Source :- ZEE NEWS
First Credit Card : आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही केवळ एक सुविधा नाही, तर अनेकांसाठी गरज बनली आहे. शॉपिंगपासून ते ट्रॅव्हलिंगपर्यंत, क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातलं पहिलं क्रेडिट कार्ड केव्हा आणि कुणी तयार केलं? खरंतर, यामागची गोष्ट खूपच रंजक आहे. हे कार्ड अमेरिकेतील व्यावसायिक फ्रँक मॅकनामा यांनी त्यांच्या मित्रांसोबत 1950 मध्ये तयार केलं. एकदा ते रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले असताना त्यांचं पाकीट विसरल्यामुळे ते बिल भरू शकले नाहीत. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि त्यांनी असं पेमेंट सिस्टीम तयार करण्याचा विचार केला ज्या अंतर्गत रोख रक्कम न देता व्यवहार करता येईल.
यातूनच Diners Club Card ची कल्पना सुरु झाली. हे कार्ड 1951 मध्ये अधिकृतपणे लाँच करण्यात आलं. सुरुवातीला ते फक्त काही निवडक रेस्टॉरंट्समध्येच वापरता येत होतं आणि ग्राहकांना 30 दिवसांची पेमेंट लिमिट मिळत होती.
पहिल्या वर्षात 200 लोकांना हे कार्ड दिलं गेलं आणि वर्षा अखेरीस 20000 कार्ड धारक झाले. हे कार्ड कागदाचं (कार्डबोर्ड) होतं. त्यानंतर 1959 मध्ये अमेरिकन एक्सप्रेसनं पहिलं प्लास्टिक क्रेडिट कार्ड सादर केलं.
1958 मध्ये अमेरिकन एक्सप्रेसने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलं जाणारं कार्ड लाँच केलं. 1966 मध्ये बँक ऑफ अमेरिका नं Visa कार्ड सुरू केलं. IBM च्या अभियंत्यानं 1960 च्या दशकात मॅग्नेटिक स्ट्रिप तयार केली.
आता भारताविषयी बोलायचं झालं तर कधी हे कार्ड भारतात आलं आणि आतापर्यंत किती कोटी खर्च करण्यात आले याविषयी जाणून घेऊया. भारतामध्ये क्रेडिट कार्ड 1980 च्या दशकात आलं. सर्वप्रथम सेंट्रल बँक ऑफ इंडियानं हे सुरू केलं. आज भारतात 10.88 कोटी क्रेडिट कार्ड वापरात असून जानेवारी 2025 मध्ये 1.84 लाख कोटी खर्च झाले आहेत. क्रेडिट कार्ड आता फक्त स्टेटस नाही, तर एक जबाबदार आर्थिक साधन बनलं आहे. ज्यामुळे कधीही कोणाला कुठेही पैशांची अडचण येत नाही.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)
SOURCE : ZEE NEWS