Home LATEST NEWS ताजी बातमी ‘या देशात मंदिरं सुरक्षित नाही, तर आमचं काय?’ मुंबईतील जैन मंदिरावर कारवाईनंतर...

‘या देशात मंदिरं सुरक्षित नाही, तर आमचं काय?’ मुंबईतील जैन मंदिरावर कारवाईनंतर मोर्चातून संताप व्यक्त

4
0

Source :- BBC INDIA NEWS

मुंबईच्या जुन्या जैन मंदिरावर महानगरपालिकेच्या बांधकाम पथकाने तोडक कारवाई केली.

फोटो स्रोत, ANI/Alpesh Karkare

“मंदिर टूटा है, हौसला नही”

“मंदिर सिर्फ पत्थर नही, हमारी पहचान और संस्कृती है.”

“हम शांत है , लेकिन कमजोर नही”

“डर के नही, डटके खडा है पूरा समाज”

अशा वेगवेगळ्या घोषणा आणि पोस्टर्स घेऊन जैन समाजातील हजारो लोक, सकल हिंदू समाज बांधव आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी मुंबईतील मोर्चा काढला होता.

विलेपार्लेमधील पारसनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरामध्ये पालिकेचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

अनेक वर्ष जुनं मंदिर पाडल्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आलेल्या काही जैन बांधवांच्या डोळ्यात अश्रू होते. पालिकेला जाब विचारण्यासाठी या ‘अहिंसक’ रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान, या कारवाई प्रकरणी के ईस्ट वार्डचे वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दहा दिवसांपूर्वीच घाडगे यांची बदली केईस्ट वॉर्डमध्ये करण्यात आली होती.

पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना याबाबत माहिती दिली.

विलेपार्ले पूर्व परिसरातील नेमिनाथ सहकारी आवास इमारतीच्या शेजारी, कांबळीवाडी परिसरामध्ये 32 वर्ष जुने जैन मंदिर होते. या मंदिरावर मुंबई महानगर पालिकेच्या बांधकाम पथकानं 16 एप्रिल रोजी कारवाई करत बुलडोजर चालवला.

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील मुंबई महापालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण मंदिर जमीनदोस्त केलं.

त्यानंतर शनिवारी मुंबईतील विलेपार्ले पूर्व स्थानक परिसरापासून के ईस्ट महापालिका वार्ड कार्यालयापर्यंत जैन समाज आणि विश्व हिंदू परिषद यांच्या नेतृत्वात जैन बांधव, सकल हिंदू बांधव आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी कार्यकर्ते यांनी ‘अहिंसक’ मोर्चा काढला. या मोर्चामुळं देशभर सध्या हे प्रकरण चर्चेत आहे.

‘या देशात मंदिरं सुरक्षित नाही, तर आमचं काय?’

आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मनीष जैन यांनी म्हटलं की, “या देशात आता मंदिरं सुरक्षित नाहीत तर आम्ही कसं सुरक्षित असणार. “

“आम्हाला खूप दुःख झालं आहे. मंदिर तोडत असताना, देवांची विटंबना होत असताना, ग्रंथांचा अपमान होत असताना आम्ही व महिलांनी विरोध केला.

मात्र, आमच्या बोलण्याकडे काहीच लक्ष दिले गेले नाही. सर्रास बूट घालून मंदिरावर कारवाई करण्यात येत होती, हे फार दुःखद आहे.”

या कारवाईविरोधात जैन समाजाने रस्त्यावर उतरत मुंबई महापालिकेविरोधात निदर्शने केली.

फोटो स्रोत, ANI

तसंच, आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या स्थानिक सुनिता जैन म्हणाल्या की, आम्ही पूजा करत होतो, अचानक पोलीस आले आणि तोडायला लागले.

आम्हाला साहित्यही घेऊ दिलं नाही. आम्हाला ओढून बाहेर काढण्यात आलं. मंदिराची अशी अवस्था पाहताना, आम्हाला खूप दुःख झालं.”

नेहमीच शांतता प्रिय असणारा जैन समाज मुंबईत रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मंदिराबद्दल वाद काय?

विलेपार्ले पूर्वमधील कांबळीवाडी परिसरामध्ये नेमिनाथ सहकारी आवास इमारतीच्या शेजारी एक 32 वर्षांपूर्वीच दिगंबर जैन मंदिर होतं.

हे मंदिर एका इमारतीच्या पार्किंगच्या जागेत होतं आणि त्या जागेवरून वाद होता. याप्रकरणी जागेवर दावा करणारे आणि मंदिर ट्रस्टी यांच्यामध्ये न्यायालयीन लढा देखील सुरू आहे.

सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली होती. त्यात मंदिर हटवण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानंतर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चार वेळा मंदिर तोडण्याचे आदेश दिले होते.

पाचव्या वेळी कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं गेलं नाही, तर पालिका अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं होतं.

या कारवाईविरोधात जैन समाजाने रस्त्यावर उतरत मुंबई महापालिकेविरोधात निदर्शने केली.

फोटो स्रोत, ANI

अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष आणि जैन मंदिर ‘अहिंसक’ मोर्चाचे समन्वयक ललित गांधी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या मुद्द्यावर संताप व्यक्त केला.

मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी 15 एप्रिल पर्यंत स्थगिती दिली होती. 16 तारखेला 11 वाजता सुनावणी पार पडणार होती. मात्र, 16 तारखेला सकाळी आठ वाजता महापालिकेने कारवाई केली.

याप्रकरणी 16 तारखेला सुनावणी झाली तेव्हा पालिकेने कारवाई सुरू असल्याचं सांगितलं. त्यावर कोर्टाने कारवाई थांबवण्यास सांगत पालिकेवर ताशेरे ओढले, असंही गांधी म्हणाले.

या प्रकरणी आता 30 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.

कारवाईनंतर आमचे देव बाहेर आहेत. त्यामुळे तिथे असलेला ढिगारा हलवून आम्हाला तात्पुरते देव ठेवण्यासाठी शेड करून देण्याबाबत चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुंबई महापालिकेचे म्हणणं काय?

याप्रकरणी पालिकेने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मात्र, सेशन कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर पालिकेला हे मंदिर तोडण्यासंदर्भात कोर्टाने निर्देश दिले होते.

त्यानुसार मुंबई महापालिकेच्या के ईस्ट वार्ड विभागानं ही कारवाई केल्याचं, महापालिकेत्या अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

त्यामुळे पालिका के ईस्ट वार्ड विभागाने मंदिराला नोटीस दिली होती. मात्र नोटीस देऊनही मंदिर प्रशासनाने ऐकलं नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जैन समाजाच्या मागण्या काय?

या कारवाईनंतर मुंबईच्या रस्त्यांवर हजारोंच्या संख्येनं उतरत निषेध व्यक्त करण्यात आला.

यासाठी जबाबदार महापालिका अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याची मागणी जैन समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे.

तसंच, महापालिकेनं स्वतःच्या खर्चाने नवीन मंदिर त्वरित बांधून द्यावे. तसंच, महापालिकेने घटनेबद्दल सार्वजनिक माफी मागावी अशीही मागणी कण्यात आली आहे.

दक्षिण भारत जनसभेकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

दक्षिण भारत जैन सभेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पत्राद्वारे जैन मंदीर पुन्हा उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दक्षिण भारत जैन सभा यांची एक बैठक पार पडली. बैठकीत जैन मंदीरावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.

सर्व आंदोलनकर्ते हे पालिकेला जाब विचारण्यासाठी अहिसंक रॅलीत आक्रमक होते.

फोटो स्रोत, ANI

“मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली असतानाही घाईघाईत मंदिर जमीनदोस्त करण्यात आले.

त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्याच जागी नवीन मंदिर आणि कारवाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,” असं निवेदनात म्हटलं आहे.

अल्पसंख्याक असणे हा शाप

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी या कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

आजच्या काळात देशात अल्पसंख्याक असणे हा एक शाप ठरत आहे. सध्या जैन समाजामध्ये असलेली भीती, असुरक्षितता आणि अनिश्चितता अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील शांतताप्रिय जैन समाजाला पद्धतशीरपणे लक्ष्य केले, असा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे.

खासदार अखिलेश यादव यांनी या कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला.

फोटो स्रोत, X/@yadavakhilesh

अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशातील सिंगोली येथे जैन साधूंवर झालेला हिंसक हल्ला, जबलपूरमधून लीक झालेली ऑडिओ क्लिप ज्यामध्ये भाजपच्या सदस्यांनी जैनांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती आणि मुंबईतील जैन मंदिराची तोडफोड, जेथे पवित्र मूर्ती, धर्मग्रंथ आणि धार्मिक पुस्तकांची कथितपणे विटंबना केली गेली, याचा आपल्या ट्विटमध्ये संदर्भ दिला. तसेच जैन समाजाने लक्षात ठेवावे, भाजपचे कोणाशीच सख्य नाही असं म्हणत टोला लगावला आहे.

काँग्रेसनंही याबाबत भूमिका मांडली आहे.

“भाजप सरकारने मुंबईतील मंदिर बुलडोझरने पाडले. या घटनेने जैन समुदायासह संपूर्ण देश दुखावला आहे. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.

भाजपचा मंदिरांबद्दलचा द्वेष वेळोवेळी समोर येत राहतो, यापूर्वी स्मार्ट सिटीच्या नावाखाली बनारसमध्ये शेकडो मंदिरे पाडण्यात आली होती. देवांच्या मूर्ती तोडल्या गेल्या.

भाजप आणि त्यांचे नेते अहंकाराने इतके मातलेले आहेत की त्यांना लोकांच्या श्रद्धेची अजिबात काळजी नाही. त्यांना फक्त स्वतःच्या आणि त्यांच्या मित्रांच्या फायद्याची काळजी असते. भाजपच्या या पापाचे कोणतेही प्रायश्चित्त नाही,” असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

एकमेकांसाठी उभे राहा, फूट पडू देऊ नका!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे.

“मुंबई महानगर पालिकेचा कारभार मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून भाजपच चालवतं. भाजपचं सरकार कुणाचंच नाही याची जाणीव आता झाली असेल,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आंदोलनाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं की, “विलेपार्ले येथील 90 वर्षे जुने मंदिर पाडल्याच्या विरोधात जैन समुदायाने मुंबईत शांततेत निदर्शने केली.

प्रिय अल्पसंख्याक समुदायांनो, त्यांची नजर तुम्हा सर्वांवर आहे, फक्त मुस्लीमच नाही तर जैन, पारशी, शीख आणि ख्रिश्चन देखील.. एकमेकांसाठी उभे राहा, आपआपसात फूट पडू देऊ नका!’

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC