Source :- BBC INDIA NEWS

“माझं तर घरच तुटलं आहे. मुलांना घेऊन आता कुठे जाऊ? आता आमचं कोणीही उरलेलं नाही. माझ्या घरातील लक्ष्मी गेली. आसरा गेला,” नीलांचल साहू आक्रंदत बोलत होते. आपल्या कुटुंबातील तीन व्यक्ती गमावलेल्या नीलांचल यांना आपलं दु:खं आवरता आवरत नव्हतं.
कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या चार मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होतं. तेव्हाच चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण 6 व्यक्ती जखमी झाल्या असून 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत 41 वर्षीय नीलांचल साहू यांच्या कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये त्यांच्या पत्नी 38 वर्षीय सुनीता साहू, 56 वर्षीय सासू प्रमिला साहू आणि 32 वर्षीय मेहुणी सुजाता पाडी यांचा समावेश आहे. सासू आणि मेहुणी त्यांच्याकडे दोन दिवस पाहुण्या म्हणून रहायला आल्या होत्या.
या घटनेत साहू यांची 14 वर्षांची मुलगी सुदैवाने वाचली. त्यांचा 17 वर्षांचा मुलगा ट्यूशनला गेला होता. त्यामुळे, तोही वाचला. पण, या घटनेचा त्यांच्या मुलांवर खोल परिणाम झाला आहे. ते दोघे अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत, असं साहू कुटुंबीयांनी बीबीसीशी बोलनाता सांगितलं.
“पत्नी , सासू आणि मेहुणी गेली. आता कोणाच्या आधाराने आम्ही जगायचं? माझ्या मुलांचं काय होईल? आता असं वाटतंय की, मी जगलो नाही तरी चालेल.”
हंबरडा फोडून झाल्यावर कसंबसं सावरत नीलांचल बीबीसीला या घटनेची माहिती देत होते.
20 मे 2025 च्या दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा महाराष्ट्र नगर इथे ही हृदयद्रावक दुर्घटना घडली. सुमारे 40 वर्ष जुन्या सप्तशृंगी इमारतीचा भाग एका क्षणात कोसळला.
स्लॅब कोसळून इमारतीचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाला आणि त्याखाली सहा जण अडकले. इतर सहा जणांना या मलब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले.
‘हे निष्काळजीपणाचं प्रतीक’
कल्याण इमारत स्लॅब दुर्घटना फक्त अपघात नव्हती. हे निष्काळजीपणाचं, व्यवस्थेच्या अपयशाचं आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत झालेल्या अनास्थेचं प्रतीक आहे, असं आजूबाजूला राहणारे लोक सांगतात.

या घटनेत इमारतीत राहणाऱ्या साहू, यादव, चव्हाण, खरात, गुजर आणि शेलार या कुटुंबाच्या आयुष्यातलं हसू लोपलंय . कारण आजवर समोरासमोर सहवासात असणाऱ्या सहा सदस्यांचा यात मृत्यू झाला.
याच घटनेत इमारतीतील तळमजल्यात राहणारे निखिल खरात गंभीर जखमी आहेत, मात्र, ते सुदैवाने बचावले आहेत.
‘चौथ्या मजल्यावरील फरशीचा बेस सामानासहित कोसळला’
प्रत्यक्षदर्शी आणि जखमी खरात यांचे मावसबंधू राहुल कारंडे या घटनेबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, “ही घटना घडली तेव्हा आम्ही बाजूलाच एका घरात होतो. चौथ्या मजल्यावरील काम सुरू असताना फरशीचा बेस थेट सामानासहित खाली तळमजल्यापर्यंत कोसळला. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या घरातील लोक या ढिगाऱ्याखाली अडकले. हे अवघ्या काही क्षणात घडले होते.”

कारंडे यांनी पुढं सांगितलं की, “या दुर्घटनेत तळमजल्यावर असणारा माझा भाऊ देखील अडकला होता, मात्र सुदैवाने आम्ही तिथे पोहोचून त्याला तातडीनं बाहेर काढलं. तसंच इतर लोकांना देखील आम्ही बाहेर काढलं. इमारत जुनी आणि धोकादायक झालेली आहे. इमारतीचा अजूनही काही भाग थोडा थोडा पडतो आहे “
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
सप्तशृंगी इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. या इमारतीच्या काही भागात डागडुजीचे काम सुरू होते. तसेच, जो भाग कोसळला त्याच भागातील चौथ्या माळ्यावर फरशी बसवण्याचं काम सुरू होत. याचदरम्यान ही दुर्घटना घडली.
राज्यात अनेक शहरात धोकादायक, जर्जर आणि स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या अनेक इमारती आहेत. काही धोकादायक इमारतींमधील रहिवासी नोटिसा बजावूनही घरे रिकामी करण्यास तयार होत नाहीत. तर काही इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने या इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान स्थानिक प्राधिकरणापुढे आहे.

काही जमीनमालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि स्थानिक प्राधिकरणाच्या संथ कारभारामुळे स्थानिक रहिवासी आधी आमचे पुनर्वसन करा मगच आम्ही घरे रिकामी करतो, अशी भूमिका घेत आहेत.
त्यामुळे कल्याण-डोंबिवली भागात अनेक ठिकाणी लोक जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. मात्र, आता या दुर्घटनेमुळे धोकादायक, जर्जर आणि स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि तिथे राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षतेचा मुद्दा देखील.
स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पालिकेने इमारतीला दिली होती सूचना
या घटनेसंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनय गोयल बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, “या इमारतीमध्ये एका घरात विनापरवानगी काम सुरू होते. त्यामुळे ही घटना घडली असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोकादायक आणि अति धोकादायक इमारतीच्या यादी मधली ही इमारत नव्हती. मात्र, स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पालिकेने इमारतीला सूचना दिली होती.”

पुढे गोयल म्हणाले की, “अनेकदा अशा इमारतीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट केलं जात नाही. त्यामुळे संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावे लागेल. सांगून आणि सूचना देऊनही लोक त्या इमारतींमध्ये राहत असतील तर त्यांच्यावरही पुढे गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.”
विनापरवानगी काम करणाऱ्या घरमालकावर गुन्हा
एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅट क्रमांक 401 चे मालक कृष्णा लालचंद चौरसिया (40) यांच्यावर कलम 105, 125 आणि महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम, 1966 अंतर्गत संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना या प्रकरणी अटक देखील करण्यात आलेली आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

ज्यामध्ये चौरसिया यांनी स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता त्यांच्या फ्लॅटमध्ये अनधिकृतपणे फ्लोअरिंगचे काम सुरू केले .या कामामुळे इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
नमस्वी श्रीकांत शेलार (2), प्रमिला कालचरण साहू (56), सुनीता नीलांचल साहू (38), सुशीला नारायण गुजर (78), व्यंकट भीमा चव्हाण (42), सुजाता मनोज पाडी (38) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.
विनायक मनोज पाधी (4), शर्विल श्रीकांत शेलार (4), निखिल चंद्रशेखर खरात (26) अरुणा वीर नारायण अशी या घटनेतील जखमींची नावे आहेत.
स्थलांतर आणि घराचा मुद्दा मार्गी लागणार
कल्याण येथील दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस, महापालिका, आपत्ती आणि इतर प्रशासनाने तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले. घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
घटनास्थळावरील शोध कार्य पूर्ण झाले असून इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञानमंदिर विद्यालय, कल्याण (पूर्व) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्या सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर काही सदस्य आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या घरी वास्तव्यासाठी गेले आहेत.
या इमारती मधून सर्व घरमालकांना आणि भाडेकरूंना घर खाली करण्यासाठी पालिकेकडून व पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या इमारतीतील घरमालकांची आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठक होऊन स्थलांतरबाबत आणि घराचा मुद्दा मार्गी लागणार असल्याचं रहिवासी आणि पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मृतांना शासनामार्फत पाच लाख रुपयाचे अर्थसहाय्य
या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.
तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC