Home world news marathi ‘मध्यरात्री 2.30 वाजता….’, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची नूर खान एअरबेसवर भारताने क्षेपणास्त्र हल्ला केल्याची...

‘मध्यरात्री 2.30 वाजता….’, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची नूर खान एअरबेसवर भारताने क्षेपणास्त्र हल्ला केल्याची अखेर कबुली

2
0

Source :- ZEE NEWS

Pakistan PM Shehbaz Sharif confirms Indian Attack: भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तान मात्र भारताचे दावे फेटाळत असून, याउलट आपणच भारताचं नुकसान केल्याचा दावा करत आहे. पण अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी रावळपिंडीतील नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी भारताने केलेल्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याची कबुली दिली आहे. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री 2.30 वाजता फोन करुन आपल्याला ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या हल्ल्याची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शहबाज शरीफ यांनी कबुली दिलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

इस्लामाबादमधील पाकिस्तान स्मारकात आयोजित एका विशेष ‘यौम-ए-तशकूर’ (Youm-e-Tashakur) कार्यक्रमाला संबोधित करताना, शहबाज शरीफ यांनी सांगितलं की, “9-10 मे च्या मध्यरात्री 2.30 च्या सुमारास, लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी मला सुरक्षित लाईनवरून फोन करून माहिती दिली की हिंदुस्तानी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात हल्ला केला आहे. मी तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगू शकतो की जनरल यांच्या आवाजात आत्मविश्वास आणि देशभक्ती होती”.

“आपल्या हवाई दलाने देशाला वाचवण्यासाठी आपल्याच देशात विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला. यासह त्यांनी चिनी विमानांमध्ये आधुनिक उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला,” असंही ते म्हणाले. 

10 मे रोजी पाकिस्तानने त्यांच्या तीन हवाई तळांना भारतीय क्षेपणास्त्रं आणि ड्रोनने लक्ष्य केल्याचं सांगितलं होतं. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पहाटे 4 वाजता इस्लामाबादमध्ये बोलावण्यात आलेल्या आणीबाणी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानी हवाई दलाच्या नूर खान (चकलाला, रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (झांग जिल्ह्यातील शोरकोट) या हवाई तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. 

सॅटेलाईट इमेजमध्ये पाकिस्तानी हवाई तळांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हे दिसत होतं. 25 एप्रिल 2025 आणि 10 मे 2025 रोजी घेतलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये हवाई तळाचं झालेलं नुकसान दिसून येत आहे, जे नूर खान हवाई तळावर संभाव्य स्ट्राईक किंवा हल्ला दर्शवितात.

शहबाज शरीफ यांच्या विधानावर भारतातील सत्ताधारी आणि विरोधकही व्यक्त झाले आहेत. “पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्वतः कबूल केलं आहे की जनरल असीम मुनीर यांनी त्यांना पहाटे 2.30 वाजता फोन करून भारताने नूर खान हवाई तळ आणि इतर अनेक ठिकाणी बॉम्बहल्ला केल्याची माहिती दिली. पंतप्रधान मध्यरात्री पाकिस्तानच्या आत हल्ल्यांच्या बातम्यांनी जागे झाले. हे ऑपरेशन सिंदूरच्या अचूकतेबद्दल आणि धाडसाबद्दल बरंच काही सांगते,” असं भाजपा आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही शरीफ यांच्यावर टीका केली. “भारत त्यांच्या नियंत्रणाखालील दहशतवादी हवाई तळ उद्ध्वस्त करत असताना या माणसासारखे बेफिकीर राहणे. खूप समाधानकारक आहे,” असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत. 

SOURCE : ZEE NEWS