Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Sameer Khan/BBC Hindi
इंदूरमधील साकार नगरचे रहिवासी 29 वर्षीय राजा रघुवंशी आणि 27 वर्षांची सोनम हे दाम्पत्य हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. त्यानंतर ते 23 मे रोजी तेथून बेपत्ता झाले.
अखेरीस 11 दिवसांनी, 2 जून रोजी ईस्ट खासी हिल्समधील वेइसाडोंग धबधब्याजवळ सुमारे 150 फूट खोल दरीत राजा यांचा मृतदेह आढळून आला. परंतु, सोनम या अद्यापही बेपत्ता आहेत.
राजा रघुवंशी यांचा मृतदेह बुधवारी 4 जूनच्या संध्याकाळी मेघालयहून त्यांच्या घरी आणला गेला. मृतदेह पाहून राजा यांचे वडील स्वतःला सावरू शकले नाहीत. आई उमा या तर एका कोपऱ्यात बसून सतत रडत होत्या.
बुधवारी सायंकाळीच नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांच्या उपस्थितीत इंदूरच्या रिजनल पार्क मुक्तिधाममध्ये मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.
23 मे रोजी बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी हे जोडपे मेघालयातील नोंग्रियाट येथे पोहोचले होते आणि ते शेवटचं शिपारा होमस्टेमधून चेक आउट करताना दिसले होते.
पोलीस काय म्हणत आहेत?
ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) विवेक स्येंम यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, “ही हत्या होती, यात काहीही शंका नाही. आम्हाला या घटनेत वापरलेला एक ‘दाओ’ (एक मोठा धारदार चाकू) ही सापडला आहे. परंतु, अधिक माहितीसाठी आम्ही सध्या शवविच्छेदन अहवालाची (पोस्टमॉर्टम रिपोर्ट) वाट पाहत आहोत.”
पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सध्या सोनम यांना शोधणे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
तत्पूर्वी, राजा रघुवंशी यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी मंगळवारी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Sameer Khan/BBC Hindi
सोनम यांचा होता उपवास
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, 11 मे रोजी लग्नानंतर राजा आणि त्यांची पत्नी सोनम हे 20 मे रोजी हनीमूनसाठी इंदूरहून निघाले होते.
23 मे रोजी दोघेही शिलाँगला पोहोचले, मात्र त्याच दिवसापासून त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला.
सोनम आणि त्यांच्या सासू उमा यांच्यात झालेल्या शेवटच्या फोन कॉलमध्ये सोनम यांनी जंगलात फिरायला जाण्याची माहिती दिली होती. त्याचबरोबर उपवासात योग्य आहार मिळालं नसल्याचंही सांगितलं होतं.
राजा यांच्या आईनं सोनम यांना उपवासाचं काहीतरी खाऊन घेण्याचा सल्ला दिला होता आणि फोन आल्यानं बरं वाटलं असं म्हणून त्यांच्यातील संवाद संपला होता.
या संभाषणानंतर राजा आणि सोनम यांच्याशी संपर्क तुटल्याचे राजा यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.
आता, बेपत्ता झाल्यानंतर 11 दिवसांनी पोलीस आणि बचाव पथकाला राजा यांचा मृतदेह सापडला आहे.
नातेवाईकांकडून सीबीआय तपासाची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा आणि सोनम यांनी भाड्याने घेतलेल्या स्कूटरच्या जीपीएस रेकॉर्डवरून ते 23 मे रोजी मावक्मा गावात काही काळ थांबले होते. ज्या ठिकाणी राजा यांचा मृतदेह सापडला ते ठिकाण त्या गावापासून 20 किलोमीटर दूर आहे.
इंदूरमध्ये राजा यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर कामात हलगर्जीपणाचा आरोप केला. राजा यांचे पाकिट, दागिने आणि इतर सामान गायब, असल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Sameer Khan/BBC Hindi
मृत राजा यांचे मोठे भाऊ सचिन रघुवंशी यांनी अपहरण आणि हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणाची सीबीआय तपासाची मागणी केली आहे.
ते म्हणाले, “आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की, या प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे. नवीन लग्न झालं होतं. दोघांमध्ये कोणतं भांडणही नव्हतं आणि ते इंदूरहून मेघालयला फिरायला गेले होते, त्यामुळं तिथे कुठलं वैरही नव्हतं.
“आम्हाला योग्य मदत मिळाली नाही आणि आम्ही आमचा भाऊ गमावला. आता लवकरात लवकर सीबीआय तपास व्हायला हवा म्हणजे निदान आमची सून सापडेल आणि माझ्या भावाच्या दोषींना शिक्षा होऊ शकेल,” सचिन रघुवंशी म्हणाले.
‘ड्रोनच्या मदतीनं राजा यांचा मृतदेह सापडला’
दांपत्य बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना सर्वांत आधी त्यांनी वापरलेली स्कूटर सापडली होती, अशी माहिती ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक स्येंम यांनी दिली.
त्यांनी पुढं सांगितलं की, “आम्ही दोघांना शोधायला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम आम्हाला एक स्कूटर सापडली. बेपत्ता झाल्यानंतर एक दिवसानं त्यांनी भाड्यानं घेतलेली स्कूटर सोहरारिम येथे बेवारस अवस्थेत आढळली.
“त्यानंतर शोध सुरू असताना स्कूटर सापडलेल्या ठिकाणापासून सुमारे 15 किलोमीटर दूर एका खोल दरीत राजा यांचा मृतदेह सापडला.”
एसपी विवेक म्हणाले, “हा संपूर्ण परिसर जंगलांनी आणि खोल दऱ्यांनी भरलेला आहे. तपासाचे क्षेत्र सुमारे 150 चौरस किलोमीटर असून हा सर्व परिसर जंगल आणि दऱ्यांमध्ये व्यापला गेलेला आहे.”

फोटो स्रोत, Sameer Khan/BBC Hindi
सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली.
पोलिसांनी सांगितलं की, “राजा यांचा मृतदेह ड्रोनच्या मदतीने शोधता आला. घनदाट जंगल आणि पावसामुळे पोलीस दल आणि बचाव पथकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळेच ड्रोनचा वापर करण्यात आला.”
मेघालय पोलिसांना सोनमच्या शोधादरम्यान राजा यांच्या मृतदेहाजवळ रक्तानं माखलेला एक रेनकोट मिळाला आहे. मात्र तो रेनकोट सोनमचाच आहे की नाही, हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
इंदूरमध्ये राजा आणि सोनम यांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.
त्याच वेळी मेघालयमध्ये पोलीस आणि तपास पथक सोनमचा शोध घेण्यामध्ये गुंतलेले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC