Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे पारंपारिक शस्त्रू अण्वस्त्रसज्ज झाले, तरी देखील आतापर्यंत ते एकमेकांवर हल्ला करण्यासाठी भूदल, वायुदल आणि नौसेनेचा वापर करत होते.
ताज्या संघर्षात पहिल्यांदाच दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करून हल्ले करण्यात आले आहेत.
दोन्ही देशांकडून होत असलेल्या ड्रोनच्या वापराचा संघर्षावर काय परिणाम होणार, त्याची व्याप्ती वाढणार की मर्यादित राहणार, त्यामुळे युद्धाचं स्वरुप कसं बदलतं आहे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया.
दक्षिण आशियातील दोन अण्वस्त्रसज्ज शेजारी देशांमध्ये (भारत आणि पाकिस्तान) जगातील पहिलं ड्रोन युद्ध सुरू झालं आहे.
गुरुवारी (8 मे), पाकिस्ताननं भारतीय भूप्रदेशात आणि भारत-प्रशासित काश्मीरमधील तीन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केल्याचा आरोप भारतानं केला. भारताचा हा आरोप पाकिस्ताननं लगेचच फेटाळला.
पाकिस्ताननं दावा केला आहे की त्यांनी गेल्या काही तासांमध्ये भारताचे 25 ड्रोन पाडले आहेत. यासंदर्भात भारताकडून मौन पाळण्यात आलं आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, दोन्ही देशांकडून अस्थिर सीमेवर फक्त तोफखान्यानंच नव्हे तर मानवरहित शस्त्रांचा वापर करत जशास तसं उत्तर देण्यासाठी करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांच्या कित्येक दशकांपासूनचं शत्रूत्वं नव्या धोकादायक टप्प्यावर पोहोचलं आहे.
अमेरिका आणि इतर जागतिक शक्ती दोन्ही देशांना संयमाचा आग्रह धरत असताना हा प्रदेश तणावाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
शांतपणे हल्ला करणाऱ्या, दूरून संचालित करता येणाऱ्या आणि हल्ला केल्याचं नाकारता येणाऱ्या ड्रोनमुळे भारत-पाकिस्तान संघर्षात एक नवीन अध्यायाची सुरूवात होते आहे.
ड्रोनमुळे बदलतंय युद्धाचं स्वरुप
जाहरा मॅटिसेक, यूएस नेव्हल वॉर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.
त्यांनी बीबीसीला सांगितलं, “भारत-पाकिस्तान संघर्षाची वाटचाल एका नवीन ड्रोन युगाकडे होते आहे. असं युग ज्यात ‘अदृश्य डोळे’ आणि मानवरहित अचूकता संघर्षातील वाढ किंवा संयम ठरवू शकते. त्यामुळेच दक्षिण आशियातील वादग्रस्त आकाशात, जो देश ड्रोन युद्धात प्रभुत्व मिळवेल तो फक्त युद्धभूमी पाहणार नाही – तर त्या युद्धाचं स्वरुप, दिशा ठरवेल.”
बुधवारी (7 मे) सकाळपासून पाकिस्ताननं म्हटलं आहे की, भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यात आणि सीमेपलीकडून केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात पाकिस्तान आणि पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये 36 जण मारले गेले आहेत आणि 57 जण जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या बाजूला, भारताच्या सैन्यानं माहिती दिली आहे की, पाकिस्ताननं केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात किमान 16 नागरिक मारले गेले आहेत.
गेल्या महिन्यात पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक कट्टरतावादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याचं भारतानं आग्रहानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं या हल्ल्यात कोणताही सहभाग असल्याचं नाकारलं आहे.
पाकिस्तानच्या लष्करानं गुरुवारी (8 मे) जाहीर केलं की त्यांनी कराची, लाहोर आणि रावळपिंडीसह वेगवेगळ्या शहरांमध्ये भारताचे 25 ड्रोन पाडले आहेत.
हे ड्रोन इस्रायली बनावटीचे हॅरॉप ड्रोन असल्याचं वृत्त आहे. हे ड्रोन तांत्रिक आणि शस्त्रास्त्रावर आधारित प्रतिकारक उपायांचा वापर करून पाडण्यात आल्याचं वृत्त आहे.
भारतानं दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानचे अनेक हवाई संरक्षण रडार आणि प्रणाली उदध्वस्त केल्या आहेत. यात लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणालीचा समावेश आहे. पाकिस्ताननं मात्र याचा इन्कार केला आहे.
आधुनिक युद्धातील ड्रोनची भूमिका
आधुनिक युद्धात, लेझर-गाइडेड क्षेपणास्त्रं आणि बॉम्ब, ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनं (यूएव्ही) ही महत्त्वाची बनली आहेत. यामुळे लष्करी कारवायांची अचूकता आणि कार्यक्षमता लक्षणीयरित्या वाढते.
ते हवाई हल्ल्यांसाठी समन्वय साधू शकतात किंवा जर ते सुसज्ज असतील तर थेट लेझरद्वारे लक्ष्यं निश्चित करू शकतात आणि तात्काळ लढाईस उपयुक्त ठरू शकतात.
ड्रोन शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीवर दबाव आणू शकतात किंवा त्याची दिशाभूल करू शकतात. हे ड्रोन वादग्रस्त हवाई क्षेत्रात उड्डाण करून शत्रूच्या रडार उत्सर्जनाला चालना देऊ शकतात, ज्यामुळे या रडारवर लॉइटरिंग ड्रोन किंवा अँटि-रेडिएशन क्षेपणास्त्रांसारख्या शस्त्रांद्वारे हल्ला केला जाऊ शकतो.
प्राध्यापक मॅटिसेक म्हणतात, “रशिया आणि युक्रेन त्यांच्यातील युद्धात असंच करत आहेत. ड्रोनची भूमिका दुहेरी स्वरुपाची असते. ते एकीकडे लक्ष्यावर हल्ला करू शकतात किंवा दिशाभूल करू शकतात.”
“ज्यामुळे शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीची कार्यक्षमता कमी करण्यासंदर्भात ड्रोनमुळे सैन्याची शक्ती वाढते, तेही कोणत्याही लढाऊ विमानांना धोक्यात न घालता.”
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भारताच्या ड्रोन ताफ्यामध्ये प्रामुख्यानं लष्करी गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी टेहळणी करणाऱ्या आयएआय सर्चर आणि हेरॉनसारख्या इस्रायल-निर्मित यूएव्हींनी सज्ज आहे.
तसंच त्यात हार्पी आणि हॅरॉप लॉईटरिंग ड्रोनचा समावेश आहे, जे स्वतंत्रपणे लष्करी गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आणि अचूक हल्ला करण्यासाठी सक्षम आहेत.

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images
विशेषकरून हॅरॉप, अतिशय उच्च दर्जाच्या, अचूकतेनं हल्ला करण्यास सक्षम असलेल्या युद्धाच्या दिशेनं वाटचालीचे संकेत देतं. त्यातून आधुनिक युद्ध किंवा संघर्षामधील लॉईटरिंग शस्त्र किंवा ड्रोनचं वाढतं महत्त्व दिसून येतं, असं तज्ज्ञ म्हणतात.
लॉईटरिंग ड्रोन किंवा उपकरण म्हणजे अशा प्रकारचे ड्रोन जे जिथे हल्ला करायचा आहे त्या प्रदेशात किंवा भागात जाऊन लक्ष्यावर टेहळणी करतात, त्याची निवड करतात, त्यासाठी हवेत वाट पाहतात आणि नंतर संधी मिळताच अचूकतेनं हल्ला करतात.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हेरॉन ड्रोन हे, शांतता काळात देखरेख करण्यासाठी आणि लढाईच्या कारवायांसाठी अशा दोन्हींसाठी भारताचे “आकाशातील अधिक उंचीवरील डोळे आहेत.”
आयएआय सर्चर एमके II हे युद्धआघाडीवर हल्ला किंवा कारवाई करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. ते 18 तासापर्यंत कारवाई करू शकतात. त्यांचा पल्ला किंवा रेंज 300 किमीची (186 मैल) असते आणि ते 7,000 मीटर (23,000 फूट) पर्यंतच्या उंचीवर उड्डाण करू शकतात.
भारत आणि पाकिस्तानची ड्रोनसज्जता किती?
भारताकडील लढाऊ ड्रोनची संख्या “माफक” स्वरुपाची आहे, असं अनेकांना वाटतं.
तरी देखील अमेरिकेकडून 31 एमक्यू-9बी प्रीडेटर ड्रोन्स विकत घेण्यासाठी अलीकडेच केलेल्या 4 अब्ज डॉलरच्या करारामुळे भारताच्या हल्ला करण्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
एमक्यू-9बी प्रीडेटर ड्रोन्स 40 तासांपर्यत आणि 40,000 फूट उंचीपर्यंत उडू शकतात.
भारत मोठ्या प्रमाणात म्हणजे झुंडीनं म्हणजे एकाच वेळी मोठ्या संख्येनं ड्रोनचा वापर करण्याचे डावपेचदेखील विकसित करतो आहे.
यासाठी हवाई संरक्षण प्रणालीला पूर्णपणे व्यापून टाकण्यासाठी भारत मोठ्या संख्येनं छोटे यूएव्ही तैनात करतो आहे. यामुळे अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करता येतो, असं तज्ज्ञ म्हणतात.
पाकिस्तानचा ड्रोनचा ताफा “विस्तृत स्वरुपाचा आणि वैविध्यपूर्ण” आहे. त्यात पाकिस्तानमध्ये निर्मित आणि आयात करण्यात आलेल्या ड्रोनचा समावेश आहे, असं एजाज हैदर यांनी बीबीसीला सांगितलं.
ते लाहोरस्थित संरक्षणविषयक बाबींचे विश्लेषक आहेत.
तुर्की आणि देशातील उत्पादक, यातील उल्लेखनीय ड्रोन म्हणजे चिनी बनावटीचे सीएच-4, तुर्की बनावटीचे बायराक्तर अकिन्सी आणि पाकिस्ताननं स्वत: विकसित केलेले बुराक आणि शाहपर ड्रोन यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय पाकिस्ताननं लॉईटरिंग शस्त्रं देखील विकसित केली आहेत. त्यामुळे त्यांची हल्ला करण्याची क्षमता वाढली आहे.
एजाज हैदर पुढे म्हणाले की जवळपास एक दशकभरापासून पाकिस्तानचं हवाई दल (पीएएफ) त्यांच्या कारवायांमध्ये मानवरहित प्रणालींचा सक्रियपणे समावेश करतं आहे. “लॉयल विंगमन” ड्रोन विकसित करणं हे त्यांचं प्रमुख एक लक्ष्य आहे. हे मानवरहित हवाई वाहन किंवा ड्रोन, लढाऊ विमानांबरोबर समन्वयानं काम करण्यासाठी विकसित करण्यात आले आहेत.”
प्राध्यापक मॅटिसेक यांना वाटतं की “हॅरॉप आणि हेरॉन ड्रोनचा पुरवठ्यासाठी इस्रायलकडून मिळणारी तांत्रिक मदत भारतासाठी महत्त्वाची ठरली आहे. तर पाकिस्तान तुर्की आणि चिनी ड्रोनवर अवलंबून आहे. यातून शस्त्रास्त्रांच्या सुरू असलेल्या स्पर्धेवर प्रकाश पडतो.”
भारत आणि पाकिस्ताननं अलीकडेच एकमेकांवर ड्रोनचा वापर करून केलेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या शत्रुत्वात लक्षणीय वाढ झाली आहे.
मात्र रशिया-युक्रेन युद्धं ज्याप्रमाणे ड्रोन-केंद्रीत असल्याचं दिसून आलं आहे, त्यापेक्षा भारत-पाक संघर्ष लक्षणीयरित्या वेगळा दिसतो आहे, असं तज्ज्ञ म्हणतात.
रशिया-युक्रेन युद्धात ड्रोन लष्करी कारवायांच्या केंद्रस्थानी आहेत. तिथे दोन्ही बाजूंनी टेहळणी करण्यासाठी, लक्ष्य करण्यासाठी आणि थेट हल्ला करण्यासाठी हजारो यूएव्ही तैनात केले जात आहेत.
भारत-पाक संघर्ष नेमका कोणत्या दिशेनं?
मनोज जोशी भारतातील संरक्षण विश्लेषक आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं, “सध्या सुरू असलेल्या संघर्षात लढाऊ विमानं किंवा मोठ्या क्षेपणास्त्रांऐवजी ड्रोनचा वापर करणं हा खालच्या स्तरावरील लष्करी पर्याय आहे. लढाऊ विमानांपेक्षा ड्रोनमध्ये कमी शस्त्रं किंवा दारूगोळा असतो.”
“त्यामुळे एका दृष्टीनं हा संयमितपणे करण्यात आलेला हल्ला किंवा संयमितपणे उचलण्यात आलेलं पाऊल आहे. मात्र जर हे व्यापक स्वरुपाच्या हवाई हल्ल्याआधी उचलण्यात आलेलं सुरुवातीचं पाऊल असेल तर मात्र संपूर्ण कॅल्क्युलेशनच बदलतं.”
एजाज हैदर यांना वाटतं की जम्मूमधील “ताजी ड्रोन कारवाई हा तात्काळ केलेल्या चिथावणीला पाकिस्ताननं दिलेला डावपेचात्मक प्रतिसाद दिसतो आहे. तो (पाकिस्तानकडून) करण्यात आलेला व्यापक स्वरुपाचा प्रतिहल्ला नाही.”
हैदर पुढे म्हणतात, “भारताविरुद्ध करण्यात आलेला खरा प्रत्युत्तरासाठीचा हल्ला धक्कादायक आणि विस्मयकारक असेल. तो कदाचित अधिक व्यापक आणि विस्तृत उद्दिष्टांना लक्ष्य करणारा असेल, ज्यात मानवसंचालित आणि मानवरहित अशा दोन्ही प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वापर असेल.”
“अशा कारवाईचा किंवा हल्ल्याचा उद्देश निर्णायक परिणाम साध्य करणं हा असेल. त्यातून सध्याच्या जशास तसं हल्ल्या पलीकडे लक्षणीय वाढ दिसून येईल.”
युक्रेनमधील युद्धात ड्रोनच्या वापरानं युद्धाला मूलभूतपणे आकार दिला असला तरी, भारत-पाकिस्तान संघर्षात ड्रोनची भूमिका अधिक मर्यादित स्वरूपाची आणि प्रतिकात्मक राहिली आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, DASSAULT RAFALE
दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र डागण्यासाठी त्यांच्या लढाऊ विमानांचा देखील वापर करत आहेत.
“आपण सध्या जे ड्रोन युद्ध पाहत आहोत, ते कदाचित जास्त काळ सुरू राहणार नाही. एका मोठ्या संघर्षाची ही फक्त सुरुवात असू शकते,” असं जोशी म्हणतात.
“हे तणाव कमी होण्याचं किंवा तणाव वाढण्याचं चिन्हं असू शकतं – दोन्ही गोष्टींची शक्यता आहे. आपण आता महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. इथून पुढे हा संघर्ष कोणत्या दिशेला जाईल हे अनिश्चित आहे.”
स्पष्टपणे भारत ड्रोनचा समावेश त्याच्या अचूकतेनं हल्ला करण्याच्या धोरणात करतो आहे. यामुळे लढाऊ विमानांनी सीमा ओलांडल्याशिवाय लक्ष्यावर हल्ला करणं शक्य होतं. मात्र या बदलामुळे गंभीर प्रश्नदेखील उपस्थित होतात.
“ड्रोनमुळे राजकीय आणि लष्करी कारवाईची व्याप्ती कमी होते. त्यामुळे संघर्ष वाढण्याचा धोका कमी करत टेळहणी करण्याचे आणि हल्ला करण्याचे पर्याय उपलब्ध होतात,” असं प्राध्यापक मॅटिसेक म्हणतात.
“मात्र ड्रोनमुळे संघर्ष वाढण्याची एक नवीन परिस्थितीदेखील निर्माण होते. पाडलेला प्रत्येक ड्रोन, उदध्वस्त केलेलं प्रत्येक रडार, दोन अण्वस्त्रसज्ज देशांमधील या तणावाच्या वातावरणात संभाव्य चकमकीचं कारण बनतो” असं प्राध्यापक मॅटिसेक पुढे म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC