Source :- BBC INDIA NEWS
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाकडून घारापुरीच्या लेण्या – एलिफंटाला जाणाऱ्या फेरी बोटीला नौदलाच्या स्पीडबोटची धडक बसल्याने अपघात झाला आणि फेरी बोट बुडाली. यात अनेक लोकांचा जीव गेला.
गेटवे ऑफ इंडियावरून प्रवासी वाहतूक कशी केली जाते? त्यासाठीचे नियम काय आहेत?
मुंबईला सुमारे 149 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे. इथे एकूण 16 जलमार्गांवरून प्रवासी वाहतूक होते.
त्यापैकी अपोलो बंदरावर गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आली 1911 मध्ये.
गेटवे ऑफ इंडियापासून 9 नॉटिकल मैलावर म्हणजे 11 किलोमीटर्सवर अरबी समुद्रात एलिफंटा म्हणजेच घारापुरी बेट आहे. ही एक युनेस्को हेरिटेज साईट आहे.
अपोलो बंदरावरून मांडवा म्हणजे अलिबागला जाणाऱ्या आणि घारापुरीच्या लेण्या पाहण्यासाठी एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटी सुटतात. मुंबई – मांडवा वॉटर टॅक्सी सेवाही सुरू करण्यात आली होती, पण चढ्या तिकीटदरांमुळे प्रतिसाद न मिळाल्याने ती बंद करण्यात आली.
गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 101 नोंदणीकृत बोटी सध्या आहेत. साधारण दर अर्धा तासाने फेरी बोट सुटते आणि याप्रवासाला सुमारे तासभर वेळ लागतो.
गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष सरदार मिर्झा जमालुद्दीन महाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे या बोटींची नोंदणी केली जाते. त्यानंतर बोटीची तपासणी झाल्यावर बोटीला फिटनेस सर्टिफिकेट दिलं जातं. बोटीच्या आकारमानानुसार त्यातून किती प्रवाशांची वाहतूक एकावेळी केली जाऊ शकते, याबद्दलची माहितीही यामध्ये असते. प्रत्येक बोटीच्या आकारानुसार तिची प्रवासी क्षमता वेगवेगळी असते. परवाना मिळालेल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीमधून नेता येऊ शकत नाहीत.
यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टकडून बोटींना लायसन्स दिलं जातं. या प्रवासी बोटीच्या प्रवाशांचा आणि बोटीचा इन्शुरन्स मालकांना करावा लागतो आणि त्यानंतरच त्यांना पॅसेंजर बोटीसाठीचा परवाना मुंबई पोर्ट ट्रस्टकडून मिळतो. याशिवाय प्रवासी बोट चालवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळकडूनही (Maharashtra Maritime Board) लायसन्स घ्यावं लागतं.
दरवर्षी बोटींची तपासणी केली जाते आणि त्यानुसार बोटींची दुरुस्ती होते. त्यातले भाग बदलले जातात, पुन्हा तपासणी आणि ट्रायल होते. त्यानंतर परवान्याचं नूतनीकरण होत असल्याचं महाडकर सांगतात.
पण ज्याप्रमाणे प्रवासी वाहनं 15 वर्षं जुनी झाल्यानंतर ती बाद करावी लागतात, तसा बोटींच्या मूळ बांधणीला किती काळ उलटलाय, त्यानुसारचा नियम नाही.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या या बोटींमध्ये लाकडी लाँच – फेरी बोटी आणि कॅटमरान या दोन्हींचा समावेश आहे. साधारण 80 लाकडी बोटी गेटवे ते एलिफंटा – मांडवा मार्गावर वापरल्या जात असल्याचं द इंडियन एक्स्प्रेसने आपल्या बातमीत म्हटलंय.
पण सरकारकडून मदत मिळाल्याशिवाय सगळ्या बोटींचं आधुनिकीकरण करणं शक्य नसल्याचं गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष सरदार मिर्झा जमालुद्दीन महाडकर सांगतात.
ते म्हणतात, “नवीन कॅटमरान घेण्यासाठी 5-6 कोटी रुपये खर्च येतो. फक्त तिकीटांमधून इतका पैसा एकटा मालक भरून काढू शकत नाही. आपल्याकडे तिकीटांचे दर फार नाहीत. सरकारकडून आम्हाला कर्जासाठी मदत, सबसिडी मिळत नाही. आम्हाला थेट बँकेकडूनच कर्ज घ्यावं लागतं. या पर्यटन व्यवसायासाठी सरकारने आपला फंड दिला, व्याजमुक्त कर्ज दिलं तर हे होऊ शकतं.”
सुरक्षेच्या दृष्टीने फेरीबोटमध्ये काय असतं?
नीलकमल बोटीला अपघात झाला त्यावेळी बचावासाठीच्या कोणत्याही पूर्वसूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, कोणीही लाईफजॅकेट घातलं नव्हतं, बोट बुडायला लागल्यावर जॅकेट्स घातली असं या अपघातातून बचावलेल्यांनी सांगितलंय.
प्रत्येक फेरीबोटीत लाईफ जॅकेट्स, लाईफ राफ्ट असतात, असं मुकादम यांचं म्हणणं आहे. पण आजवर ही लाईफजॅकेट घालून बसण्याची सक्ती प्रवाशांवर केली जात नव्हती.
शिवाय अपघात झाल्यास फेरीबोटीतल्या प्रवाशांना धोक्याची सूचना देणारी कोणतीही यंत्रणा बोटीमध्ये नाही. असं मदतकार्य करणाऱ्या आरिफ बामणे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
या अपघाताची माहिती देताना पायलट बोटीवर काम करणारे आरिफ बीबीसी मराठीला म्हणाले,
“सगळीकडून ‘हेल्प’, ‘हेल्प’ आवाज येत होता. जितकं शक्य होतं तितकं वेगानं काम केलं. लाकडी बोटीत अलार्म सिस्टिम नव्हती. माझ्या अंदाजानुसार कपॅसिटीपेक्षा जास्त लोक असावेत. काही लोकांना लाईफ जॅकेट मिळालं नव्हतं, त्यांना आम्ही लाईफ जॅकेट दिलं आणि वाचवलं. आम्ही साधारण 20 ते 25 लोकांना वाचवलं. तिथल्या लोकांना नेव्हल फेरी बोटीत नेऊन सोडलं. 13 पैकी 4 मृतदेह आम्हाला तिथंच दिसले, नेव्हल फेरी बोटीला कळवल्यावर ते उचलण्यात आले. लाकडी बोटीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा नसते. त्यात फक्त लाइफ जॅकेट, रिंग्ज असतात.”
“माझ्या मतानुसार प्रत्येक बोटीत सबमर्सिबल पंप पाहिजे. मदत मिळेपर्यंत त्याचा वापर करुन पाणी बाहेर काढता येईल. ही बोट फार कमी वेळातच बुडली त्यांना कदाचित या उपायांचा वापर करता आला नसेल. प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट घातलंच पाहिजे. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे.”
एखाद्या बोटीला अपघात झाल्यास त्याबद्दलची माहिती जवळपासच्या बोटींना दिली जाते आणि जवळ असणाऱ्या इतर बोटी आणि नौदलाद्वारे बचाव कार्य केलं जातं. ज्या बोटीला मदतीची गरज आहे ती समुद्रात किती आतवर आहे, यावर तिथपर्यंत इतर बोटींना पोहोचायला किती वेळ लागेल, हे अवलंबून असतं.
पण आता झालेला अपघात हा नौदलाच्या स्पीडबोट आदळल्याने झाला आणि फेरी बोटीत दोष नसल्याचं महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
ते म्हणाले, “बोटीने सुरक्षेसाठीचे नियम पाळले होते आणि त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक नव्हते. मोटार वाहन अधिनियम कायद्यानुसार जशी वाहनाच्या वयासाठी 15 वर्षांची मर्यादा आहे, तसं बोट वापरात ठेवण्यासाठी बोटीचं जास्तीत जास्त वय किती असू शकतं याबाबत Inland Vessels Act मध्ये नमूद करण्यात आलेलं नाही. या फेरी बोटीकडे वैध परवाना होता, ज्याचं दरमहिन्याला नूतनीकरण केलं जातं.”
17 जुलै 1947 ला बुडलेली रामदास बोट हा मुंबईच्या समुद्रातला आजवरचा सगळ्यात मोठा – सगळ्यांच्या अजूनही लक्षात असलेला अपघात होता. या अपघातात सुमारे 700 जणांचा मृत्यू झाला होता.
2020 साली मांडवा जेट्टीजवळ प्रवासी वाहतूक करणारी लाँच खडकाला आपटून फुटली आणि बुडत होती – पण त्यावेळी सर्व 88 प्रवाशांना वाचवण्यात आलं होतं.
प्रवासी बोटीला झालेल्या या अपघातामुळे आता प्रवासी सुरक्षेबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC