Source :- ZEE NEWS
Santiago Flight 513 : जगभरात अशा अनेक रहस्यमय घटना आहेत ज्यावर आपल्याला कधीच विश्वास बसणार नाही. अशीच एक घटना 35 वर्षांपूर्वी घडली आहे. जी वाचून लोकांना आजपर्यंत त्यावर विश्वास बसलेला नाही. आजही लोक या रहस्यमय कथेवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतात. अशीच एक कथा सँटियागो फ्लाइट 513 ची आहे. जी ऐकून अनेक जणांना धक्का बसला आहे.
ही कथा आहे सँटियागो विमानाची. ज्यामध्ये सँटियागो विमानाने 1954 मध्ये उड्डाण केले. मात्र, ते ज्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे होते त्या ठिकाणी ते पोहोचले नाही. तर ते अचानक गायब झाले. आणि ते पुन्हा 1989 मध्ये अचानक दिसले. याबाबतची बातमी पहिल्यांदा 1989 मध्ये ‘वीकली वर्ल्ड न्यूज’ या वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती.
सँटियागो फ्लाइट 513 सोबत नेमकं काय घडलं होतं?
सँटियागो एअरलाइन्सच्या विमानाने 14 सप्टेंबर 1954 रोजी जर्मनीतील आचेन येथून उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर हे विमान 18 तासांमध्ये ब्राझीलमधील पोर्टो एलेग्ने येथे लॅन्ड होणार होते. मात्र, हे विमान 18 तासांनंतरही लॅन्ड झाले नाही. हे विमान अटलांटिक महासागरावर असताना अचानक रडारवरून गायब झाले. त्यानंतर या विमानाचा अनेक दिवस शोध घेण्यात आला. परंतु विमानाची कोणतीही माहिती मिळाली नाही. या विमानाचे अवशेष देखील सापडले नाही. या विमानामधील कोणताही प्रवासी सापडला नाही. अनेक प्रयत्न करून देखील या विमानाबाबत कोणतीही माहिती मिळू न शकल्याने हे विमान बेपत्ता असल्याचे सांगून ते प्रकरण बंद करण्यात आले.
35 वर्षांनंतर लॅन्ड झाले विमान
35 वर्षींनंतर हे विमान 12 ऑक्टोबर 1989 रोजी ब्राझीलमधील पोर्टो एलेग्ने विमानतळावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आकाशात दिसले. विमान दिसताच तिथे असणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमने आकाशात दिसणाऱ्या विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा प्रयत्न करून देखील विमानाशी कोणताही संपर्क झाला नाही. त्याचवेळी ते विमान अचानक स्वतःहून जमिनीवर उतरले. हे सर्व बघताच तिथे उपस्थित असणारे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या विमानाकडे धाव घेतली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या विमानाचा दरवाजा उघडला आणि आत पोहोचले. तेव्हा विमानातील लोकांना पाहून त्यांना धक्का बसला.
त्यांच्यासमोर विमानाच्या प्रत्येक सीटवर फक्त सांगाडे बसलेले दिसत होते. हे सांगाडे सीट बेल्ट बांधलेले होते. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पायलटचा सांगाडा देखील तसाच होता. त्यामुळे तो अजूनही विमान चालवत असल्यासारखे वाटत होते. या घटनेनंतर अनेक लोकांनी या घटनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. मात्र, या विमानाबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. अनेक शास्त्रज्ञ आणि तज्ञांच्या मते ही केवळ एक अफवा किंवा बनावट कथा असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु आजही बरेच लोक या कथेवर विश्वास ठेवतात आणि ती एक गूढ कथा असल्याचं म्हटलं जातं.
SOURCE : ZEE NEWS