Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Wendy Maeda/The Boston Globe via Getty Images
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान सध्या तणावाचं वातावरण आहे. या तणावाचा परिणाम दोन्ही देशांमधील अनेक गोष्टींवर होताना दिसतोय. सोशल मीडियावरदेखील या तणावाचं प्रतिबिबं उमटताना दिसत आहे.
भारत-पाकिस्तानमधील याच संघर्षामुळे पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्की देशातील सामानाला भारतात विरोध होताना दिसून आला. आता हे प्रकरण खाण्याच्या पदार्थांपर्यंत येऊन ठेपलेलं आहे.
जयपूरमधील एका मिठाईच्या दुकानाने दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध मिठाई ‘म्हैसूर पाक’चं नाव बदलून ‘म्हैसूरश्री’ केलं असल्याची बातमी अनेक माध्यमांनी दिली. त्यानंतर सोशल मीडियावर बरीच उलट-सुलट चर्चा सुरु झाली.
सोशल मीडियावर ही बातमी गतीने व्हायरल झाली. त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही आल्या. ‘म्हैसूर पाक’चं नाव बदलून ते ‘म्हैसूर भारत’ असं करण्यात यायला हवं, असंदेखील काहींनी म्हटलं.
याशिवाय, आणखी एका ‘मोती पाक’ नावाच्या मिठाईवरुनही मोठा वाद झडताना दिसून आला. या मिठाईचं नावदेखील बदलण्यात आलं असून ते ‘मोती श्री’ असं करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
हे सगळे नावातील बदल कशासाठी? तर या मिठाईंच्या नावात ‘पाक’ हा शब्द आहे. आणि तो सामान्यत: ‘पाकिस्तान’ या देशासाठी वापरला जातो. त्यामुळे, मिठाईच्या नावातून पाकिस्तानचा उल्लेख काढून टाकण्यासाठी म्हणून हे बदल करण्यात आले आहेत.
खरं पाहता, या मिठाईच्या जन्माचं मूळ हे भारतातलंच आहे. मात्र, या मिठाईंच्या नावाला आता विरोध होताना दिसतो आहे. कारण, अर्थातच ‘पाक’ हा शब्द त्यामध्ये असणं, यामध्ये दडलेलं आहे.
एखाद्या देशानं असा तणाव वाढल्यानंतर साहित्याला-सामानाला विरोध करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये.
याआधी 2020 साली गलवानमध्ये चीनच्या सैनिकांसोबत भारतीय सैनिकांचा संघर्ष झाला होता, तेव्हा देखील देशात अशाच स्वरुपाचा तणाव वाढलेला होता.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेव्हाही चीनी साहित्यावर बहिष्काराची भाषा वाढीस लागली होती. चीनमध्ये तयार झालेल्या आणि भारतात आलेल्या सामानावर बहिष्कार टाकण्याची मोहिम राबवण्यात आली होती.
याशिवाय, आणखीही अशी काही उदाहरणं आहेत, ज्यामध्ये देशात तणाव वाढल्यानंतर एखाद्या देशात तयार होऊन आलेल्या सामानावर बहिष्कार टाकण्याची मोहिम झालेली आहे.
‘म्हैसूर पाक’चा इतिहास
‘म्हैसूर पाक’ मिठाईच्या नावावरुनचं लक्षात येतं की, या मिठाईचा इतिहास म्हैसूरशी निगडीत आहे.
1902 ते 1940 च्या दरम्यान म्हैसूरवर राज्य करणारे महाराज नलवाडी कृष्मराज वोडेयार हे खव्वये म्हणून ओळखले जायचे. ते आपल्या स्वयंपाक्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे खमंग पदार्थ तयार करवून घ्यायचे. त्यासाठी, पदार्थांसोबत वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी आपल्या स्वयंपाक्यांना उद्युक्त करायचे.
एकदा त्यांचे स्वयंपाकी काकासुर मदप्पा हे मिठाई तयार करण्यास विसरुन गेले होते. अशा परिस्थितीत त्यांना त्वरित काहीतरी तयार करावं लागणार होतं. त्यासाठी त्यांनी गडबडीत एक मिठाई तयार केली आणि तिला ‘म्हैसूर पाक’ असं नाव दिलं.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीचे सहकारी पत्रकार इम्रान कुरैशी यांच्याशी संवाद साधताना काकासुर मदप्पा यांचे पणतू एस. नटराज यांनी पहिल्यांदा ‘म्हैसूर पाक’ कसा तयार झाला, याबाबतची रंजक कहाणी उलगडून सांगितली.
ते सांगतात की, “मदप्पा यांनी मिठाई तयार करण्यासाठी बेसन आणि तूपामध्ये पाक मिसळला. जेव्हा महाराजांनी त्यांना विचारलं की, या मिठाईचं नाव काय आहे? तेव्हा मदप्पांनी त्यांना सांगितलं की, या मिठाईचं नाव ‘पाका’ असं आहे. आपण त्याला पाका असं म्हणू शकतो. आणि ही मिठाई म्हैसूरमध्ये तयार झाली आहे, तर आपण या मिठाईला ‘म्हैसूर पाक’ असंही म्हणू शकतो, असंही त्यांनी महाराजांना सांगितलं.”
नटराज यांनी पुढे म्हटलं की, “कन्नड भाषेमध्ये बेसनसोबत साखरेचा पाक मिसळला असता, त्याला पाका असं म्हणतात. मात्र, जेव्हा हा शब्द इंग्रजी भाषेत उच्चारला अथवा लिहिला जातो, तेव्हा पाका या शब्दामधील ‘आ’ चा उच्चार केला जात नाही. तेव्हा, त्याला फक्त ‘पाक’ असं म्हटलं जातं. “
कर्नाटकमधील रामनगरा जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील पहिल्यांदा ‘म्हैसूर पाक’ कशापद्धतीने तयार झाला, याबाबतची कहाणी नोंदवण्यात आली आहे.
काकासुर मदप्पा यांचे वंशज आजतागायत ‘म्हैसूर पाक’ तयार करण्याचं काम करतात.
मदप्पा यांचे पणतू सांगतात की, “आमची चौथी पिढी म्हैसूर पाक तयार करते. कारण, महाराजांनी माझ्या पणजोबांना ही मिठाई अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. त्यामुळेच म्हैसूरमध्ये अशोक रोडवर या मिठाईचं पहिलं दुकान उघडण्यात आलं.”
‘म्हैसूर पाक’ कसा तयार केला जातो?
रामनगरा जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतात पारंपरिक पद्धतीने ही मिठाई लग्नसमारंभ तसेच इतर सणसमारंभांमध्ये दिली जाते. याशिवाय, ही मिठाई डोहाळे जेवणासारख्या समारंभांमध्येही लोकप्रिय आहे.
‘म्हैसूर पाक’ तयार करण्यासाठी साखरेचा पाक गरम केला जातो. भारतातील इतर गोड पदार्थ जसे की, जिलेबी आणि गुलाबजाम तयार करताना देखील साखरेच्या पाकाचा वापर केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
‘म्हैसूर पाक’ तयार करण्यासाठी जो पाक तयार केला जातो, त्यासाठी वेगवेगळे मसाले जसे की, वेलची, गुलाब, मध इत्यादींचा वापर केला जातो.
या पदार्थाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे हा साखरेचा पाक तयार करण्यात अगदी मोजकेच स्वयंपाकी निपुण असतात. अनेक स्वयंपाकी पाक तयार करण्याची आपली रेसिपी इतर कुणालाही सांगत नाहीत. ती गुपित ठेवतात.
‘पाक’ शब्दाचा अर्थ
भारतात ‘पाक’ हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे. हा शब्द भारतातील विविध भाषांमध्ये वापरला जातो. फारसी भाषेत देखील ‘पाक’ या शब्दाचा उल्लेख आहे.
अजित वडनेरकर हे भाषा तज्ज्ञ आहेत. त्यांनी ‘शब्दों का सफर’ या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.
भारतात ‘पाक’ शब्दाचा उगम कसा झाला, याविषयी बोलताना ते सांगतात की, “भारतीय संस्कृतीमध्ये कोणतीही गोष्ट जेव्हा आगीतून जाते, तेव्हा तिला पवित्र मानलं जातं. जेव्हा वेगवेगळ्या धातूंना आगीमध्ये टाकण्यात आलं, तेव्हा हे धातू एखादी नवीनच वस्तू तयार होऊन बाहेर पडले. कोणताही धातू जेव्हा आगीमध्ये वितळतो, तेव्हा त्याला ‘पक’ अर्थात पवित्र असं म्हटलं गेलं. ‘पक’ या शब्दापासूनच ‘पाक’ हा शब्द तयार झाला आहे. पाकपासूनच ‘पाग’देखील तयार झाला आहे. म्हणूनच, जेव्हा जिलेबीवर पाक टाकला जातो, तेव्हा त्या प्रक्रियेला हिंदीत ‘पागना’ असं म्हणतात.”
‘पाक’ शब्द वेगवेगळ्या भाषेत वापरला जातो. मात्र, या भाषांमध्ये ‘पाक’ हा शब्द कुठून आला?

फोटो स्रोत, Getty Images
या प्रश्नावर अजित वडनेरकर असं म्हणतात की, “पाक शब्द भारत आणि इराणमध्ये सापडतो. अशाच शब्दाशी साधर्म्य साधणारा एक शब्द जर्मनीतही सापडतो. मात्र, इराण आणि भारतातील पाक हा शब्द जर्मनीतून आला अथवा जर्मनीमध्ये जो शब्द सापडतो तो भारतातून गेला आहे, असं त्याचा अर्थ नाहीये.”
पुढे ते सांगतात की, “हिंदी आणि फारसी दोन्ही भाषांमध्ये वापरल्या जाणाऱ्या “पाक” या शब्दाचा मूळ अर्थ ‘पवित्र’, ‘शुद्ध’, ‘स्वच्छ’ असा होतो. ‘पाक’ (پاک) हा पर्शियन शब्द ‘पवित्र’ या अर्थाचे विशेषण म्हणून वापरला जातो. त्याचाच संस्कृत समतुल्य शब्द म्हणजे ‘पवित्र’ (शुद्ध), ‘पवमन’ (शुद्धक), ‘पावक’ (अग्नी) इ. आहे.”
“हिंदीमध्ये ‘पाक’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे पकवण्यात अर्थात ‘शिजवण्यात आलं’ आणि दुसरा आहे ‘पवित्र’.”
पाकिस्तानच्या संदर्भात ‘पाक’ हा शब्द वापरला जाण्याबाबत अजित वडनेरकर सांगतात की, “पाक या शब्दात एक प्रकारचा प्राप्त अर्थ आहे. अशी प्राप्ती ज्यामध्ये स्वतःमध्ये कोणताही दोष काढला जाऊ शकत नाही. पाकिस्तान हा शब्द निर्माण करण्यामागील मूळ संकल्पना देखील अशीच होती. ती म्हणजे हा असा एक जमिनीचा तुकडा आहे, जो ‘पाक’ (शुद्ध) म्हणता येईल असा आहे, असं त्या नावातून प्रतीत करायचं होतं.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC