Home LATEST NEWS ताजी बातमी पहलगाममध्ये हल्ला झाला ‘त्या’ ठिकाणच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची होती?

पहलगाममध्ये हल्ला झाला ‘त्या’ ठिकाणच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची होती?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

बैसरन व्हॅली

22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरनमध्ये कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकूण 26 लोकांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तींमध्ये 25 पर्यटक आणि एका स्थानिक तरुणाचा समावेश होता. मागच्या तीन दशकांमध्ये पर्यटकांवर झालेला हा सगळ्यात मोठा हल्ला आहे.

पण आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या बैसरनच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नेमकी कुणाकडे आहे? ही जागा कधी उघडते आणि कधी बंद केली जाते? चला तर मग याबाबत स्थानिक नागरिक आणि संबंधित लोक काय म्हणतायत ते पाहूया.

कार्ड

बैसरन खोऱ्याच्या देखभालीची जबाबदारी पहलगाम डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडे (पीडीए) आहे. बैसरनशिवाय या भागात असणाऱ्या इतर पर्यटन स्थळांची जबाबदारी देखील याच मंडळाकडे आहे.

बीबीसीने या व्यवस्थापन मंडळातील तीन लोकांसोबत चर्चा केली. त्यांनी हे कबूल केलं की, बैसरन पार्कच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्याच विभागाकडे आहे.

त्यांनी हेही स्पष्ट केलं की, बैसरन शिवाय पहलगाम आणि इतरही जागांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पहलगाम विकास महामंडळाकडून बैसरन खोरे, बेताब खोरे आणि पहलगामच्या इतर छोट्या मोठ्या उद्यानांची जबाबदारी कंत्राटदारांना दिली जाते. हे कंत्राट एकूण तीन वर्षांचं असतं.

बैसरन व्हॅली

नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मागच्या वर्षी बैसरन खोऱ्यासाठी तीन कोटी रुपयांचं कंत्राट एका खासगी ठेकेदाराला तीन वर्षांसाठी दिलं गेलं.

आम्ही त्या कंत्राटदाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.

कार्ड

बैसरन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला सांगितलं की, बैसरन आणि बेताब खोरं वर्षभर पर्यटकांसाठी खुलं असतं.

याच अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की, वातावरण बिघडल्यास ही जागा पर्यटकांसाठी काहीकाळ बंद केली जाते. त्यांचं म्हणणं होतं की, मोठी बर्फवृष्टी झाली की सामान्य काश्मिरी नागरिक सुद्धा आपापल्या घरातच राहणं पसंत करतात. अशा परिस्थितीत बैसरनसारख्या उंच ठिकाणी पर्यटकही जात नाहीत.

पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणांनी याआधी कधीही बैसरनचा परिसर बंद करण्यास सांगितला नसल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, बैसरनचा परिसर पर्यटकांसाठी खुला करताना कधीही पोलिसांच्या परवानगीची (सेक्युरिटी क्लियरन्स) चर्चा झाली नाही.

ऑथॉरिटीच्या आणखीन एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मागच्या वर्षी अमरनाथ यात्रेच्या वेळी बैसरन किमान दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आलं होतं. त्याहीवेळी पोलिसांनी आमच्याशी याबाबत संवाद साधलेला नव्हता.

बैसरन पार्क

या अधिकाऱ्याचं असं म्हणणं होतं की, बैसरन परिसरात याआधी कधीही पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात केलेले नव्हते. त्यांनीही सांगितलं की हे ठिकाण वर्षभर सुरूच असायचं.

त्यांचं असंही म्हणणं होतं की, मागच्या तीन वर्षांमध्ये बैसरन उघडण्यासाठी पोलिसांची कधीही परवानगी घेतल्याचं त्यांना आठवत नाही.

आणखीन एका अधिकाऱ्याने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही जे प्रश्न विचारत आहात त्यांची उत्तरं आम्ही देऊ शकत नाही. हे एक अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे.

पहलगाम डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या एकही अधिकाऱ्याने त्यांचं नाव जाहीर करण्यास परवानगी दिली नाही.

दुसरीकडे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, बैसरन पर्यटकांसाठी खुलं करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी कधीच घेतली गेली नाही. हे पोलीस अधिकारी काही वर्षांपूर्वी अनंतनागमध्ये तैनात केलेले होते. सध्या ते तिथे काम करत नाहीत.

आम्ही त्यांना विचारलं की, त्यांच्या कार्यकाळात पोलिसांची परवानगी घेतल्याचं त्यांना आठवतंय का? तर ते म्हणाले की असं झाल्याचं त्यांना अजिबात आठवत नाही.

बैसरन
कार्ड

पहलगामच्या पोनी स्टॅन्ड क्रमांक एकचे अध्यक्ष बशीर अहमद वानी यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांच्या स्टॅण्डवर उभे राहणारे घोडेवाले हल्ला होण्यापूर्वी रोज पर्यटकांना घेऊन बैसरन खोऱ्यात जायचे.

ते म्हणाले, “ज्या दिवशी हा हल्ला झाला त्यादिवशी देखील माझ्या स्टॅन्डवरील 10 घोडेवाले तिकडे गेले होते. बैसरन व्हॅली कधीच बंद होत नाही. यावर्षीच्या सुरुवातीपासूनच आम्ही पर्यटकांना तिकडे नेट आहोत.”

“माझ्या स्टॅन्डवरून रोज किमान 50 घोडे बैसरनकडे जातात. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात फक्त 2024मध्ये अमरनाथ यात्रेच्या वेळेसच बैसरन बंद झालेलं बघितलं आहे.”

त्यांनी सांगितलं, “माझे वडीलसुद्धा लोकांना घोड्यावरून घेऊन जायचे. काही दशकांपूर्वी पहलगाममध्ये दोनच ‘साइट सीन’ होत्या (साईटसीन म्हणजे ज्याठिकाणी फक्त घोड्यांचा वापर करून जात येतं अशा जागांसाठीचा स्थानिक शब्दप्रयोग). शिकार गह आणि बैसरन व्हॅली. नंतर शिकार गहपर्यंत गाड्यांचा रस्ता झाला आणि तिकडे घोडेवाल्यांची वर्दळ कमी झाली.”

बैसरन

बशीर अहमद यांनी सांगितलं की, त्यांच्या वडिलांच्या काळापासूनच पर्यटक बैसरन व्हॅलीला जातात. त्यांचं हेही म्हणणं आहे की, काश्मीरमध्ये कट्टरपंथी चळवळींच्या कारवाया सुरू होण्याआधी देखील पर्यटक याठिकाणी भेट द्यायचे.

बशीर अहमद यांच्या मते बैसरनला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक रस्ता (ट्रेक) 3 किलोमीटरचा आहे आणि दुसरा 6 किलोमीटरचा. एका रस्त्याचं नाव ‘हिल पार्क’ आहे आणि दुसऱ्याचं ‘सीएम बेड रोड’ असं आहे.

घोडेवाल्यांच्या आणखीन एका संघटनेतील व्यक्तीने मला सांगितलं की, 22 एप्रिलच्या आधी आम्ही या भागात काढलेले फोटो आणि व्हीडिओ शेअर करण्याची भीती वाटत आहे. त्यांचं म्हणणं होतं की परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर आम्ही तुम्हाला व्हीडिओ दाखवू शकू. त्या व्हीडिओवरून हे कळेल की हल्ला झालं ते ठिकाण वर्षभर खुलं राहायचं.

अनेक बातम्यांनुसार, गृह मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं, की बैसरन व्हॅली पर्यटकांसाठी उघडण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेतलेली नव्हती.

कार्ड

आम्ही कमीत कमी 10 स्थानिकांशी बोलून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हा परिसर वर्षातून कधीतरी बंद असायचा की नाही? या सगळ्यांनी असं म्हटलं की कधीच असं व्हायचं नाही.

एका स्थानिक व्यक्तीने मला नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितलं की, त्यांनी बैसरन व्हॅली कधीही बंद असल्याचं बघितलेलं नाही.

त्यांनीही अमरनाथ यात्रेच्या काळात दोन महिन्यांसाठी ही जागा बंद असल्याच्या माहितीला दुजोरा दिला. त्यांचं असंही म्हणणं होतं की, त्याकाळात सुरक्षा दलातील सैनिकांना तिथे ठेवलं गेलं होतं.

बैसरन
कार्ड

पहलगामच्या बाजारपेठेपासून जो रस्ता बैसरनला जातो तो अत्यंत ओबडधोबड परिस्थितीत आहे. तिथे जाण्यासाठी एकतर पायी जावं लागतं किंवा मग घोड्यावरून प्रवास करावा लागतो.

बैसरन पार्क किमान 8 हजार फुटांच्या उंचीवर आहे. हा संपूर्ण परिसर दाट जंगलांनी वेढलेला आहे. बैसरन व्हॅलीला ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणूनही ओळखलं जातं.

बैसरन पार्कमध्ये जाण्यासाठी तिकीट खरेदी करावं लागतं. लहान मुलांसाठी 20 रुपये आणि प्रौढांसाठी 35 रुपये असे या तिकिटांचे दर आहेत.

बैसरन

दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात पहलगाम आहे. श्रीनगरपासून पहलगाम 100 किलोमीटर अंतरावर आहे.

अनेक बॉलिवूड चित्रपट, स्थानिक नाटकं आणि लघुपटांमध्ये या परिसराचं चित्रण केलेलं आहे.

एवढंच नाही तर दरवर्षी लाखो भाविक पहलगामपासूनच अमरनाथच्या गुफेपर्यंतची यात्रा सुरू करतात. पहलगामच्या नुनवनमध्ये यात्रेचा बेस कॅम्प असतो. याच बेस कॅम्पवरून भाविकांचे जथ्थे अमरनाथला निघतात.

अमरनाथ यात्रेसाठी पहलगामपासूनच कडक सुरक्षा व्यवस्था असते. सुरक्षा दलांना उंच डोंगरांवर तैनात केलं जातं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC