Home LATEST NEWS ताजी बातमी ‘आधी काळा डाग, नंतर वेदना आणि विद्रूप होत नखं गळतात,’ केसगळतीनंतर गावकऱ्यांत...

‘आधी काळा डाग, नंतर वेदना आणि विद्रूप होत नखं गळतात,’ केसगळतीनंतर गावकऱ्यांत आणखी भीती

6
0

Source :- BBC INDIA NEWS

बुलडाणा नखगळतीचे रुग्ण

“काही होत नसेल तर कशाला येता?”, अशा शब्दांत बुलढाण्याच्या केस आणि नखगळती होणाऱ्या गावातील नागरिकांनी रोष आणि भीती व्यक्त केली आहे. हे लोक आता केंद्रीय पथकाकडे तपासणीसाठीही फिरकेना झाले आहेत.

“आधी आमच्या डोक्याचे केस गेले. आता नखं जात आहेत. त्यावर काही उपचार झाले नाहीत. केसगळतीचा अहवाल आला पाहिजे. आम्हाला काय आजार झाला हे आम्हाला समजलं पाहिजे. निदान झालं तर आम्ही काळजी घेऊ. आमच्या लहान मुलांच्या दूर राहूल. पण, अहवालच आला नाही, तर आम्हाला कसं समजेल की आम्हाला काय झालं?”

आधी केसगळती आणि आता नखगळतीनं बाधित असलेल्या बोंडगावातील दिगांबर इलामे यांनी अशा शब्दांत राग मांडला.

दिगांबर इलामे हे बोंडगावातील केसगळतीचे पहिले रुग्ण आहेत. आता 15 दिवसांपूर्वी त्यांची नखंही अर्ध्यातून तुटून पडली आहेत. पण, अजूनही केसगळतीचा अहवाल आला नसल्यानं त्यांचा सरकारवर संताप व्यक्त होत आहे.

फक्त इलामेच नाहीतर शेगांव तालुक्यातल्या 6 गावांमध्ये ही नखगळती सुरू झाली आहे. ज्या लोकांचे केस गळून टक्कल पडलं होतं त्याच लोकांची नखं आता गळत आहेत.

आतापर्यंत शेगाव तालुक्यात नखगळतीचे 60 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बोंडगाव, कालवड ही गावं अधिक बाधित आहेत.

नखगळती सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये आणखी भीती निर्माण झाली आहे. आधी केसगळती झाली, आता नखगळती सुरू झाली. पुढे शरीराचा कुठल्या अवयवाला काय होईल माहिती नाही. सरकार वाट कशाची बघतेय? असा सवाल बोंडगावातील गवंडी काम करणारे प्रवीण इंगळे यांनी केला.

प्रवीण इंगळे यांचीही जानेवारी महिन्यात केसगळती होऊन टक्कल पडलं होतं. आता त्यांची एका हाताची नखं तुटली आहेत. तसेच पायांची नखं देखील तुटली आहेत.

नखगळती होताना नेमकं काय होतं? याबद्दलही पवीण यांनी सांगितलं.

“आधी काळा डाग पडतो. थोडं दुखतं. त्यानंतर अचानक नखं विद्रूप होतात आणि गळून पडतात,” असं ते म्हणाले.

आधी आयसीएमआरची टीम आली होती. मोठमोठे डॉक्टर आले होते. आमच्या केसांचे नमुने, रक्ताचे नमुने नेले, पण अजून अहवाल का दिला नाही? असा सवाल तेही उपस्थित करतात.

केंद्रीय पथकाच्या टीमकडे रुग्ण फिरकेना

शेगाव तालुक्यात नख गळतीचे रुग्ण वाढत असल्यानं केंद्रानं 9 जणांची एक कमिटी स्थापन केली आहे.

यामध्ये नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलच्या अतिरिक्त संचालक तन्झिन डिकेड यांच्या नेतृत्वात 9 जणांचं एक पथक 22 एप्रिलला बोंडगावमध्ये दाखल झालं होतं. यामध्ये जलसंधारण विभागापासून तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे तज्ज्ञ होते.

हे पथक जवळपास पाच वाजण्याच्या सुमारास नखगळतीनं बाधित असलेल्या बोंडगावात पोहोचलं. पथकातील तज्ज्ञ, डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यासाठी गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात बसले होते. पण, त्याठिकाणी अवघे चार जण तपासणीसाठी आले.

गावातल्या इतर रुग्णांनी तपासणीकडे पाठ फिरवली. त्यामुळं पथकाला लोकांच्या घरोघरी जाऊन तपासणी करावी लागली.

लोक तपासणीसाठी का आले नाहीत?

लोक तपासणीसाठी का येत नाहीत? असं आम्ही मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या स्थानिकांना विचारलं. तर वारंवार त्याच त्याच तपासण्या करतात. पण, त्यावर उपाय काहीच नाही. अजून मागचा अहवाल आला नाही आणि तपासण्या करून काय करतात? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत होते.

तरुण मुलांनी लग्न जुळणार नाही, फोटो आला तर लोकांची बदनामी होईल अशी भीती बोलून दाखवली.

केसगळती सुरू झाली तर आमच्या गावात लग्न जुळत नव्हते. केसगळती थांबून गेल्या दोन महिन्यात सगळं नॉर्मल झालं होतं. त्यामुळं गावात पाच जणांची लग्न जुळली. पण, नव्यानं नखगळती सुरू झाली.

‘आम्ही समोर आलो तर लग्न जुळणार नाही ना मॅडम’, असं पायरीवर बसलेला एक तरुण म्हणाला.

तपासणी करणारे केंद्रीय पथक

जानेवारी महिन्यात केसगळती झाली त्यावेळी 55 वर्षीय पार्वती यांनी मुलाचं लग्न जुळत नसल्याची भीती बोलून दाखवली होती. टीव्हीवरच्या बातम्या पाहून सोयऱ्यांचा फोन आला की, लग्न जमू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.

पण, आता पार्वतीच्या मुलाचं लग्न जुळलं आहे. आम्ही गावात गेलो तेव्हा पार्वती आम्हाला भेटल्या. केसगळतीनंतर त्यांची नखगळतीही सुद्धा झाली. पण, त्यांच्या मुलाची नखगळती झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळीही त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. तसेच फोटोही घेऊ नका म्हणाल्या.

याच भीतीपोटी केंद्रीय टीम लोकांच्या घरी तपासणीसाठी गेली तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला नव्हता.

जानेवारी महिन्यातला केसगळतीचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळं ग्रामस्थांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

पुणे येथून आरोग्य विभागाच्या सहसंचालक बबिता कमलापूरकर 21 एप्रिलला बोंडगावात आल्या होत्या.

यावेळी केसगळतीचे पहिले रुग्ण दिगांबर इलामे यांनी त्यांच्यासमोर रोष व्यक्त केला. काही होत नसेल तर तुम्ही कशाला येता? असा संतप्त सवाल त्यांनी राज्य आरोग्य विभागाच्या पथकाला केला होता.

नखगळती होण्यामागे नेमकं कारण काय?

याआधी केसगळती झाली तेव्हा आयसीएमआरचं पथक आलं होतं. पण, त्यांनी अजूनही अहवाल दिला नाही. आता नखगळती सुरू झाली. त्यामुळे दोन्हीसाठी एकच गोष्ट जबाबदार आहे का? असा प्रश्न आहे.

नखगळती नेमकी का होत आहे? याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते म्हणाले की, जानेवारी महिन्यात केसगळती झाली होती तो टॉक्सीनचा तीव्र परिणाम होता. आता नखं गळतात. म्हणजे बॉडीमधून टॉक्सीन बाहेर निघतंय. हा टॉक्सीनचा क्रोनिक इफेक्ट असू शकतो.

रुग्ण

सोबतच आयसीएमआरचा अहवाल आला नसला तरी, नागपूर एम्सने रुग्णांच्या शरीरात सेलेनियम वाढल्यामुळे केसगळती होत असल्याचा अहवाल दिला असल्याचंही डॉ. गिते सांगतात.

पण, सेलेनियमचा स्त्रोत नेमका काय आहे? याच परिसरातल्या लोकांच्या शरीरामध्ये सेलेनियम का वाढलं? ते कुठून आलं? याबद्दल सरकारी पातळीवर कोणीही बोलायला तयार नाही.

मग आयसीएमआरने अद्यापही अहवाल का दिला नाही? याबद्दल नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलच्या अतिरिक्त संचालक तन्झिन डिकेड म्हणाल्या की , “आम्ही त्याचं विश्लेषण करत आहोत. वैज्ञानिक त्यावर आणखी काम करत आहेत. पूर्ण अभ्यास झाल्यानंतर अहवाल देतील. यामागे कुठलंतरी पर्यावरणीय कारण दिसतंय. नेमकं काय आहे त्याची तपासणी करू, त्यानंतर नेमकं कारण समजेल.”

‘गोड पाण्यासह रेशन तपासून द्या’

जानेवारी महिन्यात केसगळती झाली तेव्हा पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी या भागात जाऊन काही नमुने गोळा केले होते.

रुग्णांच्या शरीरात सेलेनियम वाढल्यामुळं हे होत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. तसेच सेलेनियमचा स्त्रोत हा रेशनचा गहू असू शकतो असा दावाही त्यांनी केला होता. या परिसरातले गव्हाचे नमुने त्यांनी तपासले होते.

पण, रेशनच्या गव्हात सेलेनियम आढळून आलं नाही, असं म्हणत सरकारनं त्यांचा रिपोर्ट नाकारला होता.

बावस्करांच्या याच अहवालाचा दाखला देत ग्रामस्थ रेशनचा गहू तपासून देण्याची मागणी करतात.

रुग्ण

प्रवीण इंगळे म्हणाले की, ” आयसीएमआरने आमचं रक्त नेलं, केस नेले. पण, अहवाल का आला नाही, हे समजत नाही. रेशनमुळे आमची केसगळती झाली हे समजलं होतं. हिम्मतराव बावस्कर आमच्या गावात आले होते. हिम्मतराव बावस्कर खोटं थोडी ना बोलणार आहेत. त्यांनी आमच्या घरचे गहू नेले होते तपासायला. रेशनच्या गव्हात काही गडबड असेल, तर आम्हाला रेशन तपासून द्यायला पाहिजे.”.

तसेच बोंडगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याची समस्या आहे. हा खारपान पट्टा असल्यानं गावात पिण्यायोग्य पाणी नाही. पाच किलोमीटरवरून शेगावला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जाते. तिथून या गावात दररोज पिण्यासाठी पाणी आणलं जातं.

याच गावातले उल्हास भिवटे म्हणतात, “इथून पाच किलोमीटर अंतरावरून प्यायचं पाणी आणतो. नाहीतर गावात खासगी गाडी येते. त्यांच्याकडून 10 रुपये कॅनचं पाणी विकत घेतो.

एका कुटुंबाला दररोज 50 रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागतं. जानेवारी महिन्यात केसगळती झाली तेव्हा आम्हाला टँकरनं पिण्याचं पाणी पुरवण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं.”

पण, जानेवारीपासून आता एप्रिल सुरू झाला पण गावात एक टँकर आलं नाही. फक्त आश्वसानं दिलं, असंही ते म्हणाले.

केसगळतीचा रिपोर्ट आला नाही. आता नखं चालले. याआधी किडनी स्टोनचे पेशंट होते. आम्ही काय फक्त दवाखान्यात पैसे भरायचे का? आम्हाला प्यायला चांगलं पाणी द्यावं,” अशी मागणी गावकरी करत आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC