Home LATEST NEWS ताजी बातमी लहान मुलांना पैश्याची शिस्त कशी लावावी? वाचा ‘या’ 4 खास टिप्स

लहान मुलांना पैश्याची शिस्त कशी लावावी? वाचा ‘या’ 4 खास टिप्स

3
0

Source :- BBC INDIA NEWS

बचत

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता प्रत्येक पालकाला लागून राहिलेली असते.

पहिली काळजी मुलांच्या आरोग्याची असते आणि दुसरी म्हणजे, ते त्यांच्या आवडीप्रमाणे जीवनात किती आनंदी आहेत.

पण जसजसं मुलं मोठी होत जातात, तसतसं पालकांच्या मनात एक चिंता घर करू लागते जी त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते.

या चिंतेचं नाव आहे पैसा. याचे दोन पैलू आहेत, पहिला म्हणजे तो आपल्या भविष्यासाठी पैसे कसं वाचवतो आणि दुसरा म्हणजे पैसे वाचवण्याचं किंवा पैशांची बचत करण्याचं महत्त्व तो किती समजतो?

ब्रिटनमध्ये स्टँडर्ड लाइफ बँकेने एक सर्वेक्षण केलं आहे, ज्यामध्ये असं आढळून आलं आहे की, दहा पैकी सात पालक आपल्या मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी चिंतेत आहेत.

अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, लहान वयातच मुलांना पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवल्यानं त्याचा संपूर्ण आयुष्यावर फरक पडतो.

पण भविष्यासाठी पैशांची बचत करणे इतकं सोपं नाही. अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटीचे वर्तणूक अर्थशास्त्र तज्ज्ञ (बिहेवियर इकॉनॉमिक्स एक्स्पर्ट) आणि लेखक डॅन एरिली म्हणतात, “पैशांबाबत एक समस्या म्हणजे त्याला कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळं आपल्याला हे समजून घेणं फार कठीण जातं की, भविष्यात याचा नेमका अर्थ काय असेल.”

बीबीसी पॉडकास्ट ‘मनी बॉक्स’मध्ये फेलिसिटी हॅनाने ‘द प्रायव्हेट ऑफिस’मधील आर्थिक नियोजक (फायनान्शियल प्लॅनर) किर्स्टी स्टोन आणि ‘द मनी चॅरिटी’मध्ये युवा विभागाच्या संचालक स्टेफनी फिट्झगेराल्ड यांच्यासोबत संवाद साधला आहे. त्यांनी पालकांची ही चिंता दूर करण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत.

फिट्झगेराल्ड सांगतात की, पालकांनी आपल्या मुलांना पैशांचा योग्य वापर करण्यासाठी संधी दिली पाहिजे, जेणेकरून मुलं स्वतः काही चुका करून शिकू शकतील.

1) दीर्घकालीन खाते

आपल्या मुलांना त्वरित पैशांची आवश्यकता नसते. अशा स्थितीत, दीर्घकालीन गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं.

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, बँका मुलांसाठीही खातं उघडतात. या खात्यांच्या मदतीने मुलांना पैसे कसे जमा करायचे आणि कसे काढायचे याचं शिक्षण दिलं जाऊ शकतं.

बँका साधारणपणे दोन प्रकारच्या खात्यांची सुविधा देतात. एक म्हणजे, ज्यामध्ये कधीही पैसे जमा आणि काढता येतात, तर दुसरं ज्यामध्ये ठराविक कालावधीसाठी पैसे जमा करणं आवश्यक असतं.

याला सामान्य भाषेत बँक एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) असं म्हणता येईल. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, बचत खात्यांच्या तुलनेत दीर्घकालीन खात्यांमध्ये जास्त व्याज मिळतं.

बचत

फोटो स्रोत, Getty Images

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मुलांसाठी बचत खातं उघडण्यापूर्वी, व्यक्ती ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन कोणती बँक किती जास्त व्याज देत आहे, याची तुलना करू शकते.

पालक आपल्या मुलांसाठी बँकेत असं खातं देखील उघडू शकतात, ज्यात मूल 18 वर्षांचं झाल्यावरच पैसे काढता येतील. अशा प्रकारे मूल दीर्घ काळासाठी त्यात पैसे जमा करू शकतं.

पालकांना आपल्या मुलांना त्या काळासाठी तयार करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी आधी चर्चा करणं महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये त्या पैशाचा वापर कुठे आणि कसा केला जाईल, हे समजावता येईल, असं तज्ज्ञ म्हणतात.

मुलं जे पैसे बचत करत आहेत, त्याचा वापर विद्यापीठाच्या किंवा महाविद्यालयाच्या फी साठी होईल का किंवा कार घेण्यासाठी होईल, हे त्यांना सांगणं आवश्यक आहे.

आयुष्यातील अनपेक्षित घटनांसाठी पैसे बचत करण्यामुळे मुलांना अधिक सुरक्षिततेचा अनुभव होईल.

2) हळूहळू पैसे वाचवा

सध्याच्या काळात मुलांसाठी पैसे वाचवणं हे त्यांच्या भविष्यासाठी एखाद्या मोठ्या गिफ्टपेक्षा कमी नाही. या पैशाने ते त्यांच्या जीवनाची सुरुवात तर करू शकतीलच. त्याचबरोबर पैशांबद्दल ते अधिक जागरूकही होऊ शकतील.

जर तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळं काही काळासाठी पैसे वाचवू शकत नसाल, तर याबद्दल चिंतित होण्याची काहीच गरज नाही, असं तज्ज्ञ म्हणतात.

अशावेळी महत्वाची गोष्ट म्हणजे कर्ज घेऊ नका आणि क्रेडिट कार्डचा वापर करू नका.

आपल्या मुलांना एक चांगलं आणि सुरक्षित भविष्य द्यायला हवं असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं, असं फिट्झगेराल्ड म्हणतात. परंतु प्रत्यक्षात महागाईमुळे आपल्याला दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत लोकांची बचत करण्याची क्षमता कमी झाल्याचेही दिसते.

3) चक्रवाढ व्याजाच्या जादूकडे दुर्लक्ष करू नका

काही लोक चक्रवाढ व्याजाची व्याख्या मोफतचे पैसे म्हणून करतात तर काही लोक त्याला जगातील आठवं आश्चर्य म्हणतात, कारण यामुळं तुमचं भांडवल अनेक पटींनी वाढते आणि व्यक्तीला ते कळतही नाही.

समजा तुम्ही बचत खात्यापासून सुरुवात केली आणि बँक तुम्हाला या बचत खात्यावर वार्षिक पाच टक्के व्याज देते. तुम्ही या खात्यात 10 हजार रुपये जमा केले आहेत. आता हे 10 हजार रुपये झपाट्यानं कसं वाढताना दिसतील हे तुम्हाला लक्षात येईल.

एक वर्षाच्या अखेरीस तुमच्या बचत खात्यातील 10,000 रुपयांवर 5 टक्के व्याज लागू होईल आणि तुमची एकूण रकम 10,500 रुपये होईल.

लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे चक्रवाढ व्याजाची जादू तुम्हाला तेव्हाच दिसेल जेव्हा तुम्ही बँक खात्यातून मूळ रक्कम किंवा त्यावरील व्याजाची रक्कम काढणार नाही.

बचत

फोटो स्रोत, Getty Images

आता दुसऱ्या वर्षात येऊया.

दुसऱ्या वर्षी तुम्हाला पहिल्या वर्षाप्रमाणे फक्त 500 रुपये व्याज मिळणार नाही. यावर्षी तुम्हाला 10,500 रुपये वर 5 टक्के वार्षिक व्याज मिळेल, जे 525 रुपये होईल.

म्हणजेच दुसरं वर्ष संपल्यानंतर तुमच्या बचत खात्यात तुमचे 10 हजार रुपये वाढून 11025 रुपये होतील.

तिसऱ्या वर्षी तुम्हाला या 11025 वर वार्षिक 550 रुपये मिळतील आणि ती रक्कम वाढून 11575 रुपये होईल.

चौथ्या वर्षी ही रक्कम 12153 रुपये होईल. तर पाचव्या वर्षी ही रक्कम वाढून 12760 रुपये होईल.

जेव्हा मूल 18 वर्षांचे होईल तेव्हा या रकमेत चांगली वाढ झालेली दिसेल.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, तुम्ही थोडी-थोडी बचत करा आणि बाकीचं काम गणितावर सोडून द्या. तो स्वतः जादू करेल.

4) एक पिगी बँक घ्या आणि बचत करा

तज्ज्ञ म्हणतात की, जर तुम्हाला मुलांना पैशाचं महत्त्व शिकवायचं असेल तर त्यांच्यासाठी पिगी बँक खरेदी करा आणि त्यात पैसे टाकायला सुरुवात करा.

तज्ज्ञांचं सांगणं आहे की, पिगी बँक विकत घेतल्याने मुलांना पैसा खेळण्याची वस्तू नाही आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजे, हे त्याला शिकायला मिळेल.

पिगी बँकच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या रुपयांच्या नाण्यांचं महत्त्वही कळतं. त्यांना कळेल की पाच रुपयांच्या नाण्याची किंमत दोन रुपयांच्या नाण्यापेक्षा जास्त आहे.

मुलांना पॉकेट मनी देणं ही एक चांगली सुरुवात आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

हे खरं आहे की, प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी बचत करतो, पण आपल्या मुलांना पैशाचं महत्त्वही समजलं पाहिजे आणि असं केल्यानं त्यांचं भविष्य चांगलं होईल हे देखील महत्त्वाचं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC