Home LATEST NEWS ताजी बातमी ‘ब्रह्मोस’चा हल्ल्यात वापर केल्याचा पाकिस्तानचा दावा? भारतासाठी का खास आहे हे क्षेपणास्त्र...

‘ब्रह्मोस’चा हल्ल्यात वापर केल्याचा पाकिस्तानचा दावा? भारतासाठी का खास आहे हे क्षेपणास्त्र ?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

ब्राम्होस क्षेपणास्त्र

फोटो स्रोत, ANI

नुकत्याच झालेल्या संघर्षात भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा (मिसाइल) वापर केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

ब्रह्मोसला भारतीय लष्कराचं एक शक्तिशाली शस्त्र मानलं जातं. हे एक सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल आहे. ते पाणबुडी, जहाज, एअरक्राफ्ट किंवा जमिनीवर कुठूनही सोडता येऊ शकतं.

भारताने रशियासोबत भागीदारी करून ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. भारताच्या ब्रह्मपुत्रा आणि रशियाच्या मॉस्क्वा नदीवरून हे नाव देण्यात आले आहे.

ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. यूएव्हीप्रमाणे ते लक्ष्य बदलू शकतं.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वेग हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. ते आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने उडते.

हा वेगच त्याला अत्यंत घातक आणि शत्रूच्या रडारमध्ये कधीच न दिसणारे क्षेपणास्त्र बनवते.

त्याचे लक्ष्य इतके अचूक आहे की, 290 किलोमीटरच्या अंतरावरही ते लक्ष्याच्या एक मीटर व्यासाच्या आतच कोसळते.

डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ रवी गुप्ता म्हणतात की, “सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे क्षेपणास्त्र सुपरसॉनिक वेगानं उडते. यामुळेच हे क्षेपणास्त्र खास ठरते.”

ते म्हणतात, “हे एक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचे इंजिन शेवटपर्यंत सुरू राहते. या काळात त्याचे लक्ष्य यूएव्हीप्रमाणे बदलता येऊ शकते.”

रवी गुप्ता यांनी म्हटलं की, त्याचा ‘सीकर सेन्सर’ इतका प्राणघातक आहे की, ते अनेक समान लक्ष्यांपैकी खरं लक्ष्य ओळखून ते नष्ट करण्यास सक्षम आहे.

रवी गुप्ता यांच्या मते, “त्याचे ‘स्टीव्ह डायव्हिंग’ तंत्रज्ञान अप्रतिम आहे. या क्षेपणास्त्रात जमिनीपासून काही मीटर उंचीवर उडण्याची आणि समोरील अडथळे पार करून शत्रूवर अचानक हल्ला करण्याची क्षमता आहे.”

रशियाचे सहकार्य

ब्रह्मोस डॉट कॉम नुसार, या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) तत्कालीन प्रमुख डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रशियाचे उप संरक्षण मंत्री एनवी मिखाइलोव्ह यांनी 12 फेब्रुवारी 1998 रोजी स्वाक्षरी केली.

त्यानंतर ब्रह्मोस एरोस्पेस कंपनीची स्थापना करण्यात आली. सध्या ही कंपनी क्षेपणास्त्रांची निर्मिती करत आहे. ब्रह्मोस 290 किलोमीटरपर्यंत उडू शकते. हे 10 मीटर ते 15 किलोमीटर उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम आहे.

याची पहिली यशस्वी चाचणी 12 जून, 2001 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर या क्षेपणास्त्रमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

डीआरडीओचे तत्कालीन प्रमुख डॉ. एपीजे अब्दुल कलाम

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय नौदलाने 2005 मध्ये प्रथमच आयएनएस राजपूतवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली. 2007 मध्ये भारतीय लष्करातही त्याचा समावेश करण्यात आला.

त्यानंतर भारतीय वायुसेनेने सुखोई-30 एमकेआय विमानातून हवेत लॉन्च करणारी आवृत्ती स्वीकारली.

सध्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वजन 2900 किलोग्रॅम आहे. यामुळं लढाऊ विमानांवर एकावेळी एकच क्षेपणास्त्र डागता येते. त्याचं वजन कमी केल्यानंतर एका ऐवजी पाच क्षेपणास्त्रे बसवता येतील.

आता ब्रह्मोसचा नवीन व्हेरिएंट ब्रह्मोस एनजी तयार केला जात आहे. याचं वजन 1260 किलो आणि रेंज 300 किलोमीटर असेल.

रवी गुप्ता सांगतात की, “ब्रह्मोसची 2005 च्या आसपास चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी, त्याच्या वेगामुळे होणारे नुकसान मोजण्यासाठी आम्ही युद्धसाहित्याशिवाय (वॉरहेड) एका जुन्या जहाजावर त्याची चाचणी केली होती. त्याचा परिणाम अत्यंत घातक होता.”

ते सांगतात की, या क्षेपणास्त्राने सर्वात आधी पाण्याच्या पृष्ठभागावर जाणाऱ्या जहाजाला जवळजवळ कापलं. या हल्ल्यामुळे जहाजाचे दोन तुकडे झाले आणि काही मिनिटांतच ते जहाज बुडाले.

ते म्हणतात की, “अशा प्रकारची क्षमता एखाद्या क्षेपणास्त्रात असेल, तर त्याचा हल्ला किती प्राणघातक असेल याचा सहज अंदाज लावता येऊ शकतो.”

‘ब्रह्मोस’ आणखी घातक होणार

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने (डीआरडीएल) 21 जानेवारी 2025 रोजी स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी केली. हे इंजिन क्षेपणास्त्रांमध्ये वापरले जाते.

रवि गुप्ता सांगतात, “ब्रह्मोसची गती आधीच खूप वेगवान आहे, आता जर त्यात स्क्रॅमजेट इंजिन बसवले, तर हे अत्यंत घातक आणि मारक होईल. हे आवाजाच्या गतीपेक्षा आठ पट वेगाने उडेल.”

 स्क्रॅमजेट इंजिनमुळे क्षेपणास्त्राची गती आवाजाच्या आठ पट वाढेल.

फोटो स्रोत, PIB

त्यांच्या मते, “याचा पहिला परिणाम असा होईल की, यानंतर क्षेपणास्त्र रडारच्या पकडीत येणार नाही आणि जोपर्यंत शत्रू कोणताही प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देण्याचा विचार करेल, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल.”

ते सांगतात की, दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे क्षेपणास्त्र हल्ल्याचा होणारा परिणाम अनेक पटींनी वाढेल.

संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ कर्नल मनीष ओझा (निवृत्त) म्हणतात की, ब्रह्मोसला विविध चाचण्यांनंतर भारताने अत्यंत घातक, अचूक आणि लांब अंतरापर्यंत हल्ला करणारे क्षेपणास्त्र बनवले आहे.

ते म्हणाले, “सुखोईमध्ये बसवल्यानंतर या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आणखी वाढली आहे. सध्या त्याला आणखी मारक बनवण्यासाठी तंत्रज्ञान अपग्रेड केले जात आहे.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC