Home LATEST NEWS ताजी बातमी राजपाल यादव तुरुंगातून बाहेर येणार, शिक्षेला अंतरिम स्थगिती

राजपाल यादव तुरुंगातून बाहेर येणार, शिक्षेला अंतरिम स्थगिती

8
0

Source :- BBC INDIA NEWS

राजपाल यादव

फोटो स्रोत, Getty Images

11 फेब्रुवारी 2026

अपडेटेड 43 मिनिटांपूर्वी

वाचन वेळ: 6 मिनिटे

दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता राजपाल यादवच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे.

‘बार अँड बेंच’च्या वृत्तानुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मार्च 2026 रोजी होणार असून तोपर्यंत राजपाल यादव तुरुंगाबाहेर राहतील.

राजपाल यादवला दिलासा देताना न्यायालयाने नोंदवले की, प्रतिवादीच्या बँक खात्यात दीड कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

न्यायालयाने शिक्षा स्थगित करताना अशी अट घातली आहे की, राजपाल यादव यांनी एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका एक जामीनदार सादर करावा.

राजपाल यादवचे मॅनेजर गोल्डी जैन यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर बीबीसी न्यूज हिंदीचे सहयोगी पत्रकार रवि जैन यांच्याशी बोलताना सांगितले की, “या निर्णयामुळे राजपाल यादव यांच्या सर्व चाहत्यांनाही मोठा आनंद होईल. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजपाल यादव लवकरच तुरुंगाबाहेर येतील, फक्त थोडी वाट पाहावी लागेल.”

महत्त्वाचं म्हणजे, नऊ कोटी रुपयांच्या थकबाकी आणि चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांनी तक्रारदाराच्या खात्यात दीड कोटी रुपये जमा केले आहेत. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर करून त्यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला.

सलमान आणि अजय देवगन

फोटो स्रोत, Getty Images

चेक बाऊन्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवने मागील गुरुवारी (5 फेब्रुवारी) तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं.

राजपाल यादवच्या आर्थिक अडचणींबाबतच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. याचदरम्यान काही लोकांनी राजपाल यादवला आर्थिक मदत करण्याची घोषणाही केली.

बॉलिवूड अभिनेते सलमान खान आणि अजय देवगन हे देखील आता राजपाल यादवच्या मदतीला सरसावले आहेत.

बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना, राजपाल यादवचे व्यवस्थापक गोल्डी यांनी दावा केला की इंडस्ट्रीतील अनेक प्रमुख कलाकार राजपाल यादवला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

गोल्डी यांनी बीबीसी न्यूज हिंदीचे सहयोगी पत्रकार रवी जैन यांना सांगितलं की, “सलमान खान, अजय देवगन, वरुण धवन आणि सोनू सूदसारख्या अनेक मोठ्या स्टार्सनी आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राजपाल यादवला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या परिस्थितीमुळे इंडस्ट्रीतील त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.”

गोल्डी म्हणाले की, सलमान, अजय यांसोबतच यासोबतच चित्रपट उद्योगातील इतर अनेक प्रमुख व्यक्तींनीही राजपाल यादवला पाठिंबा दिला आहे.

“मी इथे सगळ्यांची नावं सांगू शकत नाही,” असे गोल्डी यांनी सांगितलं.

त्यांनी पुढे सांगितले की, तुरुंगात असलेल्या राजपाल यादवच्या जामीन अर्जाबाबत गुरुवारी न्यायालयीन सुनावणी होणार आहे.

गोल्डी म्हणाले, “आम्हाला आशा आहे की त्यांना या प्रकरणात जामीन मिळेल.”

मंगळवारी (10 फेब्रुवारी) बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने त्याच्या पुढील चित्रपटासाठी साइनिंग अमाउंट देणार असल्याचं सांगितलं. तर लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि जनशक्ती जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली.

दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला 4 फेब्रुवारीपर्यंत शरण येण्याची मुदत दिली होती. त्यानुसार 5 फेब्रुवारी रोजी राजपाल यादवने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं.

दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं की, ‘न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे कायद्याबद्दल आदर नसल्याचं लक्षण आहे. अभिनेता किंवा चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्यामुळे त्यांना कोणतीही विशेष सूट देता येणार नाही.’

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी राजपाल यादव भावूक झाला होता.

यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं.

बीबीसी न्यूज हिंदीचे सहयोगी पत्रकार इकबाल परवेझ यांनी मदत करणाऱ्या कलाकारांच्या टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सलमान खानच्या टीमने या बातमीला दुजोरा दिला.

‘सोनू सूद आणि तेजप्रताप यादव यांनी काय म्हटलं?’

अभिनेता सोनू सूदने राजपाल यादवच्या अभिनयाचं कौतुक तो ‘प्रतिभावान अभिनेता’ असल्याचं म्हटलं. राजपालने अनेक वर्षे चित्रपटसृष्टीला लक्षात राहील असं काम केलं आहे, असंही त्यानं सांगितलं.

राजपाल यादवसोबत एकजूट दाखवण्याचं आवाहन करत सोनू सूदने एक्सवर लिहिलं की, “कधी कधी गोष्टी चुकीच्या दिशेने जातात. ते प्रतिभेअभावी नाही, तर वाईट वेळेमुळे होतं. तो माझ्या चित्रपटाचा भाग असेल. हाच तो क्षण आहे, जेव्हा निर्माता, दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.”

त्याने पुढं म्हटलं की, “भविष्यातील कामातून ॲडजस्ट (समायोजित) होणारी ही छोटी साइनिंग अमाउंट दान नाही, तर त्यांचा हक्क आहे. आपल्यापैकी कोणी अडचणीत असेल, तर इंडस्ट्रीने त्याला तो एकटा नाही, हे सांगायला हवं. आपण फक्त एक उद्योग किंवा इंडस्ट्री नाही, हे दाखवण्याचा हाच एक मार्ग आहे.”

ग्राफिक्स

दरम्यान, तेजप्रताप यादव यांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिलं की, “राजपाल यादव यांच्या कुटुंबीयांच्या वेदनांबाबत मला माहिती मिळाली आहे.”

पुढे त्यांनी लिहिलं की, “या अत्यंत कठीण काळात मी आणि संपूर्ण जनशक्ती जनता दल परिवार त्यांच्या कुटुंबासोबत पूर्ण सहानुभूतीने आणि ठामपणे उभे आहोत. मानवतावादी करुणा आणि सहकार्याच्या भावनेतून जेजेडी परिवाराच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला 11 लाख रुपयांची आर्थिक मदत देत आहे.”

अभिनेता गुरमीत चौधरीने चित्रपटसृष्टीतील लोकांना पुढे येण्याचं आवाहन करत एक्सवर लिहिलं की, राजपाल यादव यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अत्यंत प्रतिभावान कलाकाराला असा कठीण काळ सहन करताना पाहणं वेदनादायक आहे. त्यांनी आपल्याला अगणित हसू, आनंद आणि आठवणी दिल्या आहेत. आज त्यांना आपल्या मदतीची गरज आहे.”

तो पुढे लिहितो की, सहकलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मी माझ्याकडून जमेल त्या मार्गाने मदतीसाठी पुढे जात आहे. सर्व निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटसृष्टीतील सदस्यांना माझी नम्र विनंती आहे की, आपण सगळे माणुसकी आणि सहानुभूतीने एकत्र येऊया आणि काहीतरी तोडगा काढूया. आपली इंडस्ट्री एक कुटुंब आहे आणि कुटुंब आपल्या माणसांना एकटं सोडत नाही.”

‘नेमकं प्रकरण काय आहे?’

न्यायालयीन कामकाजातून समोर आलं आहे की, राजपाल यादव याच्यावरील हे प्रकरण ‘अता-पता-लापता’ या चित्रपटाशी संबंधित आहे. 2010 साली मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने या चित्रपटासाठी सुमारे पाच कोटी रुपये दिले होते.

न्यायालयीन कार्यवाहीनुसार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि अभिनेत्याला आर्थिक तोटा झाला. त्यामुळे तो कंपनीचे पैसे परत करू शकला नाही.

लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार न्यायालयाने म्हटलं की, “याचिकाकर्ता क्रमांक 1 (राजपाल यादव) यांचं वर्तन निंदनीय आहे. वारंवार आश्वासनं देऊन आणि न्यायालयाकडून सवलत मागूनही त्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचं पालन केलं नाही.”

कर्जफेडीसाठी कंपनीला दिलेले अनेक चेक न वटल्यामुळे (बाऊन्स झाल्यामुळे) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 2018 मध्ये दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने राजपाल यादवला दोषी ठरवत सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेलं. तिथे शिक्षेला स्थगिती मिळाली होती.

राजपाल यादव

फोटो स्रोत, Getty Images

न्यायालयाने सांगितलं होतं की, त्याने तक्रारदार कंपनीची थकबाकी रक्कम भरावी. मात्र, राजपाल यादवने अनेकदा पैसे देण्याचं आश्वासन दिलं, पण ठरलेल्या मुदतीत तो रक्कम जमा करू शकला नाही.”

न्यायालयाने हा मुद्दा गांभीर्याने घेत वारंवार दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत, असं मत नोंदवलं. याच कारणावरून उच्च न्यायालयाने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. राजपाल यादववर चेक बाऊन्सचा खटला दाखल करण्यात आला होता.

ही शिक्षा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट 1881 मधील कलम 138 चे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली देण्यात आली होती. तसेच जानेवारी 2019 मध्ये सत्र न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला होता.

दिल्ली उच्च न्यायालयाने 2024 मध्ये कर्जाची रक्कम परत केली जाईल, या आश्वासनावर शिक्षेला स्थगिती दिली होती. मात्र प्रत्यक्षात पैसे परत दिले गेले नाहीत.

राजपाल यादवने डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 मध्ये न्यायालयासमोर रक्कम परत करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र तो त्यात अपयशी ठरला.

त्यानंतर न्यायालयाने 4 फेब्रुवारी रोजी त्याला आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता.

यापूर्वीही 2013 साली खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याच्या प्रकरणात राजपाल यादवला 3 डिसेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.

राजपाल यादवचं म्हणणं काय?

कनिष्ठ न्यायालयाकडून शिक्षा झाल्यानंतर 28 एप्रिल 2018 रोजी राजपाल यादवने शाहजहांपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत, आपल्याला कट रचून अडकवण्यात आलं असल्याचं म्हटलं होतं.

दोन वर्षांपूर्वी इंडिया टुडे ग्रुपच्या एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राजपाल यादवने आपण ‘कोणतीही फसवणूक केलेली नाही’, असं सांगितलं होतं.

तो म्हणाला की “‘अता पता लपता’ हा चित्रपट बनवण्यासाठी कंपनीने पाच कोटी रुपये दिले होते. ती एक प्रकारची गुंतवणूक होती. मी कधीही अता पता लापताचा दिग्दर्शक नव्हतो.”

 राजपाल यादवच्या म्हणण्यानुसार, चित्रपटासाठी दिलेली रक्कम ही 'कंपनीने केलेली गुंतवणूक' होती.

फोटो स्रोत, ANI

याच चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने राजपाल यादवबद्दल माहिती दिली होती.

नवाजुद्दीन म्हणाला होता की, “जेव्हा राजपालचं काम चांगलं सुरू होतं, तेव्हा अनेक लोक त्याच्या घरी जेवायला येत असत. त्याने कधीही तक्रार केली नाही… उलट नेहमी मदतच केली. आम्ही सगळे स्ट्रगल करत होतो, तेव्हा राजपालचं घर म्हणजे लंगरसारखं होतं, कुणीही येऊन जेवू शकत होतं… तो खूपच चांगला माणूस आहे.”

याच मुलाखतीत त्याने राजपाल यादवला ‘बॉलिवूडमधील सर्वाधिक सुशिक्षित अभिनेत्यांपैकी एक’ असं म्हटलं होतं.

राजपाल यादव हा उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर जिल्ह्यातील पुवायनचा रहिवासी आहे.

त्याने लखनौ येथील भारतेंदू नाट्य अकादमी आणि दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून (एनएसडी) अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. ‘भूलभुलैया’, ‘फिर हेराफेरी’, ‘चुप चुप के’, ‘हंगामा’ अशा चित्रपटांमधील त्याच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC