Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, X/Ramdas Tadas
वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांना देवळीतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. जानवं आणि सोवळं घातलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला गाभाऱ्यात जाता येणार नाही, असं सांगत प्रवेश नाकारण्यात आल्याचं भाजपचे माजी खासदार रामदास तडस म्हणाले.
पुजाऱ्यानं आतमध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर रामदास तडस यांनी पत्नी आणि कार्यकर्त्यांसोबत बाहेरूनच रामाचं दर्शन घेतलं. मात्र, या मंदिरात ग्रामस्थांनाही गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही का? वर्षभर मंदिरात कशी पुजा होते? जाणून घेऊयात.
हे राम मंदिर नेमकं कुठं आहे?
देवळीत रामदास तडस यांच्या घराच्या जवळ फार जुनं राम मंदिर आहे. इथं मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर स्टीलचा कठडा आहे. त्या कठड्याला लागून गणपतराव महाराजांची मूर्ती आहे. त्यामागे गाभारा असून तिथं राम, सिता आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे. या गर्भगृहाला लोखंडी दरवाजा आहे.
रामदास तडस यांना मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून का रोखलं?
याच राम मंदिरात रामनवमीनिमित्त रामदास तडस दर्शनासाठी गेले होते. यावेळी तडस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि भाजपचे काही कार्यकर्ते देखील होते. पण, या मंदिरात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं.
रामदास तडस म्हणतात, “मी 40 वर्षांपासून या मंदिरात राम लल्लांच्या दर्शनासाठी जातो. रामनवमीला नेहमी गाभाऱ्यात जाऊन राम लल्लांच्या मूर्तीची पूजा करून हार घालतो. त्यानंतर माझ्या कामांना सुरुवात करतो.”
“पण, यावेळी मला विचित्र अनुभव आला. मला पुजाऱ्यानं हेकेखोरपणानं राम लल्लांच्या दर्शनासाठी गर्भगृहात जाऊ दिलं नाही. मुकुंद चौरीकर हेच पुजारी आणि ट्रस्टी दोन्ही आहेत. तो वर्षभर इथं राहत नाही. काही दिवसांसाठी येतो आणि आम्हाला अशी वागणूक देतो. मी तेव्हाच पुजाऱ्याला समज दिली.”

फोटो स्रोत, X/Ramdas Tadas
पण, गाभाऱ्यात प्रवेश न देण्यामागे पुजाऱ्यांनी काय कारण दिलं? याबद्दल रामदास तडस बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणतात, “सुरुवातीला त्यांनी इथं सोनं खूप आहे असं कारण दिलं. पण, आम्ही आणि इतर भाविक सोनं चोरायला येत नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी दुसरं कारण दिलं.”
“आमच्या कार्यकर्त्याने विचारलं की, आम्हाला तुम्ही गाभाऱ्यात येऊ देत नाही, तर मग तुम्ही कसे तिथे आहात? तेव्हा पुजारी मुकुंद चौरीकर म्हणाला की, मी जानवं आणि सोवळं घातलं आहे, तुम्ही घातलं आहे का? तुम्हाला बाहेरूनच पुजा करायला लागेल.”
“यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला. पण, रामनवमीच्या दिवशी वाद वाढू नये म्हणून मी कार्यकर्त्यांना शांत केलं आणि बाहेरून दर्शन घेऊन निघून गेलो.”
देवाच्या गाभाऱ्यात परवानगीशिवाय आता जाऊ नये, अशी पाटी गाभाऱ्याच्या बाहेर लावण्यात आलेली आहे. रामदास तडस दर्शन घेत असतानाच्या फोटोंमध्ये ही पाटी स्पष्टपणे दिसतेय.
“स्पर्श करून इतर मूर्तींचं दर्शन घेतो, तर मग रामाचं का नाही?”
पण, रामदास तडस यांना रामाचं दर्शन घेण्यापासून रोखलं तर मग सर्वसामान्य नागरिकांचं काय? त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो का? राम नवमीच्या दिवशी जे मंदिरात गेले होते त्यांना काय अनुभव आला? याबद्दल आम्ही देवळीतल्या काही सामान्य नागरिकांसोबत बोललो.
अगदी मंदिराजवळच राहणाऱ्या एका 54 वर्षीय महिला नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, “मी राम मंदिरात नेहमी जाते. माझ्या घराच्या जवळच मंदिर आहे. त्यामुळे लहानपणापासून या मंदिरात आम्ही जातो. मंदिराच्या गाभाऱ्यात कोणालाच प्रवेश नाही आणि बाहेरून मूर्तींचं दर्शन चांगलं होतं. त्यामुळे गाभाऱ्यात जायचा प्रश्नही येत नाही.”

फोटो स्रोत, X/Ramdas Tadas
तर देवळीतले भोला जाधव हे किराणा दुकानदार आहेत. ते देखील या राम मंदिरात दर्शनासाठी जातात. रामनवमीच्या दिवशी तेही मंदिरात गेले होते. पण, आपण बाहेरूनच दर्शन घेतल्याचं ते सांगतात.
ते म्हणतात, “मी श्रावण किंवा कुठला सण-वार असेल तर मंदिरात जाऊन दर्शन घेतो. पण, मी गाभाऱ्यात कधीही गेलो नाही. बाहेरून 10 फुटांवरून नमस्कार करतो. ज्यांना गाभाऱ्यात जायचं आहे त्यांना जाऊ दिलं पाहिजे.”
“त्याच मंदिरात शिवजी आणि बजरंगबलीची मूर्ती आहे. त्या दोन्ही मूर्तींना आम्ही हात लावून दर्शन घेऊ शकतो. तर मग रामाचं दर्शन हात लावून का घेऊ शकत नाही?” असा प्रश्न भोला जाधव उपस्थित करतात.
देवाचं दर्शन घेण्यापासून कोणालाच थांबवू नये. स्पर्श करून, हात लावून देवाला नमस्कार केला की, मनाला समाधान मिळतं. त्यामुळे गाभाऱ्यात जाऊ दिलं पाहिजे, अशी मागणी भोला जाधव करतात.
“अभिषेक करणाऱ्यांना गाभाऱ्यात जाऊ देतात”
तर याच गावातले शेतकरी गिरीश काशीकर सांगतात की, पुजारी, ट्रस्टी आणि ज्यांना अभिषेक करायचा आहे अशा लोकांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो.
गिरीश काशीकर हे शरद जोशी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. ते देवळीत शेती करतात. तसेच या राम मंदिरात नेहमी दर्शनासाठी जातात. इथं गणपतराव महाराजांनी समाधी घेतली होती. त्यांच्यावर श्रद्धा आहे म्हणून नेहमी या मंदिरात जात असल्याचं काशीकर सांगतात.

काशीकर बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “आतमध्ये राम, सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे. त्यानंतर लोखंडी दरवाजाच्या बाहेर गणपतराव महाराजांची मूर्ती आहे. त्यानंतर स्टीलचा कठडा आहे. त्या कठड्याच्या बाहेर उभं राहून दर्शन घेता येतं. मी या मंदिरात नेहमी दर्शनासाठी जातो. पण, गाभाऱ्यात कधीच गेलो नाही.”
“मंदिरात अभिषेक करतात त्यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. तसेच ट्रस्टी पण गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. काल देखील ट्रस्टींनी आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. ट्रस्टी पँट शर्ट घालून दर्शन घेतात. मग त्यांना नियम नाही का? पण, आम्ही सगळे दरवाजाच्या बाहेर उभं राहून दर्शन घेतो.”
“प्रत्येकाला दर्शन घ्यायला आतमध्ये जाऊ द्यायला पाहिजे. आता ट्रस्टी सांगतात की, सोनं आहे तिथं. मग सीसीटीव्ही लावा. पण, सर्वसामान्यांना देवाचं दर्शन घ्यायला नियम कशाला लावता?”
तडस यावर कायदेशीर कारवाई करणार का?
रामदास तडस यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्यानंतर कार्यकर्ते देखील संतप्त झाले होते. तसेच रामदास तडस यांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर तडस यावर काही कायदेशीर कारवाई करणार आहेत का? असा प्रश्न आम्ही तडस यांना विचारला.
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “लोकांना माहिती झाल्यानंतर काही जण पुजाऱ्यांना जाब विचारायला गेले होते. पण, हे प्रकरण वाढवू नका. पुन्हा अशी चूक होणार नाही आणि रामनवमीच्या दिवशी सर्वांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवू, असं आश्वासन पुजाऱ्यानं दिलं. हे पुन्हा व्हायला नको इतकीच इच्छा आहे.”
पण, रामदास तडस यांना प्रवेश नाकारल्याच्या प्रकरणावरून आम्ही पुजारी आणि ट्रस्टी मुकुंद चौरीकर यांच्यासोबत संपर्क साधला. पण, यावर त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
महात्मा गांधींकडून वर्ध्यात देशातलं पहिलं मंदिर दलितांसाठी खुलं
वर्ध्यात बजाज कुटुंबाचं लक्ष्मी नारायण मंदिर होतं. पण, महात्मा गांधींनी हे मंदिर हरीजनांसाठी खुलं केलं होतं. त्यानंतर त्यांनी देशातील अनेक मंदिरं हरीजनांसाठी खुली केली. तसेच भारतात हरीजनांसाठी विद्यालय सुरू केले, असं वर्ध्यातील मगन संग्रहालयाच्या संचालिका विभा गुप्ता सांगतात.

फोटो स्रोत, X/Ramdas Tadas
तसेच बजाज फाऊंडेशनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधींच्या आदर्शानं प्रेरीत होऊन जमानलाल बजाज यांच्या पुढाकारानं 1928 मध्ये वर्ध्यातील लक्ष्मी नारायण मंदिर दलितांसाठी खुलं करण्यात आलं.
हे भारतातील पहिलं मंदिर होतं जे दलितांना पुजेसाठी खुलं करण्यात आलं होतं. या मंदिराला महात्मा गांधींनी भेट दिली आणि त्यानंतर ते भारत छोडो चळवळ सुरू करण्यासाठी मुंबईला गेले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC