Source :- ZEE NEWS
Indian Crorepati Buys 3 kg Gold For Wife Every Year: नेटफ्लिक्सच्या ‘देसी ब्लिंग’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या रिअॅलिटी शोमध्ये भारतीय वंशाचे कोट्यधीस सतीश सानपाल यांच्या पत्नी तबिंदा सानपाल सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमाच्या ट्रेलरमध्ये तबिंदा यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. सतीश यांना सोनं किती आवडत याबद्दल तबिंदा बोलत होत्या त्यावेळी त्यांनी एक सर्वांच्या भुवया उंचावणारं विधान केलं आहे.
हा कार्यक्रम आहे तरी काय?
नेटफ्लिक्सच्या या आगामी रिअॅलिटी शोमध्ये दुबईतील उच्चभ्रू भारतीय आणि त्यांच्या भव्य जीवनशैलीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश सहभागी झाले असून डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रिझवान साजन आणि अॅनाक्स होल्डिंगचे संस्थापक सतीश सानपाल यांसारख्या प्रमुख व्यावसायिक व्यक्तीही कार्यक्रमात त्यांच्या जीवनशैलीबद्दल बोलताना दिसणार आहेत. ट्रेलरमधून कार्यक्रमात नेमकं काय पाहायला मिळणार आहे हे दाखवण्यात आलं आहे. दुबईतील उच्चभ्रू भारतीयांच्या अतीश्रीमंत जीवनशैलीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रत्येक वाढदिवसाला 3 किलो सोनं
ट्रेलरमधील भारतीय वंशाचे कोट्यधीश उद्योगपती सतीश सानपाल यांच्या पत्नी तबिंदा सानपाल या त्यांच्या जीवनशैलीबद्दल बोलताना दिसतात. “सतीशला सोने खरेदी करायला आवडते. तो माझ्यासाठी दरवर्षी 3 किलो सोने खरेदी करतो,” असा खुलासा तबिंदा यांनी केला आहे.
सध्याच्या दरानुसार किती किंमतीचं झालं हे सोनं?
सध्याच्या दरांनुसार एक किलो सोन्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच तीन किलो सोन्याचा सध्याचा दर पाहिल्यास दरवर्षी सतीश त्यांच्या पत्नीला साडेचार कोटी रुपयांपेक्षा अधिकचं सोनं खरेदी करुन देतात.
सतीश आणि तबिंदा सानपाल कोण आहेत?
भारतीय वंशाचे सतीश सानपाल हे अॅनाक्स होल्डिंगचे अध्यक्ष आहेत. दुबईतील रिअल इस्टेट, आर्थिक बाजारपेठ, हॉस्पिटॅलिटी आणि मीडिया अशा अनेक क्षेत्रात त्यांच्या कंपनीने गुंतवणूक केलेली आहे.
मुलीला भेट केलेली आलिशान गाडी
सतीश यांचं लग्न ब्रिटिश-पाकिस्तानी महिलेशी झाले आहे. त्यांना इसाबेला नावाची एक वर्षाची मुलगी आहे. सतीश सानपाल यांनी 2025 च्या सुरुवातीला त्यांच्या मुलीला पहिल्या वाढदिवसानिमित्त कस्टम मेड गुलाबी रोल्स रॉयस भेट दिली होती. त्यांनी भेट दिलेल्या कारचा फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरला होता.
खिशात 80 हजार घेऊन दुबईला
गेल्या वर्षी ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत, सतीश सानपाल यांनी असा खुलासा केला होता की त्यांचा जन्म भरातातील जबलपूरमध्ये झाला. ते काही दशकांपूर्वी खिशात फक्त 80 हजार रुपये असताना दुबईला आले होते. त्याच मुलाखतीत, तबिंदाने असेही उघड केले होते की ती मुस्लिम आहे आणि सतीश हिंदू आहे. याच कारणामुळे सुरुवातीला तिचे कुटुंब त्यांच्या नात्याचं समजल्यानंतर नाराज होते. मात्र, सतीश यांना उद्योग जगतामध्ये यश आणि श्रीमंती मिळाल्याने त्यांचे मत बदलले. “सतीश त्याच्या कारकिर्दीत जसजसे वर जात होता तसतसे मी सर्वांचे वर्तन बदलताना पाहिले आहे. ते सर्वजण सतीशला भेटण्यासाठी आम्हाला फोन करू लागले,” असं ताबिंदा यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
SOURCE : ZEE NEWS
