Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यावर आल्यानंतर आपल्यापैकी बहुतांश जणांच्या जीवनात चर्चा सुरू होते ती लग्नाची. चांगला किंवा आपल्यासाठी सर्वोत्तम जीवनसाथी निवडणं हे या त्यानंतरच सर्वांत महत्त्वाचं आणि तेवढंच कठीण कामही असतं.
सगळं काही इंटरनेटवर अवलंबून असलेल्या या आजच्या काळात अनेकजण यासाठीही तंत्रज्ञानाची मदत घेतात. म्हणजे ऑनलाईन मॅचमेकिंग तसेच वेबसाईटद्वारे पार्टनर निवडण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो.
पण काहीवेळा अशा पद्धतीनं मॅट्रिमोनियल वेबसाईट किंवा ऑनलाईन पार्टनर निवडताना फसवणूक झाल्याचे प्रकारही समोर येतात. कधी खोटी प्रोफाईल तयार करून फसवणूक केली जाते तर कधी जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंग केलं जातं.

फोटो स्रोत, cybercrime.gov.in
मॅट्रिमोनियल वेबसाईटवर विवाहोच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांची तपशीलवार माहिती दिलेली असते. त्याच्या मदतीने योग्य साथीदार निवडण्यासाठी मोठी मदत होत असते. पण त्याचवेळी अविश्वासार्ह वेबसाईट असेल तर फसवणुकीची शक्यता निर्माण होते.
तसंच फसवणूक करणारे भामटे कधी-कधी खोट्या माहितीच्या आधारे त्यांचे प्रोफाईल्स तयार करत असतात. अशावेळी आपणच ऑनलाईन पार्टनर निवडताना काही काळजी घेणं गरजेचं आहे.
आपण काय काय काळजी घ्यायला हवी, याबाबतचे काही मुद्दे सायबर गुन्हे कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सायबर क्राईम विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहेत. ते अत्यंत उपयोगाचे ठरू शकतात.

कोणत्याही मॅट्रिमोनियल वेबसाईटवर तुमचं प्रोफाईल तयार करण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी त्या वेबसाईटची विश्वासार्हता तपासायला हवी. त्या वेबसाईटबद्दल यूझर्सने दिलेले रिव्ह्यूदेखील त्यासाठी मदत करू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
नेमक्या कोणत्या वेबसाईटवर प्रोफाईल तयार करायला हवे, याबाबत मित्र नातेवाईक किंवा संबंधित क्षेत्राशी सबंध असलेल्या कुणाचा तरी सल्ला घेतला तर त्याचा आपल्याला वेबसाईट निवडताना फायदा होऊ शकतो.
आपल्या परिचयातील कोणी अशाप्रकारे ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करून पार्टनरची निवड केली असेल, तर त्यांच्या अनुभवांसंबंधी त्यांच्याशी बोलूनही आपण माहिती मिळवू शकतो.
कारण यासाठी आपण जी बेवसाईट निवडणार आहोत ती सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं ठरतं.

कोणत्याही वेबसाईटवर तुम्हाला प्रोफाईल किंवा लॉगिन करायचं असेल तर त्यासाठी आपला ई मेल आयडी गरजेचा असतो. तसंच मॅट्रिमोनियल साईटवरही तुम्हाला ई मेलचा वापर करूनच नोंदणी करावी लागते.
त्यासाठी शक्यतो सगळे त्यांचा नेहमी वापरला जाणारा ई मेल आयडीच वापरत असतात. पण तसं करणं कधी-कधी सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याचं ठरू शकतं. कारण सायबर गुन्हेगार ई मेलचा वापर करून तुमच्या डेटापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळं शक्यतो अशा वेबसाईटवर प्रोफाईल तयार करण्यासाठी आधी एक नवीन ई मेल आयडी तयार करून त्याचाच वापर पुढील संवादासाठी करायला हवा.
तसंच शक्यतो फोटो, फोन नंबर, घराचा पत्ता अशा प्रकारची वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळायला हवं. पूर्ण खात्री झाल्याशिवाय अशाप्रकारची माहिती शेअर करता कामा नये.

वेबसाईटच्या प्रोफाईलच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या उमेदवाराची ऑनलाईन माहिती घेतल्यानंतर पुढचं पाऊल टाकण्यापूर्वी संबंधित व्यक्तीबाबत संपूर्ण सखोल माहिती मिळवणं अत्यंत गरजेचं असतं.
उमेदवाराने प्रोफाईलमध्ये दिलेली माहिती खरी आहे की नाही, पार्श्वभूमी काय आहे हे पाहणं गरजेचं असतं. कामाचं ठिकाण, कुटुंब, मित्र, नातेवाईक, शेजारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायला हवा.
तसं केल्यास उमेदावाराबद्दल खात्री तर मिळतेच, पण त्याचबरोबर या उमेदवाराबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळण्यासही मदत होते.

तुम्ही ऑनलाईन पार्टनरची निवड करत असताना जे काही करत असाल त्याबाबत कुटुंबीयांबरोबर माहिती शेअर करत राहायला हवी. त्यामुळं त्यांच्या अनुभवातून आपल्याला काही मार्गदर्शन मिळू शकते.
तसंच तुम्ही कुणाला, कधी, कुठे भेटणार आहात याचीही माहिती कुटुंबाला असली तर कोणत्याही प्रकारचा धोका होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. शिवाय तुम्हाला ऐनवेळी काही मदत हवी असली तर तीही तातडीने मिळण्याची हमी राहते.

एखाद्या प्रोफाईलवरून उमेदवाराबरोबर मॅच होत असेल आणि प्राथमिक चर्चेनंतर तुम्ही एकमेकांना भेटणार असाल तर भेटीबाबतही काही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरत असतं.

फोटो स्रोत, cybercrime.gov.in
तुम्ही ज्या व्यक्तीला भेटणार आहात त्या व्यक्तीच्या ऑनलाईन माहितीशिवाय स्वभाव किंवा इतर गोष्टी याची मात्र तुम्हाला माहिती नसते. त्यामुळं खबरदारी म्हणून भेटीसाठी सार्वजनिक ठिकाणाचीच निवड करायला हवी.
तसंच तुम्ही कुणाशी भेटायला जाणार आहात याबाबत तुमच्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना माहिती देऊन ठेवायला हवी.

तुम्हाला एखाद्या उमेदवाराचं प्रोफाईल आवडल्यानंतर किंवा मॅच होत आहे असं वाटल्यानंतर तुमच्या मनात असलेले सगळे प्रश्न संबंधित व्यक्तीला विचारायला हवे.
ईमेल किंवा शक्य त्या माध्यमातून किंवा तुम्ही जर भेटत असला तर त्या व्यक्तीला जास्तीत जास्त समजून घेण्यासाठी भरपूर प्रश्न विचारून त्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती करून घ्यायला हवी.

समोरची व्यक्ती आपल्याला जे काही सांगत आहे ते सगळं खरं आहे की त्यात काही वेगळं जाणवत आहे, हे समजण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न विचारून आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेणं महत्त्वाचं असतं.

मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झालेल्या उमेदवाराबरोबर बोलताना किंवा चॅटिंग करतानाही काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे समोरची व्यक्ती जर काही खासगी माहिती विचारत असेल तर वेळीच सावध व्हायला हवं.

फोटो स्रोत, cybercrime.gov.in
अशा प्रकारची कोणतीही माहिती शेअर करणं टाळायला हवं. समोरची व्यक्ती नंबर, ई मेल आयडी, पत्ता अशाप्रकारची माहिती मागू शकतो पण आपण मात्र काळजीपूर्वक विचार करूनच समोरच्याला काय सांगयचं हे ठरवायला हवं.
तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीबाबत किंवा इतर गोष्टींची पूर्णपणे तपशीलवार माहिती मिळवत नाहीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारची खासगी माहिती शेअर करणं टाळायलाच हवं.

ऑनलाईन गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार ब्लॅकमेलिंग किंवा छळ करण्यासाठी सर्वाधिक वापर करतात तो फोटोंचा. एखाद्या व्यक्तीच्या फोटोवरून आक्षेपार्ह फोटो बनवून किंवा खासगी फोटोंद्वारे बदनामीची भीती दाखवून त्रास दिला जातो.
त्यामुळं कुणीतरी भामटा जर खोट्या प्रोफाईलद्वारे तुमच्या संपर्कात आला असेल तर त्याला ही संधी मिळू नये यासाठी कुणालाही आपले खासगी किंवा संवेदनशील फोटो शेअर करू नका.
या फोटोद्वारे गुन्हेगार तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुमचे काही आक्षेपार्ह फोटो हे इंटरनेटवर लीक होण्याची भीतीही असते. त्यामुळं फोटोंच्या बाबतीत ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.

अशा प्रकारे ऑनलाईन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करणं किंवा त्याला पैसे देणं टाळायला हवं नसता फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.
एखाद्याने तुम्हाला काही अडचणीचं कारण सांगून पैशाची मागणी केली तर त्यात काहीतरी संशयास्पद आहे, हे समजून जा. तसं झाल्यास त्या व्यक्तीबरोबर पुढील कोणत्याही प्रकारचा संवाद साधताना अत्यंत काळजी घ्यायला हवी.
असं काही झाल्यास त्या व्यक्तीबाबत संपूर्ण माहिती काढल्यानंतरच पुढं काय करायचं ते ठरवायला हवं.

पार्टनर निवडण्यासाठी तुम्ही मॅट्रिमोनियल वेबसाईट किंवा ऑनलाईन मार्गाचा वापर करत असाल तर नक्कीच NRI प्रोफाईलही तुमच्यासमोर येतातच. पण अशा प्रोफाईल पाहून संपर्क साधताना काळजी घेणं गरजेचं असतं.
विशेष म्हणजे अशा प्रोफाईल पाहून आणि ऑनलाईन संवादावरून थेट कोणत्याही प्रकारचं वचन किंवा आश्वासन देणं टाळा.

फोटो स्रोत, cybercrime.gov.in
प्रत्यक्ष समोरा-समोर भेटल्याशिवाय लग्नाचं किंवा दुसरं कोणतंही आश्वासन देता कामा नये. संबंधित उमेदवाराच्या कुटुंबाची, नातेवाईकांची , कामाविषयी पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय पाऊल पुढं टाकणं टाळायला हवं.
त्यांनी विदेशातील पत्ते किंवा काही माहिती दिली असेल तर त्या माहितीची सत्यता पडताळणंही अत्यंत गरजेचं असतं.
अशा प्रकारची खबरदारी बाळगून ऑनलाईन पार्टनर निवडताना होणाऱ्या फसवणुकीपासून तुमचा बचाव होऊ शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC