Home world news marathi रक्तरंजित संघर्ष! इस्त्रायलने गाझामध्ये अन्न मिळवण्यासाठी जमलेल्या गर्दीवरच केला हल्ला; 59 ठार,...

रक्तरंजित संघर्ष! इस्त्रायलने गाझामध्ये अन्न मिळवण्यासाठी जमलेल्या गर्दीवरच केला हल्ला; 59 ठार, 221 जखमी

3
0

Source :- ZEE NEWS

इराण आणि इस्त्रायलमध्ये सध्या संघर्ष पेटला आहे. यादरम्यान इस्त्रायलने गाझा पट्ट्यात मदतीसाठी पोहोचलेल्या ट्रकबाहेर जमलेल्या गर्दीवर टँकने हल्ला केला आहे. या हल्ल्यात लोक ठार झाले आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हल्ला झाला तेव्हा भुकेने व्याकूळ लोकांनी तिथे गर्दी केली होती. आतापर्यंतच्या संघर्षातील हा सर्वात रक्तरंजित हल्ला म्हणून पाहिलं जात आहे. 

या हल्ल्यानंतरचा व्हिडीओ समोर आला असून, व्हिडिओमध्ये दक्षिण गाझा पट्टीतील खान युनूस येथील एका रस्त्यावर सुमारे डझनभर मृतदेह पडलेले दिसत आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून गाझामध्ये हमासच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी दहशतवाद्यांशी युद्ध सुरू असलेल्या इस्रायली सैन्याने या भागात गोळीबार झाल्याची कबुली दिली आणि ते या घटनेची चौकशी करत असल्याचे सांगितले.

प्रत्यक्षदर्शींनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, खान युनूसच्या मुख्य पूर्वेकडील रस्त्यावर मदत ट्रकमधून अन्न मिळवण्याच्या आशेने जमलेल्या हजारो लोकांच्या गर्दीवर इस्रायली टँकने किमान गोळे डागले.

“अचानक त्यांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं आणि तिथे सगळ्यांनी गर्दी केली. यानंतर तोफगोळे पडू लागले,” असं नासेर रुग्णालयात रॉयटर्सने मुलाखत घेतलेल्या प्रत्यक्षदर्शी अला यांनी सांगितले. रुग्णालयात जागेअभावी जखमी लोक जमिनीवर आणि कॉरिडॉरमध्ये पसरलेले आहेत.

“कोणीही या लोकांकडे दयेने पाहताना दिसत नाही. अन्न मिळवताना लोक मरत असून, त्यांचे दोन तुकडे होत आहेत. या लोकांना बघा, हे सर्व लोक आपल्या मुलांना खायला मिळावं यासाठी जीव पणाला लावत आहेत,” अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. 

या हल्ल्यात किमान 59 जणांचा मृत्यू झाला असून 221 जण जखमी झाले, त्यापैकी किमान 20 जणांची प्रकृती गंभीर आहे, असं पॅलेस्टिनी डॉक्टरांनी सांगितलं. जखमींना कार, रिक्षा आणि गाढवांच्या गाड्यांमधून रुग्णालयात नेण्यात येत होतं. मे महिन्यात गाझामध्ये मदत पुन्हा सुरू झाल्यापासून एकाच दिवसात झालेला हा सर्वात मोठा मृतांचा आकडा होता.

SOURCE : ZEE NEWS