Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, PRAVIN MAHAJAN
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
-
16 जून 2025, 16:17 IST
अपडेटेड 5 तासांपूर्वी
“त्यादिवशी हवामान खराब झाल्यानं हेलिकॉप्टर उड्डाण बंद झालं होतं. म्हणून हेलिकॉप्टरमध्ये गेलो नसल्यानं आमचा जीव वाचला. पण, कुटुंबातले लोक गेले, त्याचं वाईट वाटतंय.”
केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेतून वाचलेले प्रवीण महाजन बीबीसी मराठीसोबत बोलताना भावूक झाले.
यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबासह 7 जण ज्या हेलिकॉप्टर अपघातात दगावले, त्याच हेलिकॉप्टरने प्रवीण महाजन 15 जून रोजी केदारनाथवरून गुप्तकाशीला येणार होते. पण, त्यांचा जीव वाचला तो उत्तर प्रदेशातल्या एका आजीमुळे
जयस्वाल सांगतात की, “आमचे साडू राजकुमार जयस्वाल आणि मी मिळून हेलिकॉप्टरचं बुकींग केलं होतं.
साडूचं कुटुंब हेलिकॉप्टरमध्ये बसलं. आम्ही बसत होतो, तेवढ्यात एक आजी आल्या आणि आम्हाला जाऊ द्या, तुम्ही नंतरच्या हेलिकॉप्टरमध्ये या अशी विनंती करू लागल्या.
त्या आजी उत्तर प्रदेशातील होत्या. त्यांचा नातूही सोबत होता. त्यांचं कुटुंब पुढे निघून गेलं होतं. त्यामुळं त्यांना बसू दिलं आणि आम्ही थांबलो.”
महाजन दाम्पत्य थांबलं आणि त्या आजी जयस्वाल कुटुंबासोबत त्या हेलिकॉप्टरमध्ये गेल्या. त्या आजीसाठी महाजन दाम्पत्यानं हेलिकॉप्टरमधली बूक केलेली जागा त्यांना दिली. पण त्यामुळंच त्यांचा जीव वाचला.

फोटो स्रोत, SDRF Uttarakhand Police
हेलिकॉप्टरनं उड्डाण भरल्यानंतर काही वेळातच वातावरण खराब झालं. त्यामुळे हेलिकॉप्टर बंद झाले. त्याचवेळी हेलिकॉप्टर कोसळल्याचीही बातमीही समजली.
त्यामुळे त्यादिशी हेलिकॉप्टरचं उड्डाण पूर्णपणे बंद करण्यात आलं. जे हेलिकॉप्टर कोसळलं त्यात आपल्याच कुटुंबातली व्यक्ती होत्या, त्यांचं काय झालं? अशी चिंता महाजन दाम्पत्याला लागली होती.
शेवटी प्रवीण आणि पूजा यांनी घोड्यानं जायचा निर्णय घेतला. केदारनाथमधून घोडा बूक करून ते दोघं गौरीकुंडला गेले.
त्यानंतर हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेल्या जयस्वाल कुटुंबाचे मृतदेह घेण्यासाठी ते रुद्रप्रयागला पोहोचले.
महाजन कुटुंब चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आहे. तर पूजा महाजन यांची सख्खी बहीण श्रद्धा, मेहुणा राजकुमार जयस्वाल आणि या दाम्पत्याची दोन वर्षांची मुलगी काशी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला.
राजकुमार जयस्वाल हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कोळसा व्यापारी आहेत. तसेच त्यांचा ट्रान्सपोर्टचाही व्यवसाय आहे.
त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. या पत्नीची दोन मुलंही आहेत. पण, हे दोन्ही मुलं राजकुमार यांच्यासोबत गेलेली नव्हती.

फोटो स्रोत, PRAVIN MAHAJAN
पत्नीचं निधन झाल्यानंतर राजकुमार यांनी 2015 मध्ये श्रद्धा यांच्यासोबत विवाह केला होता. त्यांना दोन वर्षांपूर्वी एक मुलगी झाली.
त्यांना शिवभक्त म्हणून ओळखतात. त्यांच्या भक्तीमुळे त्यांनी मुलीचं नावसुद्धा काशी ठेवलं आणि त्यांच्या बंगल्याचं नाव सुद्धा काशी आहे. प्रदीप मिश्रा यांचा शिवपुराण कार्यक्रमही त्यांनी वणीत आणला होता.
जयस्वाल यांचे वणीमधील वरोरा बायपासजवळ कार्यालय आहे. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं आणि आई आहेत.
ते वणीत अतिशय धार्मिक व्यक्ती म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण वणी परिसरात शोककळा पसरली आहे.
12 व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन परतत होते
प्रवीण महाजन सांगतात की, “आमचे साडू राजकुमार जयस्वाल हे फार धार्मिक होते. ते वणीमध्ये मोठा शिवपुराम कार्यक्रम सुद्धा करत होते. त्यांनी एक वर्षांत 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन पूर्ण करायचं ठरवलं होतं.
त्यांचे 11 ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले होते. फक्त केदारनाथ बाकी होतं. आम्हीही त्यांच्यासोबत चार-पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन केले.
आता त्यांचं शेवटचं केदारनाथचं ज्योतिर्लिंग उरलेलं होतं. त्यामुळे मी आणि माझी पत्नी पूजा आम्ही त्यांच्यासोबत दर्शनाला जायचं ठरवलं होतं. राजकुमार, त्यांची पत्नी श्रद्धा, मुलगी काशी आणि आम्ही दोघे असे पाच जण केदारनाथ दर्शनाला गेलो.”
हे पाचही जण 14 तारखेला केदारनाथला पोहोचले. ते जाताना सुद्धा हेलिकॉप्टरनेच गेले. पण, त्यावेळी कुठलीही भीती वाटली नाही, हवामान चांगलं होतं, असंही प्रवीण सांगतात.

फोटो स्रोत, SDRF Uttarakhand Police
या सगळ्यांनी केदारनाथला दर्शन घेतलं आणि 15 जूनला पहाटे 5 वाजता हेलिकॉप्टरचं बुकींग केलं. सगळेजण गुप्तकाशीला पोहोचून पुढच्या प्रवासाला निघणार होते.
प्रवीण महाजन पुढे सांगतात, “आमची मेहुणी, साडू आणि छोटीशी काशी या अपघातात गेली याचं खूप वाईट वाटतं.
आमच्या साडूंनी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन पूर्ण करण्याचं व्रत घेतलं होतं. त्यांचं व्रत पूर्ण झाल्यामुळं ते खुश होते. पण, त्यातच त्यांचा असा अपघात झाला.”
आमचं कुटुंबाचा ज्या हेलिकॉप्टरनं घात केला त्या हेलिकॉप्टरचा पायलट नवीन होता अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे कदाचित अपघात झाला असेल असंही महाजन म्हणाले.
उत्तराखंड सरकारनं काय म्हटलं?
उत्तराखंडचे जिल्हा पर्यटन विकास अधिकारी आणि नोडल हेलिकॉप्टर सर्व्हिस राहुल चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज (15 जून) सकाळी आम्हाला एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच आम्ही त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
प्राथमिक माहितीनुसार, आर्यन एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर केदारनाथ धाम येथून प्रवाशांना त्यांच्या गुप्तकाशी तळावर परत आणत होते. त्यावेळी खोऱ्यातील हवामान अचानक बिघडले. पायलटने हेलिकॉप्टरला खोऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण यादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले.”
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पुष्कार सिंह धामी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “रुद्रप्रयाग जिल्ह्यात हेलिकॉप्टर अपघाताची अतिशय दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी बाबा केदार यांना प्रार्थना करतो.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC