Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Derbyshire Police
(इशारा: या लेखातील काही तपशील विचलित करू शकतात.)
एका महिलेनं 15 वर्षांपूर्वी तिच्या मैत्रिणीची (जी तिची जोडीदारही होती) हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते घराच्या मागे असलेल्या बागेत पुरले. मात्र, आता एवढ्या वर्षांनी या महिलेला जन्मेठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या महिलेचं नाव ॲना पोडेडवॉर्ना असं आहे. गेल्या वर्षी तिनं डर्बीशायर पोलिसांशी संपर्क साधला.
तिनं पोलिसांना सांगितलं की, इझाबेला झाब्लोकाचा मृतदेह डर्बीतील प्रिन्सेस स्ट्रीटमध्ये पुरलेला आहे.
पोडोडवॉर्नानं मात्र ही हत्या केल्याचा आरोप नाकारला होता.
मंगळवारी (10 फेब्रुवारी) न्यायालयानं तिला दोषी ठरवलं.
डर्बी क्राउन कोर्टात सुनावणीच्या वेळी 40 वर्षांची पोडोडवॉर्ना ही एक ‘कुशल खाटीक’ असल्याचं सांगण्यात आलं.
याच न्यायालयात बुधवारी (11 फेब्रुवारी) तिला किमान 21 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
कुटुंबानं चिकाटीनं केलेल्या पाठपुराव्यामुळे सत्य समोर
डर्बीतील बॉयर स्ट्रीटमधील पोडेडवॉर्नाला शिक्षा सुनावताना, न्यायमूर्ती विल्यम्स केसी म्हणाल्या की, या खटल्यात समोर आलेल्या पुराव्यांवरून इझाबेला ही कुटुंबातील सर्वांची प्रिय सदस्य होती हे हे स्पष्ट होतं.
तिचं आई, आजी आणि तिची मुलगी कॅटार्झिना (जिला कासिया म्हणतात) यांच्याशी अतिशय घनिष्ठ नातं होतं.
“पोलंडमध्ये असणाऱ्या कुटुंबीयांशी ती नियमितपणे संपर्कात होती. मात्र 4 सप्टेंबर 2010 ला इझाबेलाची मुलगी कासियाचा 10 वा वाढदिवस होता. त्या दिवशी इझाबेलनं कासियाच्या अपेक्षेनुसार तिला फोन केला नाही.”
“तिच्या हिंसक, चलाख आणि क्रूर कृत्यांमुळे कासियाच्या जीवनातून तिची आई अचानक बेपत्ता झाली होती. त्यामुळं कासियाला लहानाची मोठी होताना तिच्या लाडक्या आईचं नेमकं काय झालं याबाबत काहीही माहिती नव्हती.”
“कुटुंबानं याबाबतीत अतिशय चिकाटीनं पाठपुरावा केला नसता, जे घडलं आहे, त्याचा उलगडा करण्याची आशा सोडली असती, तर कदाचित हा गुन्हा उघडकीस आला नसता.”
“तुला कोणताही पश्चाताप झालेला नाही. मे 2025 मध्ये पोलिसांशी उशिरानं संपर्क साधल्याचं श्रेय तुला देता येणार नाही. इझाबेलाच्या मृत्यूबद्दलची खोटं पसरवण्यासाठी म्हणून तू हे केलं आहेस.”
हत्या कशी झाली आणि मृतदेहाचं काय केलं?
ज्युरींना सांगण्यात आलं की, पोलंडमधून दोन महिला कामाच्या शोधात युकेला एकत्र गेल्या होत्या. त्या डर्बीतील नॉर्मंटन भागात राहत होत्या.
सरकारी वकिलांच्या मते, 30 वर्षांच्या झाब्लोकानं पोलंडमध्ये असलेल्या तिच्या आईला 28 ऑगस्ट 2010 रोजी अखेरचा फोन केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांचा संपर्क झाला नाही.
सरकारी वकील गॉर्डन आस्पडेन केसी यांनी सांगितलं की, हा फोन झाल्यानंतर लगेचच, पोडेडवॉर्नानं झाब्लोकाची हत्या केली.
हत्येनंतर पोडेडवॉर्नानं “मोठ्या चाकूचा वापर करून इझाबेलाच्या शरीराचे दोन तुकडे केले.”
फोटो स्रोत, Derbyshire Police
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिवादी (पोडेडवॉर्ना) पूर्वी ‘खाटीक’ म्हणून काम करत होती. शिवाय ती तिच्या कामात खूपच निपुण होती. टर्कीचे (कोंबडीसारखा पक्षी) “तुकडे करणं, त्यांची हाडं बाजूला करणं, मांसाचे तुकडे करणं”, हे तिच्या कामाचा भाग होतं.
न्यायालयात सांगण्यात आलं की, इझाबेलाचा मृतदेह घराच्या मागच्या बाजुला असणाऱ्या बागेत पुरण्यात आला होता. त्यानंतर त्यावर क्राँक्रीटचा थर करण्यात आला होता.
इझाबेलाच्या मुलीची आयुष्यभराची वेदना
इझाबेला झाब्लोकाची मुलगी कासिया आता प्रौढ झाली आहे. तिनं 2025 मध्ये पोलंडमधील टीव्ही पत्रकार राफल झालेव्स्की यांच्याशी संपर्क साधला. कासियानं राफल यांना इझाबेला झाब्लोकाच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं.
मे 2025 मध्ये राफल झालेव्स्की यांनी पोडेडवॉर्ना यांना मुलाखत देण्याची विनंती केली. ते पोडेडवॉर्नाला तिच्या बॉयर स्ट्रीटवरील घरी आव्हान देण्यासाठी डर्बीला गेले.
पोडेडवॉर्नानं इझाबेलाच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. मात्र, न्यायालयात सांगण्यात आलं की वाढत्या दबावासमोर ती तग धरू शकली नाही. तिनं डर्बीशायर पोलिसांना ईमेल करून मृतदेह कुठे शोधायचं हे सांगितलं.
त्यानंतर नॉर्मंटनमधील प्रिन्सेस स्ट्रीट मालमत्तेमध्ये व्यापक शोध घेण्यात केल्यानंतर इझाबेल झाब्लोकाचे अवशेष सापडले.
फोटो स्रोत, Derbyshire Police
न्यायालयात पीडितेच्या भावना व्यक्त करणारं निवेदन वाचून दाखवण्यात आलं. त्यात कासिया म्हणाली की तिची आई बेपत्ता झाल्याचा तिच्या संपूर्ण आयुष्यवर अत्यंत वेदनादायक परिणाम झाला.
“लहानपणी मी आईच्या खूपच जवळ होते. तीच माझं संपूर्ण जग होती. त्यामुळं एक शब्दही न सांगता ती माझ्या आयुष्यातून गायब होणं, हा माझ्यासाठी एक भयावह अनुभव होता,” असं कासियाच्या निवेदनात म्हटलं होतं.
त्यात पुढे म्हटलं होतं, “माझ्या आयुष्यात अचानक निर्माण झालेल्या पोकळीमुळे माझ्या मनावर एक खोल जखम झाली. ती आजपर्यंत माझ्या मनावर आहे. यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे प्रचंड अनिश्चितता. वर्षानुवर्षे, मला हे माहिती नव्हतं की ती मला का सोडून गेली.”
“मैत्रिणींबरोबर खेळण्याऐवजी, मी सतत विचार करायची की माझी आई कुठे आहे आणि तिनं मला फोन करणं का बंद केलं. मला वाटलं की मला एकटं सोडून देण्यात आलं आहे.”
“मी अनेक वर्षे जरी अनिश्चिततेच्या स्थितीत जगली असले, तरीदेखील माझ्या मनात मला हे नेहमीच माहिती होतं की माझ्या आईनं मला जाणूनबुजून सोडलेलं नाही.”
पॉडेडवॉर्नाकडून बचावाचा अपयशी प्रयत्न
पॉडेडवॉर्ना म्हणाली की, जेव्हा तिनं इझाबेला झाब्लोकाला मारलं, तेव्हा तिनं हे स्वसंरक्षणार्थ केलं. मात्र ज्युरी आणि न्यायाधीशांनी तिचा हा दावा फेटाळून लावला.
तिची बाजू सावरण्यासाठी, पॉडेडवॉर्नाच्या वतीनं क्लाईव्ह स्टॉकवेल केसी म्हणाले, “पूर्वी चांगल्या चारित्र्याच्या असलेल्या या आरोपीनं जे केलं, त्यामागे काहीतरी कारण असावं.”
“तिला, 11 वर्षे आणि 6 वर्षे वयाची दोन मुलं आहेत. ते त्यांच्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ त्यांच्या आईशिवाय जगतील.”

मात्र न्यायमूर्ती विल्यम्स म्हणाल्या, “तिच्या अवशेषांबरोबर केलेलं क्रौर्य पाहता, तुम्ही तिचा तिरस्कार करत होता आणि त्या रागातून तुम्ही तिची हत्या केली हे दिसतं.”
“तू तुझं आयुष्य असं सुरू ठेवलंस की जणू काही घडलंच नव्हतं. तू इझाबेला बेपत्ता होण्याबद्दल तिच्या आईशी आणि तुझ्या स्वत:च्या आईशी खोटं बोललीस. बेपत्ता होण्याबद्दल तक्रार दाखल झाली, तेव्हा तू पोलिसांशी खोटं बोललीस. वर्षानुवर्षे तू खोटं बोलत राहिलीस.”
तपास अधिकारी काय म्हणाले?
या तपासाचं नेतृत्व करणारे पोलीस अधिकारी (डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर) केन मार्टिन म्हणाले की, हे “सुरुवातीपासूनच आव्हानात्मक आणि त्रासदायक होतं.”
“इझाबेलाच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी, ॲना पॉडेडवॉर्नानं तिच्यावर केलेल्या भयावह क्रौर्याबद्दल तिच्या कुटुंबाला अशा पद्धतीनं माहिती मिळाली.”
“ऑगस्ट 2010 मध्ये घरात इझाबेलाची हत्या केल्यानंतर ॲनानं तिच्या मृतदेहाचे क्रूरपणे तुकडे केले.”
“ॲना पॉडेडवॉर्नानं स्वत:च कबूल केलं आहे की ती राक्षसासारखी वागली. मला वाटत नाही की माझे शब्द तिच्या कृत्यांचं आणि इझाबेलाशी तिनं केलेल्या वर्तनाचं अधिक चांगल्या प्रकारे वर्णन करू शकतील.”
“इझाबेलाची हत्या केल्यानंतर, पॉडेडवॉर्नानं तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले. कामाच्या ठिकाणच्या मांसाच्या तुकड्यांना हाताळण्यासारखंच हे होतं. मग तिनं रात्र होण्याची वाट पाहिली. त्यानंतर तिनं घराच्या बागेत खड्डा खोदला आणि त्यात इझाबेलाला पुरलं.”
“मग तिनं इझाबेलाच्या सर्व खुणा मिटवल्या. त्यानंतरच्या वर्षांमध्ये ती खोटं बोलत राहिली आणि न्यायाच्या प्रक्रियेत अडथळा आणत राहिली,” असं ते म्हणाले.
फोटो स्रोत, Derbyshire Police
मार्टिन म्हणाले की “पोलंड आणि युकेमध्ये झालेल्या गुंतागुंतीच्या तपासात, इझाबेलाच्या कुटुंबासमोर सत्य आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी कठोर मेहनत केली. त्यांचं लक्ष इझाबेलाला न्याय मिळवून देण्यावर केंद्रित राहिलं आणि त्याच गोष्टीनं प्रेरित होत ते काम करत राहिले.”
“इझाबेला ही एक अतिशय प्रिय आई, मुलगी आणि नात होती. कोणतीही गोष्ट तिला परत आणू शकत नाही. मात्र मला आशा आहे की, आज सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे तिच्या कुटुंबाला अनिश्चितेतून बाहेर पडून जे घडलं ते स्वीकारता येईल आणि शांतता मिळवता येईल,” असं ते पुढे म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



