Home LATEST NEWS ताजी बातमी भारतात आता मिळणार ई-पासपोर्ट, काय आहेत वैशिष्ट्यं?

भारतात आता मिळणार ई-पासपोर्ट, काय आहेत वैशिष्ट्यं?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

India E Passport

फोटो स्रोत, Getty Images

देशाबाहेर प्रवास करायचा असेल, तर आपल्याला लागतो – पासपोर्ट. एखाद्या देशाचे आपण नागरिक असल्याची ही ओळख असते.

भारतामध्ये आता ‘पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0’ या मोहिमेअंतर्गत ई-पासपोर्ट द्यायला सुरुवात झालीय.

ई-पासपोर्ट म्हणजे काय? तो नेहमीच्या पासपोर्टपेक्षा वेगळा असतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आता असणारा पासपोर्ट बाद ठरणार का?

अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

ई-पासपोर्ट म्हणजे काय?

इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट हे कागदी पासपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक पासर्पोट यांचं कॉम्बिनेशन आहे. या पासपोर्ट मध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच RFID चिप असेल आणि पासपोर्टच्या आत बसवण्यात आलेला एम्बेडेड अँटिना असेल.

पासपोर्टधारकाचे वैयक्तिक तपशील, जसं की, नाव, जन्मतारीख, पासपोर्ट नंबर, बायोमेट्रिक माहिती म्हणजे फेस रेकग्निशनसाठीचा डेटा, बोटांचे ठसे ही सगळी माहिती या चिपमध्ये असेल.

आता असणारे कागदी पासपोर्ट आणि ई-पासपोर्ट यामध्ये दिसायला फरक असेल. ई-पासपोर्टच्या पुढच्या कव्हरवरच खालच्या बाजूला एक सोनेरी रंगाचं चिन्ह असेल. शिवाय, विविध देशांचे व्हिसा स्टँप करण्यासाठी या ई-पासपोर्टमध्ये पानंही असतील.

ई-पासपोर्टमध्ये सुरक्षेसाठी कोणत्या सुविधा?

बेसिक अॅक्सेस कंट्रोल (BAC) म्हणजे ठराविक उपकरणं वापरूनच पासपोर्ट चिप स्कॅन करता येईल. इतर कोणत्याही गॅजेट्सनी या चिप स्कॅन होणार नाहीत.

पॅसिव्ह ऑथेंटिकेशन (PA) म्हणजे चिपमध्ये साठवलेली माहिती ही तपासलेली असेल आणि या माहितीसोबत छेडछाड, बदल करता येणार नाहीत.

एक्स्टेंडेड अॅक्सेस कंट्रोल (EAC) म्हणजेच चिपमध्ये फेस रेकग्निशन, हाताच्या बोटांचे ठसे यांची माहिती असल्याने त्यासाठी अधिकची सुरक्षा असेल.

ई-पासपोर्टमुळे काय फायदा होईल?

यात आताच्या पासपोर्टपेक्षा सिक्युरिटी फीचर्स अधिक असतील. एखाद्या व्यक्तीचं नाव, ओळख दुसऱ्या कुणी चोरण्याची शक्यता यामुळे कमी होईल. कारण फिंगरप्रिंट, फेशियल रेकग्निशन जुळल्याशिवाय पासपोर्टचा वापर करता येणार नाही. बोगस पासपोर्ट्स तयार करता येणार नाहीत.

शिवाय, आंततराष्ट्रीय मानांकनांनुसार हा पासपोर्ट तयार करण्यात आल्याने जगभरातल्या सगळ्या विमानतळांवर तो आरामात वापरता येईल.

आताच्या घडीला इमिग्रेशनच्या तपासणीला वेळ लागतो. पण ई-पासपोर्टमुळे हे व्हेरिफिकेशन पटापट होईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करताना लागणारा इमिग्रेशनसाठीचा वेळ आणि रांगा कमी होतील.

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता अनेक देश व्हेरिफिकेशनसाठी बायमेट्रिक प्रणालीची मदत घेतायत. त्यामुळेच ई-पासपोर्ट असणाऱ्या भारतीय प्रवाशांनाही याचा फायदा होईल.

भारत इ पासपोर्ट

फोटो स्रोत, Getty Images

कोणत्या शहरांत ई-पासपोर्ट मिळत आहेत?

भारतात ई-पासपोर्टचा पायलट प्रोजेक्ट म्हणजे चाचणी सुरू झाली एप्रिल 2024 मध्ये. भुवनेश्वर आणि नागपूर या दोन शहरांमध्ये 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुमारे 80 हजार पासपोर्ट देण्यात आले.

टप्प्याटप्याने या सेवेचा देशभरात सगळीकडे विस्तार केला जाणार आहे.

नाशिकमधल्या सिक्युरिटी प्रेसमध्ये या ई-पासपोर्टची निर्मिती केली जातेय. माहिती सुरक्षित राहणं आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.

साधा पासपोर्ट अवैध ठरणार का?

तुमच्याकडे आता असणारा साधा पासपोर्ट अजूनही वैध आहे. तो लगेच बदलण्याची गरज नाही.

प्रत्येक पासपोर्टवर तो कोणत्या तारखेपर्यंत वैध आहे याची तारीख म्हणजे व्हॅलिडिटी एक्स्पायरी डेट असते. यानंतर तुम्हाला पासपोर्ट रिन्यू करावा लागतो. त्यामुळे तुमच्याकडे आता असणारा पासपोर्ट तुमच्या पासपोर्टवरच्या या तारखेपर्यंत वैध असेल.

त्यानंतर जेव्हा तुम्ही पासपोर्ट रिन्यू करायला जाल, तोपर्यंत तुमचं पासपोर्ट केंद्र ई-पासपोर्ट सेवा द्यायला लागलं असेल, तर तुम्हालाही ई-पासपोर्ट मिळेल. यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया करावी लागणार नाही.

ई-पासपोर्ट वापरणारे इतर देश

अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलियासारखे देश आधीपासूनच ई-पासपोर्ट वापरत आहेत.

सध्या एकूण 140 देश आणि संघटनांनी ई-पासपोर्ट अमलात आणला असून, जगभरात एक अब्जापेक्षा जास्त लोकांकडे असे पासपोर्ट असल्याचं ICAO ने म्हटलंय.

SOURCE : BBC