Home LATEST NEWS ताजी बातमी नेदरलँडचे महापौर मूळ आईच्या शोधात नागपुरात, आईला भेटल्यावर ‘ही’ गोष्ट सांगणार आहेत

नेदरलँडचे महापौर मूळ आईच्या शोधात नागपुरात, आईला भेटल्यावर ‘ही’ गोष्ट सांगणार आहेत

7
0

Source :- BBC INDIA NEWS

“मला वाटतं माझी आई अपराधीपणाच्या भावनेत जगत असेल. तिनं काहीतरी अक्षम्य चूक केली आहे असं तिला वाटत असेल. पण, तिला एकदा भेटून सांगायचं आहे की मी ठीक आहे. मी अतिशय चांगलं आयुष्य जगत आहे. आई तुझं मुलं अतिशय प्रेमात वाढलं आहे.”

हीच भावना मनात घेऊन थेट नेदरलँडहून नागपूरला पोहोचलेले फाल्गुन बीबीसी मराठीसोबत बोलत होते. फाल्गुन बिनेन्डिज्क (Falgun Binnendijk) हे नेदरलँडमधील होमस्टीड शहराचे महापौर असून ते तब्बल 40 वर्षानंतर त्यांच्या मूळ आईच्या शोधात नागपुरात आले होते. त्यांनी तीन ते चारवेळा आईच्या शोधात नागपूरचा दौरा केला.

आपल्या आईने मनावर कोणतंही ओझं घेऊ नये, मला ती सांभाळू शकली नाही याचं कुठलंही दडपण घेऊ नये हेच सांगण्यासाठी मला तिला भेटायचंय असं फाल्गुन यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

फाल्गुन यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1985 ला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला. नागपुरातल्या मातृ सेवा संघाच्या पाळणाघरात त्यांना सुपुर्द करण्यात आलं. तिथं तीन दिवस ते राहिले. तिथल्याच नर्सनं त्यांचं नाव फाल्गुन ठेवलं तेच नाव आताही कायम आहे. त्यानंतर त्यांना विदेशातील एका दाम्पत्यानं दत्तक घेतलं आणि नेदरलँडला नेलं.

फाल्गुन नेदरलँडमध्ये अतिशय चांगल्या कुटुंबात वाढले. त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी अतिशय प्रेमात वाढवल्याचं ते सांगतात.

ते बीबीसी मराठीला इमेलवरून दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, मी दत्तकपुत्र आहे याचा मला कधीही त्रास झाला नाही. कारण, माझ्या आयुष्याचा तो एक भाग होता. मी दत्तक आहे हे माझ्यापासून लपवून सुद्धा ठेवलेलं नाही. मला लहानपणी नेदरलँड विमानतळावर एक नर्स घेऊन येतानाचा एक फोटो आहे. याच फोटोनं माझ्या बालपणाच्या फोटो अल्बमची सुरुवात होते. त्यामुळे आपण दत्तक आहोत हे मला आधीपासूनच माहिती होतं.

आपण दत्तक आहोत हे माहिती असल्यानंच त्यांनी आपलं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. आईच्या शोधात ते 2017 ला नागपुरात पोहोचले. त्यांनी मातृ सेवा संघाला भेट दिली. पण, त्यांच्याकडेही आईचा पूर्ण पत्ता नसल्यानं फाल्गुन यांना आईला शोधता आलं नाही. यानंतर फाल्गुन यांनी 2024 मध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत मागितली.

फाल्गुन सांगतात, मी 8 वर्षांपासून माझ्या मूळ आईला शोधायचे प्रयत्न करत आहे. सुरुवातीला मी कुठून आलो आहे हे मला शोधायचं होतं आणि त्यात मला यश मिळालं. मी नागपुरात पोहोचलो. मी माझ्या मूळ आईला शोधत असताना मला नेदरलँडच्या आई-वडिलांकडूनही खूप पाठिंबा मिळाला. कारण, मी माझं मूळ का शोधतोय हे त्यांनाही माहिती आहे. ते अतिशय प्रेमळ आहेत.

आईसाठी सोडून गेले पत्र

फाल्गुन आपल्या कुटुंबाला घेऊन नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये 21 डिसेंबरला नागपुरात आले होते. त्यांच्या मुलांना आपले वडील कुठल्या खोलीत जन्मले हे बघायचं होतं. त्यामुळे ते मुलांच्या आग्रहास्तव आणि आपल्या आईला शोधता येईल यासाठी ते नागपुरात आले होते. ते 21 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत नागपुरात होते. आईला शोधण्याच्या या प्रवासात आपल्याला अनेक चांगली माणसं भेटल्याचं ते सांगतात. त्यापैकीच त्यांनी घेतलेलं एक नाव म्हणजे विनोद जाधव.

वरिष्ठ जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव यांनी अगदी पहिल्या भेटीपासून माझं मूळ शोधायची जबाबदारी घेतली आहे, असं फाल्गुन सांगतात.

मातीशी नाळ जुळलेली फाल्गुनसारखी व्यक्ती बघितली नाही, असं विनोद जाधव बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले.

जाधव सांगतात, “फाल्गुनला आईला कुठलाही जाब विचारायचा नाही. तिला तिची मजबुरी विचारायची नाही. मुलाचा त्याग का केलास हे विचारायचं नाही. फक्त आई तू तुझ्या मनावरचं ओझं कमी कर. तू ज्या मुलाला जन्म दिलास आज तो खूप मोठ्या पदावर आहे हेच त्यांना आईला भेटून सांगायचं आहे. तसेच आईची इच्छा असेल तर तिनं भेटावं. तिच्यावर कुठलीही जबरदस्ती नाही. तिच्या नवीन आयुष्यात तिला डिस्टर्ब करायचं नाही.”

तसेच फाल्गुन यांनी विनोद जाधव यांच्याकडे एक पत्र दिलं आहे. आई भेटली तर तिला हे पत्र द्यायला सांगितलं आहे. हे पत्र हिंदीत लिहिलं असून त्यांनी आपला मूळ भारत असल्यानं हिंदी सुद्धा शिकून घेतली आहे.

तसेच त्यांनी त्यांची पत्नी आणि मुलांसाठी सुद्धा नेदरलँडला हिंदीची शिकवणी लावलेली आहे. इतकंच नाहीतर त्यांनी आपल्या चारही मुलांची नाव भारतीय ठेवलेली आहेत.

फाल्गुन यांचं मूळ शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न

गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी विनोद जाधव आणि जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्यासोबतच मातृ सेवा संघाच्या माजी अधिक्षिका मंगला भुसारी यांची भेट घेतली होती. त्यांच्या काळातच फाल्गुन यांना मातृ सेवा संघात सुपूर्द करण्यात आलं होतं.

त्यावेळी फेब्रुवारी महिना असल्यानं मंगला यांनी त्या लहान बाळाचं नाव फाल्गुन ठेवलं होतं. आता तेच फाल्गुन एका विदेशातील शहराचे महापौर बनले आहेत.

मंगला भुसारी सांगतात, आईच्या पत्त्यावर तालुका वगैरे काहीही लिहिलेलं नाही. त्यामुळे शोध घेणं जरा अवघड वाटतं. पण, फाल्गुन मला भेटायला आले तेव्हा त्यांना फार गहिवरून आलं. माझी आई भेटली नाही पण या माझ्या आईसारख्याच आहेत. यांनी मला संस्थेत ठेवलं, वाढवलं. त्यामुळे तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात असं फाल्गुन म्हणाले होते.

जिल्हा प्रशासनाकडून फाल्गुन यांच्या आईला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कायद्यानुसार जी मुलं विदेशात दत्तक दिली जातात त्यांना भारतात येऊन त्यांचे नातेवाईक, त्यांचं मूळ शोधण्याचा अधिकार असतो. त्याच कायद्याचा वापर करून आता नागपूर जिल्हा प्रशासन फाल्गुन यांच्या आईचं मूळ शोधत आहेत.

ही जबाबदारी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्यावर असून ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “कायद्यानुसार जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे मूळ शोधण्याचे काम असते. आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार एका दत्तक गृहात ते होते. तिथं तीन दिवस त्याला ज्यांनी सांभाळलं अशा सोशल वर्कर मंगला भुसारी व सेलोकर सर यांची भेट झाली. नियमाप्रमाणे आम्हाला फाल्गुनची आई आणि नातेवाईक भेटले तर आणि त्यांची परवानगी असेल तर आम्ही भेट घालून देऊ. आमची शोधमोहीम अजूनही सुरू आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC