Source :- ZEE NEWS
Donald Trump on Pahalgam Terror Attack: 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा बळी घेतला होता. या हल्ल्यावर आता फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या हल्ल्याला ‘वाईट हल्ला’ असे म्हटले आहे. रोमला जाताना एअर फोर्स वन विमानात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच तणाव राहिला आहे आणि दोन्ही देश आपापसात तो सोडवतील.”
‘मी भारत-पाकिस्तानच्या खूप जवळ ‘ – डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मी भारताच्या खूप जवळ आहे आणि मी पाकिस्तानच्याही खूप जवळ आहे. ते हजार वर्षांपासून काश्मीरमध्ये लढत आहेत. काश्मीर वाद हजार वर्षांपासून चालू आहे, कदाचित त्याहूनही जास्त काळ. तो एक वाईट हल्ला होता.” ते पुढे म्हणाले, “त्या सीमेवर 1500 वर्षांपासून तणाव आहे. हे नेहमीच असेच चालत आहे, पण मला खात्री आहे की ते त्यावर कसा तरी उपाय शोधतील. मी दोन्ही नेत्यांना ओळखतो. पाकिस्तान आणि भारत यांच्यात खूप तणाव आहे, पण तो नेहमीच राहिला आहे.”
भारतात पुलवामा नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतेक सगळेच पर्यटक होते. 2019 च्या पुलवामा बॉम्बस्फोटानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक आहे असे म्हंटले जात आहे.
हे ही वाचा: “मलाही फाशी द्या…” पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया, भारताला पाठिंबा
भारताने पाकिस्तानविरुद्ध केली कारवाई
दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक प्रकारची कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत सिंधू पाणी करार निलंबित करणे, अटारी बॉर्डर ताबडतोब बंद करणे यांचा समावेश होता. याशिवाय, बीएसएफने अटारी-वाघा सीमेवरील रिट्रीट सेरेमनी मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित केली.
SOURCE : ZEE NEWS