Home LATEST NEWS ताजी बातमी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन

7
0

Source :- BBC INDIA NEWS

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले आहे.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

29 मिनिटांपूर्वी

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (87) यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. डॉ. नारळीकर यांचे काल झोपेत (19 मे रात्री) निधन झाले असे त्यांच्या खासगी सचिवांनी बीबीसी मराठीला सांगितले.

डॉ. नारळीकर हे केवळ खगोलशास्त्रज्ञच नव्हते तर विज्ञान लेखकही होते. त्यांनी नाशिक येथे झालेल्या 94 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते.

आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जात. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि विज्ञानलिषयक लेखन लोकप्रिय ठरल्या आहेत.

डॉ. नारळीकरांची फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका असो, वा विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञानकथालेखन असो, डॉ नारळीकर कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व राहिलं आहे.

महाराष्ट्र सरकारने डॉ. नारळीकरांना 2010 साली ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

भारत सरकारने डॉ. जयंत नारळीकर यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ या नागरी पुरस्काराने गौरवलं आहे. तसंच, स्मिथ्स प्राईज, अॅडम्स प्राईज, प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारानेही डॉ. नारळीकरांचा गौरव झाला आहे.

डॉ. जयंत नारळीकर यांचा अल्पपरिचय

19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म झाला.

डॉ. नारळीकरांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे वाराणसीच्या हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर आई सुमती या संस्कृत अभ्यासक होत्या. नारळीकरांचे प्राथमिक शिक्षण वाराणसीतच झाले. त्यांचे उच्चशिक्षण ब्रिटनस्थित केंब्रिज विद्यापीठात झाले.

1972 साली डॉ. नारळीकर भारतात परतले आणि TIFR मध्ये खगोलशास्त्र विभागात प्रमुखपदी विराजमान झाले. पुढे 1988 साली त्यांची आयुका संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली.

हॉयल-नारळीकर सिद्धांत या नावानं ओळखल्या जाणाऱ्या कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’साठी डॉ. जयंत नारळीकर जगभरात ओळखले जातात.

विश्वाची निर्मिती महास्फोटातून झाली की ते स्थिर स्थितीत आहे, असे दोन विचारप्रवाह खगोलभौतिकी तज्ज्ञांमध्ये आहेत. नारळीकर आणि हॉयल यांचा सिद्धांत स्थिर स्थिती विश्वाची कास धरणारा होता.

संशोधनासोबतच विज्ञानविषयक लेखन त्यांनी सुरू ठेवलं. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, वामन परत न आला, यक्षांची देणगी, चला जाऊ अवकाश सफरीला यांसारख्या विज्ञानकथा त्यांनी लिहिल्या.

‘यक्षांची देणगी’ या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कारही मिळाला आहे.

आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप, विश्वाची रचना, विज्ञानाची गरुडझेप यांसारखी विज्ञानविषयक माहिती देणारी पुस्तकंही त्यांनी लिहिली.

‘चार नगरांतले माझे विश्व’ ही त्यांची आत्मकथा असून, डॉ. विजया वाड यांनी ‘विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ हे चरित्र लिहिले आहे.

डॉ. नारळीकर

फोटो स्रोत, @DrSEShinde

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर यांनी डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते लिहितात, “भारतीय खगोलशास्त्र आणि विज्ञानाच्या विश्वात अमुल्य योगदान देणारे ज्येष्ठ खगोलभौतिकशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानविचारवंत डॉ. जयंत विष्णु नारळीकर यांचं निधन ही संपूर्ण देशासाठी आणि विज्ञानप्रेमींसाठी अत्यंत दुखःद बातमी आहे.”

“खगोलभौतिकशास्त्रातील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ म्हणून कीर्ती मिळवलेल्या डॉ. नारळीकर यांनी स्टीफन हॉकिंग यांच्यासह देखील काम केले आहे तर फ्रेड हॉयल यांच्यासोबत ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ मांडला, ज्याने ब्रह्मांडाच्या उत्पत्तीबाबतच्या पारंपरिक संकल्पनांना आव्हान दिलं. त्यांचा जीवनप्रवास केवळ प्रयोगशाळेतच नव्हे, तर सामान्य जनतेपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचाही होता.

“मराठीतून विज्ञान लेखन करून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला विज्ञानाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. विविध पुस्तकांमधून त्यांनी विज्ञानसाक्षरतेचा संदेश घरोघरी पोहोचवला. तर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा देखील त्यांना बहुमान मिळाला आहे. पद्मविभूषणसह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या डॉ. नारळीकर यांच्या जाण्याने विज्ञान आणि साहित्य क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे,”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC