Home LATEST NEWS ताजी बातमी पंजाबातील 3 भाऊ पाकिस्तानात वाहून गेले, 30 महिन्यांत त्यांनी काय सहन केलं...

पंजाबातील 3 भाऊ पाकिस्तानात वाहून गेले, 30 महिन्यांत त्यांनी काय सहन केलं आणि ते कसे परतले?

7
0

Source :- BBC INDIA NEWS

जोगिंदर सिंग आणि गुरमेज सिंग 30 महिन्यांनी पाकिस्तानातून भारतात परतले

फोटो स्रोत, KuldeepBrar/BBC

ही 2023 सालची गोष्ट आहे. पंजाबात पावसानंतर आलेल्या पुरामुळे सतलज नदीच्या काठावरील भागात पाणी साचलं होतं. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं.

फिरोजपूर जिल्ह्यातील किलचे गावात राहणारे जोगिंदर सिंग, गुरमेज सिंग आणि छिंदर सिंग नदीला पूर आल्यामुळे त्यांचे ट्रॅक्टर उंच जागी घेऊन जात होते. त्याचवेळेस सतलज नदीच्या पाण्याचा लोंढा आला आणि त्यात ते वाहून गेले.

त्यांचं काय झालं, याची कोणतीही माहिती कुटुंबाला नव्हती. मग पाकिस्तानातून आलेल्या वृत्तांमधून समजलं की ते नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर पाकिस्तानात वाहून गेले होते.

कुटुंबानं स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. मात्र त्यातून काहीही मार्ग निघाला नाही.

नंतर दोन्ही देशांच्या मंजूरीनंतर पाकिस्तान सरकारनं अलीकडेच या तिघांना भारताच्या ताब्यात दिलं.

‘परतीची आशाच उरली नव्हती’

जोगिंदर सिंग म्हणाले, “आमचं शेत सीमेजवळ आहे. ट्रॅक्टर पाण्यात अडकलं होतं. आम्ही ते काढण्यासाठी गेलो, तर पाण्याचा जोरात लोंढा आला आणि त्यात वाहून आम्ही पाकिस्तानात पोहोचलो.”

ते म्हणाले, “तिथे काही लोकांनी आम्हाला बसायला सांगितलं आणि पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी आमच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि आम्हाला त्यांच्यासोबत घेऊन गेले. सुरुवातीचे 4-5 दिवस आम्हाला मारहाणदेखील झाली. आम्हाला विचारण्यात आलं की आम्हाला पाकिस्तानात मुद्दाम पाठवण्यात तर आलेलं नाही ना.”

“आम्ही त्यांना सांगितलं की आमचा असा कोणताही हेतू नव्हता. आम्ही सतलज नदीच्या पाण्यात वाहून इथे आलो आहोत. त्यांना जेव्हा याची खात्री पटली, तेव्हा त्यांनी आम्हाला मारहाण करणं थांबवलं.”

“सर्वात आधी आम्हाला कसूर तुरुंगात आणि नंतर लाहोर तुरुंगात पाठवण्यात आलं. तुरुंगात आम्हाला वेगवेगळं ठेवलं जात होतं. तिथे इतर भारतीय कैदीदेखील होते. ते अनेक वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत होते. आम्हाला कोणालाच भेटू दिलं जात नव्हतं.”

कुटुंबासोबत बसलेले गुरमेज सिंग (डावीकडे)

फोटो स्रोत, KuldeepBrar/BBC

जोगिंदर म्हणाले, “जवळपास 15 महिन्यांनी न्यायाधीशांच्या परवानगीनं आठवड्यातून एकदा घरी बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळेस मला माहित झालं की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.”

“आम्ही कधी भारतात परतू शकू याची आम्हाला कोणतीही आशा नव्हती. मात्र एक दिवस अचानक आम्हाला सांगण्यात आलं की आमची सुटका करण्यात आली आहे. ते ऐकून आम्हाला अतिशय आनंद झाला. आम्ही सरकारचे आभार मानतो, त्यांच्यामुळे आम्ही आमच्या घरी परतू शकलो आहोत.”

आनंदामुळे दोन दिवस झोप आली नाही

जोगिंदर सिंग यांच्या पत्नी सरोज रानी म्हणाल्या, “जोगिंदर सिंग आणि त्यांचे सहकारी सतलज नदीत वाहून पाकिस्तानात गेल्याबद्दल आम्हाला 25 दिवसांनी बातम्यांमधून माहित झालं होतं. त्याआधी आम्ही ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.”

“आम्हाला जेव्हा हे माहित झालं, तेव्हा खूपच दु:ख झालं. मुलंदेखील रडत राहायची आणि शाळेत जात नव्हती. घरात कमावणारे फक्त जोगिंदर सिंगच होते.”

त्यांनी सांगितलं की जोगिंदर सिंग पिकांची कापणी करणाऱ्या मशीनवर फोरमॅन म्हणून काम करतात. हे 3 भाऊ आहेत आणि 8 एकर शेती एकत्रच करतात. तिघे भाऊ वेगवेगळे राहतात.

त्यांनी सांगितलं की घर चालवणं आधीच कठीण होतं. पुरामुळे शेताचा काही भाग नदीत वाहून गेला. नदीचा प्रवाह शेतातून गेला. मग जेव्हा पूर आला, तेव्हा 4 एकर गव्हाचं पीकदेखील पाण्यात वाहून गेलं.

ग्राफिक्स

पतीच्या परतण्याबद्दल त्या म्हणतात, “आम्ही गुरुद्वारे, मंदिरं आणि मशिदींमध्ये खूप प्रार्थना आणि पूजा केली. आम्हाला जोगिंदर सिंग जिवंत असण्याची कोणतीही आशा नव्हती. कारण बातम्यांमध्ये त्यांचा फक्त फोटोच पाहिला होता.”

“दोन मुलं खासगी शाळेत शिकत होते. फी न भरल्यामुळे एका मुलाचं नाव शाळेतून कमी करण्यात आलं होतं. आता ते घरी परतल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला अतिशय आनंद झाला आहे.”

गुरमेज सिंग म्हणाले, “आम्ही 2023 मध्ये ट्रॅक्टर उंच जागी नेण्यासाठी गेलो होतो. मात्र त्याआधीच सतलज नदीच्या पाण्याचा जोरात लोंढा आला आणि त्यात वाहून आम्ही पाकिस्तानात पोहोचलो. तिथे पोहोचल्याबरोबर तिथल्या लोकांनी आम्हाला पकडलं.”

“आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला तिथल्या पोलीस किंवा सैन्याच्या ताब्यात देण्यात यावं. जेणेकरून आम्हाला आमच्या घरी परतता येईल. त्यांनी कोणत्यातरी विभागात फोन केला आणि अधिकारी आमचा चेहरा झाकून आम्हाला घेऊन गेले.”

“सुरुवातीला आम्हाला मारहाण केली जायची. मात्र नंतर आम्ही वाहून आल्याच्या बातम्या आल्यानंतर मारहाण थांबवण्यात आली. तुरुंगात इतर कैद्यांना जे जेवण दिलं जायचं, तेच आम्हालादेखील दिलं जायचं.”

ग्राफिक्स

ते म्हणाले, “आधी आम्हाला परतण्याची कोणतीही आशा नव्हती. नंतर जेव्हा आमची सुटका होणार असल्याचं माहित झालं, तेव्हा आनंदामुळे दोन दिवस झोप आली नाही.”

त्यांनी सांगितलं की त्यांना खूप मानसिक तणाव झाला होता. ते दररोज गुरुद्वाऱ्यात प्रार्थनेसाठी जातात. ते गेल्यानंतर मुलांच्या शिक्षणावर त्याचा विपरित परिणाम झाला आणि कुटुंबातील सदस्यदेखील आजारी पडले. आता त्यांना मुलं आणि कुटुंबासाठी काहीतरी करायचं आहे. ते सरकारचे आभार मानतात.

गुरमेज सिंग यांच्या आई मंजीत कौर म्हणाल्या, “आमचा मुलगा सतलज नदीत वाहून जाण्याबद्दल आम्हाला खूप दिवसांनी माहित झालं. मुलाशिवाय आमचं आयुष्यच नव्हतं. आम्ही दररोज प्रार्थना करत होतो आणि अतिशय कठीण परिस्थितीत दिवस काढले.”

त्या म्हणाल्या की आता त्या अतिशय आनंदी आहेत आणि त्यांची तब्येतदेखील चांगली आहे. “आमच्या मुलाला दुसरं जीवन दिल्याबद्दल देवाचे आभार मानतो.”

‘सर्व काही तपासावर अवलंबून आहे’

ॲडव्होकेट मेहर सिंग मल्ल यांनी सांगितलं की जे लोक पुरात वाहून किंवा इतर कोणत्याही कारणानं सीमेपलीकडे पाकिस्तानात पोहोचतात, त्यांची तिथल्या सुरक्षा यंत्रणा चौकशी करतात. त्यानंतर भारताच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सशी संपर्क केला जातो.

ते म्हणाले की, “जेव्हा हे स्पष्ट होतं की ते जाणूनबुजून दुसऱ्या देशात गेले नव्हते. तेव्हा पाकिस्तान त्यांना भारतात परत पाठवतो. परतीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित नसते. ते सर्व तपासावर अवलंबून असतं.”

ते असंही म्हणाले की पाकिस्तानातून परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर भारतात गुन्हा नोंदवणं आवश्यक नसतं. ते या गोष्टीवर अवलंबून असतं की सीमा मुद्दाम पार करण्यात आली होती की चुकून झाली होती.

ग्राफिक्स

टेलिफोनिक माहितीनुसार, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे इन्स्पेक्टर दीप सिंग म्हणाले, “हे प्रकरण जुनं असल्यामुळे आमच्याकडे याचं कोणतंही रेकॉर्ड नाही.”

ते म्हणाले, “आता त्यांची परत येण्याची फक्त आम्हाला माहिती होती. त्याव्यतिरिक्त आमच्याकडे इतर कोणतीही माहिती नाही.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC