Source :- ZEE NEWS
Sodha dynasty of Amarkot: जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागातील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावात वाढ झाली. त्यातच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची भारतानं सर्वच मार्गांनी कोंडी करण्यात सुरुवात केली. परिस्थिती दर दिवसाआड आणखी गंभीर होत असताना पाकिस्तानातील एकंदर चित्र नेमकं कसं आहे याचाच कयास अनेकजण लावत आहेत. सोशल मीडियावर त्यासंदर्भातील अनेक बातम्याही चर्चेचा विषय ठरत आहेत. याच पाकिस्तानात एका भारतीय राजघराण्याची इतकी चर्चा आहे की पाक सरकारही या कुटुंबासमोर दचकून राहतं, त्यांची आदब राखतं.
पाकिस्तानात हिंदूना मिळणारी वागणूक कायमच चर्चेचा मुद्दा ठरत असली तरीही शेजारी राष्ट्रामध्ये एक कुटुंब असंही आहे ज्या कुटुंबाला त्या देशात कमालीचा मान मिळतो. या राजघराण्याला पाकिस्तानात इतकं महत्त्वं प्राप्त आहे की, तिथले नागरिकही त्यांच्यापुढं वचकून राहतात.
एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहानुसार पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील उमरकोट येथील हे राजघराणं इतिहास आणि वर्तमानात विशेष स्थान कायम राखून आहे. पाकिस्तानात आपला वारसा पुढे नेणाऱ्या या राजघराण्याची इथं भारतातही तितकीच चर्चा होते. 1947 मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हा अनेक कुटुंबांनी पाकिस्तान सोडून राजस्थान गाठलं होतं. पण, उमरकोटच्या राणा यांनी मात्र आपली जन्मभूमी सोडली नाही. सध्याच्या घडीला याच कुटुंबाचा वारसा राजा करणी सिंह सोढ़ा पुढे नेत आहेत. सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत त्यांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.
सोढा कुटुंबातील 27 वे राणा कुंवर करणी सिंह सोढा सध्या या राजवंशाचे प्रमुख असून तिथं ते अल्पसंख्यांक नेतेही आहेत. राजा हमीर सिंह आणि राणी नलिनी प्रभा कंवर यांचे सुपुत्र करणी सिंह हे नेत्यांच्या कुटुंबातून पुढे आले आहेत. त्यांचे वडील हमीर सिंह पाकिस्तानातील राजकारणात अनेकदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. तर, माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांचेही ते निकटवर्तीय होते.
भारतीय राजघराण्यांमध्येही मानाचं स्थान…
2015 मध्ये करणी सिंह यांनी भारतीय राजघराम्यांमध्ये मानाचं स्थान मिळवलं. येथील एका राजघराण्याशी त्यांचं लग्नाचं नातं जोडलं गेलं. त्यांची पत्नी पद्मिनी सिंह राठोड राजस्थानच्या कनोटा येथील ठाकूर मान सिंह राठोड यांची कन्या आहे. भारताशी असणारं त्यांचं नातं इतक्यापुरताच सीमित नसून, त्यांच्या आईचा आणि तिन्ही बहिणींचा जन्मही भारतातच झाल्याचं सांगितलं जातं.
सोढा कुटुंबाची पाळंमुळं राजपूतांशी जोडली गेली असून, ते मुळचे मालवा आणि उत्तर पश्चिम राजस्थानातील असल्याचं सांगण्यात येतं. इतिहास सांगतो की, त्यांचे पूर्वज राव सोढा यांनी सध्याच्या खीप्रो, सिंध इथं त्यांच्या राजघराण्याचा भक्कम पाया रचला. पुढे या कुटुंबाच्या क्षेत्रावर ताबा मिळवल्यानंतर त्यांना राणा ही उपाधी बहाल करण्यात आली. राणाचाच अर्थ आहे, ‘राजा’.
11 व्या शतकातील किल्ला
या राणा कुटुंबाचं मुख्य वर्चस्व उमरकोट इथं असून इथं 11 व्या शतकातील एक किल्लाही आहे. असं म्हणतात की राणा अमर सिंह यांनी तो उभारला होता. करणी सिंह यांचे आजोबा राणा चंदर सिंह पाकिस्तानातील पीपल्स पार्टीचे संस्थापक सदस्य असून, हिंदू अल्पसंख्यांक असूनही कुंवर करणी सिंह एकता आणि संस्कृतीवा वाव देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिले.
उमरकोट येथील किल्ला आणि तिथं असणारं प्राचीन मंदिर, शिव मंदिर, काली माता मंदिर यांसारख्या वास्तू या भागातील समृद्ध हिंदू वारसा अधोरेखित करतात. आजही तिथं केशरी ध्वज मानानं फडकतो. करणी सिंह यांचाच विवाह भारत आणि पाकिस्तानमधील नात्यासोबत या दोन्ही कुटुंबांमध्ये असणारा सलोखा सर्वांसमोर आणतं आणि यातूनच एकोपा जपण्याची नवी उमेद मिळत राहते असंही अनेकांचं मत.
SOURCE : ZEE NEWS