Home LATEST NEWS ताजी बातमी बेडकाचं विष किती धोकादायक? रशियातील विरोधी पक्षनेते नवालनींना याच विषानं मारलं?

बेडकाचं विष किती धोकादायक? रशियातील विरोधी पक्षनेते नवालनींना याच विषानं मारलं?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

रशियतील विरोधी नेत्याची हत्या डार्ट फ्रॉग विषाने झाल्याचा दावा ब्रिटनने केला आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

रशियातील विरोधी पक्षनेते अलेक्सी नवालनी यांची हत्या ‘डार्ट फ्रॉग’च्या विषापासून विकसित झालेल्या एका टॉक्सिनने करण्यात आली आहे, असा दावा ब्रिटन आणि त्यांच्या युरोपीयन सहकारी असलेल्या मित्रदेशांनी केला आहे.

सायबेरियातील एका ‘पेनल कॉलोनी’मध्ये नवालनी यांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर दोन वर्षांनी, ब्रिटन आणि ब्रिटनच्या मित्र राष्ट्रांनी त्यांच्या शरीरातून घेतलेल्या नमुन्यांच्या विश्लेषणाच्या आधारे रशियन सरकारला दोषी ठरवलं आहे.

म्युनिक सुरक्षा परिषदेत बोलताना, ब्रिटिश परराष्ट्र सचिव यवेट कूपर म्हणाल्या की, तुरुंगात असलेल्या नवालनींच्या विरोधात विष वापरण्याचा हेतू, सोय आणि संधी ही ‘फक्त रशियन सरकारकडेच होती’.

TASS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने हे निष्कर्ष ‘दुष्प्रचार मोहिमे’चा भाग असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत.

मात्र, ब्रिटिश परराष्ट्र सचिव यवेट कूपर म्हणाल्या की, नवालनी यांच्या शरीरात ‘एपिबॅटिडिन’ नावाचं विष असण्यामागचं कोणतंही सुस्पष्ट असं कारण सापडलेलं नाही.

कूपर यांच्या या घोषणेनंतर, ब्रिटन, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड्स यांनीही एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

या आठवड्याच्या शेवटी झालेल्या परिषदेत कूपर यांनी नवालनी यांच्या पत्नी युलिया नवालनी यांचीही भेट घेतली.

“रशियन सरकार नवालनी यांच्याकडे धोका म्हणून पाहत होतं. या प्रकारच्या विषबाधेचा वापर करून, रशियन सरकारने दाखवून दिलंय की, त्यांच्याकडे किती घृणास्पद साधनं आहेत आणि ते राजकीय विरोधकांपासून किती भयभीत आहेत,” असंही कूपर म्हणाल्या.

अलेक्सी नवालनी सायबेरियातील तुरुंगात कैद होते?

एका संयुक्त निवेदनात, मित्रपक्षांनी म्हटलं आहे की, “सायबेरियन तुरुंगात असताना नवालनी यांना लक्ष्य करण्यासाठी या प्राणघातक विषाचा वापर करण्यात आला. त्यासाठीची सोय, हेतू आणि संधी फक्त रशियन सरकारकडेच होती. म्हणूनच, आम्ही त्यांच्या मृत्यूसाठी पूर्णपणे रशियन सरकारला जबाबदार धरतो.”

“एपिबॅटिडिन हे विष दक्षिण अमेरिकेतील जंगली डार्ट बेडकांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतं. बंदिवासात प्रजनन करणारे डार्ट बेडूक हे विष तयार करत नाहीत तसेच ते रशियामध्ये नैसर्गिकरित्या आढळत नाही,” असंही निवेदनात म्हटलं आहे.

अलेक्सी नवालनी हे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रतिस्पर्धी आणि स्पष्टवक्ते टीकाकार होते.

फोटो स्रोत, Getty Images

नवालनी यांच्या ‘असाधारण धाडसाचं’ कौतुक करताना, ब्रिटिश पंतप्रधान किअर स्टारमर म्हणाले की, सत्य उघड करण्याचा त्यांचा दृढनिश्चय आता एक वारसा म्हणून त्यांच्यामागे उरलेला आहे.

रशियातील स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी लढताना मारल्या गेलेल्या नवालनी यांना त्यांचा देश श्रद्धांजली अर्पण करतो आहे, असं फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोइस यांनी म्हटलं आहे.

रशियातील भ्रष्टाचाराविरोधात मोहिम चालवणारे आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते बनलेल्या नवालनी यांचं 16 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 47 व्या वर्षी तुरुंगात अचानक निधन झालं.

2020 मध्ये त्यांना नोविचोक नर्व्ह एजंटकडून विषबाधा करण्यात आली. त्यांच्यावर जर्मनीमध्ये उपचार झाले आणि रशियाला परतल्यानंतर विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली.

‘अत्यंत दुर्मिळ विष’

ज्या एपिबॅटिडिन विषाचा वापर झाला असल्याचा दावा ब्रिटन आणि त्यांच्या युरोपीय मित्रदेशांनी केला आहे, ते विष सर्वांत आधी उत्तर-दक्षिण अमेरिकेतील विषारी अशा डार्ट बेडकांच्या प्रजातीमधून प्राप्त करण्यात आलं होतं.

खरं तर एपिबॅटिडिनवर पूर्वी वेगळ्या कारणासाठी संशोधन झालेलं आहे.

वेदना कमी करण्यासाठी आणि फुफ्फुसांच्या दाहक स्थितींपासून आराम देण्यासाठी म्हणून ते वापरता येईल का, यासाठी त्यावर संशोधन झालेलं आहे.

असं संशोधन करण्यात आलेलं असलं तरीही, वैद्यकीय वापरासाठी ते खूप विषारी मानलं जात होतं.

बीबीसी रशियनशी बोलताना विष तज्ज्ञ जिल जॉन्सन म्हणाले की, एपिबॅटिडिन हे विष ‘मॉर्फिनपेक्षा 200 पट जास्त प्रभावी’ आहे.

ज्या एपिबॅटिडिन विषाचा वापर झाला असल्याचा दावा ब्रिटन आणि त्यांच्या युरोपीय मित्रदेशांनी केला आहे, ते विष सर्वांत आधी उत्तर-दक्षिण अमेरिकेतील विषारी अशा डार्ट बेडकांच्या प्रजातीमधून प्राप्त करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

ते म्हणाले की, एपिबॅटिडिन हे विष मध्यवर्ती मज्जासंस्थेतील रिसेप्टर्सवर परिणाम करतं. त्यामुळे ‘मांसपेशींमध्ये झटका येणं, अर्धांगवायू, हृदय गती मंदावणं, श्वसनक्रिया बंद पडणं आणि शेवटी मृत्यू होणं,’ अशी प्रक्रिया होऊ शकते.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, हे अत्यंत दुर्मिळ न्यूरोटॉक्सिन फक्त एकाच जंगली बेडकाच्या प्रजातीमध्ये खूप कमी प्रमाणात आढळतं. आणि जेव्हा या प्रजातीचा बेडूक एक विशिष्ट प्रकारचा आहार घेतो तेव्हाच ते तयार होतं.

संशोधकांचा असा विश्वास आहे की, बेडकांना ते त्यांच्या आहारातून प्राप्त होतं. कारण, वेगवेगळ्या अधिवासातील प्राण्यांमध्ये विषाचं प्रमाण वेगवेगळं आढळलं आहे आणि बंदिवासात पाळण्यात आलेल्या बेडकांमध्ये ते आढळलेलं नाही.

‘एखाद्या व्यक्तीला असं विष देण्याचा हा एक अत्यंत दुर्मिळ मार्ग’ आहे, असंही जॉन्सन यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले की, “योग्य ठिकाणी योग्य अल्कलॉइड्स तयार करण्यासाठी योग्य आहार घेत असलेला जंगली बेडूक शोधणं ही गोष्ट जवळजवळ अशक्य आहे.”

पत्नी युलिया यांचा दावा

शनिवारी झालेल्या या घोषणेपूर्वी, नवालनी यांच्या पत्नी युलिया नवालनाया यांनी सातत्यानं सांगितलं होतं की, 2024 मध्ये आर्क्टिक पेनल कॉलनीमध्ये शिक्षा भोगत असताना त्यांच्या पतीला विष देऊन मारण्यात आलंय.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, नवालनाया म्हणाल्या होत्या की, दोन देशांमधील प्रयोगशाळांमध्ये तस्करी करून नेण्यात आलेल्या जैविक नमुन्यांच्या विश्लेषणातून असं दिसून आलंय की, त्यांच्या पतीची हत्याच झाली आहे.

त्यांनी या कथित विषाच्या नमुन्यांबद्दल किंवा विश्लेषणाबद्दल तपशील दिलेले नाहीत, परंतु दोन्ही प्रयोगशाळांनी त्यांचे निष्कर्ष सार्वजनिक करावेत, असं आव्हानही त्यांनी दिलं.

या घोषणेवर प्रतिक्रिया देताना नवालनाया म्हणाल्या की, “पहिल्या दिवसापासूनच मला खात्री होती की, माझ्या पतीला विषबाधा करण्यात आली आहे. पण आता तर त्याचा पुरावाही मिळाला आहे.

 नवालनाया म्हणाल्या होत्या की, दोन देशांमधील प्रयोगशाळांमध्ये तस्करी करून नेण्यात आलेल्या जैविक नमुन्यांच्या विश्लेषणातून असं दिसून आलंय की, त्यांच्या पतीची हत्याच झाली आहे.

फोटो स्रोत, German Federal Foreign Office via Getty Images

“युरोपीय देशांनी दोन वर्षांपासून अत्यंत सावधानी बाळगत काम केल्याबद्दल आणि सत्य उजेडात आणल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.”

“ही सर्व विधानं पश्चिमात्त्य देशांमध्ये असलेल्या गंभीर समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठीची एक प्रचार मोहीम आहे,” असं रशियन सरकारच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या आहेत, असं सरकारी वृत्तसंस्था TASS ने म्हटलं आहे.

नवालनी जिवंत असताना त्यांचं नाव घेण्याचं टाळणारे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मात्र त्यांच्या मृत्यूनंतर फार कमी शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

त्यांनी नवालनी यांच्या मृत्यूच्या एका महिन्यानंतर म्हटलं की, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही ‘नेहमीच एक दुःखद घटना’ असते.

मृत्यूच्या आधी, नवालनी तीन वर्षांपासून तुरुंगात होते. त्यांना कथित खोटारड्या आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं आणि मृत्यूच्या अगदी काही काळ आधी त्यांना ‘पेनल कॉलोनी’मध्ये हलवण्यात आलं होते.

रशियन सरकारच्या म्हणण्यानुसार, सायबेरियातील एका पेनल कॉलनीमध्ये थोडेसं फिरल्यानंतर 47 वर्षीय नवालनी यांना अस्वस्थ वाटलं. नंतर ते कोसळले आणि त्यानंतर ते पुन्हा कधीही शुद्धीवर आले नाहीत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC