Home LATEST NEWS ताजी बातमी भारताच्या हवाई हल्ल्याला पाकिस्तान कसं प्रत्युत्तर देईल? जाणून घ्या 4 महत्त्वाचे प्रश्न

भारताच्या हवाई हल्ल्याला पाकिस्तान कसं प्रत्युत्तर देईल? जाणून घ्या 4 महत्त्वाचे प्रश्न

3
0

Source :- BBC INDIA NEWS

पाकिस्तानं दावा केला आहे की, त्यांनी भारताची 5 लढाऊ विमानं पाडली आहेत. मात्र, भारतानं याला दुजोरा दिलेला नाही.

फोटो स्रोत, Reuters

रात्रीच्या वेळी केलेल्या एका नाट्यमय कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील 9 ठिकाणी क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ला केल्याचं आणि विश्वासार्ह गुप्तचर माहितीच्या आधारे दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचं भारतानं म्हटलं आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार हा हवाई हल्ला मंगळवारी (6 मे) मध्यरात्री 01:05 ते 01:30 च्या दरम्यान 25 मिनिटांमध्ये करण्यात आला. या हल्ल्यानं तो परिसर हादरला आणि स्फोटांच्या आवाजानं तिथले रहिवासी हादरून जागे झाले.

पाकिस्ताननं म्हटलं आहे की, फक्त 6 ठिकाणी हल्ला झाला. पाकिस्ताननं असाही दावा केला आहे की, त्यांनी भारताची 5 लढाऊ विमानं आणि एक ड्रोन पाडलं आहे. मात्र, भारतानं अजून या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.

“भारतानं नियंत्रण रेषेपलीकडून केलेल्या हवाई हल्ल्यात आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात 31 जण मारले गेले आहेत आणि 57 जण जखमी झाले आहेत”, असं पाकिस्ताननं म्हटलं. नियंत्रण रेषा हीच जम्मू-काश्मीरमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील प्रत्यक्ष सीमा रेषा आहे.

दरम्यान, पाकिस्ताननं नियंत्रण रेषेपलीकडून केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं भारतीय सैन्यानं सांगितलं आहे.

भारताचं म्हणणं आहे, “पहलगाममधील हल्ल्याशी पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि सीमेपलीकडील घटकांचा संबंध असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत.” मात्र, पाकिस्ताननं स्पष्टपणे हे आरोप नाकारले आहेत.

पाकिस्ताननं याकडेदेखील लक्ष वेधलं आहे की, भारताने त्यांचे दावे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.

1. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्षात नव्यानं वाढ होणार का?

2016 मध्ये उरीमध्ये भारताचे 19 सैनिक मारले गेल्यानंतर भारतानं नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन ‘सर्जिकल स्ट्राईक’ केलं होतं.

1971 नंतर पाकिस्तानमध्ये अशी कारवाई पहिल्यांदाच झाली होती. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये हवाई स्तरावरील संघर्ष झाला होता.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पहलगाममधील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी केलेली कारवाई व्यापक स्वरुपाची आहे. यात एकाच वेळी पाकिस्तानस्थित तीन कट्टरतावादी गटांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं.

भारतानं म्हटलं आहे की, या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील सशस्त्र गटाच्या 9 तळांना लक्ष्य करण्यात आलं. यात लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदिनच्या प्रमुख तळांवर हल्ला करण्यात आला.

सियालकोटमधील दोन तळ हे या हल्ल्यातील सीमेपासून सर्वात जवळ असणारे लक्ष्य होते. ते सीमेपासून फक्त 6-18 किलोमीटर अंतरावर आहेत, अशी माहिती भारतानं दिली.

भारतानं म्हटलं आहे की, या हल्ल्यातील सर्वात दूरवरचं किंवा आतील लक्ष्य होतं, बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय. ते सीमेपासून आत पाकिस्तानात 100 किमी अंतरावर होतं.

नियंत्रण रेषेपासून 30 किमी अंतरावर मुझफ्फराबादमधील लष्कर-ए-तैयबाच्या तळाचा अलीकडेच काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याशी संबंध असल्याचं भारतानं सांगितलं. मुझफ्फराबाद ही पाकिस्तानप्रशासित काश्मीरची राजधानी आहे.

पाकिस्ताननं सांगितलं की, भारतानं 6 ठिकाणी हल्ला केला. मात्र या ठिकाणी दहशतवादी तळ असल्याचा आरोप पाकिस्ताननं नाकारला.

पाकिस्ताननं म्हटलं आहे की, पाकिस्तानप्रशासित काश्मीरची राजधानी असलेल्या मुझफ्फराबादसह सहा ठिकाणी हल्ला झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीस्थित श्रीनाथ राघवन यांनी बीबीसीला सांगितलं, “भारताच्या पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यातील अत्यंत स्पष्ट बाब म्हणजे, यावेळेस भूतकाळातील पॅटर्न्सपेक्षा भारताच्या लक्ष्यांमध्ये झालेला विस्तार.”

“आधीच्या बालकोटसारख्या हल्ल्यांमध्ये नियंत्रण रेषेपलीकडील पाकिस्तानप्रशासित काश्मीरवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं. नियंत्रण रेषा ही सैन्याची प्रचंड उपस्थिती असलेली सीमा आहे.”

ते पुढे म्हणाले, “यावेळेस भारतानं आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे पाकिस्तानातील पंजाबमध्ये हल्ला केला आहे. यात लश्कर-ए-तैयबाशी संबंधित बहावलपूर आणि मुरीदकेमधील दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा, दहशतवाद्यांची मुख्यालयं आणि ज्ञात ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं.”

“जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदिनच्या मालमत्तांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. यातून एक व्यापक आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तृत प्रत्युत्तर दिसून येतं. यातून सूचित होतं की, आता अनेक गट भारताच्या निशाण्यावर आहेत आणि या हल्ल्यातून व्यापक संदेश देण्यात आला आहे.”

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा ही दोन देशांना वेगळं करणारी अधिकृत मान्यताप्राप्त सीमा आहे. ती गुजरातपासून ते जम्मूपर्यंत विस्तारलेली आहे.

भारताने हल्ला केलेलं मुरिदके इथलं ठिकाण

फोटो स्रोत, Getty Images

अजय बिसारिया भारताचे पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त आहेत.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, “भारतानं बालाकोट प्लस (म्हणजे बालाकोटहून अधिक मोठी कारवाई) प्रत्युत्तर दिलं. त्याचा अर्थ, प्रतिबंधात्मक व्यवस्था स्थापित करणं आणि ज्ञात दहशतवादी तळांना लक्ष्य करणं असा होता.”

“मात्र त्याचबरोबर पाकिस्ताननं आणखी धारिष्ट करू नये, तणाव वाढवू नये असा भक्कम संदेश देखील त्यात होता.”

“हे हल्ले अधिक अचूक, लक्ष्यावर आधारित आणि भूतकाळातील हल्ल्यांपेक्षा अधिक दृश्यमान होते. त्यामुळेच पाकिस्तानला ते नाकारता येणं तितकंच कठीण आहे,” असं बिसारिया म्हणतात.

भारतीय सूत्रांचं म्हणणं आहे की या हल्ल्यांचा उद्देश “प्रतिबंधात्मक व्यवस्था पुन्हा स्थापित करणं” हा होता.

“भारत सरकारला वाटतं की, 2019 मध्ये स्थापित करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक व्यवस्थेचा प्रभाव कमी झाला आहे आणि ती पुनर्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे,” असं प्राध्यापक राघवन म्हणतात.

ते पुढे म्हणाले, “यात प्रतिबंधात्मक व्यवस्थेसाठी वेळोवेळी, वारंवार हल्ले करणं आवश्यक असतं या इस्रायलच्या धोरणाचं प्रतिबिंब उमटलेलं आहे.”

“मात्र जर आपण असं गृहित धरलं की, पाकिस्तानला फक्त प्रत्युत्तर दिलं म्हणजे दहशतवादाला आळा बसेल, तर आपण प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानला प्रोत्साहन देण्याचा धोका पत्करत आहोत आणि परिस्थिती लवकरच नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.”

2. या परिस्थितीचं रुपांतर व्यापक संघर्षात होऊ शकतं का?

बहुतांश तज्ज्ञांना वाटतं की, पाकिस्तानकडून प्रत्युत्तर येणं अपरिहार्य आहे आणि यातून राजनयिक बाबी पुढे येतील.

“पाकिस्तानकडून नक्कीच प्रतिक्रिया येईल. दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढू नये हे हाताळण्याचं आव्हान असेल. अशा वेळी संकटकाळातील राजनयिक हाताळणी महत्त्वाची ठरेल,” असं बिसारिया म्हणतात.

“पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला जाईल. मात्र दोन्ही देशांनी एकमेकांना प्रत्युत्तर देत पुढील पातळीवर जाऊ नये यासाठी पाकिस्तानच्या प्रत्युत्तरानंतर राजनयिक हाताळणी महत्त्वाची असेल,” असं ते म्हणाले.

एजाज हुसैन लाहोरमधील राजकीय आणि लष्करी विश्लेषक आहेत. त्यांच्यासारखे पाकिस्तानमधील तज्ज्ञ म्हणतात की, मुरीदके आणि बहावलपूरसारख्या ठिकाणी भारतानं सर्जिकल स्ट्राईक करणं, हे “सध्याच्या तणावामुळे मोठ्या प्रमाणात अपेक्षित होतं.”

डॉ. हुसैन यांना वाटतं की प्रत्युत्तरादाखल हल्ले होण्याची शक्यता आहे.

“पाकिस्तानी लष्करानं प्रसारमाध्यमांमध्ये केलेली वक्तव्यं आणि बदला घेण्याचा व्यक्त केलेला दृढनिश्चय पाहता, आगामी दिवसांमध्ये सीमेपलीकडून सर्जिकल स्ट्राईकच्या स्वरुपात प्रत्युत्तरात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे,” असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

मात्र डॉ. हुसैन यांना चिंता वाटते की, दोन्ही बाजूनं होणाऱ्या सर्जिकल स्ट्राईकचं “रुपांतर मर्यादित स्वरुपाच्या पारंपारिक युद्धात होऊ शकतं.”

बुधवारी (7 मे) जम्मूतील मुख्य शहरात तोफगोळ्याचा मारा झाल्यानंतर धुराचे लोट निघत आहेत

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेच्या अल्बानी विद्यापीठातील क्रिस्तोफर क्लॅरी यांना वाटतं की, भारतानं केलेल्या हल्ल्यांची व्याप्ती पाहता, “महत्त्वाच्या ठिकाणी दिसणारं नुकसान” आणि हल्ल्यात झालेली जीवितहानी लक्षात घेता, पाकिस्तानकडून प्रत्युत्तर दिलं जाण्याची मोठी शक्यता आहे.

“यापेक्षा वेगळं केल्यामुळे भारताला जेव्हा जेव्हा त्रास होईल तेव्हा पाकिस्तानवर हल्ला करण्याची परवानगी भारताला मिळेल आणि ती जशास तसं प्रत्युत्तर देण्याच्या पाकिस्तानी लष्कराच्या वचनबद्धतेच्या विपरित असेल,” असं क्लॅरी यांनी बीबीसीला सांगितलं. ते दक्षिण आशियाच्या राजकारणाचे अभ्यासक आहेत.

“भारतातील दहशतवाद आणि दहशवादाशी संबंधित गट आणि त्यांच्या पायाभूत सुविधांचं भारतानं जाहीर केलेलं लक्ष्य पाहता, मला वाटतं की, पाकिस्तान भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यापुरतंच स्वत:ला मर्यादित ठेवले. मात्र तसं होईलच असं निश्चित नाही,” असं ते म्हणाले.

दोन्ही देशांमधील तणाव वाढत असूनही काही तज्ज्ञांना अजूनही आशा वाटते की तणाव कमी होईल.

“एकमेकांवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवायांच्या फक्त एका फेरीनंतर आणि काही काळ नियंत्रण रेषेवर वाढलेल्या गोळीबारानंतर, आपण या संकटातून बाहेर पडू शकू याची चांगली शक्यता आहे,” असं क्लॅरी म्हणतात.

“मात्र तरीदेखील, दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याचा धोका अजूनही जास्त आहे. त्यामुळे 2002 नंतरचं हे “सर्वात धोकादायक” भारत-पाकिस्तान संकट बनलं आहे. अगदी आधीच्या म्हणजे 2016 आणि 2019 च्या तणावांपेक्षाही ते अधिक धोकादायक आहे,” असं ते पुढे म्हणाले.

3. आता पाकिस्तानकडून प्रत्युत्तर येणं अपरिहार्य आहे का?

पाकिस्तानातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भारतानं हल्ला करण्यापूर्वी युद्धाच्या उन्मादाचा अभाव असला तरी परिस्थिती लवकरच बदलू शकते.

“आमच्याकडे खोलवर विभागणी झालेला राजकीय वर्ग आहे. देशातील सर्वात लोकप्रिय नेता तुरुंगात आहे. तो नेता म्हणजे इमरान खान. इमरान खानच्या तुरुंगवासामुळे जनतेमध्ये लष्कराच्या विरोधात तीव्र भावना निर्माण झाली,” असं उमर फारूख म्हणतात. ते इस्लामाबादमधील विश्लेषक आहेत आणि जेन्स डिफेन्स वीकलीचे माजी प्रतिनिधी आहेत.

ते म्हणतात, “2016 किंवा 2019 च्या तुलनेत आज पाकिस्तानातील जनता पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा देण्यासाठी फारच कमी उत्सुक आहे. नेहमी येणारी युद्धाच्या उन्मादाची लाट आज नाही. मात्र मध्य पंजाबात भारतविरोधी भावना सर्वात अधिक दिसून येतात.”

“तिथे जर जनमत बदललं तर कारवाई करण्यासाठी लष्करावर नागरी दबाव वाढलेला आपल्याला दिसून येईल. या संघर्षातून पाकिस्तानात लष्कर पुन्हा लोकप्रिय होईल.”

श्रीनगरमधील रस्त्यावर पहारा देत असलेले भारताच्या निमलष्करी दलाचे जवान

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. हुसैन देखील अशाच भावना व्यक्त करतात.

ते म्हणतात, “भारताबरोबरच्या सध्याच्या संघर्षामुळे पाकिस्तानी लष्कराला पाकिस्तानातील जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी संधी मिळते आहे. विशेषकरून शहरी मध्यमवर्गाकडून. या वर्गानं अलीकडच्या काळात लष्करावर राजकारणात हस्तक्षेप करण्याची टीका केली आहे.”

“लष्कराची संरक्षणासाठीची सक्रिय भूमिका मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियातून आधीच मोठी करून दाखवली जाते आहे. काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की भारताची सहा किंवा सात लढाऊ विमानं पाकिस्ताननं पाडली आहेत.”

ते पुढे म्हणतात, “या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची आवश्यकता असली, तरी त्यामुळे जनतेच्या काही भागात लष्कराची प्रतिमा मजबूत होते. जनतेचा हा भाग किंवा वर्ग बाह्य धोक्याच्या वेळेस राष्ट्रीय संरक्षणाच्या मांडणीभोवती पारंपारिकदृष्ट्या एकत्र होतो.”

4. भारत आणि पाकिस्तान या धोकादायक स्थितीतून मागे हटू शकतील का?

भारत पुन्हा एकदा वाढता संघर्ष आणि संयम यांच्यातील बारीक रेषेवरून वाटचाल करतो आहे.

पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर लगेचच, भारतानं मुख्य सीमा बंद केल्या, नागरिकांचं येणंजाणं थांबवलं, सिंधू जल करार स्थगित केला, राजनयिक अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितला आणि पाकिस्तानी नागरिकांचे बहुतांश व्हिसा स्थगित करून त्याला प्रत्युत्तर दिलं.

त्यानंतर सीमेच्या दोन्ही बाजूनं छोट्या शस्त्रांचा वापर होत गोळीबार झाला आहे. भारतानं पाकिस्तानच्या विमानांना त्याच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास मनाई केली आहे. पाकिस्ताननं देखील तसंच पाऊल उचलत भारताच्या विमानांसाठी स्वत:चं हवाई क्षेत्र बंद केलं आहे.

तसंच पाकिस्ताननं 1972 चा शांतता करार स्थगित केला आहे आणि त्यांच्या बाजूनं प्रत्युत्तर देत पावलं उचलली आहेत.

2019 मध्ये पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारतानं अशाच प्रकारची पावलं उचलली होती. त्यावेळेस भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेव्हरर्ड नेशन म्हणजे सर्वाधिक पसंतीचा देश हा दर्जा त्वरित रद्द केला होता.

तसंच पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं होतं आणि व्यापार आणि वाहतुकीचे महत्त्वाचे मार्ग बंद केले होते.

त्यानंतर भारतानं बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढला होता.


जम्मू आणि काश्मीरमधील उरीमध्ये गस्त घालताना भारतीय सुरक्षा दलाचे जवान

फोटो स्रोत, Getty Images

बालाकोटच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्ताननं हवाई हल्ला केला होता आणि त्या हवाई चकमकीत भारताचा वैमानिक अभिनंदन वर्धमान याला पाकिस्ताननं ताब्यात घेतलं होतं.

त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला होता. मात्र अखेर राजनयिक मार्गांनी दोन्ही देशांमधील तणाव निवळला होता. पाकिस्ताननं सद्भावना दाखवत अभिनंदनची सुटका केली होती.

“भारताची जुन्या पद्धतीच्या राजनयिक मार्गाला आणखी एक संधी देण्याची इच्छा होती. यात भारतानं व्यूहरचनात्मक आणि लष्करी उद्दिष्ट साध्य केलं होतं आणि पाकिस्ताननं त्यांच्या जनतेसमोर या संघर्षात विजय मिळवल्याचा दावा केला,” असं बिसारिया यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC