Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, @Tanumahi042006
दुपारचे 11 वाजले होते. मी बिहारमधील सुपौल जिल्ह्यामधील पिपरा ब्लॉकमधील तुलापट्टी गावात पोहोचले होते. थंडीपासून दिलासा देणारं आल्हाददायी ऊन पडलं होतं. लोक घराबाहेर बसून त्याचा आनंद घेत होते.
मात्र तुलापट्टीमध्येच एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीत एक 20 वर्षांची तरुणी ब्लँकेट ओढून झोपण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या सासऱ्यांनी तिला हाक मारली, “तनू बेटा, तुला भेटायला कोणीतरी आलं आहे.”
दोन-तीन वेळा हाक मारल्यानंतर तिनं ब्लँकेट बाजूला केलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिच्या हातात टॅब होता, ज्यावर तिच्या सुखद, आनंदी दिवसांचा व्हीडिओ सुरू होता.
या तरुणीचं नाव तनुप्रिया आहे. तिचा पती राहुलची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप तिच्याच वडिलांवर आहे.
ती एक सडपातळ मुलगी आहे. तिच्या मोठ्या डोळ्यांमध्ये तिच्या आयुष्यातील सध्याच्या दु:खाची वेदना दिसून येते. तिला सकाळी लवकर उठायचं नसतं. तिला उशीरापर्यंत झोपायचं असतं. जेणेकरून आयुष्यातील आणखी एक दिवस कसातरी निघून जाईल.
तनुप्रियाची कहाणी, भारतात एखाद्या मुलीनं तिच्या स्वत:च्या आयुष्याबद्दलचा निर्णय घेण्याची, जातीयवादाच्या जोखडाची आणि पितृसत्ताक व्यवस्थेत अडकलेल्या समाजाची कहाणी आहे.
तनुप्रिया आणि राहुलची प्रेमकहाणी
तनुप्रिया, बिहारमधील सहरसामधील बनगावची रहिवासी आहे. तर राहुल सुपौल जिल्ह्यातील तुलापट्टी गावचा रहिवासी होता.
तनुप्रियाचं सुरुवातीचं शिक्षण सहरसामध्येच झालं. तनुप्रिया अभ्यासात हुशार होती. ती प्रेमशंकर झा आणि गुंजन कुमारी यांची सर्वात मोठी मुलगी आहे.
प्रेमशंकर झा यांचं औषधांचं दुकान आहे. गुंजन कुमारी, सरकारी शाळेत संस्कृत शिकवतात. तनुप्रियाला दोन लहान भाऊ आहेत.
तनुप्रिया आणि राहुल कुमार यांची भेट दरभंगा वैद्यकीय महाविद्यालयात झाली.
राहुल साधारण शेतकरी कुटुंबातील होता. त्याचे वडील गणेश मंडल दहावीपर्यंत शिकलेले असून ते शेती करतात. तर त्याच्या आई अनीता देवी बारावीपर्यंत शिकलेल्या असून त्या गृहिणी आहेत.
‘मंडल’, बिहारमधील अती मागास जातसमूहातील आहेत.
राहुल आणि तनुप्रिया हे दोघेजण दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये बीएससी नर्सिंग करत होते.
फोटो स्रोत, Shahnawaz Ahmed/BBC
ती सांगते, राहुल माझ्यापेक्षा एक वर्ष सीनियर होता. वैद्यकीय व्यवसायात सीनियर आणि ज्युनियर यांचा संवाद अधिक होतो. त्यामुळे माझी राहुलशी मैत्री झाली. तो माझा सर्वात चांगला मित्र होता. आम्हा दोघांमध्ये कधीही भांडण का होत नाही, याचं महाविद्यालयात सर्वांना आश्चर्य वाटायचं.
राहुल, तनुप्रियाला अभ्यासात मदत करायचा. मात्र बुलेट या मोटरसायकलमुळे दोघांमधील जवळीक वाढली.
राहुलकडे बुलेट होती. तर तनुला बुलेट चालवण्याची आवड होती. आजदेखील तनुच्या इन्स्टाग्रामवर राहुलबरोबर बुलेट चालवतानाचे अनेक व्हीडिओ आहेत.
तनुप्रियाला ते व्हीडिओ दाखवताना आनंदी होतो. ती म्हणते, “आम्ही दोघं एकत्र अभ्यास करायचो आणि एकत्र फिरायचो. डेटिंगसारखं काहीही नव्हतं. आम्ही बुलेटवर मंदिरात जायचो. मी एका ब्राह्मण कुटुंबातील आहे. तर माझे पती ईबीसी (अती मागास) वर्गामधील होते.”
“महाविद्यालयात अनेकजणांना हे आवडलं नाही. माझे वडील प्रेमशंकर झा यांच्यापर्यंत अशी माहिती पोहोचवण्यात आली की माझं अफेअर तथाकथित मागास जातीतील मुलाशी सुरू आहे.”
तनुप्रिया आणि राहुल यांच्यामधील मैत्रीची माहिती कुटुंबापर्यंत पोहोचली होती.
फोटो स्रोत, @Tanumahi042006
तनुप्रिया सांगते की गेल्या वर्षी (2025) 27 मार्चला ती तिच्या घरी बनगावला गेल्यावर कुटुंबातील लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
तनुप्रिया म्हणाली, “त्यांनी माझ्यावर दबाव आणला की मी राहुलवर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा. मात्र जर त्यानं मला चुकीच्या पद्धतीनं हातदेखील लावला नाही तर मी असं कसं काय करू शकले असते.”
“तुम्ही कोणाशी मैत्री करता, तेव्हा त्याचा अर्थ असा तर नसतो की तुमच्यावर कोणाचा दबाव यावा आणि तुम्ही तुमच्या मित्राचं करिअर उद्ध्वस्त करावं.”
तनुप्रिया म्हणते, “मी नकार दिल्यावर माझ्या कुटुंबीयांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा हे सर्व माझ्या सहन करण्यापलीकडे गेलं, तेव्हा मी इन्स्टाग्रामद्वारे राहुलला मेसेज पाठवला की मला वाचव. माझ्याकडे फोन नव्हता आणि राहुलशी संपर्क करण्यासाठी माझ्याकडे लॅपटॉप हेच एकमेव माध्यम होतं.”
राहुलच्या मदतीनं तनुप्रियानं तिचं घर सोडलं. दोघांनीही त्यांच्या आयुष्याबद्दल विचार केला आणि मग विचारपूर्वक लग्न करण्याचा निर्णय घेतला.
तनुप्रिया म्हणाली, “आम्ही लखीसरायमधील अशोकधाममध्ये लग्न केलं आणि सुपौलच्या कोर्टात प्रतिज्ञापत्र वगैरेदेखील बनवून घेतलं. मग, बनगाव पोलीस ठाण्यातदेखील, मी हे लग्न माझ्या इच्छेनंच केलं असल्याबद्दलचा, 161 आणि 164 संदर्भातील माझा जबाब झाला.”
ती म्हणते की, “लग्नानंतर मी डीएमसीएचला आले. मी बीएससी नर्सिंगबरोबरच यूपीएससीची तयारी करू लागली. राहुलनं माझ्यासाठी टॅब विकत घेतला. त्यानं मला सांगितलं की तू फक्त अभ्यास कर.”
“त्यानं 5 ऑगस्टला देखील सांगितलं होतं की तू राज्यशास्त्राचा धडा पूर्ण करून घे. मी म्हणाले होते की संध्याकाळी करेन, मात्र ती संध्याकाळ कधीच आली नाही.”
पाच ऑगस्टला काय झालं?
अखेर 5 ऑगस्टला काय घडलं होतं?
या प्रश्नाबाबत तनुप्रिया थोडं थांबून म्हणाली, “त्या दिवशी मंगळवार होता. सोमवारी माझा उपवास होता. आम्ही मंदिरात गेलो होतो. सकाळी प्रसाद खाऊन मी उपवास सोडला. आम्ही सोबतच नाश्ता केला. जेवण करून मी महाविद्यालयात गेले.”
“संध्याकाळी मी कँटिनला जात होते, तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांना समोरून पाहिलं. मी पाहिलं की एक व्यक्ती मास्क घालून आली आहे. तो राहुलला वारंवार विचारत होता की ही बुलेट कोणाची आहे.”
ती म्हणाली, “राहुल त्याला मास्क काढायला सांगत होता. त्याचवेळेस त्यानं कट्टा काढला आणि राहुलवर गोळी झाडली. राहुल माझ्याकडे पळत आला आणि मी त्याच्याकडे. तो माझ्या कुशीत येऊन पडला.”
“आम्ही त्याला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेलो. प्रेमशंकर झा यांना इतर विद्यार्थ्यांनी पकडलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क काढल्यावर दिसलं की ते माझे वडील होते. माय फादर किल्ड माय हसबंड.”
या घटनेनंतर नर्सिंग कॉलेजमध्ये गोंधळ उडाला. तिथे असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रेमशंकर झा म्हणजे तनुप्रियाच्या वडिलांना पकडलं आणि त्यांना मारहाण केली.
नंतर स्थानिक पोलिसांनी प्रेमशंकर झा यांना उपचारांसाठी पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवलं.
तनुप्रिया त्यावेळची आठवण काढत सांगते, “ज्यांच्यावर प्रेम आहे (तनुप्रियाचे वडील) त्यांनीच तुमच्या पतीची हत्या करावी. ती यामुळे की तो तुमच्या जातीतील नव्हता. जातच सर्वकाही असते का. जे उच्च जातीतील आहेत, तेच चांगले आहेत का? इतरांचं रक्त अशुद्ध आहे का?”
“जर असं असेल तर हॉस्पिटलमध्ये का पाहत नाहीत की कोणत्या जातीच्या माणसाचं रक्त दिलं जातं आहे. असं कोणी का म्हणत नाही की त्याला फक्त त्याचं गोत्र असणाऱ्या माणसाचंच रक्त हवं आहे?”
फोटो स्रोत, @Tanumahi042006
दरभंग्यात ही घटना बेंता पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली होती. राहुल कुमारचे वडील गणेश मंडल यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये 4 आरोपींची नावं आहेत. प्रेमशंकर झा, गुंजन कुमारी आणि त्यांची दोन मुलं. हे सर्व तनुप्रियाचे आई-वडील आणि भाऊ आहेत.
दरभंगा तुरुंगात असलेल्या प्रेमशंकर झा यांची जामीन याचिका नोव्हेंबर महिन्यात सत्र न्यायाधीश शिव गोपाल मिश्र यांच्या न्यायालयानं फेटाळली होती.
सरकारी वकील अमरेंद्र नारायण झा यांनी बीबीसीला सांगितलं, “प्रेमशंकर झा यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली होती. या प्रकरणात आरोपपत्रदेखील दाखल करण्यात आलं आहे.”
तर या प्रकरणातील इतर आरोपींबद्दल विचारल्यावर बेंता पोलीस ठाण्याचे इंचार्ज हरेंद्र कुमार यांनी बीबीसीला सांगितलं, “या प्रकरणात गुंजन कुमारी यांना पाटणा उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. तर उर्वरित दोन आरोपींच्या सहभागाबद्दल तपास सुरू आहे.”
तनुप्रिया म्हणाली, “तपास योग्यप्रकारे होत नाहिये. गुंजन कुमारी यांना जामीन मिळाला. दोन्ही भाऊ उघडपणे फिरत आहेत. या कटामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, हे योग्यप्रकारे तपास झाला तरच समोर येईल.”
“कोणीही येऊन कॉलेजच्या परिसरात गोळी झाडतो. आपण कोणत्या जंगली व्यवस्थेत जगत आहोत, जिथे राज्यघटना, कायदा नावाची कोणतीही गोष्ट नाही.”
‘आता हाच माझा मुलगा आहे’
राहुलच्या मृत्यूनंतर तुलापट्टीमधील त्याच्या घराचीदेखील एका क्षणात वाताहात झाली आहे. घरात एक अव्यक्त शांतता आहे.
तनुप्रियाच्या खोलीच्या दारावर कडी लावण्यात आली आहे. जेणेकरून तिला खोलीचं दार आतून बंद करता येऊ नये.
तनुप्रिया म्हणते, “या लोकांना भीती वाटते की मी काहीतरी करून घेईन. त्यामुळे मला आतून कधीही दार बंद करू देत नाहीत. मला फक्त चहा करता येतो. हे लोक दिवसभर मी काहीतरी खावं यासाठी प्रयत्न करत असतात.”
“आजपर्यंत ते माझ्याशी कधीही वाईट वागलेले नाहीत. तुझ्यामुळे यांचा मुलगा गेला असं कोणीही म्हणत नाही. बिहारच्या अशा आतल्या भागातील गावात तुम्ही एखाद्या सुनेला शर्ट-पँट घातलेलं कधी पाहिलं आहे का?”
राहुलचे वडील गणेश मंडल जास्त बोलत नाहीत. मात्र आई अनीता देवी बोलतात.
त्या म्हणतात, “मी आजपर्यंत असे वडील पाहिलेले नाहीत, जे स्वत:च्याच जावयाची हत्या करतील. माझा मुलगा (राहुल) तर गेला, मात्र हीच माझा मुलगा आहे. तिलाच मुलगा मानून पुढचं आयुष्य जगू.”
फोटो स्रोत, Shahnawaz Ahmed/BBC
मात्र तनुप्रियासमोर तिचं प्रदीर्घ आयुष्य आहे.
अनीता देवी म्हणतात, “ठीक आहे. मात्र ती आता मुलगा बनून माझ्याकडे राहील. ती असल्यावर, बाबू-बाबू म्हणत सर्व दिवस निघून जातो. एरवी सरकार आम्हाला काय देणार? आमचा मुलगा परत करतील का. त्या लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी आमची इच्छा आहे.”
ऑगस्टमध्ये झालेल्या या घटनेनंतर तनुप्रियानं पुन्हा पुस्तकांना हात लावलेला नाही.
तिच्या खोलीत दोन बॅगा लटकत आहेत. कदाचित त्यातील एक राहुलची असेल.
तनुप्रिया म्हणते, “मी एकट्यानंच कोणतंही स्वप्न पाहिलं नव्हतं. जे काही होतं, ते राहुलबरोबरच होतं. आता तो राहिला नाही, मग अभ्यास का करायचा? मी फक्त माझ्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी जिवंत राहिली आहे.”
“रात्र झाल्यावर मी ती तशीच घालवण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून उशीरापर्यंत झोपलेली राहेन. दुपारी अकरा-बारा वाजता उठते. मी आणखी एक दिवस जगले, याचं समाधान त्यातून मिळतं.”
तनुप्रिया म्हणते, “माझ्या वडिलांनी माझ्या पतीची हत्या केली आणि माझी अवस्था प्राणविहिन शरीरासारखी केली आहे. कोणी मला मारेकऱ्याची मुलगी म्हणावं अशी माझी इच्छा नाही.”
प्रेमशंकर झा यांची बाजू अद्याप मिळालेली नाही. ते किंवा त्यांचे वकील यांच्यापैकी कोणीही याबद्दल प्रतिक्रिया दिल्यास ती याच बातमीच अपडेट करण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC



