Home LATEST NEWS ताजी बातमी भारत-पाकिस्तान तणावानंतर आयपीएल आठवडाभर स्थगित; उरलेले सामने कुठे होतील?

भारत-पाकिस्तान तणावानंतर आयपीएल आठवडाभर स्थगित; उरलेले सामने कुठे होतील?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, जान्हवी मुळे
  • Role, बीबीसी मराठी
  • Twitter,
  • 9 मे 2025

    अपडेटेड 9 मे 2025

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत. बीसीसीआयनं तशी अधिकृत घोषणा केली आहे.

आता परिस्थितीचा आढावा घेऊन मगच स्पर्धेचे उरलेले सामने कधी आणि कुठे खेळवायचे याविषयीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे.

आयपीएलमध्ये सहभागी फ्रँचायझी तसंच खेळाडूंनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

आता आयपीएलचे राहिलेले सामने कुठे होऊ शकतात, याविषयीही चर्चा सुरू झाली आहे.

बीसीसीयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की “आयपीएलच्या गव्हर्निंग कौंसिलनं स्पर्धेशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा केल्यावरच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंच्या भावना आणि त्यांना वाटत असलेली काळजी मांडली. ब्रॉडकास्टर्स, स्पॉन्सर्स आणि प्रेक्षकांची बाजूही जाणून घेतली.”

“आमच्या सैन्यदलांची ताकद आणि क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, सर्वांच्या एकत्रित हिताचा विचार करून बोर्डानं हा निर्णय घेतला आहे. आम्ही राष्ट्राच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत आणि भारत सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. क्रिकेट हे राष्ट्रीय आवड असलं तरी देशाचं सार्वभौमत्व, निष्ठा आणि सुरक्षिततेशिवाय काहीही मोठं नाही,” असं या पत्रकात म्हटलं आहे.

गुरूवारी (8 मे रोजी) धरमशाला इथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स मधला सामना फ्लडलाईटमध्ये बिघाडाचं कारण देत मध्येच रद्द करण्यात आला होता.

त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव असताना आयपीएल सुरू ठेवावी का? या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते आहे, हे सुरक्षेच्या दृष्टीनं कितपत योग्य आहे? असे प्रश्नही काही चाहते आणि क्रिकेट विश्लेषकांनी विचारले होते.

आयपीएलची ट्रॉफी

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर बीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल परिस्थितीचा आढावा घेत असून त्यानंतर यंदाची स्पर्धा सुरू राहील की नाही, यावर विचार केला जाईल अशी माहिती आयपीएल चेअरमन अरुण धूमल यांनी त्यानंतर दिली.

आज (9 मे रोजी) सकाळी हे सामने स्थगित होत असल्याची माहिती आयपीएलशी निगडीत काही पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली होती. त्यानंतर वेगवेगळ्या फ्रँचायझींनीही स्पर्धेपेक्षा देश महत्त्वाचा, अशा आशयाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर केल्या होत्या.

अखेर स्पर्धा आठवडाभरासाठी स्थगित केली आहे.

आयपीएल ही क्रिकेट जगतातली सर्वात मोठी लीग असून त्यात पाकिस्तान वगळता जगभरातल्या अनेक देशांचे क्रिकेटपटू सहभागी होतात. दहा टीम्समध्ये मिळून यंदा साधारण 75 परदेशी खेळाडू सहभागी झाले आहेत.

त्याशिवाय प्रशिक्षक, संघ व्यवस्थापनातील इतर व्यक्ती, समालोचक, चीअरलीडर्स म्हणून अनेक परदेशी नागरीकांचा हातभार लागतो. यातल्या काहींनी चिंता व्यक्त केली आहे.

आयपीएलचे उरलेले सामने कुठे आणि कधी होतील?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आणि त्यातही भारतीय क्रिकेटचा व्यस्त कार्यक्रम पाहता आयपीएलसाठी पुढच्या कालावधीत जागा तयार करणं हे आव्हानात्मक ठरू शकतं.

पण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात स्पर्धेसाठी जागा तयार केली जाऊ शकते.

7 मे रोजी कोलकात्यातील आयपीएल सामन्यासाठी जमा झालेली गर्दी

फोटो स्रोत, Getty Images

ऑगस्टमध्ये भारताची पुरुष टीम बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणं अपेक्षित आहे. पण तिथली परिस्थिती पाहता बांगलादे दौराही रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसंच सप्टेंबरमध्ये आशिया कप नियोजित आहे मात्र भारत आणि पाकिस्तानमधला तणाव पाहता या स्पर्धेविषयीही अनिश्चितता आहे. या दोन्हींपैकी एखादी स्पर्धा रद्द झाली तर आयपीएल तेव्हा खेळवता येईल.

याआधी 2021 मध्ये आयपीएल अशी मध्यात स्थगित करण्यात आली होती. कोव्हिडची दुसरी लाट आणि लॉकडाऊनमुळे तो निर्णय घ्यावा लागला.

त्यानंतर काही महिन्यांनी आयपीएलचे उरलेले सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत खेळवण्यात आले होते.

पण आठवडाभरातच परिस्थिती निवडळली तर आयपीएलचे उर्वरीत सामने भारतातच तुलनेनं सुरक्षित ठिकाणी हलवता येतील.

मुंबईत 26/11 च्या हल्ल्यानंतर इंग्लंडचा संघ भारताबाहेर गेला होता. पण सुरक्षिततेची हमी दिल्यावर ते भारतात परतले आणि मग हल्ल्यानंतर तीनच आठवड्यात चेन्नईत कसोटी सामना खेळवण्यात आला होता.

भारतातच गर्दीशिवाय सामने भरवणं किंवा भारताबाहेर आयोजन करणं हे पर्यायही बीसीसीआयसमोर आहेत.

आयपीएलमध्ये कोणते सामने बाकी होते?

आयपीएलमध्ये साखळी फेरी आणि प्लेऑफ मिळून अजून सोळा सामने बाकी होते आणि त्यातले अनेक सामने उत्तर भारतात आणि पश्चिम भारतातही होणार होते.

हे सामने पुढीलप्रमाणे :

  • 9 मे – लखनौ विरुद्ध बंगळुरू – लखनौ – 7:30 PM
  • 10 मे – हैदराबाद विरुद्ध कोलकाता – हैदराबाद – 7:30 PM
  • 11 मे – पंजाब विरुद्ध मुंबई – अहमदाबाद – 3:30 PM
  • 11 मे – दिल्ली विरुद्ध गुजरात – दिल्ली – 7:30 PM
  • 12 मे – चेन्नई विरुद्ध राजस्थान – चेन्नई – 7:30 PM
  • 13 मे – बंगळुरू विरुद्ध हैदराबाद – बंगळुरू – 7:30 PM
  • 14 मे – गुजरात विरुद्ध लखनौ – अहमदाबाद – 7:30 PM
  • 15 मे – मुंबई विरुद्ध दिल्ली – मुंबई – 7:30 PM
  • 16 मे – राजस्थान विरुद्ध पंजाब – जयपूर – 7:30 PM
  • 17 मे – बंगळुरू विरुद्ध कोलकाता – बंगळुरू – 7:30 PM
  • 18 मे – गुजरात विरुद्ध चेन्नई – अहमदाबाद – 3:30 PM
  • 18 मे – लखनौ विरुद्ध हैदराबाद – लखनौ – 7:30 PM
  • 20 मे – क्वालिफायर 1 – हैदराबाद – 7:30 PM
  • 21 मे – एलिमिनेटर – हैदराबाद – 7:30 PM
  • 23 मे – क्वालिफियार 2 – कोलकता – 7:30 PM
  • 25 मे – फायनल – कोलकाता 7:30 PM

धरमशाला इथे भरलेलं स्टेडियम असं रिकामं केलं

धरमशालातील HPCA स्टेडियम आयपीएल सामन्यादरम्यान फ्लडलाईट बंद झाल्यावर अंधारात बुडालं तेव्हाचं दृश्य.

फोटो स्रोत, Getty Images

त्यावेळी हिमाचल प्रदेशच्या धरमशाला इथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमधला सामना सुरू होता. ब्लॅकआऊट झाल्यानंतर हा सामना आधी थांबवण्यात आला आणि मग रद्द करण्यात आला.

धरमशालापासून जवळच असलेल्या जम्मू आणि पठाणकोट या शहरांमध्ये झालेल्या हवाई हल्ल्याचा अलर्ट आल्यानंतर हे पाऊल उचललं गेलं.

spectators

फोटो स्रोत, Getty Images

वीज गेल्यामुळे मैदानातला एक फ्लडलाईट बंद पडला. मग दुसरा फ्लडलाईट बंद झाला आणि खेळाडू मैदानाबाहेर गेले.

लाईट्समध्ये तांत्रिक बिघाडामुळे सामना रद्द करावा लागत असल्याचं त्यानंतर बीसीसीआयनं जाहीर केलं.

दोन्ही संघांच्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सुरक्षितपणे स्टेडियमबाहेर काढण्यात आलं.

धरमशाला स्टेडियमची क्षमता साधारण 23,000 एवढी आहे आणि आजच्या सामन्यासाठी स्टेडियम 80 टक्के भरल्याचं सांगितलं जात आहे. कुठलाही मोठा गोंधळ न होऊ देता सुरक्षा रक्षकांनी या सर्वांना सुरक्षितपणे स्टेडियममधून बाहेर काढलं.

सोशल मीडियावर काहींनी आपले अनुभव त्यानंतर व्यक्त केले आहेत.

11 मे रोजीचा IPL सामनाही धरमशालाऐवजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये खेळवण्यात येईल असं बीसीसीआयनं काही तास आधी जाहीर केलं होतं.

हिमाचल प्रदेशातील कांगडा इथला विमानतळ बंद असल्यानं खेळाडू धरमशालामध्ये पोहोचू शकणार नसल्यामुळे 11 मे रोजीचा हा सामना हलवण्यात आल्याचंही बीसीसीआयनं सांगितलं आहे.

दिल्ली आणि पंजाबमधल्या सामन्यासाठी धरमशाला इथे गेलेल्या खेळाडू आणि आयोजनात सहभागी सदस्यांना विशेष ट्रेननं परत आणलं जाणार असल्याची माहिती भारतीय माध्यमांनी दिली.

पाकिस्तानातही क्रिकेटवर प्रश्नचिन्ह

हे सामने रावळपिंडी, लाहौर आणि मुलतानमध्ये खेळवले जाणार होते. आता स्पर्धेचं नवं वेळापत्रक येत्या काळात जाहीर करू असंही त्यांनी म्हटलं आहे.

8 मे रोजी रावळपिंडीमध्ये पेशावर झल्मी आणि कराची किंग्स या संघांमधला पीएसएलचा सामना होणार होता. पण तो रद्द करण्यात आला. पीसीबीनं सामना रद्द करण्याचं जाहीर केलं, तेव्हा कुठलं कारण दिलं नाही.

मात्र काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रावळपिंडी स्टेडियमजवळ एका ड्रोन हल्ल्यानंतर हा सामना स्थगित करण्यात आला. पाकिस्तान सरकारनं या ड्रोनविषयी अधिकृत पुष्टी केलेली नाही.

पण पाकिस्तानच्या लष्करानं भारतीय ड्रोन स्टेडियमजवळ पाडल्याचा दावा केला. भारतानं त्याविषयी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रावळपिंडी

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानात 11 एप्रिल ते 18 मे या कालावधीत पीएसएलचं आयोजन करण्यात आलं आहे. इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडीजसह बांग्लादेशातले खेळाडूही या स्पर्धेत खेळत आहेत.

पण भारतानं पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानची हवाई हद्द जवळपास बंद झाली आणि हे खेळाडू आता पाकिस्तानातून बाहेर पडू शकत नाहीयेत. त्याविषयीही काहींनी चिंता व्यक्त केली आहे.

इतर देशांनी काय म्हटलं आहे?

भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या विदेशी खेळाडूंमध्येही चिंतेचं वातावरण पसरलं. अनेकांनी घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना वेळेत घरी पाठवण्याची व्यवस्थाही केली जात असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे.

वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशनसह आम्ही या प्रदेशात असलेल्या वेस्ट इंडीजच्या खेळाडूंच्या स्वास्थ्य आणि सुरक्षेची काळजी घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डही ब्रिटनच्या परराष्ट्र विभागाच्या संपर्कात आहे. बुधवारी (7 मे 2025 ) रोजीच इंग्लंडचे काही खेळाडू, प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांनी यासंदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलवर चर्चा केली.

तर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानंही सुरक्षिततेचा आढावा घेत असल्याचं म्हटलं आहे. बांगलादेशाचे काही खेळाडू पाकिस्तानात खेळत असून बांगलादेश क्रिकेट बोर्डही तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC