Home LATEST NEWS ताजी बातमी मसूद अझहर : कंदाहार विमान अपहरण ते पुलवामा हल्ल्याचा आरोप; भारताच्या ‘मोस्ट...

मसूद अझहर : कंदाहार विमान अपहरण ते पुलवामा हल्ल्याचा आरोप; भारताच्या ‘मोस्ट वॉन्टेड’चा संपूर्ण प्रवास

2
0

Source :- BBC INDIA NEWS

मौलाना मसूद अझहर

फोटो स्रोत, Getty Images

8 मे 2025, 10:51 IST

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात कट्टरतावादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि 4 निकटवर्तीय सहकारी ठार झाले. याबाबत जैश-ए-मोहम्मदकडून (जेईएम) बुधवारी (7 मे) एक निवेदन प्रसिद्ध केले.

बीबीसी न्यूज उर्दूनुसार मृतांमध्ये मसूद अझहरची मोठी बहीण आणि मेहुणा, भाच्याची पत्नी आणि भाची तसेच पाच मुलांचा समावेश आहे.

या निवेदनानुसार, पाकिस्तानमधील बहावलपूर येथील सुभान अल्लाह मशिदीवर झालेल्या हल्ल्यात मसूद अझहरच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे.

याच बहावलपूरमध्ये 10 जुलै 1968 रोजी अल्लाहबख्श सबीर यांच्या कुटुंबात मसूद अझहरचा जन्म झाला होता. अझहरचे वडील सबीर बहावलपूर येथील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते.

भारताच्या गृह मंत्रालयाने 7 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ लोकांच्या यादीत 57 वर्षीय मसूद अझहरचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

भारताविरुद्धच्या अनेक प्रकरणांमध्ये मसूद अझहरचं नाव आलं आहे. ही यादी मोठी आहे.

या प्रकरणांमध्ये 1 ऑक्टोबर 2001 रोजी श्रीनगरमधील तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्य विधानसभा संकुलावर झालेल्या हल्ल्याचाही समावेश आहे. यात 38 जणांचा मृत्यू झाला होता.

यानंतर 12 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही मसूद अझहरचं नाव आहे. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे सहा जवान आणि इतर तिघे ठार झाले होते.

पुलवामा हल्ल्याच्या कटाचा आरोप

मसूद अझहरवर पुलवामा हल्ल्याचाही आरोप आहे. या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या 40 जवानांचा मृत्यू झाला होता.

मौलाना मसूद अझहरची सर्वाधिक चर्चा कंदहार हायजॅकच्या वेळी झाली होती. 1999 मध्ये कंदहार हायजॅकच्या वेळी कट्टरतावाद्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती. त्या तीन कट्टरतावाद्यांमध्ये मसूद अझहरच्या नावाचा समावेश होता.

भारत सरकारचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी मसूद अझहरला एका विशेष विमानात कंदहारला नेले. तेव्हापासून भारताच्या सुरक्षा यंत्रणा मसूद अझहरचा शोध घेत आहेत.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. ज्यात 40 हून अधिक जवान मृत्यूमुखी पडले होते.

फोटो स्रोत, EPA

मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद या भारतात प्रतिबंधित संघटनेचा म्होरक्या म्हणून ओळखला जातो. या संघटनेचे मुख्यालय पाकिस्तानी पंजाबमधील बहावलपूर येथे असल्याचा दावा भारत सरकार सातत्याने करत आहे.

ज्यामुळे भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानाच्या सीमेपासून 100 किलोमीटर आत जाऊन हल्ला केला आहे, त्यामागे हे देखील एक कारण मानलं जातं,

भारत अनेक वेळा पाकिस्तानला मसूद अझहरला भारताकडे सोपवण्याची मागणी करत आहे. परंतु, पाकिस्तान नेहमीच तो पाकिस्तानमध्ये नसल्याचा दावा करत आले आहे.

जिहादी कारवायांची सुरुवात

भारत 2009 पासून मौलाना मसूद अझहरच्या जैश-ए-मोहम्मदला संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी करत होता. पण चीन नेहमीच याविरोधात नकाराधिकाराचा (व्हेटो)चा वापर करत आला.

सुमारे दहा वर्षांच्या प्रयत्नांनंतर आणि पुलवामा हल्ल्यानंतर 1 मे 2019 रोजी संयुक्त राष्ट्रांनी मौलाना मसूद अझहरच्या संघटनेला ‘दहशतवादी संघटना’ घोषित केले होते, ज्यावरून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंध समितीवर प्रश्न उपस्थित केले होते.

मौलाना मसूद अझहर

फोटो स्रोत, Getty Images

मसूद अझहरच्या ज्या कारवायांचा भारतीय गृहमंत्रालयाने मोस्ट वॉन्टेड यादीत उल्लेख केला आहे, त्यानुसार, अझहरच्या नेतृत्वाखाली जैश-ए-मोहम्मद दहशतवादी कारवायांसाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम राबवते आणि तरुणांना भारतविरुद्ध कारवाई करण्यासाठी भडकवण्याचं काम करते.

जानेवारी 2002 मध्ये इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने मौलाना मसूद अझहरबद्दल तपशीलवार लेख प्रकाशित केला होता. या लेखानुसार, मसूद अझहरचा जिहादी कारवायांमध्ये सहभाग किंवा संबंध हा तो कराचीमध्ये शिकत असताना झाला होता..

मसूद अझहरला भारतात अटक

या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मसूद अझहरने भारतात प्रवेश सीमा रेषेच्या मार्गाने केला नव्हता. त्याने जानेवारी 1994 मध्ये ढाका येथून दिल्ली विमानाने भारतात प्रवेश केला होता.

काही दिवस दिल्लीच्या नामांकित हॉटेल्समध्ये थांबून मसूद अझहर आधी देवबंद आणि नंतर काश्मीरला पोहोचला. तिथून 10 फेब्रुवारी 1994 रोजी भारतीय सुरक्षा दलांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

मसूद अझहरच्या अटकेनंतर 10 महिन्यांच्या आत, कट्टरतावाद्यांनी दिल्लीमध्ये काही परदेशी नागरिकांचे अपहरण केले. त्यांच्या बदल्यात मसूद अझहरच्या सुटकेची मागणी त्यांनी केली होती.

कट्टरतावाद्यांची ही मोहीम अयशस्वी ठरली. कारण उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांना सहारनपूर येथून त्या परदेशी नागरिकांची सुटका करण्यात यश आलं.

मसूद अझहर

फोटो स्रोत, Getty Images

एका वर्षानंतर हरकत-उल-अन्सारने पुन्हा काही परदेशी नागरिकांचे अपहरण करून सुटका करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी झाला.

या घटनेनंतर 1999 मध्ये सुटका होईपर्यंत अझहरला जम्मू येथील कोट भलवाल तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्या वेळी तिथे काश्मीरमधून अटक करण्यात आलेले काश्मिरी, अफगाण आणि पाकिस्तानी कट्टरतावाद्यांची एक मोठी टोळी कैदेत होती.

यामध्ये दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिद्दीनचा श्रीनगरमधील कमांडर समजला जाणारा सैफुल्ला खान आणि त्याच्या दोन सख्ख्या कट्टरवादी भावांचाही समावेश होता.

कट्टरतावाद्यांवर किती प्रभाव?

श्रीनगरमधील बीबीसीचे माजी प्रतिनिधी झुबेर अहमद यांच्याशी संवाद साधताना सैफुल्लाने दावा केला होता की, मसूद अझहरने तुरुंगात असताना काही गोष्टींचा उल्लेख केला होता.

त्यानं सांगितलं होतं की, “मौलानाचं एकच काम होतं, भाषण देणं. त्यानं कधी बंदूक हातात घेतली नव्हती, कधी कोणाला मारलं नव्हतं. तो जिहादच्या विचारधारेवर भाषण देत असत.”

सैफुल्लाच्या मते, मौलाना अझहरच्या भाषणाचा तिथे असलेल्या सर्व कट्टरतावाद्यांवर जबरदस्त परिणाम होत असत. मात्र, झुबेर अहमद यांनी आपल्या वृत्तात यूट्यूबवरील मौलानाच्या क्लिप भारताविरोधात भडकावणाऱ्या, चिथावणीखोर असल्याचे नमूद केले होते.

मसूद अझहर

फोटो स्रोत, AFP

बीबीसी न्यूज उर्दूचे सध्याचे संपादक आसिफ फारूकी यांनी बीबीसी हिंदीशी संवाद साधताना सांगितलं होतं की, “पाकिस्तानमध्ये बंदी असूनही जैश-ए-मोहम्मदच्या काही हालचाली दिसून आल्या. त्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांची मदत मिळत होती, असं म्हटलं जातं. मात्र याचे कोणतेही प्रमाण किंवा ठोस पुरावा नाही.”

आसिफ फारूकी म्हणाले होते, “1999 मध्ये कंदहारच्या घटनेनंतर मसूद अझहरने अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या मदतीने जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली. दोन-तीन वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली.

मी आजपर्यंत मसूद अझहरच्या बाजूने उघडपणे किंवा अप्रत्यक्षपणे बोलणारा असा एकही नेता पाहिलेला नाही.”

पाकिस्तानमध्ये प्रतिमा कशी आहे?

आसिफ फारूकी सांगतात, ”पाकिस्तानमध्ये मसूद अझहरबद्दल चांगलं मत नाही. सर्वांना माहीत आहे की, तो एका कट्टरतावादी गटाचा प्रमुख आहे आणि तो कट्टरवादाचा प्रचार करतो.”

“काही कट्टरतावादी घटनांमध्ये त्याचा हात होता. तरुण वर्गाचं त्याच्याबद्दल चांगलं मत नाही. पण समाजाचा एक भाग असा आहे, जो त्याला पाठिंबा देतो. हे तेच लोक आहेत, जे भारताला आपला शत्रू मानतात.”

वास्तविक, मौलाना मसूद अझहर सार्वजनिक ठिकाणी कमी दिसला आहे. हाफिज सईदप्रमाणे पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये मसूद अझहरशी संबंधित बातम्या फार दिसत नाहीत.

गेल्या दोन दशकांमध्ये फक्त दोन वेळाच मसूद अझहर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसला आहे.

या विषयी आसिफ फारूकी यांनी सांगितलं होतं की, “कराचीतील एका मेळाव्यात मौलाना दिसला होता आणि त्यानंतर मुझफ्फराबादमधील जिहादी संघटनांच्या परिषदेतही त्याला पाहिलं गेलं होतं.”

SOURCE : BBC