Home LATEST NEWS ताजी बातमी लग्नासाठी अकोल्यातून गुजरातमध्ये गेलेल्या वऱ्हाडींवर कारवाई, पोलिसांनी घेतले ताब्यात

लग्नासाठी अकोल्यातून गुजरातमध्ये गेलेल्या वऱ्हाडींवर कारवाई, पोलिसांनी घेतले ताब्यात

6
0

Source :- BBC INDIA NEWS

आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोडून देण्याची विनवणी करताना गुन्हे शाखेत पोहोचलेल्या काही महिला ढसाढसा रडू लागल्या

“आम्ही महाराष्ट्रातील अकोलामधून एका लग्नासाठी वऱ्हाडी म्हणून आलोय. वरातीत असलेला माझा मुलगा आणि बहीण जावई यांना पोलिसांनी उचललं. आमच्याकडे जन्माचं प्रमाणपत्र आणि आधारकार्ड आहे.”

पोलिस आपल्या नातेवाईकांना कधी सोडतील याची वाट बघत पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या जैबुन्निसा बीबीसी गुजरातीसोबत बोलत्या होत्या. त्या लग्नासाठी आपल्या कुटुंबासोबत अहमदाबादला आल्या होत्या.

पहलगाम हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं पाकिस्तानला दोषी ठरवत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितलं. तसेच त्यांचे व्हिजा सुद्धा रद्द करण्यात आले. यानंतर गुजरात पोलिसांनी 25 एप्रिलला पहाटे 2 वाजता अहमदाबाद इथं शोध मोहीम राबवली.

गुजरात पोलिसांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत जवळपास 900 कथित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अहमदाबादशिवाय पोलिसांनी सुरत, राजकोट आणि वडोदरा इथं सुद्धा बेकायदेशीर राहणाऱ्या विदेशी लोकांना ताब्यात घेतलं आहे.

याच कारवाईत जैबुन्निसा यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची नातेवाईक फरजाना यांचं अहमदाबाद इथं लग्न होतं. फरजाना यांच्या हळदीचा कार्यक्रम 26 एप्रिलला होता. याच दिवशी फरजाना यांचे भाऊ आणि भाचाला पोलिसांनी उचललं.

लग्नपत्रिका दाखवताना फरजाना

फरजाना सांगतात, “आमच्या घरी लग्नासाठी वऱ्हाडी आलेले होते. आमचं घर खूप लहान आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांची सोय चंदोला परिसरात नातेवाईकांकडे केली होती. पण, पोलिसांनी बांगलादेश समजून त्यांना उचलून नेलं.

“पोलिसांनी ज्या लोकांना ताब्यात घेतलं त्यात माझा मोठा भाऊ आणि भाचासुद्धा आहे. तेच नसतील तर लग्न कसं होईल. ते महाराष्ट्रातील अकोल्याहून आले होते. त्यांची चौकशी करून सोडून दिलं जाईल असं मला सांगण्यात आलं होतं. पण, आता रात्र झाली तर आम्ही गुन्हे शाखेच्या बाहेर वाट बघतोय.

“आम्ही आमच्या भावाचा जन्माचा दाखला आणि इतर सरकारी कागदपत्रं दाखवलं तेव्हा त्यांना रात्री उशिरा साडेदहा वाजता सोडण्यात आलं,” फरजाना सांगतात.

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महिलांनी क्राइम ब्रांचबाहेरील गेटवर असा ठिय्या दिला होता

फरजाना मेहंदी लागलेले हात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर आपला भाऊ आणि भाच्याची वाट बघत बसल्या होत्या.

त्या पुढे म्हणतात, “आम्ही हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी पोलीस ठाण्यात बसलो होतो. त्यामुळे हळदीचा कार्यक्रम होऊ शकला नाही. लग्न 27 एप्रिलला होतं. त्याच दिवशी आम्ही हळदीचा कार्यक्रमही केला. कमी लोकांमध्ये कसंतरी लग्न आटोपलं याचं समाधान आहे. नाहीतर लग्नाच्या दिवशीही आम्ही पोलीस स्टेशनलाच असतो.”

आलमआरा यांचा मुलगा आणि सून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, रात्री दहा वाजता त्यांना सोडण्यात आल्याचं त्या सांगत होत्या

ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांचं कुटुंब 26 एप्रिलला रात्री उशिरापर्यंत गुन्हे शाखेच्या बाहेर उभे होते. गुन्हे शाखेचे पोलीस अधून मधून बाहेर येत ताब्यात घेतलेल्या काही व्यक्तींची नाव घेत होते. त्यानंतर नातेवाईक पोलिसांना जाऊन भेटत होते.

या कारवाईबद्दल पोलिसांना विचारलं असता ते म्हणाले, “चौकशीदरम्यान काहींजवळ कागदपत्रं नव्हते. पण, बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या नातेवाईकांजवळ कागदपत्र असतील तर आम्ही त्यांना वेळ देत होतो. त्यांच्याकडून आम्ही कागदपत्र घेत होतो.”

गुजरातमध्ये एक हजारापेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट आणि इतर ठिकाणी शोध मोहीम राबवली. यावेळी भारतात कथितरित्या बेककायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसह एक हजारांपेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलं.

अहमदाबादमधून ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांना पोलिसांच्या वाहनातून गुन्हे शाखेतून इतर ठिकाणी हलवण्यात आलं होतं. पण, त्यांना कुठे घेऊन चालले आहेत? असा प्रश्न विचारला असता एका पोलिस अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की “इतक्या लोकांची एकाच ठिकाणी चौकशी करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी इतर पोलिस ठाण्यात हलवलं जात आहे.”

गुजरात पोलिसांनी हजारहून अधिक लोकांना ताब्यात घेतलं

अहमदाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत पटेल यांनी 27 एप्रिलला मीडियासोबत संवाद साधला. जवळपास 900 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. यापैकी 600 भारतीय नागरिक असून त्यांना सोडून दिलं, असं ते म्हणाले.

आतापर्यंत 104 बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. काही संशयितांचं म्हणणं आहे की ते पश्चिम बंगाल आणि त्यासभोवतालच्या परिसरात राहतात. पण, त्यांच्याजवळ असलेले आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि इतर कागदपत्रं कुठून आले याचा शोध घेतला जात आहे.

तसेच हे कागदपत्रं खरे आहेत की खोटे हे देखील तपासलं जात आहे. चौकशीची प्रक्रिया पुढेही काही दिवस सुरू राहील, असंही त्यांनी सांगितलं.

अहमदाबाद क्राइम ब्रांचबाहेर जमलेल्या महिला

26 एप्रिलला गृहराज्य मंत्री हर्ष सांघवी यांनी दावा केला की “आधी अटक करण्यात आलेले चार बांगलादेशी अलकायदाचे स्लीपर सेल म्हणून काम करत होतो. या सगळ्या बांगलादेशी नागरिकांची चौकशी सुरू आहे.”

महिलांनी पोलिसांचा रस्ता रोखला

ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांना आधी अहमदाबादेतील कांकरिया परिसरातल्या फुटबॉल मैदानात नेलं जात होतं. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयाजवळ असलेल्या पोलीस मैदानात ठेवण्यात आलं. त्यानंतर रांगेनं चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेलं.

पण, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. यामध्ये सर्वाधिक महिला होत्या. काही महिला आपल्या लहान मुलांना घेऊन आल्या होत्या.

पोलिसांनी 26 एप्रिलला दुपारी ताब्यात घेतलेल्या लोकांना वाहनातून दुसऱ्या कार्यालयात नेलं. यावेळी नातेवाईकांनी पोलिसांच्या वाहनाचा रस्ता रोखला. महिलांनी रस्त्यावर बसून रास्ता रोको केला. यामध्ये काही महिला आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये झटापटही झाली.

ही महिला आपल्या बाळाला घेऊन क्राइम ब्रांचबाहेर आपल्या नातेवाईकांची वाट पाहत उभी होती

आलमआरा पठाण यांचीही पोलिसांसोबत झटापट झाली. त्या बीबीसी गुजरातीसोबत बोलताना म्हणाल्या, “आम्ही वटवा येतील मोहम्मदी मशिदीजवळ राहतो. गेल्या 23 वर्षांपासून अहमदाबादमध्ये राहतोय. माझा मुलगा रियाजच्या सासऱ्याचे घर चांदोला तलावाजवळ आहे. त्यादिवशी तो आपल्या सासऱ्याच्या घरी गेला होता. पण, पोलिसांनी माझा मुलगा आणि सून दोघांनाही ताब्यात घेतलं.

“आमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्रापासून सगळे कागदपत्र आहेत. पोलिसांनी मला आधारकार्ड आणायला सांगितलं. मी कागदपत्रं घेऊन गुन्हे शाखेला चकरा मारत होते. त्यानंतर रात्री दहा वाजता त्यांना सोडण्यात आलं,” आलमआरा यांनी सांगितलं.

आलमआरा यांचा मुलगा आणि सुनेला कागदपत्रांसह पुन्हा 27 एप्रिलला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

आलमआरा पुढे म्हणतात, “आम्ही ना बांगलादेशातून आलोय आणि ना आम्ही गुन्हेगार आहोत. आमच्या मुलांचा जन्म इथंच झाला. तरीही माझ्या मुलाला आणि सुनेला का ताब्यात घेतलं?”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC