जाणीव करून देण्यासाठी एका राक्षसाच्या हातून रावणाच्या पापाचा एकेक दैत्य बाहेर पडतो, असाही एक सीन सिनेमात होता.

17 सप्टेंबर 1917ला रिलीज झालेला हा सिनेमा प्रचंड गर्दीत सुरू झाला. मुंबईत वेस्टएंडला या सिनेमाने दहा दिवसांत 32 हजार रुपयांचा गल्ला जमवला. चेन्नईत तर एवढा गल्ला जमत होता की, बैलगाडीत पोत्यात भरून पोलिस पहाऱ्यात घेऊन जावा लागायचा.

या यशानंतर दादासाहेबांकडे भागीदार, गुंतवणूकदार येऊ लागले.

1 जानेवारी 1918 ला दादासाहेबांनी पाच धनिक भागीदारांसह हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनीची स्थापना केली.

हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनीने श्रीकृष्णजन्म, कालिया मर्दन सारखे चित्रपट केले.

पण दादासाहेबांचे त्यांच्या भागीदारांशी वाद होऊ लागले होते. एका भागीदाराने दादासाहेबांना एकेका शॉट्सचे एवढे रिटेक्स घेतले तर कंपनीला कसं परवडेल, असा सवाल केला.

आपल्या कामातील ढवळाढवळ दादासाहेबांना सहन होत नव्हती. त्यामुळे भागीदारांशी त्यांचे वाद होऊ लागले. आणि त्यांनी भागीदारी सोडण्याचा निर्णय घेतला.

‘मी चित्रपट व्यवसायासाठी मेलो आहे’

कंपनीतून बाहेर पडल्यानंतर दादासाहेब सहकुटुंब-सहपरिवार काशीला गेले. याच काळात त्यांनी नाटकही लिहिले. पण चित्रपटांपासून त्यांनी जणू संन्यासच घेतला होता.

दरम्यान, ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकरांनी दादासाहेबांना पत्र लिहून चित्रपत्रसृष्टीचे जनक, हे तुम्ही काय करत आहात असं म्हणून पत्र लिहिलं.

त्याला दादासाहेबांनी पत्र लिहून उत्तर दिलं की, ‘मी चित्रपट व्यवसायासाठी मेलोय’.

अच्युत बळवंत कोल्हटकरांनी दादासाहेबांचं हे पत्र संदेशमध्ये छापलं आणि शीर्षक दिलं, ‘दादासाहेब फाळके यांचं निधन’

या पत्रानंतर चाहत्यांनी दादासाहेबांना परत येण्याची विनंती केली. दादासाहेबही त्यांनी जन्माला घातलेल्या व्यवसायात परतले. हिंदुस्तान फिल्म कंपनीत त्यांचं पुनरागमन झालं. ही घटना 1922 मधली.

2015 साली मुंबईच्या एका शासकीय इमारतीवर दादासाहेबांचं चित्र रंगवण्यात आलं.

फोटो स्रोत, Sushant Mohan

1922 ते 1929 या काळात त्यांनी कंपनीसाठी काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. पण त्यांचं मन रमत नव्हतं. स्वतःची कंपनी काढण्याचे विचार त्यांच्या मनात येत होते.

याच काळात बाबूराव पेंटर यांचे चित्रपट प्रदर्शित व्हायला लागले होते, ते तंत्र, भव्यता यांबाबतीत उजवे होते.

दरम्यान, दादासाहेबांनी ‘फाळके डायमंड कंपनी’ नावाची नवीन संस्था सुरू केली. त्यांना 50 हजार रुपये भांडवलही मिळालं. रामायणातला विषय घेऊन… ‘सेतुबंधन’ सिनेमाला सुरुवात केली. मात्र, हा सिनेमा पूर्ण व्हायला अनेक अडचणी आल्या. हा सिनेमा पूर्ण झाला, त्याचवेळी 1931 साली ‘आलमआरा’ हा पहिला बोलपट प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रभात फिल्म कंपनीचा ‘अयोध्येचा राजा’ हा बोलपट प्रदर्शित झाला.

बोलपटांचा काळ सुरू झाला होता. दादासाहेबांनी ‘गंगावतरण’ नावाचा एकमेव बोलपट दिग्दर्शित केला. पण त्यांचं मन आता या व्यवसायातून उडालं होतं.

ब्रिटिशांचे ‘ते’ पत्र आणि दादासाहेबांचा अखेरचा श्वास

1939 साली भारतीय सिनेमाला रौप्य महोत्सव झाल्याबद्दल मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात दादासाहेबांचा सत्कार करण्यात आला.

परंतु आयोजकांनी त्यांचा योग्य मान ठेवला नाही. त्यांच्या स्वागताला कोणी आलं नाही, त्यामुळे ते प्रेक्षकांत बसले.

पृथ्वीराज कपूर यांनी त्यांना ओळखून सन्मानाने व्यासपीठावर नेले. त्यांनी आपले भाषण लिहून आणले होते. मात्र, बोलायला उभं राहिल्यावर त्यांचा कंठ भरून आला…त्यांना बोलणं जड जात होतं. त्यांचं भाषण ज्येष्ठ अभिनेते गजानन जागीरदार यांनी वाचून दाखवले.

1942 साली दादासाहेब मधुमेहाने ग्रस्त झाले होते.

चंद्रशेखर पुसाळकर हे दादासाहेब फाळके यांचे नातू. चंद्रशेखर ही फाळके कुटुंबांची तिसरी पिढी. बीबीसी मराठीशी एका लेखासंदर्भात बोलताना म्हटलं होतं की, “दादासाहेब कलाकार होते. पैसा कधीच त्यांचं प्राधान्य नव्हतं. शेवटच्या दिवसांमध्ये दादासाहेबांकडे काहीच पैसे उरले नाही.”

“शेवटच्या वर्षांमध्ये दादा अल्झायमरने ग्रस्त होते,” चंद्रशेखर पुसाळकर बीबीसीला सांगतात.

“त्यांचा मुलगा म्हणजे आमच्या वडिलांनी दादांशी बोलताना एक गोष्ट विचारली. नव्या तंत्रज्ञानासह चित्रपट काढूया का, असं प्रभाकर यांनी दादांना विचारलं.”

हे चित्र बनवण्याची फाळकेंनी 1944 मध्ये इच्छा व्यक्त केली.

पुसाळकर पुढे सांगतात, “त्या वेळी ब्रिटिशांचं राज्य होतं आणि चित्रपट निर्मितीसाठी लायसन्स घेणं अनिवार्य होतं. लायसन्स मिळावं यासाठी 1944 मध्ये दादासाहेबांनी पत्र लिहिलं. दोन वर्षांनंतर 14 फेब्रुवारी 1946 रोजी दादासाहेबांना परवानगी नाकारणारं पत्र आलं.”

“हा नकार दादासाहेबांच्या जिव्हारी लागला. पत्र मिळाल्यानंतर दोनच दिवसांत दादासाहेबांनी हे जग सोडलं!”

दादासाहेबांनी ज्या चित्रपटविश्वाची मुहूर्तमेढ रोवली त्यांना अंतिम निरोपाच्या वेळी अपेक्षित सन्मान न मिळाल्याची खंत पुसाळकर व्यक्त करतात.

“दादासाहेबांच्या अंत्यसंस्कारावेळी अगदी मोजकी माणसं उपस्थित होती आणि वर्तमानपत्रांनीही या घटनेला अल्प प्रसिद्धी दिली,” असं ते सांगतात.

संदर्भ-

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC