Home LATEST NEWS ताजी बातमी 8 महिन्यांपासून बेपत्ता ‘पुष्पा’चा सांगाडा जप्त, हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतर कारवाई; ठाण्यातील सर्व 28...

8 महिन्यांपासून बेपत्ता ‘पुष्पा’चा सांगाडा जप्त, हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतर कारवाई; ठाण्यातील सर्व 28 पोलीस कर्मचारी निलंबित

18
0

Source :- BBC INDIA NEWS

याच पोलीस ठाण्यातील सर्व 28 कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे

फोटो स्रोत, Anil Kumar/Mohammad Sartaj Alam

झारखंडमधील बोकारो येथील पिंड्राजोरा पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या सर्व 28 पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 10 उपनिरीक्षक, 5 सहाय्यक उपनिरीक्षक, 2 हवालदार आणि 11 शिपायांचा समावेश आहे.

या पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोप आहे की, त्यांनी 8 महिन्यांपूर्वी झालेल्या पुष्पा महतो हिच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपींशी हातमिळवणी करून तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी पुष्पा महतोचे वडील अनंत सिंह यांना भेटले तेव्हा त्यांचे डोळे पाणावलेले होते.

पोटच्या मुलीला आता आपण कधीच भेटू शकणार नाही याचं दुःख आणि न्यायासाठी सुरू असलेला हा प्रदीर्घ लढा, त्यांच्या चेहऱ्यावरच्या या वेदना स्पष्टपणे जाणवत होत्या.

असं असलं तरी पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईमुळे त्यांना थोडा धीर मिळाला आहे.

ते म्हणतात, “घटनेच्या तब्बल 8 महिन्यांनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर ही कारवाई झाली. झारखंड हायकोर्टानं या प्रकरणात लक्ष घातलं म्हणूनच हे शक्य झालं आहे.”

खरं तर हायकोर्टाच्या दणक्यानंतर झारखंडच्या पोलीस महासंचालक तदाशा मिश्रा यांनी आदेश दिले आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह यांनी एक ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) स्थापन केली.

या पथकाने वेगाने सूत्रं हलवत 11 एप्रिलच्या सकाळी मुख्य आरोपी दिनेश महतोला बेड्या ठोकल्या.

आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुष्पा महतोच्या सांगाड्याचे अवशेष पोलिसांच्या हाती लागले.

हे अवशेष तिच्या कॉलेजपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात सापडले.

‘… तर माझी मुलगी जिवंत असती’

जिल्हा पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह यांनी माहिती दिली की, सापडलेल्या सांगाड्याची DNA चाचणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना त्यांनी सांगितले, “याच प्रकरणात मुख्य आरोपी दिनेश महतोवर आता हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

आपल्या मुलीचा सांगाडा सापडल्यानंतर पूर्णपणे कोलमडून गेलेले अनंत महतो म्हणतात, “21 जुलैच्या त्या संध्याकाळी जेव्हा माझी पत्नी पोलीस ठाण्यात गेली होती तेव्हाच जर पोलिसांनी हालचाल केली असती तर कदाचित माझी मुलगी आज जिवंत असती.”


पुष्पा महतोचे वडील अनंत महतो आणि आई रेखा देवी.

फोटो स्रोत, Anil Kumar/Mohammad Sartaj Alam

40 वर्षांचे अनंत सिंह जे सांगत आहेत तेच दुःख त्यांची पत्नी रेखा देवी यांच्याही बोलण्यातून व्यक्त होतं.

त्या म्हणतात, “मी त्या पोलीस स्टेशनचे अंमलदार ते थेट पोलीस अधीक्षकांपर्यंत अनेकदा उंबरठे झिजवले. सर्वांकडे विनवण्या केल्या. पण माझ्या बेपत्ता मुलीचा शोध घेण्याची साधी तसदीही कोणी वेळीच घेतली नाही.”

कुटुंबीयांचे हे आरोप फेटाळून लावताना पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह बीबीसीशी बोलताना म्हणाले, “मुलीचे नातेवाईक माझ्याकडे यायचे. मी त्यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकूनही घ्यायचो. मी या प्रकरणावर स्वतः लक्ष ठेवून आहे असंच मी त्यांना सांगत होतो आणि मी खरोखरच या तपासावर लक्ष ठेवून होतो.”

कॉलेजला गेली ती परतलीच नाही

बोकारोच्या खुंटाडीह गावात राहणारी 18 वर्षांची पुष्पा महतो 21 जुलै 2025 रोजी सायकलवरून कॉलेजला निघाली होती. घरून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या चास येथील आपल्या कॉलेजला जाते असं सांगून ती घराबाहेर पडली.

पुष्पाची आई रेखा देवी नेहमीप्रमाणे शेतात मजुरीसाठी गेल्या होत्या. संध्याकाळी त्या घरी परतल्या तेव्हा पुष्पा अजून आली नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर अनेक तास त्या आपल्या मुलीच्या शोधात गावच्या गल्लीबोळांत भटकत होत्या. पण पुष्पाचा कुठेच पत्ता लागला नाही.

काहीच पत्ता न लागल्याने अखेर रेखा देवी पिंड्राजोरा पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांचा आरोप आहे की, पोलिसांनी फक्त आश्वासन देऊन त्यांना घरी परत पाठवलं. त्या रोज पोलीस स्टेशनला जायच्या आणि मुलीला शोधण्यासाठी गयावया करायच्या. अखेर 24 जुलै रोजी पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक रंजन यांनी केवळ ‘सनहा’ म्हणजे स्टेशन डायरीत नोंद केली.

18 वर्षांची पुष्पा महतो घरून 10 किलोमीटर लांब असलेल्या चास येथील कॉलेजला सायकलने जायची.

फोटो स्रोत, Anil Kumar/Mohammad Sartaj Alam

रेखा देवी सांगतात, “डायरीमध्ये नोंद तर झाली पण एफआयआर (FIR) नोंदवण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत होते. खूप विनवण्या केल्यानंतर एफआयआर दाखल झाला खरा पण तोसुद्धा अज्ञात व्यक्तीविरुद्ध.”

रेखा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सुरुवातीलाच शेजारी राहणारा तरुण दिनेश कुमार महतो याच्यावर संशय व्यक्त केला होता.

त्या म्हणतात, “पण पोलीस पहिल्या दिवसापासूनच दिनेशला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस ठाण्यातील इन्चार्जपासून ते थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत माझं म्हणणं ऐकून घेणारं कुणीच नव्हतं.”

कुटुंबीयांच्या या आरोपावर बोलताना पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह म्हणाले, “मी सुरुवातीलाच पोलीस ठाणे स्तरावर एक एसआयटी (SIT) स्थापन केली होती. मात्र, त्यांचं काम समाधानकारक नसल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर नवीन एसआयटी नेमली गेली आणि त्यांच्या तपासामुळेच आरोपीला पकडणं शक्य झालं.”

दिनेश कुमारवरच संशय घेण्याचं कारण विचारलं असता रेखा देवी म्हणतात, “माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं. हे समजल्यापासून दिनेश तिला वारंवार त्रास देत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय येणं स्वाभाविकच होतं.”

त्या पुढे सांगतात, “21 जुलैला जेव्हा मुलगी घरी आली नाही तेव्हा शेवटी मी दिनेशच्या घरी गेले. तिथे चौकशी केल्यावर तो सुद्धा घरी नसल्याचं समजलं. तेव्हा मात्र माझ्या काळजात धस्स झालं की, दिनेशमुळेच माझ्या मुलीसोबत काहीतरी अघटित घडलं असावं. त्यानंतर पतीच्या सांगण्यावरून मी तडक पोलीस स्टेशन गाठलं.”

अपहरणाचा एफआयआर दाखल व्हायला 13 दिवस

पुष्पा बेपत्ता झाल्यानंतर तब्बल 13 दिवसांनी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी पिंड्राजोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध मानवी तस्करीशी संबंधित भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(3) अन्वये हा एफआयआर नोंदवण्यात आला होता.

पण एफआयआर दाखल करायला 13 दिवस का लागले? या प्रश्नावर निलंबित ठाणे प्रभारी अभिषेक रंजन यांनी स्वतःचा बचाव करताना एक तर्क दिला आहे. ते म्हणतात, “मुलीच्या कुटुंबीयांना फक्त आपली मुलगी सुखरूप परत मिळावी एवढीच इच्छा होती.”

ते पुढे म्हणतात, “मुलीचं लग्न ठरलं असल्यामुळे सुरुवातीला पोलिसांत रीतसर तक्रार किंवा एफआयआर नोंदवण्यास कुटुंबीयांचाच विरोध होता.”

मुलीचं लग्न ठरलं होतं ही गोष्ट पुष्पाचे वडील अनंत महतो मान्य करतात पण या कारणास्तव तक्रार द्यायला आम्हीच नकार दिला हा ठाणे अंमलदारांचा दावा त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ते म्हणतात, “मुळात ठाणे प्रभारींना स्वतःलाच एफआयआर नोंदवून घेण्यात रस नव्हता.”

ते पुढे सांगतात, “खूप प्रयत्नांनंतर एफआयआर तर दाखल झाला पण प्रत्यक्षात कारवाई करण्यापासून पोलीस खूप लांब होते.”

या आरोपांवर बोलताना अभिषेक रंजन म्हणाले, “कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयावरून आम्ही दिनेश महतोची अनेकदा चौकशी केली होती. त्याच्या फोनचे सीडीआर म्हणजे कॉल रेकॉर्ड रिपोर्टही तपासले पण दिनेश आणि मृत पुष्पा यांच्यात फोनवर बोलणे झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे तेव्हा त्याला सोडून द्यावे लागले.”

त्या काळात अनंत महतो यांनी आपल्या मुलीच्या सुरक्षित परतण्यासाठी गावोगावच्या सरपंचांपासून ते आमदारांपर्यंत बोकारो जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे मदतीची याचना केली पण त्यांच्या पदरी फक्त निराशाच आली.

हायकोर्टाच्या दणक्यानंतर दोन दिवसांत कारवाई

या सर्व धावपळीत सहा महिने निघून गेले. त्यानंतर अनंत महतो यांची भेट बोकारो जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष बबीता देवी यांच्याशी झाली.

बबीता देवी सांगतात, “सुरुवातीला मी पुष्पाच्या कुटुंबीयांना घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटले. पण या प्रकरणाबाबत त्यांची भूमिका फारशी समाधानकारक नव्हती. अशा परिस्थितीत हायकोर्ट हाच आमचा शेवटचा आधार होता.”

27 फेब्रुवारी, 9 मार्च आणि 23 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने पुष्पा प्रकरणावरून पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह यांना चांगलेच धारेवर धरले आणि कडक शब्दांत ताशेरे ओढले.

पीडित कुटुंबाचे वकील विन्सेंट मार्की यांनी गंभीर आरोप केला आहे. ते म्हणतात की, हायकोर्टाच्या कडक भूमिकेनंतर कुटुंबाला घाबरवण्यासाठी 3 एप्रिल रोजी पोलिसांनी अनंत महतो यांचे वृद्ध काका सम्पद महतो यांना पोलीस ठाण्यात नेऊन बेदम मारहाण केली.

तपासादरम्यान पोलीस पथकाची भूमिका संशयास्पद होती अशी माहिती एसआयटी प्रमुख आलोक रंजन यांनी दिली.

फोटो स्रोत, Anil Kumar/Mohammad Sartaj Alam

सम्पद महतो यांना पोलीस ठाण्यात ज्या प्रकारे मारहाण झाली त्याची लेखी माहिती आम्ही 7 एप्रिल रोजी हायकोर्टाला दिली. याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने बोकारो पोलीस अधीक्षकांसह झारखंडच्या पोलीस महासंचालकांना (DGP) प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले.”

7 मार्च रोजी दिलेल्या लेखी आदेशात हायकोर्टाने पोलीस अधीक्षकांना थेट ताकीद दिली. हायकोर्टाने स्पष्टपणे नमूद केले की, “याचिकाकर्ते किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबाबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास बोकारोचे पोलीस अधीक्षक वैयक्तिकरित्या जबाबदार असतील.”

हायकोर्टाच्या या कडक टिप्पणीनंतर पोलीस महासंचालक तदाशा मिश्रा यांनी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीआयडीच्या डीआयजी संध्या राणी मेहता यांच्याकडे सोपवली.

दुसरीकडे, पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह यांनी डीएसपी आलोक रंजन यांच्या नेतृत्वाखाली एका नवीन एसआयटी पथकाची स्थापना केली.

9 एप्रिल रोजी स्थापन झालेल्या या पथकाने 10 एप्रिलपासून तपासाला सुरुवात केली. अवघ्या 24 तासांत म्हणजे 11 एप्रिलच्या सकाळी दिनेश महतोला अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर पुष्पाच्या सांगाड्याचे अवशेष पोलिसांनी हस्तगत केले.

याशिवाय हत्येसाठी वापरलेला चाकू, घटनेच्या वेळी आरोपीने घातलेले कपडे, 23 मोबाईल सिम कार्ड, चार मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाचे पुरावेदेखील एसआयटीने जप्त केले आहेत.

आरोपीकडून पैसे घेतले आणि त्याच्यासोबत पार्ट्या केल्या

एसआयटी (SIT) प्रमुख आणि उपअधीक्षक आलोक रंजन यांनी अत्यंत खळबळजनक माहिती दिली. त्यांच्या मते, “याआधीच्या तपासादरम्यान आरोपीला फायदा पोहोचवण्याच्या उद्देशानेच काम केले जात होते. मुद्दामहून तपासातल्या त्रुटी कायम ठेवल्या गेल्या जेणेकरून फिर्यादी बाजू कमकुवत होईल.”

एसआयटीने सादर केलेल्या या धक्कादायक अहवालाच्या आधारे पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह यांनी 11 एप्रिलच्या संध्याकाळी पिंड्राजोरा पोलीस ठाण्यातील सर्व 28 पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले. आरोपींशी हातमिळवणी करून तपासात अडथळा आणल्याचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह याबद्दल माहिती देताना म्हणाले, “पिंड्राजोरा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अपेक्षित सहकार्य केलं नाही. उलट तपासात मिळालेल्या इतर माहितीनुसार या पोलिसांनी आरोपीला वाचवण्यासाठी काम केलं. इतकंच नाही, तर आरोपीकडून पैसे घेऊन त्याच्यासोबत पार्ट्या केल्याचेही समोर आले आहे. याच कारणामुळे या पोलीस ठाण्यातील शिपायापासून ते ठाणे अंमलदार पर्यंत सर्वांना तातडीने निलंबित करण्यात आले असून त्यांना आता केवळ निर्वाह भत्ता दिला जाईल.”

मात्र, दुसरीकडे निलंबित ठाणे अंमलदार अभिषेक रंजन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

ते म्हणतात, “आम्ही तपासादरम्यान जे धागेदोरे शोधून काढले होते त्याच पुराव्यांच्या आधारे नवीन एसआयटीने तपास पुढे नेला आणि आरोपीला अटक केली.”

मात्र, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, “हे धागेदोरे शोधायला तुम्हाला आठ महिने का लागले? आणि तरीही तुम्हाला ना आरोपीचा पत्ता लागला ना पुष्पाची काही माहिती मिळाली. असं का झालं?”

या प्रश्नावर अभिषेक रंजन यांनी बाजू सावरत सांगितलं की, “आरोपी अत्यंत धूर्त होता त्याने पोलिसांची खूप दिशाभूल केली. त्यामुळेच इतका वेळ लागला.”

लेकीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या पुष्पाच्या आई रेखा देवी

फोटो स्रोत, Anil Kumar/Mohammad Sartaj Alam

आरोपीसोबत हातमिळवणी केल्याच्या आरोपावर ते म्हणतात, “एका गुन्हेगाराने सांगितलं आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात? याची योग्य चौकशी होईल तेव्हा मी निर्दोष असल्याचं सिद्ध होईल.”

दुसरीकडे, निलंबित करण्यात आलेल्या एका शिपायाने धनंजय सिंह यांनी आपल्या निलंबनावरच प्रश्न उपस्थित केला आहे.

ते म्हणतात, “तुम्हीच सांगा तपासात एका साध्या शिपायाची काय भूमिका असते? तरीही मला निलंबित करण्यात आलं. मी 16 वर्षांपासून पोलीस दलात काम करतोय. अनेक जिल्ह्यांत माझी नियुक्ती झाली पण आजवर माझ्यावर एकही डाग नव्हता.”

पुष्पाच्या भावाचं शिक्षण सुटलं, हाताला लागलं मजुरीचं काम

निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाचीच कारवाई होणार की त्यापुढेही काही पावलं उचलली जाणार? या प्रश्नावर डीएसपी आलोक रंजन म्हणतात, “सध्या तरी त्यांना तातडीने निलंबित करून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच त्यांच्यावर पुढे नेमकी काय कारवाई करायची हे स्पष्ट होईल.”

या सर्व घडामोडींवर पुष्पा महतोचे वडील अनंत महतो समाधानी नाहीत. ते म्हणतात, “या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआय (CBI) मार्फत व्हायला हवी. तरच आरोपीसोबतच या निलंबित पोलिसांच्या कारनाम्यांचा निष्पक्ष तपास होईल. अन्यथा काही दिवसांनंतर या सर्वांचं निलंबन मागे घेतलं जाईल आणि पुन्हा ड्युटीवर रुजू होऊन हे लोक दुसऱ्या एखाद्या पीडिताचा न्यायाचा रस्ता रोखतील.”

ते पुढे म्हणतात, “आमची मुलगी तर आता कधीच परत येणार नाही. पण नराधम आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी.”

अनंत महतो यांच्या कुटुंबात आता त्यांची पत्नी आणि 16 वर्षांचा एक मुलगा आहे. बहिणीच्या गायब होण्यानंतर या प्रकरणाच्या धसक्याने आणि घराच्या परिस्थितीमुळे त्या मुलाचं शिक्षणही सुटलं आहे.

अनंत महतो काळजावर दगड ठेवून सांगतात, “मी राजस्थानमधल्या ज्या कंपनीत मजुरी करायचो तिथेच आता माझ्या मुलाला कामाला पाठवलं आहे. तो माझ्या जागी तिथे राबतोय. मुळात इथल्या वातावरणात आणि अशा परिस्थितीत त्याला बोकारोमध्ये ठेवण्याचा धोका आम्ही पत्करूच शकत नव्हतो.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC