Home LATEST NEWS ताजी बातमी पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील लोक काय म्हणतायत?

पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील लोक काय म्हणतायत?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

पहलगाममधील हल्ल्यातील जखमींना अनंतनागच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, हॉस्पिटलच्या परिसरात जखमी लोक त्यांच्या कुटुंबियांशी बोलताना

फोटो स्रोत, Getty Images

3 तासांपूर्वी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल) कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 26 जण मारले गेले आहेत.

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश जण पर्यटक आहेत.

ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यापासूनचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत, तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

तसंच काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल सैयद आसिम मुनीर म्हणाले होते की, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फरक आहे की जगातील कोणतीही शक्ती काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळं करू शकत नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर पहलगाममधील हा हल्ला झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडावा लागला आहे.

जनरल मुनीर यांनी काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातील नस असल्याचं म्हटलं होतं.

पहलगाममध्ये कट्टरतावाद्यांचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानातून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त राहिलेले अब्दुल बासित यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, “भारताकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कारवाईला हाणून पाडण्यासाठी पाकिस्तान सर्व प्रकारे सज्ज आहे, या गोष्टीबद्दल मी निर्धास्त आहे. यावेळेस पाकिस्तान सडेतोड उत्तर देईल, याबद्दल मला कोणतीही शंका नाही.”

पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांच्या भाषणामुळे वाढला संशय

पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या आणि खासदार शेरी रहमान यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, “पहलगाममध्ये झालेल्या दु:खद दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करते. दुर्दैवानं याप्रकारच्या हल्ल्यांसाठी पाकिस्तानकडे बोट दाखवणं हे भारतासाठी नेहमीचंच झालं आहे.”

शेरी रहमान म्हणाल्या, “भारताला स्वत:चं अपयश रोखता आलेलं नाही. नियंत्रण रेषेच्या (एलओसी) जवळपास स्थैर्य आणि जबाबदार वागणुकीच्या सहभागाची मागणी करणाऱ्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जातं. इतकंच काय त्यांची टिंगल देखील केली जाते.”

“अपेक्षेनुसार, कोणताही तपास न करता भारतातील उजव्या विचारसरणीचे गट आता पाकिस्तानला नष्ट करण्याचं आवाहन करतील.”

ग्राफिक्स

उमर अजहर या पाकिस्तानातील एक्सच्या एका युजरनं जनरल मुनीर यांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. त्यात जनरल मुनीर म्हणाले होते की, पाकिस्तान त्यांच्या काश्मीरी भावांना एकटं सोडणार नाही.

या व्हिडिओ क्लिपला शेअर करत उमर अजहरनं लिहिलं आहे, “पाच दिवस आधी जनरल मुनीर यांनी प्रक्षोभक भाषण दिलं होतं. त्यांनी घोषणा केली होती की भारतानं केलेल्या कब्जाच्या संदर्भात पाकिस्तान काश्मीरी भावांना कधीही एकटं सोडणार नाही.”

“आता असं दिसतं की यात सुरुवातीच्या कल्पनेपेक्षाही अधिक चुकीच्या प्रकारे विचार केला गेला होता. जनरल मुनीर यांनी याप्रकारचं वक्तव्यं करायला नको होतं.”

अनंतनागच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जखमी झालेली महिला

फोटो स्रोत, Getty Images

उमर अजहर यांच्या या पोस्टला रिपोस्ट करत पाकिस्तानच्या संरक्षणतज्ज्ञ आयशा सिद्दीका यांनी लिहिलं आहे, “भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा जोश कोणत्या दिशेनं जाईल हे पाहायचं आहे.”

सुहासिनी हैदर ‘द हिंदू’ या भारतातील इंग्रजी वृत्तपत्राच्या राजनयिक बाबींच्या (डिप्लोमॅटिक अफेअर्स) संपादक आहेत.

त्यांनी जनरल मुनीर यांच्या भाषणाबाबत लिहिलं आहे, “पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी गेल्या आठवड्यात केलेलं भाषण आता चर्चेत आहे. त्यांनी काश्मीरमध्ये हिंसाचाराची धमकी दिली होती म्हणूनच ते चर्चेत नाही, तर त्यांची भाषा सांप्रदायिक आणि फुट पाडणारी होती.”

“दोन्हीही मुद्दे आजच्या दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य आणि क्रौर्य यांच्याशी जोडलेल्या दिसून येतात.”

हुसैन हक्कानी यांनी हमासच्या हल्ल्याशी जोडला संदर्भ

अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत राहिलेल्या हुसैन हक्कानी यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, “7 ऑक्टोबर 2023 ला इस्रायलमध्ये हमासनं दहशतवादी हल्ला केल्यानंतर गाझामध्ये भयंकर विध्वंस झाला.”

“22 एप्रिल 2025 ला जम्मू काश्मीरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला संभाव्य परिणामांच्या संदर्भात तितकाच भयंकर आहे. या दहशतवादी हल्ल्याचा सर्व देशांनी आणि लोकांनी स्पष्ट शब्दात निषेध केला पाहिजे.”

पहलगाममध्ये कट्टरतावाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताच्या सुरक्षा दलांनी दक्षता वाढवली आहे

फोटो स्रोत, Getty Images

कमर चीमा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे विश्लेषक आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात ते मुस्लिम ऑफ अमेरिकाचे संस्थापक साजिद तरार यांच्याशी बोलले. साजिद तरार म्हणाले की या दहशतवादी हल्ल्याचं जे टायमिंग आहे, त्याचे अनेक संदेश आहेत.

साजिद तरार म्हणाले, “पाकिस्तान आणि भारताचे संबंध आणखी बिघडतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची एक ओळख तयार झाली आहे. काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा होत होती. तिथे मोठ्या संख्येनं पर्यटक जात होते. मात्र ही परिस्थिती बिघडवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला आहे.”

समा टीव्ही या पाकिस्तानातील वृत्तवाहिनीच्या अँकरनं या हल्ल्याबद्दल म्हटलं की, “भारतात कोणताही दहशतवादी हल्ला झाला की थेट पाकिस्तानकडेच बोट दाखवलं जातं.”

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सैयद आसिम मुनीर यांनी एक आठवड्याआधीच काश्मीरबाबत धमकी दिली होती

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानी पत्रकार सिरिल अलमेइदा यांनी एक्सवर लिहिलं आहे, “जर भारतानं ठरवलं की हे कोणी केलं आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे…तर त्याला कोण थांबवू शकेल?”

द इकॉनॉमिस्ट या ब्रिटिश मासिकाचे संरक्षण विषयक संपादक शशांक जोशी यांनी लिहिलं आहे, “मला वाटतं की आगामी आठवड्यांमध्ये भारत पाकिस्तानच्या विरोधात लष्करी कारवाई करू शकतो.”

शशांक जोशी यांना एका एक्स युजरनं विचारलं की या कारवाईची संभाव्य तारीख काय असेल? त्याला उत्तर देत जोशी म्हणाले – “60 टक्के शक्यता आहे की मे च्या शेवटच्या आठवड्यात ही कारवाई होऊ शकते आणि मी अजिबात विनोद करत नाहीये.”

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्या भाषणाबाबत शशांक जोशी यांनी लिहिलं आहे, “एक आठवड्याआधी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी जे भाषण केलं होतं, त्याचं टायमिंग योग्य नव्हतं.”

“जनरल मुनीर म्हणाले होते – आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. काश्मीर आमच्या गळ्याची नस आहे, आम्ही काश्मीरला विसरू शकत नाही. आम्ही काश्मीरी भावंडांच्या संघर्षाला विसरू शकत नाही.”

पाकिस्तानचे लष्करप्रमुख काय म्हणाले होते?

13 ते 16 एप्रिल दरम्यान इस्लामाबादमध्ये ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रकारचं हे पहिलंच आयोजन होतं.

जनरल मुनीर यांनी कन्व्हेन्शनमध्ये भाषण करताना ‘टू नेशन थिअरी’चा मुद्दा मांडला होता.

तसंच काश्मीर गळ्याची नस असल्याचं म्हटलं होतं आणि त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिमांमधील फरक अधोरेखित केला होता.

जनरल मुनीर म्हणाले होते की जगातील कोणतीही शक्ती काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळं करू शकत नाही.

जनरल मुनीर म्हणाले होते, “आम्ही एक नाही दोन राष्ट्र आहोत. आमच्या पूर्वजांचं म्हणणं होतं की सर्व अंगांनी आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आमचा धर्म, चालीरिती, परंपरा, विचारसरणी आणि ध्येय सर्वकाही वेगळं आहे.”

जनरल मुनीर यांच्या वक्तव्यातील हिंदू आणि मुस्लिमांमधील फरकाच्या मुद्द्यावर जास्त वाद होत होता.

पाकिस्तानातील अनेकजण म्हणत आहेत की जनरल मुनीर यांच्या या वक्तव्यानं पाकिस्तानात हिंदूंच्या विरोधात द्वेष वाढेल. पाकिस्तानात हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्यांक समुदाय आहे.

ग्राफिक्स

ताहा सिद्दीकी निर्वासित पाकिस्तानी आहेत आणि पॅरिसमध्ये राहतात. सिद्दीकी पत्रकार आहेत, ते पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांमध्ये लिहितात.

त्यांनी जनरल मुनीर यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं होतं, “पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी हिंदूंच्या विरोधात द्वेष पसरवत टू नेशन थिअरीला पाठिंबा दिला आहे. 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर हा सिद्धांत तोंडावर आपटला होता.”

“जनरल मुनीर यांनी पाकिस्तानी तरुणांना खोटं सांगण्यावर भर दिला. यामुळे तरुणांचं ब्रेनवॉश करणं सोप होतं, हे उघड आहे. हे लज्जास्पद आहे.”

पाकिस्तानातील सूफी विचारवंत आणि पत्रकार सबाहत जकारिया यांनी जनरल मुनीर यांच्या व्हिडिओ क्लिपबद्दल म्हटलं की, “पहिला प्रश्न हाच आहे की आमचं कोण? जर हिंदू आणि मुस्लिमांबद्दल बोललं जात असेल तर भारतात 20 कोटी मुस्लिम राहतात.”

“जर तुमच्या दृष्टीकोनातून विचार केला तर हे 20 कोटी मुस्लिमदेखील इतर भारतीयांपेक्षा वेगळे आहेत. मग पाकिस्तान त्यांच्या 24 कोटी मुस्लिमांमध्ये या 20 कोटी भारतीय मुस्लिमांचा समावेश करण्यात तयार आहे का? भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानात जायचं आहे का?”

“ज्या 10 लाख अफगाण मुस्लिमांना परत पाठवलं जातं आहे, त्यांच्याबद्दल काय मत आहे? ते तर कित्येक दशकांपासून पाकिस्तानात राहत आहे. त्यांच्यावर टू नेशन थिअरी लागू होत नाही का?”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC