Home LATEST NEWS ताजी बातमी ‘हजारो पोलीस, घोंघावणारे हेलीकॉप्टर्स आणि गोळीबार-स्फोटांचे आवाज’; कर्रेगुट्टामध्ये काय सुरू आहे?

‘हजारो पोलीस, घोंघावणारे हेलीकॉप्टर्स आणि गोळीबार-स्फोटांचे आवाज’; कर्रेगुट्टामध्ये काय सुरू आहे?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

माओवादी

फोटो स्रोत, Getty Images

तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवरील वनक्षेत्रामध्ये सध्या युद्धपूर्व वातावरणासारखी परिस्थिती आहे.

या वनक्षेत्रातील कर्रेगुट्टामध्ये तैनात केलेल्या हजारो पोलिसांकडून माओवाद्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, नेमके किती पोलीस कर्मचारी या मोहिमेसाठी तैनात करण्यात आले आहेत, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.

गेल्या आठवड्याभरापासून, या संपूर्ण परिसरामध्ये फारच गंभीर वातावरण तयार झालं आहे. या परिसरात आकाशात वारंवार हेलीकॉप्टर्स घिरट्या घालत आहेत, हातामध्ये बंदूका घेऊन पोलीस शोधाशोध करताना दिसत आहेत.

या गंभीर अशा मोहिमेमुळे तिथल्या स्थानिक आदिवासींना त्यांच्या घरामध्येचं एकप्रकारे डांबून रहावं लागत आहे.

“आम्ही स्फोटांचे आवाज ऐकत आहोत,” अशी माहिती तिथल्या गावकऱ्यांनी स्थानिक माध्यमांना दिली आहे. मात्र, या परिसरात नेमकं काय घडतंय, याबाबत अद्याप तरी तेलंगणा पोलिसांनी मौन बाळगलं आहे.

एकाबाजूला, मोठ्या प्रमाणावर तैनात असलेला फौजफाटा आणि दुसऱ्या बाजूला पुरेशी अधिकृत माहिती उपलब्ध नसणं, यामुळे इथल्या घडामोडींबाबत अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहेत.

कर्रेगुट्टामध्ये नेमकं काय घडतंय?

कर्रेगुट्टाजवळील उंच टेकड्या, दऱ्या आणि तिथल्या गुहांमध्ये मोठ्या संख्येने माओवादी दडून बसले आहेत, असं केंद्र आणि काही राज्य सरकारांच्या सुरक्षा यंत्रणांना वाटतं. त्यामुळे त्यांनी हा परिसर वेढला असून तिथे सर्च ऑपरेशन राबवलं जात असल्याची माहिती आहे.

गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर माओवादी मृत्यूमुखी पडल्याचं वृत्त असूनही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये.

या मोहिमेमध्ये मारले गेलेल्यांच्या आकडेवारीबाबत पोलीस आणि माओवाद्यांकडून वेगवेगळी माहिती समोर येत आहे.

या मोहिमेत तीन माओवादी मारले गेले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय, तर सहा माओवादी मारले गेल्याची माहिती माओवाद्यांकडून देण्यात आली आहे.

माओवादी

फोटो स्रोत, Getty Images

या परिसराला असलेला वेढा जसजसा तीव्र होत गेला आणि संरक्षण दलाची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली, तसतसं या दुर्गम प्रदेशातील आजूबाजूच्या गावांमध्ये एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. आता पुढे काय होईल, याचा विचार सुरू झाला आहे.

दुर्गम प्रदेश असल्याकारणाने गनिमी कावा करून स्वत:चं संरक्षण करणं सोपं जातं, म्हणून या जागेचा वापर माओवाद्यांनी अनेक वर्षांपासून आपला बेस कॉम्प म्हणून केला आहे. त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात भूसुरुंग बसवलेले आहेत.

हा प्रदेश असा आहे की, इथल्या डोंगरांमधून छत्तीसगड, तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रवास करणंदेखील शक्य आहे, असं अनेक स्थानिकांनी बीबीसीला सांगितलं. त्यामुळेच, हे ठिकाण माओवाद्यांना अनुकूल असं ठिकाण बनलेलं आहे.

कर्रेगुट्टाकडे न येण्याचं माओवाद्यांचं आवाहन

माओवादी पक्षाच्या वेंकटपुरम-वाजेडू क्षेत्र समितीच्या सचिव शांता यांच्या नावानं एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

त्यामध्ये म्हटलंय, “कागर हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही कर्रेगुट्टामध्ये बॉम्ब पेरलेले आहेत. आम्ही याबाबत लोकांना माहिती दिली आहे.”

“मात्र, पोलीस काही आदिवासींना तसेच बिगर-आदिवासी लोकांना चुकीची आश्वासनं देऊन तसेच पैशांचं आमिष दाखवून कर्रेगुट्टाकडे पाठवत आहेत. लोकांनी पोलिसांच्या या जाळ्यात अडकू नये आणि कर्रेगुट्टाकडे येऊ नये, असं आवाहन आम्ही करतो.”

माओवादी

फोटो स्रोत, Getty Images

हे पत्र 8 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आलं आहे. पोलीस कर्रेगुट्टाला येत असल्याची माहिती मिळाल्यावर हे पत्र धोरणात्मकरित्या विचार करून जारी करण्यात आल्याचं मानलं जातंय. पण पोलिसांनी त्यांची रणनीती बदलली नाही आणि त्यांनी कर्रेगुट्टामधला आपला वेढा अधिकच वाढवत नेला.

“अलीकडच्या काळात आम्ही या भागात एकूण 24 सुरुंग निष्क्रिय केले आहेत, ज्यात 12 मोठ्या सुरुंगांचा समावेश आहे,” अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिली.

मात्र, सध्या या परिसरात नेमकं काय सुरू आहे, याची अधिकृत माहिती तेलंगणा पोलिसांनी दिलेली नाहीये.

काही पोलीस कर्मचाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, छत्तीसगड राज्य पोलीस आणि सीआरपीएफचे कर्मचारी मोठ्या संख्येने दररोज जंगलात जात असतात. गेल्या आठवड्याभरापासून कर्रेगुट्टाभोवती ड्रोन आणि हेलीकॉप्टर्स घिरट्या घालत आहेत.

वेंकटपुरम आणि वाजेडू भागातील आदिवासी वगळता बाहेरील लोकांना त्या भागात प्रवेश करण्याची परवानगी नाहीये. वाजेडू आणि वेंकटपुरम पोलीस स्टेशनमध्ये केंद्रीय दलांसाठी निवास तसेच इतर सुविधांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं दिसतंय.

मात्र, मुलुगु जिल्ह्याचे एसपी शबरिश यांनी माध्यमांना सांगितलं, “आम्ही कोणत्याही कारवाईत सहभागी होत नाही आहोत.”

पोलिसांचं काय ध्येय आहे?

माओवादी

फोटो स्रोत, Getty Images

इथे पोलिसांसमोर दोन मुख्य ध्येय आहेत. एक म्हणजे मध्य भारतात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या क्लिअरन्स ऑपरेशन्समुळे माओवाद्यांनी या डोंगराळ भागात मोठ्या संख्येने आश्रय घेतला आहे. त्यामुळे इथे एकाच ठिकाणी शेकडो माओवादी सापडण्याची शक्यता आहे.

दुसरं म्हणजे, या परिसरात अनेक माओवादी नेते असू शकतात, असा कयास बांधून त्यांनी कर्रेगुट्टाभोवती आपलं ऑपरेशन तीव्र केलं आहे.

माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्य, पीएलजीएची (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) पहिली बटालियन, तसेच ज्याच्यावर अनेक पोलिसांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप आहे, असा माओवादी-पीएलजीएचा प्रमुख नेता मडावी हिडमादेखील इथेच आश्रयाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

फक्त कर्रेगुट्टाचं नव्हे तर त्या शेजारी असलेल्या दुर्गामुट्टालाही संरक्षण यंत्रणांकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. तिथे एक नवीन मोबाईल टॉवरही बसवण्यात आला आहे.

किती जण मारले गेले?

या मोहिमेमध्ये आतापर्यंत एकूण किती जणांचा मृत्यू झाला आहे, याची सुस्पष्ट अशी माहिती अद्याप तरी उपलब्ध नाहीये. 24 एप्रिल रोजी तीन माओवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला माओवादी पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रामध्ये सहा माओवादी मारले गेल्याची माहिती 24 एप्रिल रोजी देण्यात आली.

यादरम्यान, 28 माओवादी मारले गेल्याचं वृत्त असलं तरी पोलिसांनी ते फेटाळून लावलं आहे.

इथे खरोखर इतके महत्त्वाचे माओवादी नेते आणि त्यांचे सहकारी आहेत का? ते खरोखरच इथे आले होते का? की ते येऊन गेले होते? यासारख्या प्रश्नांची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

या विषयावर माध्यमांमध्ये आणि स्थानिक लोकांमध्येही विविध बातम्या आणि अफवा पसरत आहेत. मात्र, सद्यपरिस्थितीविषयी पुरेशी स्पष्ट माहिती उपलब्ध नाहीये.

मात्र, दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या अपेक्षेप्रमाणे माओवादी नेते तिथे नव्हते आणि त्यांनी आधीच त्यांचा बेस कॅम्प हलवला आहे, असंही वृत्त काही तेलुगू माध्यमांनी प्रसिद्ध केलंय. बीबीसीने या वृत्तांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.

शांततेसाठी चर्चेची मागणी

अनेक सार्वजनिक संघटनांचे प्रतिनिधी, शांतता चर्चा समिती स्थापन करणाऱ्या प्रमुख व्यक्ती आणि ‘कन्सर्न्ड सिटीझन्स कमिटी’ नावाचा एक गट केंद्र सरकारला ‘ऑपरेशन कागर’ ताबडतोब थांबवण्याचे आणि माओवाद्यांशी चर्चा करण्याचे आवाहन करत आहे.

त्यापैकी काहींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना केंद्र सरकारला शांतता चर्चेसाठी पुढे येण्यास राजी करण्याची विनंती केली आहे. रेवंथ रेड्डी यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले की, ते मंत्र्यांच्या समितीशी चर्चा करून निर्णय घेतील. तसेच, त्यांना नक्षलवादाचा मुद्दा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, असं वाटत नाही, असंही त्यांनी म्हटलं.

आदिवासी, दलित आणि आदिवासी सार्वजनिक संघटनांच्या समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी मुलुगु येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

फोटो स्रोत, UGC

त्याचप्रमाणे, तेलंगणाचे विरोधी पक्षनेते कलवकुंतला चंद्रशेखर राव यांनीही या मुद्द्यावर जाहीर विधान केलं आहे. लोकांना सत्ता आणि शक्तीच्या जोरावर ठार मारण्याऐवजी त्यांना लोकशाही पद्धतीने चर्चेची संधी दिली पाहिजे, असं विधान त्यांनी केलं.

आपण शांतता चर्चेसाठी तयार असल्याचं पत्र माओवाद्यांनी चार वेळा जारी केलं आहे. मात्र, या शांतता चर्चेला भारत सरकारकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC