Source :- ZEE NEWS
व्हर्जिनिया टेकच्या शास्त्रज्ञांनी संभाव्य मेगात्सुनामीसंदर्भात इशारा दिला आहे. तसंच त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. कॅस्केडिया सबडक्शन झोनमध्ये मोठ्या भूकंपामुळे ही महात्सुनामी येऊ शकते अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे. उत्तर व्हँकुव्हर बेटापासून कॅलिफोर्नियापर्यंत पसरलेली ही फॉल्ट लाइन अमेरिकेसाठी भूकंपाचा मोठा धोका निर्माण करते.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, पुढील 50 वर्षांत या प्रदेशात 8.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता आहे. ही शक्यता जवळपास 15 टक्के आहे. जर असा भूकंप झाला तर 1000 फूट उंचीच्या लाटा किनारपट्टीच्या प्रदेशांना धडकू शकतात, ज्यामध्ये सिएटल, पोर्टलँड सारख्या शहरांचा समावेश आहे. याशिवाय अलास्का आणि हवाईच्या काही भागांचाही समावेश आहे. या लाटा अनेक मैल अंतरापर्यंत जाऊ शकतात, ज्यामुळे संरक्षण यंत्रणांना धक्का बसेल आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी खूप कमी वेळ मिळेल.
त्सुनामीमध्ये सामान्यतः काही फूट उंच लाटा निर्माण होतात. मात्र महात्सुनामी शेकडो किंवा हजारो फूट उंचीच्या लाटा निर्माण करते. या उंच लाटा सामान्यतः भूकंप, समुद्राखालील भूस्खलन किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या महत्त्वाच्या सागरी घटनांमुळे उद्भवतात.
कॅस्केडिया सबडक्शन झोन उत्तर व्हँकुव्हर बेटापासून कॅलिफोर्नियातील केप मेंडोसिनोपर्यंत सुमारे 700 मैल पसरलेला आहे, जो उत्तर अमेरिकेतील सर्वात भूकंपीयदृष्ट्या सक्रिय प्रदेश म्हणून ओळखला जातो.
कॅस्केडियाचा इतिहास
गेल्या 10 हजार वर्षांत, या क्षेत्रात 43 मोठे भूकंप नोंदवले गेले आहेत. सर्वात अलीकडील भूकंप 26 जानेवारी 1700 रोजी झाला होता. हा भूकंप 9.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यामुळे विनाशकारी त्सुनामी आली.
संशोधनाच्या प्रमुख लेखिका टीना दुरा यांनी सांगितलं आहे की, जर आज अशी त्सुनामी आली तर पूर येईल आणि परिस्थिती सामान्य होण्यासाठी दीर्घकाळ जाईल.
दक्षिण वॉशिंग्टन, उत्तर ओरेगॉन आणि उत्तर कॅलिफोर्नियाला या नुकसानीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, तर अलास्का आणि हवाईलाही गंभीर धोका आहे. त्सुनामीच्या मोठ्या लाटा अनेक मैल अंतरापर्यंत घुसू शकतात, ज्यामुळे किनारपट्टीच्या संरक्षणाला तडा जाऊ शकतो आणि रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी खूप कमी वेळ मिळेल.
ओरेगॉन आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने इशारा दिला आहे की 100 फूट उंचीच्या त्सुनामीसह पुन्हा 9.0 तीव्रतेचा भूकंप किनाऱ्यावर येऊ शकतो. 2004 च्या हिंद महासागरातील त्सुनामीमध्ये 2 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडलेल्या भारतासारखे देश विध्वंसाच्या संभाव्य प्रमाणात चांगल्या प्रकारे जाणतात.
SOURCE : ZEE NEWS